नवीन लेखन...

मन करा रे प्रसन्न

करणार्याला अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. गायन, वाचन, लेखन, चित्रकला, फोटोग्राफी, पौराहित्य, ज्योतिष, मानसशास्त्र, निसर्गोपचार, अगदी ट्रेकींगसुद्धा. काहीजणांनी जुना शाळेचा ग्रुप तयार करून ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ साध्य केले आहे. वृद्धापकाळात भेडसावणार्या अनेक समस्यांना अशा छंदातून आणि उपक्रमातून नक्कीच मन प्रसन्न राखता येईल आवश्यकता आहे एक पाऊल पुढे टाकण्याची.


विकास माझा ऑफिसमधला मित्र. आता ह्या गोष्टीला तीस वर्षे होऊन गेली असतील. एकदा आम्ही गप्पा मारीत असताना तो मला म्हणाला, ‘वयाच्या पन्नाशीनंतर मी राजिनामा देऊन नोकरी सोडणार.’ आमची चांगली ऑईल कंपनीतील सुखाची नोकरी होती. निवृत्तीच्या आधी स्वत:हून नोकरी सोडण्याचा विचार धाडसी होता. खुलासा करताना तो म्हणाला होता, ‘उदरनिर्वाहाकरिता, चार पैसे जोडण्याकरिता, संसाराकरिता नोकरी करीत आहोत ते ठीक आहे. पण ह्या नोकरीच्या ताबेदारीत आपल्याला आपली हौस, आपले छंद कुठे पुरे करता येतात? निवृत्तीपर्यंत थांबलो तर वयाच्या साठीला तितकी एनर्जी, असेलच असे नाही. कदाचित इच्छाही आटून गेली असेल. म्हणून जोपर्यंत थोडीतरी उमेदीची वर्षे आहेत त्यातच का नाही काही करू?’ म्हटले तर मुद्दा बिनतोड होता. पण आपल्या खास मध्यमवर्गीय विचारांना झेपणारा नव्हता.

आज निवृत्तीनंतर इतकी वर्षे उलटून गेल्यावर त्या विचाराचे महत्त्व जाणवते. वास्तविक जन्माला आलो त्याचवेळी निवृत्तीची तारीखही ठरलेली असते. पण आपण कितीजण त्याचा गांभीर्याने विचार करून नियोजन करतो?

नोकरी व्यवसायातील निवृत्ती तेलढ्यापुरती मर्यादित नसते. प्रत्यक्ष आयुष्यात त्याचबरोबर अनेक गोष्टी घडत असतात. मुलं मोठी होऊन मार्गाला लागलेली असतात. मुली आपापल्या संसारात गुरफटलेल्या असतात. त्यांचे मार्ग आता वेगळे असतात. जोडीदार पत्नी असेल तर ती दोन्ही तटांवर लिलया काम करीत असते. अशा वेळी एकटेपणाची जाणीव पोखरू लागते.

ज्यांनी आयुष्यात काही छंदच जोपासले नसतील, मित्र परिवार जोडला नसेल अशा व्यक्तींची बरीच घुसमट होऊ लागते. इथेच मला विकासचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला.

मी इथे उच्चभ्रू श्रीमंत वर्ग वा आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वा दुर्बळ समाजाचा विचार करीत नाही. त्यांनाही त्यांच्या समस्या आणि अडचणी असतातच. पण त्यांची उत्तरे मार्ग वेगळेच असतात. मला वाटत कुचंबणा होत असते सुशिक्षित मध्यमवर्गाची. त्यांची जीवनशैली, विचारधारा एकाच वेळी सोयीच्या असतात आणि कासणार्याही असतात. एकत्र कुटुंबाची ओढ असते तर मुंबई पुण्यासारख्या शहरातून असलेल्या मर्यादित आकाराच्या घरांमुळे सतत भांड्याला भांडे लागण्याचे प्रसंग येतात. आता तीन पिढ्यातील मंडळींना एकत्र राहणे अवघड होऊ लागले आहे. त्यांतच टिव्ही, मोबाईलचे आक्रमण, घरून काम करण्याची नव्याने होणारी कार्य पद्धती, मुलांचे ऑनलाईन अभ्यास वर्ग एक ना अनेक गोष्टींची गुंतागुंत वाढत आहे. अशा वेळी सर्वांत जास्त फरपट होते ती वयस्क मंडळींची.

