नवीन लेखन...

बहुचर्चित अमेरिकन ऑपेरा गायिका मारिया कलास

अमेरिकेच्या ऑपेराविश्वात मारिया कलासचे नाव गायिका म्हणून श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्वही बहुचर्चित आणि वादळी स्वरूपाचे ठरले होते. कलावंताचा भणंगपणा आणि भावनांची तीव्रता तिच्या स्वभावात होती. रागालोभावर ती ताबा ठेवू शकली नाही. आजची व्यावसायिकता तिच्या स्वभावात त्या काळी नसावी. टोकाला जाणाऱ्या स्वभावाच्या कलावंताच्या नशिबात जे येते ते सारे मारिया कलासच्या नशिबी आले. अफाट कीर्ती, प्रसिद्धी, लग्न, घटस्फोट, प्रेमप्रकरण आणि प्रेमभंग! ज्या क्षेत्रात फुले वेचली त्या क्षेत्रात गोवऱ्या वेचण्याचे नशिबी येणे, एकाकीपणा आणि व्यसनाधीनता यांनी अल्पायुष्यात जीवनाची अखेर होणे, हे सारे मनस्वी, हेकेखोर, तीव्र भावनावेगात वाहून जाण्याची प्रवृत्ती असलेल्या कलावंतांच्या नशिबी लिहिलेलेच असते. मारिया कलास या गोष्टींना अपवाद नव्हती.

मारिया कलास ही २ डिसेंबर १९२३ रोजी ग्रीक आईवडिलांच्या पोटी न्यूयॉर्कमध्ये जन्मास आली होती. तिच्या आईचे नाव इव्हॅनजेलिना आणि वडिलांचे नाव जॉर्ज होते. तिचे स्वतःचे मूळ नाव सेसिलिया सोफिया ॲना मारिया कालोगेरोपुलोस (Kalogeropoulos) असे लांबलचक होते. मारियाच्या जन्मापूर्वी चार महिने अगोदर तिचे आईवडील ग्रीसमधून न्यूयॉर्कमध्ये आले होते. १९३७ मध्ये मारिया तिच्या आईबरोबर ग्रीसला परतली होती. तेथे गेल्यावर तीन वर्षे मारियाने गायनाचे प्रशिक्षण घेतल्यावर अथेन्समधील थिएटर्समधील व्यावसायिक स्वरूपाच्या विविध भूमिका तिने केल्या. १९४२ पर्यंत अॅथेन्समध्ये नावलौकिक मिळवून ती न्यूयॉर्कमध्ये ऑपेराविश्वात पदार्पण करण्यास गेली होती. वयाच्या १८व्या वर्षीच तिने तिचा चाहतावर्ग निर्माण करून समीक्षकांचीही वाहवा मिळविली होती.भावनांची तीव्रता आणि कलात्मकता तिच्या गाण्यात आणि अभिनयात होती. टोस्का संगीतिकेतील आजारी आणि उंच आवाजात गाणाऱ्या गायिकेची तिची पहिलीच भूमिका अथेन्समधील रसिकांना खूप आवडली होती. तिचा आवाज निर्दोष होता अशातली बाब नव्हती; पण तिच्या आवाजातून विविध भावभावना व्यक्त करण्याचे जबरदस्त सामर्थ्य होते.

१९४८-४९ साली मारियाने व्हेनिसला दौरा केला होता. इटलीमध्येच २१ एप्रिल १९४९ रोजी तिने तिच्याहून ३० वर्षे वयाने जास्त असलेल्या मेनेघिनी नामक माणसाशी लग्न केले होते. मारियाची लोकप्रियता चढत्या श्रेणीत होती. तिचे प्रयोग हाऊसफुल्ल होत होते. १९५१ मध्ये मारिया ही इटलीमधील मिलान शहरातील लास्काला या अत्यंत दर्जेदार ऑपेरा हाऊसमधील श्रेष्ठ कलावंत व गायिका म्हणून प्रसिद्ध झाली होती. १९५२ च्या जुलै महिन्यात एमीचे दिग्दर्शक असलेल्या वॉल्टर लेगी यांच्याबरोबर अपवादात्मक ठराव्या अशा करारपत्रावर मारियाने स्वाक्षरी केली होती. करारपत्र झाल्यानंतर काही दिवसांनीच वॉल्टर लेगी, त्याची पत्नी आणि जर्मनीतील श्रेष्ठ गायिका एलिझाबेथ इटलीतील व्हेरोना स्टेडियममध्ये मारियाचा ‘ला ट्राविएटा’चा प्रयोग पाहण्यास गेले होते. तो प्रयोग झाल्यावर एलिझाबेथने मारियाचा गौरव ज्या शब्दांत केला तसा तिचा गौरव त्यापूर्वी कुणी केलेला नव्हता. एलिझाबेथ ही ‘ला ट्राविएटा’मध्ये गात असे. परंतु मारियाचे गाणे ऐकल्यावर ती म्हणाली, “यापुढे मी ‘ला ट्राविएटा’त पुन्हा कधीही गाणार नाही!” आपल्या या निर्णयाचे स्पष्टीकरण विचारले असता ती म्हणाली होती, “जेव्हा एखादा समकालीन कलावंत एखादी भूमिका अत्यंत चोख करीत असतो, तेव्हा ती भूमिका दुसऱ्याने करण्यात काहीच अर्थ नसतो!”

