इयत्ता पाचवी पासून मला हिंदी व इंग्रजी हे दोन विषय शालेय अभ्यासक्रमात सुरु झाले. बहुतेक सहावीत असताना मुन्शी प्रेमचंद यांचा एक धडा हिंदीच्या क्रमिक पुस्तकात वाचलेला अजूनही आठवतोय.. साध्या सोप्या भाषेतील, कौटुंबिक पार्श्वभूमीवरील ती एक कथा होती. आज इतकी वर्षे लोटल्यानंतरही, ज्येष्ठ साहित्यिक मुन्शी प्रेमचंद या लेखकाबद्दल मला मनस्वी आदर वाटतो..
अलीकडेच फेसबुकवर त्यांच्या विषयी एक लेख वाचनात आला.. सहजच गुगलवर त्यांच्याबद्दलची माहिती वाचली.. आणि एका सरस्वती पुत्राचा, संघर्षमय जीवनपटच समोर दिसून आला..
३१ जुलै १८८० साली वाराणसी येथील लम्ही गावात त्यांचा जन्म झाला. ते आठ वर्षांचे असताना, त्यांच्या आईचे निधन झाले. वडीलांनी लागलीच दुसरं लग्न केलं. सावत्र आई व भावंडांसोबत हा धनपतराय शिक्षण घेत होता. इयत्ता नववीत असताना वयाच्या पंधराव्या वर्षी धनपतरायचे लग्न वडिलांनी दुरावस्थेतून मार्ग काढण्यासाठी, एका थोराड व बेढब मुलीशी लावून दिले.
ही पत्नी त्यांना सतत टोचून बोलत असे. भांडणं आणि तिच्या बरोबरच्या वादविवादांमुळे धनपतरायचं मानसिक स्वास्थ्य बिघडत गेलं. लग्नानंतर पाच वर्षांनी वडील गेले… साहजिकच विधवा आई, भावंडे व पत्नीची जबाबदारी त्याच्यावर पडली. मॅट्रिकनंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी लागली व नोकरीतून मिळालेल्या वेळेचा त्यांनी लेखनासाठी सदुपयोग केला. त्यांनी बी. ए. पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च पदावर काम करु लागले. धनपतराय यांना उर्दू, हिंदी, फारसी व इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान होतं. १९०१ साली त्यांनी ‘सौत’ नावाची पहिली कथा लिहिली.. ती प्रकाशित होण्यास मात्र १९१५ साल उजाडले. दरम्यान त्यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली. तरीही त्यांनी दर महिन्याला, एक कर्तव्य म्हणून खर्चासाठी तिला पैसे पाठवणे सुरु ठेवले होते. पुढे काही वर्षांनंतर ते पैसे पाठवणे थांबले..
१९०६ साली शिवरानी देवी, या बाल विधवेशी त्यांनी दुसरं लग्न केलं. ही हुशार होती. तीच त्यांची प्रेरणा ठरली. म्हणूनच १९१३ ते १९३१ या अठरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी २२४ कथा, १०० लेख व १८ कादंबऱ्या लिहून काढल्या.
स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी चांगली सरकारी नोकरी सोडली व ब्रिटिश विरोधात पहिली कादंबरी लिहिली. ती जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हा ती ब्रिटीशांकडून जप्त केली गेली. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होता होता, ते वाचले. पुढे या कादंबरीचे लेखक म्हणून आपली ओळख राहू नये, यासाठी धनपतराय श्रीवास्तव हे नाव बदलून त्यांनी ‘मुन्शी प्रेमचंद’ स्विकारले.
१९२३ साली प्रेमचंद यांनी सरस्वती प्रेसची स्थापना केली. त्यासाठी कर्ज मिळविण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत एका चित्रपट निर्मात्याला त्यांनी कथा लिहून दिली व चित्रपटात मजुराची एक छोटी भूमिकाही साकारली. वर्षभरानंतर ते पुन्हा वाराणसीला आले.
१९३० साली बनारस येथून त्यांनी ‘हंस’ मासिक सुरु केले. १९३२ ला ‘जागरण’ नावाचे साप्ताहिक सुरु केले. दरम्यान त्यांचं अविरतपणे लेखन चालूच होतं. १९३४ साली मुंबईत जाऊन प्रेमचंद यांनी ‘मजदूर’ चित्रपटाची कथा लिहून दिली. हिमांशु राय यांच्या बाॅम्बे टाॅकीजच्या कंपनीशी त्यांनी चित्रपट लेखक म्हणून वर्षभराचा करार केला. मात्र या मायानगरीत त्यांची घुसमट होऊ लागली व करार पूर्ण होण्यास दोन महिने राहिलेले असताना, राहिलेल्या पगारावर पाणी सोडून ते वाराणसीला परतले.
८ आॅक्टोबर १९३६ साली, वयाच्या छपन्नाव्या वर्षी दुर्धर आजाराने प्रेमचंद यांचे देहावसान झाले. १९४४ साली त्यांच्या जीवनावरती, पत्नीने ‘प्रेमचंद घर में’ हे पुस्तक लिहिले. पुन्हा त्यात सुधारणा करुन १९५५ साली नवीन आवृत्ती प्रकाशित झाली. २००५ साली, मुलीच्या मुलाने म्हणजेच प्रेमचंद यांच्या नातवाने या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली.
मुन्शी प्रेमचंद यांच्या कथांवरुन सत्यजित रे यांनी ‘शतरंज के खिलाडी’ व ‘सद्गती’ हे चित्रपट केले. मृणाल सेन यांनी त्यांच्या कफन या कथेवरुन ‘ओका ऊरी कथा’ नावाचा तेलगू चित्रपट केला. तसेच ‘हिरामोती’, ‘गबन’, ‘गोदान’ अशा हिंदी चित्रपटांचीही निर्मिती झालेली आहे. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘निर्मला’ नावाची एक मालिकाही दूरदर्शनवर झालेली आहे. प्रेमचंद त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल रसिकांनी त्यांना ‘कलम का सिपाही’ ही उपाधी दिली होती..
१९८० साली त्यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने भारत सरकारने, एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले होते. मुन्शी प्रेमचंद यांनी ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली, त्या गोरखपूर येथील शाळेत त्यांच्या नावाने एक साहित्य संस्था स्थापन झालेली आहे.
थोडक्यात, मुन्शी प्रेमचंद यांना पहिल्या पत्नीपासून प्रेरणा तर मिळाली नाहीच, उलट मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.. दुसऱ्या पत्नीने मात्र त्यांच्या लेखनाला उत्तम साथ दिली व ते सुप्रसिद्ध साहित्यिक झाले… काही वर्षांपूर्वी एका मराठी वाहिनीवर मालिका लागत असे.. त्यातील प्राध्यापक असलेला नायक हा लेखक असून, त्याची पत्नी ही त्याच्यातील लेखकाला, नेहमीच प्रोत्साहन देत असते… त्या नायिकेचं नाव ‘शुभ्रा’ असं होतं… प्रत्यक्षात असं स्वप्नवत भाग्य, फार थोड्या लेखकांना लाभलेलं असावं…
– सुरेश नावडकर
दीपावली २०२३
Leave a Reply