
जय जय वो जगदंबे निराकारे निरालंबे ।
निर्गुण सगुण स्वयंते आदिमाय रेणुके ।।
श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यासाठी श्रीविष्णूंने एक नकाशा तयार केला. तो नकाशा म्हणजेच श्रीक्षेत्र माहूरगड होय असे पुराणकथाकार सांगतात.
श्रीक्षेत्र माहूरगड सात कोन लांब व सात कोस रुंद असून या क्षेत्राला चार सीमा दरवाजे आहेत. पूर्वेला हाटकेश्वर, पश्चिमेला दुरिश्वर, दक्षिणेला विमलेश्वर आणि उत्तरेला सिद्धेश्वर असून हे क्षेत्र निसर्गरम्य आहे. श्रीक्षेत्र माहूरगडाला कृतयुगात आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापार युगात देवनगर आणि कलियुगात मातापूर म्हणतात, मातापूरचे अपभ्रष्ट रूप होऊन माहूरगड असे नामाधिकरण झाले. श्रीक्षेत्र काशीपेक्षाही या क्षेत्राला असाधारण महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्याला ‘जवा आगळी काशी’ म्हणतात. काशीक्षेत्राचे जसे काळभैरव तसे या क्षेत्राचे झंपटनाथ हे नगर कोतवाल असून यांचे दर्शन केल्याशिवाय या क्षेत्राची यात्रा सफल होत नाही.
श्रीक्षेत्र माहूरगडी रेणुका मातेचे मंदिर अनादि कालापासून उभारले आहे. या मंदिराचा विस्तार साडेतीनशे वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने इ. सन १६२४ मध्ये केला. मंदिराचे वास्तुशिल्प प्राचीन पद्धतीचे असून ते गावापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बांधलेल्या हजार एक पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिराचे दर्शन होते. इथे एक पिंपळाचे झाड असून त्याखाली जमदग्नी ऋषींची स्मृती म्हणून एक शिवलिंग आहे. या लिंगाला वंदन करूनच मंदिरात प्रवेश केला जातो. मूळ मंदिर एका मोठ्या खोलीएवढे असून त्याचे शिखर मात्र मागाहून बांधले गेले. मंदिराचे खोलीत रेणुका देवीचा तांदळा असून तो सदैव शेंदुराने माखलेला असतो. या मूर्तीवर चांदीचा टोप बसवला आहे. देवीच्या मुखाची भव्यता दर्शन घेताक्षणीच दिसून येते.
या मंदिराच्या आसपास पांडव तीर्थ, कैलास टेकडी, औदुंबर झरा, अमृतकुंड, आत्मबोध तीर्थे असून ज्या ठिकाणी साक्षात रेणुका देवीचा निवास आहे त्या स्थानास ‘मातृतीर्थ’ म्हणतात.
या तीर्थाच्या जवळच रेणुका देवीची दहनभूमी असून ती ‘मुळझरी’ या नावाने प्रसिद्ध आहे. अमृतकुंडाजवळ परशुरामाने बाण मारून जे तीर्थ निर्माण केले होते, त्या तीर्थात सर्व तीर्थांचे पावित्र्य समाविष्ट झाल्यामुळे त्याला ‘सर्वतीर्थ’ म्हणतात. मंदिराच्या शेजारी श्री तुळजाभवानी व श्री महालक्ष्मी यांची लहान मंदिरे आहेत.
रेणुका देवी ही अनेकांची कुलस्वामिनी असल्यामुळे तिच्या दर्शनासाठी भक्तांची माहूरगडी सतत रीघ लागलेली असते. श्री रेणुकादेवी स्तोत्र, श्री रेणुकादेवी माहात्म्य, रेणुका कवच, रेणुका-सहस्त्रनाम, श्रीमातापूर कथासार अशा अनेक छोट्या मोठ्या ग्रंथात देवीची महती गायली गेली आहे.