मारिया ही अस्सल कलावंत होती. ती फक्त गाणारी नटी किंवा पाठ केलेले संवाद बोलणारी नटी नव्हती. ती जीव ओतून गात असे आणि दिलेली भूमिका जगत असे. ऑपेराच्या विश्वात ज्या गोष्टीची उणीव भासत होती ती मारियाने भरून काढलेली होती. आश्चर्यकारक व अविश्वसनीय वाटावा असा श्रोत्यांना व प्रेक्षकांना थरारून टाकणारा अनुभव मारिया आपल्या गाण्याने व अभिनयाने देत असे. ऑपेराला एक वेगळीच लोकप्रियता तिने मिळवून दिली होती. त्याचप्रमाणे ज्या ऑपेरा संस्था दुर्लक्षित झाल्या होत्या त्यांना तिने आपल्या गुणांनी पुनर्जीवित केले होते. ज्या ज्या भूमिका तिने केल्या त्या भूमिकांना एक उंची तिने मिळवून दिली होती. मारिया अशी उत्कर्षबिंदूवर होती. परंतु यशस्वी माणसाला शत्रूही खूप असू शकतात. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहू न शकणारी काही माणसे असतात. मारियाची अग्नीपरीक्षा घेणारा क्षण १९५५ सालातील नोव्हेंबर महिन्यात आला. शिकागो येथील लिरिक ऑपेरामधील ‘मादाम बटरफ्लाय’चा यशस्वी प्रयोग करून प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या दीर्घकाळ झालेल्या कडकडाटाचा स्वीकार करून मारिया रंगमंचाच्या मागील भागी जात असता मार्शल स्टॅन्ले प्रिंगले नामक माणूस तिला भेटला. त्याने कोर्टाचे एक समन्सच तिच्या हाती दिले. १९४७ सालातील करारानुसार बॅगारोझी या मारियाच्या माजी व्यवस्थापकाने आपण तिचे सर्वाधिकारी असलेले प्रतिनिधी असल्याचा दावा केला होता. मारियाच्या उत्पन्नातील टक्केवारीची रक्कम आणि तिच्यासाठी केलेल्या खर्चासंबंधी मारियाकडून ३ लाख डॉलर्स मिळावेत म्हणून बॅगारोझी याची मागणी होती. ७ नोव्हेंबर १९५७ रोजी मारियाने कोर्टाबाहेरच बॅगारोझीबरोबर वाटाघाटी करून वाद मिटविला होता. वाटाघाटी कोणत्या अटींवर यशस्वी झाल्या हे कधीच कुणाला जाहीर केले गेले नाही!

याच काळात आणखीही एक दुर्दैवी घटना घडली होती. ‘टाइम’ या अमेरिकेतील जगप्रसिद्ध मासिकाने मारियाच्या आईची मुलाखत प्रसिद्ध केलेली होती. मारियाने एका प्रसंगी वा मुलाखतीत आपल्या आईने आपल्या बालपणावरच दरोडा घातल्याचा उल्लेख केलेला होता.

