नवीन लेखन...

आधुनिक वानप्रस्थाश्रम!

वानप्रस्थासाठी आता वनात जाण्याची जरूरी नाही. वेळ मिळेल तेव्हा, शक्य होईल तेवढी निसर्गात भटकंती करावी. घरात निदान छोटी बाग तयार करून त्याची निगा राखावी. सूर्य, चंद्र, चांदण्या पहाव्यात. संगीतात मन रमवावे. कमी खावे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.


या जन्मावर, या जगण्यावर  शतदा प्रेम करावे

असे कविवर्य मंगेश पाडगावकर सांगतात. माणसाचा जन्म मिळणे ही एक सुवर्ण संधी असते. कारण या जन्मातच माणसाला स्वत:चे आयुष्य आनंदी करता येते आणि इतरांच्या जीवनातही आनंद फुलविता येतो. म्हणून जीवन कसे जगावे हे आपण जाणून घेऊया. या जन्मावर, या जगण्यावर प्रेम करूया.

पूर्वी माणसाला एवढे आयुष्य मिळत नसे. आता राहणीमान सुधारले म्हणून म्हणा किंवा बहुतेक आजारांवर औषधोपचार उपलब्ध असल्यामुळे म्हणा , माणूस दीर्घायुषी होत आहे. काही लोक वृद्धापकाळी आनंदाने जगत असतात तर काही ‘नको रे बाबा ही वृद्धावस्था’ असे म्हणत कुढत आयुष्य कंठीत असतात. कोणी भेटायला आला तर ‘देवा, सोडव रे बाबा मला या जगातून!’ असे म्हणत असतात. पण लगेच अधिक जगण्यासाठी डॉक्टरने दिलेली औषधे घेत असतात. प्रत्यक्षात प्रत्येकाला जास्तीत जास्त जगावेसे वाटत असते.

प्रत्येकाला वाटत असते की देवाने आपल्या घरी रहावे. पण देवाच्या घरी जायची कुणाची तशी तयारी नसते. ‘ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे.’ हे एक चिरकाल सत्य आहे. आज आपण वृद्धापकाळी सांगितलेला वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम पाहूया.

प्राचीनकाळी 1) ब्रह्मचर्याश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) संन्यासाश्रम असे जीवनातील चार आश्रम सांगितलेले आहेत. आश्रम ही एक आर्यांनी सांगितलेली व्यवस्था आहे. प्रत्येक आश्रमातील कालावधीत 25 वर्षांचा मानला गेला आहे.

आश्रम हा शब्द ‘श्रम्’ = कष्ट करणे या धातूपासून साधलेला आहे. आश्रमयन्ति अस्मिन् इति आश्रमः। म्हणजे ज्यामध्ये, ज्याच्या योगाने (माणसांना) श्रम करावे लागतात. सोप्या शब्दात सांगायचे तर आश्रम म्हणजे ज्याच्या आधारे कर्तव्यपालनाचे सर्व परिश्रम करावे लागतात तो आश्रम होय. ब्रह्मचर्याश्रमात 25 वर्षे ब्रह्मचर्यापालन करून शिक्षण घेणे महत्त्वाचे असते. गृहस्थाश्रमात विवाह करून चांगली संतती निर्माण करणे, नीतीने-प्रामाणिकपणे वागून, कष्ट करून कुटुंबाचे पालन करण्याचे कर्तव्यपालन करावयाचे असते. गृहस्थाश्रम 25 वर्षांचा असतो. त्यानंतर स्वीकारायचे असतात – वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम! पूर्वी वानप्रस्थाश्रमामध्ये वनात रहायला लागत असे. तसेच प्रत्यक्ष संन्यास घेऊन संन्याश्रम स्वीकारावा लागत असे. पूर्वी हे ठीक होते. आधुनिक काळात आपण आपल्या जीवन पद्धतीत बदल करून हे दोन्ही आश्रम कसे स्वीकारू शकतो याबद्दल माहिती करून घेऊया.

वानप्रस्थाश्रम

गृहस्थाश्रममपहाय  गृहीतमुनिवृत्तिरसंन्यत:। – ‘गृहस्थाश्रमाचा त्याग करून पण संन्यास न घेता मुनिवृत्तीने वनात राहणे म्हणजे वानप्रस्थ होय’ असे सांगण्यात आले आहे. तसेच पुत्रमुत्पाद्य वनवासं कृत्वा अकृष्टपचफलादि भक्षयित्वा ईश्वराराधनं करोति य: वानप्रस्थ:। पुत्र उत्पन्न करून आणि नंतर वनवासाला जाऊन न नांगरलेल्या भूमीतून फळे-मुळे इत्यादी भक्षण करून जो ईश्वराची आराधना करतो, तो वानप्रस्थ होय.

पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमात राहिल्यावर आणि नातवंडे झाल्यावर नंतर घरदार सोडून वनात राहायला जाणे आणि तपश्चर्या करून आत्मकल्याण साधण्याचा प्रयत्न करणे असा वानप्रस्थाश्रमाचा हेतू आहे. वानप्रस्थान वयाच्या 75 वर्षांपर्यंत करावयाचा असतो. वानप्रस्थात आत्मशुद्धी व तत्त्वज्ञान या गोष्टी मिळवायच्या असतात. त्यात शारीरिक सुखोपभोगांचा त्याग करून तात्त्विक विचारात निमग्न राहायचे असते. त्यासाठी वानप्रस्थाने अग्नी, ऊन आणि पाऊस सहन करावे, दाढी-मिशा व जटा वाढवाव्या. प्राय: मौन धारण करावे, ज्ञानप्राप्तीसाठी आरण्यके व उपनिषदे यांचे अध्ययन करावे, तत्त्वज्ञान विषय समजून घ्यावा असे सांगण्यात आले आहे.

वानप्रस्थात कसे वागावे याविषयी अनेक प्राचीन  ऋषि-मुनींनी वेगवेगळे सांगितले आहे.

मनू म्हणतात, ‘गृहस्थाला नातवंडे झाली की त्याने वानप्रस्थ करावा. वाटल्यास पत्नीला बरोबर घेऊन जावे किंवा तिला मुलांच्या स्वाधीन करून जावे. प्राणधारणे पुरतेच अन्न मिळवावे.’ याज्ञवल्क्य म्हणतात, ‘त्रिकाल स्नान करावे. स्वाध्याय करावा. भिक्षा मागून आठ घास खावे. उपकारक आणि अपकारक यांच्या विषयी समवृत्ती ठेवावी. तप करावे.’

वसिष्ठ म्हणतात, ‘जटा व मृगचर्म धारण करावे. नांगरलेल्या जमिनीवर राहू नये. भूमीतील फळे व धान्ये खाऊ नयेत. क्षमाशील असावे.’

शंख म्हणतात, ‘अग्नीची उपासना करावी. जे उपलब्ध होईल तेच वापरावे.’

आपस्तंब म्हणतात, ‘शेतात पडलेल्या कणसांवर उपजीविका करावी. कमीतकमी आहार घ्यावा.’

कुंती, गांधारी, सत्यवती या वानप्रस्थ स्त्रिया होत.

अंतिम सत्याचे ज्ञान मिळवून नि:श्रेयस किंवा मोक्ष मिळवणे हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ जीवनाचे ध्येय असल्याचे सर्व विचारवंतांनी म्हटले आहे. ब्रह्मचर्यात शिक्षण, गृहस्थाश्रमात कर्मयोग आणि वानप्रस्थात आत्मज्ञान मिळवून मोक्ष प्राप्त करून घ्यावा, असे म्हटले आहे. आधुनिक कालात यज्ञ, तप आणि दान ही जीवनातील त्रिसूत्री सांगितलेली आहे. आधुनिक काळात त्याचा अर्थ आधुनिक काळाप्रमाणे लावून तसे आचरण ठेवले पाहिजे. यज्ञ म्हणजे कर्म! आपले कर्तव्यकर्म प्रामाणिकपणे करणे म्हणजे यज्ञ करणे होय. तप म्हणजे कठोर मेहनत! प्रत्येक गोष्ट मन लावून, कठोर मेहनत करणे आपले तप होय. आयुष्यात जे आपण  कमवू, त्या संपूर्ण उत्पन्नावर आपला अधिकार नसतो. त्यातून काही भाग आपण समाजातील प्रामाणिकपणे जगणार्या दीन दुबळ्यांना दान दिलाच पाहिजे.  माणसाने माणसांशी आणि निसर्गातील सर्वांशी माणसाप्रमाणे वागावे  हीच आपल्या सनातन धर्माची शिकवण आहे.

आधुनिक काळात वानप्रस्थासाठी प्रत्यक्ष वनात जाण्याची जरूरी नाही. घरात राहूनही वानप्रस्थ स्वीकारू शकतो. मनाचा वानप्रस्थाश्रम स्वीकारू शकतो. आपल्या जगण्यात तसा बदल करू शकतो.

(1) अनारोग्य – वृद्धापकाळीही  आजारी पडणे  परवडणारे नसते. औषधोपचारासाठी खर्च होतोच शिवाय घरातील  तरुणवर्गाचा वेळ वाया जातो. संपूर्ण जग वेगात चालत आहे. सध्या तर घरातील तरुणांना वेळ देणे परवाडणारे नसते. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आहार, व्यायाम, औषधोपचार, शरीराची- परिसराची स्वच्छता आणि विश्रांती याकडे आपले आपणच लक्ष देण्याची गरज आहे.

(2) आसक्ती – वानप्रस्थ जगताना आसक्ती ठेवायची नाही. आसक्ती हेच दु:खाचे मूळ असते.  मी मागेन तेवढे मला मिळालेच पाहिजे. मी मागेन त्याचवेळी मला मिळाले पाहिजे आणि फक्त मलाच मिळाले पाहिजे असे वाटणे म्हणजेच आसक्ती! या गोष्टी सफल झाल्या नाहीत म्हणजे दु:ख वाट्याला येते. वार्धक्यात दु:ख अधिक वेदनादायक असते. आसक्ती ठेवली नाही म्हणजे सुखी आणि आनंदी जीवन प्राप्त होते.