इक्ष्वाकू वंशातील रेणू राजाने कन्याकामेष्ठी यज्ञ केला असता त्याला जी कन्या प्राप्त झाली तीच रेणुकादेवी होय. कर्नाटक प्रांती या रेणुकादेवीची उपासना यल्लमा या नावाने प्रचलित आहे. यल्ल म्हणजे सर्व आणि अम्मा म्हणजे माता होय. यल्लमा ही जगन्माता असल्यामुळे माहूरगडास मातापूर असेही म्हणतात. राजकन्या रेणुकाने स्वयंवरात जमदग्नी ऋषींना वरले आणि या ऋषीपासून तिला रुमण्वान, सुषेण, वसु, विश्वावसु आणि परशुराम असे पाच पुत्र झाले. जमदग्नीचा आश्रम नर्मदातटकी होता. या तटी रेणुका समुद्र स्नानासाठी गेली असता तिथे उपस्थित असलेल्या चित्रांगद गंधर्वाच्या रतिक्रिडेने ती क्षणभर मोहित झाली. कोपिष्ट जमदग्नीने अंतर्ज्ञानाने जाणून आपल्या मुलांना रेणुकेचा शिरच्छेद करण्यास सांगितले; पण त्यांनी पित्याची आज्ञा मानली नाही. तेव्हा क्रोधित होऊन जगदग्नीने शाप देऊन त्यांना मृत्यू दिला. परंतु परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या मातेचा शिरच्छेद केला. त्यामुळे संतुष्ट होऊन जमदग्नीने परशुरामाला वर माग असे सांगितले. परशुरामाने मातेला व भावांना जिवंत करा असा वर मागितला. जमदग्नीने वर पूर्ण करून रेणुकेस व आपल्या मुलांना जिवंत केले.
एकदा परशुराम कैलास पर्वतावर गेला असता कृतवीर्य राजाचा पुत्र कार्तवीर्य सहस्त्रार्जुन आपल्या लवाजम्यानिशी जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला असता ऋषीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले. आश्रमात असलेल्या इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामधेनू गायीची मागणी त्याने ऋषींना केली. कामधेनूवर इंद्राचा अधिकार असल्यामुळे ऋषीने ती द्यावयास नकार दिला, ते पाहून राजा क्रोधित होऊन त्याने जमदग्नी ऋषींना मारहाण करताना रेणुका मधे पडली. राजाने तिच्या शरीरावर तलवारीने एकवीस वार करून जमदग्नीला ठार मारले आणि गायीला घेऊन निघताक्षणीच तिने आपल्या शरीरातून सैन्य निर्माण करून राजाला व त्याच्या सेनेला यमसदनी धाडले. त्याक्षणी कैलास पर्वतावरून परशुराम आश्रमात आला. हा भयानक प्रकार पाहून त्याचे काळीज गलबलले. जखमी मातेच्या शरीरावर एकवीस घाव पाहिल्यानंतर क्रोधित होऊन एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. जमदग्नीच्या मृत्यूमुळे शोकाकुल होऊन रेणुकेने पतीबरोबर सती जाण्याची इच्छा व्यक्त करून ती म्हणाली, “हे परशुरामा, ज्या स्थानी तू आम्हा दोघांना अग्नी देशील ते स्थान कोरे असले पाहिजे. ” तिच्या मनोदयाप्रमाणे परशुरामाने कावड तयार करून एका परड्यात पित्याचे प्रेत व दुसऱ्या परड्यात रेणुका मातेला ठेवले आणि कावड खांद्यावर घेऊन तो अनेक तीर्थक्षेत्री भ्रमण करीत सह्याद्री पर्वतावर आला असता आकाशवाणी झाली, परशुरामा, हे स्थान कोरे असून इथेच पित्याच्या पार्थिव देहावर अग्निसंस्कार कर. ” ते स्थान दत्तप्रभूचे माहूरगड होते. अग्निसंस्काराचे पौरोहित्य श्रीदत्तगुरूंनी स्वीकारले आणि त्यांच्या आदेशानुसार जमदग्नींचे शव चितेवर ठेवताक्षणीच रेणुका सती जाण्यास सिद्ध झाली. त्या वेळी मातृवियोगामुळे परशुरामाची स्थिती केविलवाणी झाली. ते पाहून चितेवर जमदग्नीचे शीर मांडीवर घेतलेल्या रेणुकाने परशुरामाला सांगितले, ” परशुरामा शोक करू नकोस. त्वरित चितेला अग्नी दे आणि निघून जा. मात्र मागे पाहू नकोस. ” शोकाकुल झालेल्या परशुरामाने चितेला अग्नी दिला आणि मातेच्या नावाने आक्रोश करू लागला; परंतु शोक अनावर झाल्यामुळे त्याने मागे वळून पाहिले त्या वेळी चितेतून रेणुका वर येत होती. छातीपर्यंत तिचा भाग ज्वालेतून बाहेर आल्यावर दु:खीकष्टी होऊन ती परशुरामाला म्हणाली, बाळा, तू मागे वळून पाहिले नसतेस तर मी पूर्ण रूपाने तुझ्या समोर आले असते. आता मी अर्ध्या रूपात इथेच वास्तव्य करीन. ” तदनंतर श्रीरेणुका देवीची मूळ पीठावर स्थापना करून परशुरामाने केलेल्या प्रतिज्ञानुसार एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. आजही मंदिराचे दक्षिणेस परशुरामाचे मंदिर असून त्याची मूर्ती ओबडधोबड स्वरूपात पहावयास मिळते.