तसेच मारिया आपल्या आईस १९५० मध्ये अखेरची अशी भेटली होती व त्यानंतर ती आपल्या आईस कधीही पुन्हा भेटणार नव्हती आणि तिच्याशी ती बोलणारही नव्हती, असे मारियाने सांगितलेले होते. त्यामुळे मारिया ही कृतघ्न मुलगी असल्याचे ‘टाइम’ मासिकाने लिहिले होते. त्या कारणाने न्यूयॉर्कचे लोक मारियावर नाराज होते. २८ ऑक्टोबर १९५६ रोजी मेट्रॉपोलिटन ऑपेरामध्ये जेव्हा नॉर्माची भूमिका प्रथमच मारिया सादर करण्यास आली तेव्हा न्यूयॉर्कमधील श्रोत्यांनी तिचे फारशा टाळ्या देऊन स्वागत केले नाही. त्याउलट झिंका मिलानोव्ह ही श्रेष्ठ दर्जाची लोकप्रिय गायिका थिएटरमध्ये नॉर्मा पाहण्यास आपल्या आसनावर बसण्यासाठी आली असता प्रेक्षकांनी तिचे प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले होते. न्यूयॉर्कच्या प्रेक्षकांनी मारियाविषयीची नाराजी अशी प्रकट केली होती. परंतु संगीतिका पाहताना लोक मारियाच्या गाण्याने व अभिनयाने इतके लुब्ध झाले, की त्यांनी शेवटचा अंक झाल्यावर टाळ्यांचा असा व इतक्या वेळा कडकडाट केला की सोळा वेळा मारियाला ‘कर्टन कॉल’ स्वीकारण्यास स्टेजवर यावे लागले. सर्वसाधारणपणे कोणत्याही कलावंताला त्याच्या कार्यक्रमानंतर एकदाच मिळणारा ‘कर्टन कॉल’ मारियाला सोळा वेळा मिळाला. हा लोकप्रियतेचा व प्रेक्षकांनी दिलेल्या पावतीचा उच्चांकच असावा. कार्यक्रम संपल्यावर पडदा पडल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली पसंतीची पावती स्वीकारण्यास युरोप-अमेरिकेतील कलावंत पुन्हा स्टेजवर येतात, पडदा वर जातो आणि कमरेत वाकून कलावंत प्रेक्षकांच्या अभिवादनाचा मोठ्या नम्रतेने व कृतज्ञतेने स्वीकार करतात. यालाच ङ्गकर्टन कॉलफ म्हटले जाते. ज्या मारियाचे, तिच्या आईविषयी तिने दाखविलेल्या कृतघ्नतेबद्दल न्यूयॉर्कच्या प्रेक्षकांनी प्रयोगाच्या प्रारंभी थंड प्रतिसादानेच स्वागत केले होते, त्याच मारियास त्याच प्रेक्षकांनी कृतज्ञतेने सोळा वेळा ‘कर्टन कॉल’ दिला होता! कलावंताच्या उंचीचे आणि रसिकांच्या रसिकतेच्या उदारतेचे ते भव्य दर्शनच होते!

मारिया ही सतत प्रकाशातील आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या हेडलाईनमधील कलावंत होती. आपल्या कलेप्रमाणेच आपल्या बेताल वागणुकीनेही ती प्रसारमाध्यमांना भरपूर खाद्य पुरवीत होती. २ जानेवारी १९५८ ची घटना. रोम ऑपेरा हाऊसमध्ये एका उत्सवात इटलीमध्ये मारिया ‘नॉर्मा’चा प्रयोग करणार होती. त्या प्रयोगास छत्तीस तास राहिले असताना मारियाचा आवाज

इतका बसला होता, की तिला कुजबूजही करता येत नव्हती आणि त्याचे कारण आदल्या रात्री १ जानेवारीस नव्या वर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या कार्यक्रमात उशिरापर्यंत जागून तिने रोमच्या फॅशनेबल नाईट क्लबमध्ये शॅम्पेन ढोसली होती. सर्कोलो डेगली साची या सुप्रसिद्ध नाईट क्लबमध्ये ती जेव्हा दारूच्या धुंदीतून जागी झाली तेव्हा तिच्या आवाजाचा पार निकाल लागलेला होता.