परिणामी आता बर्याच प्रमाणात विभक्त कुटुंब ही अपरिहार्यता झाली आहे. कधी कलहातून, कधी गोडीगुलाबीने तर कधी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने. पण त्यानी समस्या सुटल्या नाहीत. फक्त स्वरूप बदलले. सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न झाला, एकटेपणाचा. आजारबाजारात मदत तर सोडाच साधे गप्पा मारायला, बोलायला आपले कोणी माणूस जवळ नाही. ही उपासमार बहुसंख्य वरिष्ठ नागरीकांना असह्य होत असते. त्यांत आधी उल्लेख केल्या प्रमाणे कसलेही नाद वा छंद नसतील तर दिवसभराच्या वेळेचे ओझे दडपून टाकू लागते. माणूस वयापेक्षाही अधिक म्हातारा होऊ लागतो.

इथे केवळ समस्यांची (वा)जंत्री वाजवण्याचा हेतू नाही. अशा ह्या समस्यांवर कित्येक सूज्ञ लोकांनी छान छान मार्ग काढले आहेत. काहीजणांनी माझा मित्र विकासने म्हटल्याप्रमाणे आधीच काही छंद लावून घेतले होते. तर काहींनी निवृत्तीनंतर नव्या उमेदीने नवे छंद सुरू केले. करणार्याला अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. गायन, वाचन, लेखन, चित्रकला, फोटोग्राफी, पौराहित्य, ज्योतिष, मानसशास्त्र, निसर्गोपचार, अगदी ट्रेकींगसुद्धा. काहीजणांनी जुना शाळेचा ग्रुप तयार करून ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ साध्य केले आहे.

माझ्या काही मित्रांनी खेडेगावातील मुलांच्या शिक्षणासाठी काम चालू केले आहे, तर काहीजण आपल्याच सोसायटीत जलसंवर्धन, वृक्षरोपण अशा उपक्रमात सहभाग घेत आहेत. जसे सामाजिक बांधिलकीचा विचार करणारे आहेत तसेच अजूनही शेअर बाजारात आपल्या बुद्धीचा कस लावीत आहेत. मुद्दा आहे आपल्या आयुष्याचे ओझे आपल्यालाच नव्हे, तर जवळच्या लोकांनाही वाटू न देण्याची काळजी घेणे. वपुंचे एक वाक्य आठवते. आपले म्हातारपण आपल्यालाच आवडत नाही, तर ते इतरांना का आवडावे?

माझ्या काही मित्रांनी हौसेने खडवली कर्जत वगैरे ठिकाणी फार्म हाउसेस घेतली. सुरुवातीला उत्साह चांगला होता. मात्र वाढत्या वयाबरोबर ते अवघड होऊ लागले. परिणामी ते उपक्रम बंद करावे लागले. मात्र तसाच विचार असेल, तर त्याला आता पर्यायी मार्ग आहेत. आज अनेक ठिकाणी वरिष्ठ नागरिकांसाठी आश्रम व्यवस्था आकारास येत आहेत. अतिशय आकर्षक आणि उपयुक्त अशा ह्या योजना आहेत. दापोली जवळ, कोकणात अथश्री सारख्या संस्था, जांभूळपाड्या जवळ अनेक वृद्धाश्रम चालू आहेत. अशीच एक योजना गणपतीपुळे येथे आहे. आपल्या खास विश्वासाची आणि सुंदर उपक्रम साकार करणार्या व्यास क्रिएशन्स्तर्फे दापोली गुहागर येथे चालू आहे. इंग्रजीत एक म्हण आहे : You Cannot eat the Cake and Keep is also ! पण व्यास क्रिएशन्स्ची योजना मात्र ही म्हण चुकीची ठरवणारी आहे! इथे गाजराची पुंगी वाजवाल तितके दिवस वाजेल, ज्या दिवशी वाटेल तेव्हा मोडून खाण्याचीही सोय आहे.

वृद्धापकाळात भेडसावणार्या अनेक समस्यांना अशा छंदातून आणि उपक्रमातून नक्कीच मन प्रसन्न राखता येईल आवश्यकता आहे एक पाऊल पुढे टाकण्याची.

समर्थांच्या उक्तीप्रमाणे ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!’

–मधुकर लेले

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..