साडेतीन पीठांपैकी माहूरगड एक शक्तिपीठ म्हणून समजले जाते. देवीची नित्य पूजा, आरती आणि नैवेद्य हे विधी मोठ्या सन्मानपूर्वक होत असतात. विशेषत: मंदिरात नंदादीप सतत तेवत असतो. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्त्रिया देवीची खणानारळाने ओटी भरतात आणि भाविक तसेच यात्रिक नवसाला बोललेले सोन्याचांदीचे अलंकार, जरीची वस्त्रे, साड्या, खण आणि नगद पैसेदेखील अर्पण करून तिचा आशीर्वाद घेतात. देवीला अर्पण केलेल्या दागदागिन्यांचा लिलाव दरवर्षी होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्री पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, आश्विन महिन्यातील नवरात्र, दत्तजयंती, पौष वद्य एकादशी आदि उत्सवानिमित्त गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची यात्रा भरते. विशेषत: श्रावणी पौर्णिमेला भक्तजन माहूरगडाला प्रदक्षिणा घालतात. या धार्मिक उपासनेला परक्कमा म्हणतात. ही परक्कमा केली असता सर्व पापांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
माहूरगडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरूदेव दत्तांचे निद्रास्थान त्यांचे सारे चरित्र याच परिसरात घडले असून ही भूमी माता अनसूयाचे माहेरघर आहे. यास्तव श्री गुरूदेव दत्तांसंबंधी म्हटले जाते-
सर्वात्मा तू असोनि निजसी बा माहूरी ।
निजदासा उध्दराया भिक्षा मागे कोल्हापूरी ।
करीसी तू स्नान नित्यप्रेमे काशीपुरी ।
वससी बा विश्वराया सहयागिरीवरी ॥
माहूरगडावरील असलेले दत्तमंदिर अतिशय सुंदर व भव्य आहे. मंदिराचा आकार दहा फूट लांब व दहा फूट रुंद असून त्याची बांधणी इ. सन १२९७ मध्ये मुकुंद भारती यांनी केली आहे. मंदिराच्या सभामंडपात दोन्ही बाजूंना सहा सहा खांबांच्या दोन रांगा असून शेवटी गाभारा आहे. त्याच्या उत्तरेकडील भिंतीला लागून दत्तात्रेयांच्या पादुका असून त्यांची तीन फूट उंचीची सुबक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या सभोवती दगडी कोट असून दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात भगवा ध्वज भाविकांना गुरूदेव दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठी आवाहन करतो. या जागी उभे राहिले असता निसर्गाने वेढलेला रमणीय देखावा दृष्टीस पडतो.
अशा या पवित्र मंदिराच्या परिसरात अनेक साधुसंतांच्या समाधी दृष्टीस पडतात. विशेष म्हणजे बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे गुरू दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना गुरूदेव दत्ताचा साक्षात्कार झाल्यामुळे माहूरगड महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान बनले आहे.
रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर नकळत भक्तांचे पाय दत्तमंदिराकडे वळतात व गुरूदेव दत्तांचे दर्शन घेऊन धन्य होतात.
तसे पाहता रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक घराण्यांची कुलस्वामिनी असल्यामुळे देवीचे कुळाचार घरोघर पाळले जातात. कारण ती संकटापासून सर्वांचे रक्षण करून जीवन सुखमय करते, असा अनुभव आजही असंख्य भक्तांना येत असतो. घरातले कुठलेही मंगल कार्य झाले की देवीदर्शनाला माहूरगडी जावे लागते. त्याला ओहर यात्रा म्हणतात. सर्वधर्मजातीतले लोक या देवीचे उपासक असून अर्धनारी नटेश्वर लोकांची संख्या लक्षणीय आहे. ते देवीचे निस्सीम भक्त असल्याचे दिसून येते.
सर्वदेवमयी देवी सर्वतीर्थमयी परा ।
विश्वरूपा परमाया जगन्माता च रेणुका ||
Leave a Reply