विशेष म्हणजे मारियाचा ‘नॉर्मा’चा प्रयोग पाहण्यास इटलीचे राष्ट्राध्यक्ष जिओवानी ग्रॉन्ची (Giovanni Gronchi) सपत्नीक उपस्थित होते. मारियाने आपला आवाज बसल्याने आपण ‘नॉर्मा’च्या प्रयोगात भूमिका करू शकणार नाही हे ऑपेरा हाऊसला कळविले. परंतु पर्यायी व्यवस्था होऊ न शकल्याने डॉक्टरांनी दिलेला सल्ला धुडकावून मारिया ‘नॉर्मा’साठी रंगभूमीवर उभी राहिली. परंतु पहिल्या गाण्याच्या प्रारंभापासूनच तिच्या आवाजाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून आले. पहिल्या अंकाच्या अखेरीस थिएटरमधील अर्धे प्रेक्षक तिची चेष्टा करीत होते, तर अर्धे प्रेक्षक तिच्या आवाजाचा दुर्दशेने स्तिमित होऊन खुर्चीला खिळून बसले होते. पहिल्या अंकानंतर मारिया प्रेक्षकांचा रोष चुकविण्यास रंगमंचाच्या मागील दाराने पळून गेली होती.

या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचा, सिग्नोरा ग्रॉन्ची हिचा मारियास फोन आला होता. मारियाच्यातील गायिकेवर आणि कलावंतावर प्रेम करणाऱ्या सिग्नोराने फोनवर मारियास सांगितले होते की, झालेल्या घटनेमुळे तिचा किंवा राष्ट्राध्यक्ष असलेल्या तिच्या पतीचा कोणताही अपमान झालेला नव्हता. ते दोघेही मारियाच्या वर्तनाने यत्किंचितही दुखावलेले नव्हते. राष्ट्राध्यक्षांच्या व त्यांच्या पत्नीच्या उदार अंतःकरणाचा, विशाल-सुसंस्कृत मनाचा आणि कलावंतावरील निस्सीम प्रेमाचा प्रत्यय मारियाला आला असावा.

३ सप्टेंबर १९५९ ला मारियाने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. मारियाचे वय त्या वेळी ३६ वर्षांचे होते आणि तिच्या पतीचे वय ६६ वर्षांचे होते. त्यांचा विवाह दहा वर्षे टिकला होता, हेही विशेषच होते! मारिया आता जगातील एका अत्यंत श्रीमंत माणसाच्या प्रेमात पडलेली होती. ॲरिस्टॉटल ओनॅसिसने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या विधवा पत्नीशी, जॅकी केनेडीशी २० ऑक्टोबर १९६८ रोजी विवाह करून मारियाबरोबरच्या प्रेमप्रकरणाच्या नाटकावर पडदा टाकला होता. ॲरिस्टॉटल ओनॅसिस यांच्या १५ मार्च १९७५ रोजी झालेल्या मृत्यूचा मारियाच्या मनावर मोठा आघात झाला असावा, असा तर्क केला जातो. त्यानंतर दोन वर्षांनी मारियाच्या मृत्यूला जी कारणे झाली त्यापैकी ॲरिस्टॉटलचा मृत्यू हेही एक महत्त्वाचे कारण होते असे मानले गेले होते. १६ सप्टेंबर १९७७ रोजी पॅरिस येथील स्वतःच्या घरात वयाच्या ५४व्या वर्षी तिला मृत्यू आला. अंथरुणावर न पडता मारियाला मृत्यू आला होता!

मारियाच्या प्रत्यक्ष मृत्यूपूर्वी तिच्यातील गायिकेचा होत असलेला मृत्यू तिच्या रसिकांनी, समीक्षकांनी आणि स्वतः मारियानेही पाहिलेला होता. उत्कर्षकाळात वर्षाला पन्नास कार्यक्रम करणारी मारिया १९६० ते ६४ या काळात वर्षाला तीसपेक्षा कमी कार्यक्रम करीत होती. १९६५ ते १९७४ या काळात तिच्या कार्यक्रमांची संख्या रोडावत गेली. मारियाने पुनः पुन्हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गायिका म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या गाण्याची गुणवत्ता जी घसरत गेली ती पुन्हा कधी पूर्ववत झाली नाही. त्यामुळे कलासमीक्षकांनी तिच्यावर तिच्या अखेरच्या काळात आपली नाराजी दाखवून कठोर टीकाच केली होती. तिने तिच्या निकृष्ट आवाजामुळे केलेल्या अपेक्षा भंगामुळे तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या श्रोत्यांनीही कार्यक्रमप्रसंगीच थिएटरमध्ये आरडाओरडही केलेली होती.

