नवीन लेखन...

माझे स्वयंपाकघर

तीस एक वर्षापूर्वीचा काळ… तेव्हा खेडेगावात स्वयंपाक चुलीवरती किंवा स्टोव्ह वर केला जायचा. चुलीवरची खरपूस भाकरी, वांग्यांचे भरीत या गोष्टी ऐकण्यापुरत्या बऱ्या. पण जेव्हा प्रत्यक्षात आपल्यावर वेळ येते तेव्हा कळते की ते करण्यासाठी जळण आणण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत काय मेहनत आहे. डोळ्यांची तर वाट लागते.

माझे अगदी असेच झाले. मी बारावीत असतानाच माझे लग्न झाले. कशी बशी बारावीची परिक्षा दिली. मे महिन्यात लग्न झाले. आणि मी सासरी नारायणगाव (जिल्हा पुणे) येथे आले. आमचे घर बैठे वाडीतील कौलारु चार खणांचे होते. जमीन शेणांनी साखलेली. स्नानगृह बाहेर, पुढे अंगण, अंगणात तुळशीवृंदावन संध्याकाळी तुळशीत दिवा लावणे, सकाळी लवकर उठून अंगणात पाणी शिंपडून त्यावर छानशी रांगोळी घालणे. हे सर्व मला नवीनच होते. पण तिथेही मी न डगमगता त्या कामांची मजा घेतली. माहित नसलेल्या गोष्टी माहिती करुन घेतल्या.

मला अजूनही आठवते की बाहेरुन पाणी आणले जायचे ते पण डोक्यावर हंडा. घरात नळ ही संकल्पनाच नव्हती. अर्थात यातल्या कित्येक गोष्टी माझ्या वाट्याला करायला आल्याच नाहीत. आमची एकत्र कुटुंबव्यवस्था, व्यवसाय शेती. फक्त एकच मुलगा चांगला शिकला तो म्हणजे माझा नवरा. बाकी जेमतेम दहावी, अकरावी पर्यंत शिकलेले. माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर (सरकारी नोकरी) ते पण बदली गावी असायचे.

आम्ही एकत्र कुटुंबात रहायचो. सासू-सासरे मिळून आमच्या कुटुंबात सोळा व्यक्ती होत्या. माझे तेव्हा नुकतेच लग्न झालेले. मोठ्या तीन जाऊबाईची मिळून चार मुले व दोन मुली होत्या. सोप्या शब्दात सांगायचं तर तंत्रज्ञानात होणारे बदल इथे फारच तीव्रतेने जाणवले.म्हणजे पाटा वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली. जमीन (घरातील) शेणाची न रहाता शहाबादी फरशी आली. प्रत्येक ठिकाणी पाण्याचे नळ, स्वयंपाक करण्यासाठी ओटा त्यावर गॅसही आला. कामं अगदी चुटकी सरशी व्हायला लागली. ते माझे स्वत:चे पहिले स्वयंपाक घर होते. सरकारी घर असले तरी मी माझे स्वयंपाक घर स्वच्छ व नीटनेटके ठेवले होते. तेही कलात्मक रीत्या सजवलेले. म्हणजेच स्वयंपाक करताना सर्व वस्तु हाताशी पाहिजेत अशा रितीने मांडणी केलेली. बहुधा तो गुण माझ्यात आईचा आला असावा. माझी आई शांताबाई गिरमे व सासूबाई लक्ष्मीबाई भुजबळ यांना त्यांचे श्रेय आहे. भंडारदरा थंड हवेचे ठिकाण, अतिप्रमाणात पाऊस. भंडारदरा डॅम हा इंग्रजाच्या काळातील म्हणजेच १९१६ साली बांधण्यात आला. अकरा टि.एम.सी. डॅमची पाणी साठवण्याची क्षमता.

