नवीन लेखन...

काश्मीर एक जाणीव – भाग पाच

सौंदर्य, सौहार्द, संरक्षण आणि सैनिक प्रवास, प्रवासी आणि प्रदेश हे तीन प्र’कार ‘ जेव्हा एकत्र येतात तेव्हा पर्यटन या शब्दाला अर्थ प्राप्त होतो  प्रवास करून प्रवासी प्रदेश बघतो आणि समृध्द होतो. इतके हे तीन शब्द परस्परावलंबी आहेत. हे जसं आहे तसं काश्मीर बघताना सौंदर्य, सौहार्द, संरक्षण आणि सैनिक या चार शब्दाचं साहचर्य आहे.

गेले काही दिवस काश्मीर बद्दल मी लिहीत होतो, त्याला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. पण उपरोक्त चार शब्दांबद्दल लिहिणं अत्यंत आवश्यक होतं.

काश्मीरला नंदनवन का म्हणतात याचं उत्तर तिथे गेल्याशिवाय मिळणार नाही, याची कल्पना होती. पण काश्मीर म्हणजे केवळ पर्यटन स्थळ इतकीच मर्यादित दृष्टी घेऊन गेलो तर, काश्मीरच्या अंतरंगाची ओळख कधीही होणार नाही. याचीही जाणीव होती.
म्हणून इतिहासात डोकावलो. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडाची माहिती घेतली.

तत्कालीन राज्यकर्ते, त्यांचे राजकारण, त्यांची स्वार्थी आणि संकुचित दृष्टी, त्यांच्या विकल्या गेलेल्या निष्ठा, जमिनीवर आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार, नृशंस हत्याकांडे, देशभक्तांच्या हत्या, सांस्कृतिक वैभवावरचे भीषण आघात, प्राचीन मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर विशेषत: पंडितांवर केलेले क्रूर अत्याचार, बलात्कार अशा कित्येक कहाण्या वाचायला मिळाल्या होत्या.

त्या पार्श्वभूमीवर काय पहायला मिळणार याची धाकधूक वजा जिज्ञासा होती. आणि कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीरच्या अंतरंगात डोकावणे मला महत्त्वाचे वाटले. म्हणून काश्मीरचे सौंदर्य पाहता पाहता तिथले सौहार्द अनुभवत होतो.

दररोज वेगवेगळ्या निवासस्थानी येणारे वेगवेगळे विक्रेते, विविध व्यवसाय करणारे तरुण, दुकानदार, चहा देणारे, काश्मीरचे केशर विकणारे आणि ड्रायफ्रूटस विक्रेते फेरीवाले, शेतकरी, ड्रायव्हर्स, अशा अनेकांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. आणि तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर ची तिथली सकारात्मक समाजभावना कळली. दहशतवाद्यांच्या बंदुका आपल्याला भविष्य देऊ शकणार नाहीत. आपला रोजगार आपण मिळवला पाहिजे आणि त्यासाठी पर्यटक इथे यायला हवेत.त्यासाठी भयमुक्त वातावरण असायला हवे, असा एक सार्वत्रिक सूर या निमित्ताने ऐकायला, पहायला आणि अनुभवायला मिळाला.

काल दगड घेऊन उभे असणारे आज हातात केशर विकायला उभे आहेत. काल दहशतवाद्यांची गुलामी करण्यात धन्यता मानणारे आज रिक्षा, मिनीबस घेऊन पर्यटकांना सुहास्य वदनाने सर्वत्र फिरवत आहेत. कालचे घरभेदी म्हणून संशयाच्या फेऱ्यात असलेले, आज आपल्या घरात, लॉजवर, हाऊसबोटीत पर्यटकांना आनंदी ठेवण्यासाठी, खास जेवण बनवून खिलवण्यासाठी धडपडत आहेत.
मंदिरांचा विध्वंस करणाऱ्यांबद्दल अभिमान बाळगणारे, आज अशा स्थळांचा इतिहास सांगताना शरमुन जात आहेत. हे साक्षात अनुभवायला मिळालं.

पर्यटक आले तरच आपण जगू, त्यासाठी आपले संरक्षण करणाऱ्यांना मानाचे स्थान दिले पाहिजे, ही भावना बळावली आहे, हा फार मोठा दिलासा आहे. हे चित्र खरंच खूप सुखावह आहे.

आणि एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी, ती म्हणजे आपल्यासाठी आधारवड म्हणून खंबीरपणे उभे असणारे सैनिक! बॉर्डर सिक्युरिटी, आर्मी आणि स्थानिक पोलीस यांच्या बरोबर गप्पा मारताना, त्यांच्याबरोबर फोटो काढून घेताना, त्यांचे विचार ऐकताना धन्यता वाटली.

त्यांचे अनुभव, त्यांचे तिथले संघर्षमय परिस्थितीतील जगणे, तिथले धोके, पर्यटक म्हणून येणाऱ्या आणि तिथे असणाऱ्या स्थानिक नागरिकांचे संरक्षण असं खूप काही ऐकायला मिळालं. आपण कल्पना करू शकणार नाही असे अनेक अनुभव त्यांनी सांगितले.
आमच्याशी बोलताना त्यांची दृष्टी सर्वत्र फिरत होती. त्या कर्तव्यात ते चुकत नव्हते.

तिथे महाराष्ट्रातील अनेक सैनिक भेटले.बोलले. आम्ही मराठीत बोलताना ऐकून त्यांनी आपण होऊन परिचय करून घेतला. आणि आमचा ऊर अभिमानाने भरून आला. गुरुद्वारा बघायला गेल्यानंतर तिथल्या एका सैनिकाने प्रचंड आत्मविश्वासाने सांगितले. ” आज तुम्हाला तुमचे संरक्षण करणारे सैनिक सर्वत्र दिसत आहेत, पण आणखी काही वर्षांनी तुम्ही भयमुक्त वातावरणात इथे फिरू शकाल !

ते शब्द दिलासादायक होते. भविष्यातील शुभसंकेत देणारे होते. काश्मीरमधून निघताना या शब्दांनी आम्हाला आश्वस्त केलं. पहाटे पहाटे श्रीनगर सोडताना सर्वत्र सैनिक दिसले. विमानतळावर त्यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या आधाराने सध्या काश्मीरचे सौंदर्य आणि सौहार्द टिकून आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

काश्मीरहून निघालो खरा, पण उगीचच वाटत होतं, कानात कुणीतरी हळूच सांगत आहे…

– पुनरागमनायच !

( समाप्त )

– श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
—————————————–
लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..