(3) अज्ञान –  पुढची पिढी खूप हुशार आहे. आपल्यापेक्षा आपली मुले हुशार आहेत. आपल्या मुलांपेक्षा आपली नातवंडे हुशार आहेत. तुमच्या घरात तुम्हालाही हा अनुभव येत असेल. अज्ञानी माणूस निर्भयतेने जगू शकत नाही. माणूस निर्भय असेल तरच सुखी -आनंदी जीवन जगू शकतो. अनीतीने वागलो तर सतत भीती वाटत राहते. नीतीने – प्रामाणिकपणे जगलो तर आपणास निर्भयता प्राप्त होते. छंद माणसाला हे प्राप्त करून देतो. म्हणून वृद्धापकाळी संगणक, मोबाईल यांचे ज्ञान मिळवायला पाहिजे. आपण आधुनिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वाचन केले पाहिजे. एखादी कला जोपासायला पाहिजे. त्यामुळे निर्भयता व आनंदाची प्राप्ती होऊ शकते.

(4) अहंकार – वृद्धापकाळी अहंकार माणसास दु:ख देतो. त्यामुळे  मी, माझे, माझ्या वेळी  हे शब्द वापरू नये. या जगात माझे असे काहीही नसते. आपण या जगात, या घरात, या नातेवाईकात काही वर्षांपुरते आलेले पाहुणे असतो. आपले शरीरही शेवटी आपल्याजवळ रहात नाही. तेही आपल्याला सोडून जाते. मृत झाल्यावर लोक आपल्या शरीरालाही ‘अमुकाची बॅाडी’ म्हणून ओळखू लागतात.

(5) रडत/ कुढत – काही माणसे वृद्धापकाळी सतत रडत, कुढत, तक्रार करीत राहतात. त्यामुळे त्यांना त्रास होतोच, त्यापेक्षा जास्त त्रास घरातील इतरांना होत असतो. आजूबाजूच्या इतरांना होत असतो. नेहमी हसरा चेहरा ठेवून आनंदी रहावे. माणूस ज्यावेळी जन्मतो, त्यावेळी तो रडतो आणि इतर लोक मूल जन्माला आले म्हणून हसत असतात. माणसाने आयुष्यात काही गोष्टी अशा कराव्यात की तो हसत हसत जाईल आणि तो गेल्यामुळे इतर लोक विरहामुळे रडतील. पण हे कधी होईल? आपण इतरांसाठी जगलो तर! वानप्रस्थासाठी आता वनात जाण्याची जरूरी नाही. वेळ मिळेल तेव्हा, शक्य होईल तेवढी निसर्गात भटकंती करावी. घरात निदान छोटी बाग तयार करून त्याची निगा राखावी. सूर्य, चंद्र, चांदण्या पहाव्यात, संगीतात मन रमवावे. कमी खावे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

 संन्यास आणि मोक्ष

या आधुनिक काळात संन्यास आणि मोक्ष यांचा मूळ हेतू लक्षात घ्यावयास हवा. मनाने संन्यास घेता येतो. जिवंतपणी मोक्ष समजून घेता येतो.

संन्यास म्हणजे काम्य कर्मांचा त्याग! याविषयी गीतेतले वचन असे आहे –

काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु: ॥

– काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास होय, असे विद्वान म्हणतात. संन्यास म्हणजे सर्वसंग परित्याग करणे, वैराग्य धारण करणे. कर्मफलाचा त्याग करायचा. इतरांसाठी जगायचे. संन्यासी हा निर्भय आणि अभयदानी असतो. तो निरपेक्ष असतो. निःस्पृही असतो. अध्यात्मशील असतो. मनन, चिंतन आणि तप हे त्याच्या ब्रह्मज्ञानाला साधक असते. ममत्व आणि आसक्ती लोप पावलेली असते. तो वैरभाव करीत नाही. सर्वांचा आदरच करतो. क्रोध त्याच्यापाशी नसतो. सर्वांना अभय देतो. संन्यासी वृत्ती जाणून ती आपल्यात आपण आणू शकतो.

मोक्ष म्हणजे मुक्ती, म्हणजे सुटका! संसारात त्रिविध तापांनी पोळणार्या जीवाची त्यातून सुटका होणे याला मोक्ष म्हणतात. अविद्येपासून मुक्ती मिळवायला हवी. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम् – ज्ञानानेच मोक्ष मिळतो.

शास्त्रीय संगीताचे शिक्षण आपण घेतले असेल तर शास्त्रीय संगीताची मैफल आपण अधिक आनंदाने अनुभवू शकतो. क्रिकेटच्या खेळाचे ज्ञान असेल तर आपण क्रिकेटची मॅच अधिक एन्जॅाय करू शकतो. तसेच जीवनाचे आहे. जीवन कसे जगायचे हे आपण एकदा समजून घेतले तर ते आपण आपले जीवन अधिक आनंद व समाधानाने जगू शकतो.

–दा. कृ. सोमण

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..