भंडारदरा येथे भरपूर प्रमाणात पाऊस असल्याकारणाने आम्हाला सर्व धान्ये डाळी साठवण्याचे पदार्थ वस्तु अन देवून पॅकबंद डब्यात ठेवावे लागत. नाहीतर बुरशी येऊन खराब व्हायचे. तिथले स्वयंपाकघर फक्त डायनिंग टेबल, फ्रीज व एक डब्यासाठी रॅक मांडणी बसेल एवढेच होते. घरात एकदम खेळीमेळीचं वातावरण होतं. गंमत अशी की मला चुल व स्टोव्ह मुळात कसा पेटवायचा ते माहितच नव्हते. पण मला माझ्या जावांनी सांभाळून घेतले. आम्ही चौघी मिळून स्वयंपाक करत असू. त्यांच्याकडून मी नवनवीन गोष्टी शिकत व अनुभवत गेले. दाण्याचा कुट खलबत्त्यात करणे (लोखंडी), पाट्यावर मसाला किंवा पुरण वाटणे इत्यादी. माझ्याकडून त्या केर काढणे, भाजी निवडणे, लसूण सोलणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी करुन घेत. सर्वात लहान असल्यामुळे किंवा मी शिकलेली असल्यामुळे कोण जाणे माझ्या वाट्याला कामे मात्र हलकी फुलकी यायची. पण त्यांच्या कामाचा नीटनिटकेपणा, स्वच्छता हे सर्व मी अनुभवत गेले. नात्यांची वीण घट्ट बांधली | गेली. असेच मजेत एक वर्ष चुटकीसरशी निघून गेले ते समजले नाही. पुढे मी माझ्या मिस्टरांबरोबर बदलीच्या गावी रहायला गेले. ते एक वर्ष मला बरंच काही शिकवून गेले.

आमची बदली भंडारदरा येथे (जि. अहमदनगर) झाली आम्हाला सरकारी क्वार्टर मिळाली. खालीच घर असल्या कारणाने मागे पुढे भरपीर मोकळी जागा. घरपण चार रुमचे, ऐसपैसे आणि त्यात आम्ही दोघंच. दिमतीला एक घरगडी होता. त्याचे नाव शंकर. तो घरगडी कसला. आमच्या कुटुंबातलाच एक भाग होता. तो आदिवासी होता. पण आपल्याला लाजवेल असे त्याचे वर्तन होते.

नारायणगाव मधील स्वयंपाक घरापेक्षा हे स्वयंपाकघर थोडे छोटे होते. पण त्यामधे वस्तुची मांडणी आम्ही आमचीच करुन ते कसे छान व सुटसुटीत दिसेल याची खबरदारी घेतली. माझा घरगडी शंकर याचेही आभार मानेन. त्याने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि माझे घर संभाळले म्हणून मी माझे अर्धवट राहिलेले शिक्षण बाहेरुन परिक्षा देवून पूर्ण केले असा माझा बारा वर्षाचा प्रवास भंडारदरा ते पुण्यात येईपर्यंतचा अविस्मरणीय झाला.

भंडारदरा येथे असतानाच आम्ही पुण्यात सहकारनगर नं २ येथे चार रुमचा एक फ्लॅट घेतला. तोपर्यंत मला एक मुलगी झाली. आजच्या फ्लॅट संस्कृतीत स्वयंपाक घर छोटेखानीच असते. पण त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची जोड दिली तर घरातील गृहिणीच नाही तर कुठलीही व्यक्ती कमीत कमी वेळात विविध रुचकर पदार्थ तयार करु शकते. पण ह्यासाठी लागते ते व्यवस्थापन. आजकाल घर बांधत असतानचा काही गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे स्वयंपाक घराला पूर्वेकडे खिडकी तसेच पूर्वेकडे ओटा, शेगडी असावी तर सकाळची सूर्याची कोवळी, प्रसन्न किरणे स्वयंपाक घरात चहुबाजूंनी शिरुन खोली जंतूनांशक बनविण्यास मदत करतात. खोली प्रकाशमय झाल्याने गृहिणीला स्वयंपाक करण्यास प्रसन्न वाटते. हसरा चेहरा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व जसा आजूबाजूचा आसमंत भारावून टाकतो त्याचप्रमाणे घरातील नीटनेटके हवेशीर स्वयंपाकघर त्या घराचे आरोग्य सक्षम बनवते. याचां अनुभव मला तरी पुरेपूर आला. मितींचा रंग पांढरा, आकाशी किंवा पिस्ता असावा.