११ डिसेंबर १९६१ रोजी मारियाने ‘मीडिआ’चा प्रयोग ‘ला लास्का’ मध्ये केला होता. तिचा आवाज सदोष वाटला म्हणून श्रोत्यांनी कुजबूज करायला प्रारंभ केला. जोन विकर्स हा जेसनची भूमिका करीत होता. लोकांची नाराजी लक्षात घेऊन मारियाने नाट्यप्रयोगातील संवादातून जेसनची निर्भर्त्सना करताना त्याला गाण्यातून ‘वूर’ असे म्हटले. नंतर गाणे थांबवून श्रोत्यांना उद्देशून त्यांच्याकडे पाहत त्यांना ‘वूर’ म्हणून ओरडली. क्षणभर थांबली. गॅलरीतील श्रोत्यांना उद्देशून म्हणाली, “मी आतापर्यंत माझ्याजवळ होते नव्हते ते सारे सारे तुम्हाला दिलेले आहे!”

मारियाने त्यानंतर तो प्रयोग पूर्ण केला. लोकांनीही कुजबूज थांबवून नाटक संपल्यावर थिएटरमध्ये आपल्या जागी उभे राहून टाळ्या वाजवून मारियाचा मोठा सन्मान केला.

१९६५च्या मे महिन्यातही मारियाचा आवाज ही चर्चेची गोष्ट झालेली होती. २९ मे च्या रात्री ‘नॉर्मा’चा प्रयोग पॅरिस ऑपेरात चालू असताना कोसोटो या सहकलाकाराने मारियाला खूप सावरण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या प्रयोगाच्या शेवटी तर पडदा पडल्यावर मारिया स्टेजवरच कोसळली होती आणि तिला बेशुद्धावस्थेतच रंगपटात न्यावी लागली होती.

१९६९च्या जूनमध्ये मारियाने ‘मीडिया’ हा चित्रपट काढला होता. या चित्रपटात ती फारशी गायली नव्हती. परंतु त्या चित्रपट निर्मितीसाठी तिने अपार कष्ट घेतले होते. एकदा तर चित्रीकरण प्रसंगी कोरड्या नदीच्या पात्रातून उन्हातान्हात धावताना ती चक्कर येऊनच पडली होती.

खरेतर १९७० मध्ये मारियाचे गाणे संपल्यासारखेच होते. २५ मे १९७० रोजी झोपेच्या गोळ्या जास्त घेतल्याने तिला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते. त्यावेळी मारियाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे जाहीरही झाले होते.

१९७० च्या पूर्वार्धात मारियाने न्यूयॉर्क शहरात ज्युइलिआर्ड स्कूलमध्ये तरुण गायकांना मार्गदर्शनाचे जे कार्य केले, ते ऐतिहासिक स्वरूपाचे मानले गेले. तिचे हे कार्य ‘मास्टरक्लास’ या ब्रॉडवे नाट्यातून टेरान्स मॅकनालीने चिरस्मरणीय करून ठेवले आहे.

१९७३ मध्ये जवळजवळ ८ वर्षांनी लोकांच्यात येऊन गाण्याचा तिने पुन्हा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्नही अपयशी ठरला होता.

११ नोव्हेंबर १९७४ रोजी मारियाने उत्तर जपानमध्ये सादर केलेला तिचा गायनाचा कार्यक्रम हा अखेरचाच ठरला होता.

आपल्यातील कलावंताचा गळा मारियाने स्वतःच आपल्यातील दुर्गुणांनी घोटला होता. अत्यंत प्रतिभावान आणि भावनाप्रधान वा भावविवश कलावंतांची अखेर बऱ्याच वेळा दुर्दैवीच दिसते. मारियाने स्वतःवर कोणत्याही प्रकारच्या शिस्तीचे वा संयमाचे बंधन ठेवले नव्हते. तिच्या आवाजावर ताण येईल एवढे कार्यक्रम तिने तिच्या उत्कर्ष काळात केले होते. अखेरच्या काळात कार्यक्रम रद्द करण्याचीही तिच्यावर वेळ येत गेली. अनेक ऑपेरा हाऊसेसची आणि प्रसारमाध्यमांची नाराजी तिने स्वतःच ओढवून घेतली होती.

अखेर शेवटी १६ सप्टेंबर १९७७ रोजी तिचे निधन झाल्यावर २० सप्टेंबर रोजी तिचे अंत्यविधी झाले. १९७९तील वसंत ऋतूतील वादळी हवेत तिच्या पार्थिवाची रक्षा ग्रीसच्या (Aegean Sea) सागरात विलीन केली गेली.

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..