पण ह्या सर्वांबरोबर येतो तो म्हणजे स्वयंपाक घरातील सहजपणाचा वावर. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वचजण ह्या घराच्या गाभ्यात वावरंत असतात तेव्हा सगळ्यांनाच हाताशी आपापल्या लागणाऱ्या गोष्टी मिळाल्या की मग सांडासांड, तोडफोड आपण टाळू शकतो. यासाठी आता माझ्या स्वयंपाक घरात नवीन बदल म्हणजे ट्रॉलीज. तुमच्या लक्षात आले असेल जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे स्वयंपाकघरात नवनवीन बदल घडत गेले. उदा. चहा, साखरेचे-डब्रे, मसाल्याचा डबा, तेलाचे भांडे, हे जर का ओठट्याच्याच लगतच्या खालच्या ट्रॉलीत ठेवल्या तर पटकन हाताला लागल्यामुळे वेळ वाचतो. तसेच मुलांनी खावेत असे पौष्टिक पदार्थ उदा सुकामेवा, विविध पिठांचे लाडू हे त्यांच्या हाताला लागतील अशा डब्यातून ठेवले गेले तर मुलांच्या पोटात जायला मदत होते आणि खराब झाले म्हणून फेकून देण्याची वेळ येत नाही.

मिक्सरची जागा आता फूडप्रोसेसरनी घेतली म्हणजे काय तर परात न घेता कणिक फुडप्रोसेसर मधे चुटकीसरशी मळून मिळते. पाणी पिण्याच्या पिंपाची जागा फिल्टरने भिंतीवरच्या) घेतली. ओटा पोकळा दिसू लागला.

फ्रीज हा गृहिणीचा खूप जवळचा मित्र आहे. त्याच्या मदतीने रोज रोज भाजी आणण्याची कटकट नाही. दोन दिवसासांठी ओले मसाले करुन ठेवू शकतो. एक दिवसासाठी कणिक ठेवू शकतो. भाज्या, फळे तर चांगलीच ताजी रहातात. त्याचा उपयोग करु तेवढा थोडाच आहे. एक मात्र लक्षात ठेवावं फ्रीज चे अडगळीचे कपाट करु नका.

स्वयंपाक घराला पोटमाळा असावा. त्यावर आपण रोजच्या वापरात नसलेली खास प्रसंगासाठी लागणारी भांडी ठेवू शकतो. खरकटी भांड्यासाठी आपण ओठ्याखाली ट्रॉली बनवली तर त्याचे सिंकमध्ये प्रदर्शन -होणार नाही.

फोडणी हा भारतीय ‘ स्वयंपाकाचा आत्मा आहे. फोडणीच्या वासावरुन भुकेचा _ अग्नी प्रज्वलीत होतो. फोडणी वरुन आठवले की घरातील फोडणीचा धूर बाहेर जाण्यासाठी एक्झॉस्ट पंखा बसवणे जरुरीचे आहे. या पंख्यामुळे भिंती व बाकी वस्तुंचे संरक्षण होते. भिंती चिकट होत नाहीत. स्वच्छता करण्याचा वेळ वाचतो.

डायनिंग टेबलाची जागा शक्‍यतो हवेशीर आणि मोकळ्या जागेतच पाहिजे. ती टेलिव्हिजन च्या समोर नसावी. म्हणजे जेवताना आपल्याला पदार्थांचा आस्वाद घेवून त्याला न्याय देता येतो. त्याचप्रमाणे चांर किंवा तीनच सदस्य असले तरी त्यांच्या गप्पा रंगून पंचरस पाझरुन अन्नाचे पचन होण्यास मदत होईल. जेवताना मोबाईल जर बंद ठेवले तर अजून जेवणाची व कुटुंबातील एकमेकांची गोडी वाढेल.

सगळ्यात महत्वाचे आपले घर जो स्वच्छ ठेवतो तो झाडू मात्र दर्शनी न ठेवता, हाताशी पटकन आला पाहिजे अश्या एका कोपऱ्यात ठेवावा. म्हणूनच नीटनेटकं, सुसज्ज स्वयंपाक घर ज्याचे घरी ते मानसिक, शारीरिक आयुष्याची दोरी बळकट करी.

नीता भुजबळ, पुणे

सौजन्य : उत्तम कथा (जुलै २०१८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..