नवीन लेखन...

अमेरिकेत भेटली आपली झाशीची राणी!

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला. त्या लेखात घोड्यावर स्वार झालेली, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम घेतलेली झाशीची राणी पाहून मला सुखद धक्काच बसला.

एरवी, परदेशप्रवासात मराठी भाषा, महाराष्ट्रीय वेशभूषा, मराठी माणूस यांची भेट झाल्यास खूप आनंद होतो. मराठीच काय, भारतीय माणूस भेटला वा दिसला तरी परक्या देशात मन सुखावते. कधी कधी गहिवरतेही!

झाशीच्या राणीचे आणि तिच्या घोड्याचे संपूर्ण जांभळ्या रंगातील ते चित्र पाहून माझे मन हरखून गेले. हे चित्र कोणी काढले असावे, कुठून घेतले असावे, असे प्रश्न मनाला पडले. या प्रश्नांचे समाधान करणारे उत्तर मला लेखाच्या अखेरीस लिहिलेल्या टिपणातून मिळाले. ‘वॉटर कलर फ्रॉम कालिघाट, इंडिया, व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम, लंडन/आर्ट रिसोर्स न्यूयॉर्क’ असा उल्लेख असलेले ते टिपण होते.

त्या लेखावर वा लेखाखाली लेखिकेचे नाव मात्र नव्हते. कुणातरी लेखिकेने तो लेख लिहिल्याचे संपादिकेने लिहिले होते.

आयुष्यात कोणत्या टप्प्यावर, कोणत्या क्षणी आणि कोणत्या ठिकाणी कोण कुणास भेटेल हे सांगता येत नाही. अनपेक्षितपणे अमेरिकेत मला झाशीची राणीच भेटली होती. जांभळ्या रंगातील त्या राणीकडे मी अधिक आत्मीयतेने निरखून पाहिले. डोक्यावर राजमुकुट होता. मुकुटाच्या मध्यभागी घोड्याच्या शेपटीसारखा छोटा वळणदार पिसारा होता. पाठीवर केस मोकळे सोडलेले होते. नऊवारी साडी परिधान केलेली होती. घोड्याचा लगाम धरलेल्या डाव्या हातावरून साडीचा पदर वाऱ्यावर फडफडत होता. पदरावर आडवे पट्टे होते.

चेहरा एखाद्या हिंदू देवतेच्या मुखवट्यासारखा होता. रेखीव कोरलेल्या भुवयांच्या मध्यभागी कुंकू ठळकपणे रेखलेले होते. मासोळीसारखे टपोरे डोळे होते. चेहऱ्यावरील हे डोळे लक्षवेधी होते. लालसर चेहऱ्यावरचे नाक सरळ तरतरीत होते. गळ्यात माळांचे अनेक पदर होते. हातात बांगड्या होत्या. लढताना हातास दुखापत होऊ नये म्हणून लांब हाताच्या ब्लाऊजसारखे धातूचे वस्त्र राणीने अंगावर चढविलेले दिसत होते. डाव्या प पायात चढ आणि उजव्या हातात उभी तलवार होती.

लेख वाचण्यापूर्वी लेखांतर्गत चौकटीतील मजकूर वाचण्याचा मोह मला झाला. एका चौकटीत लिहिले होते, ‘लक्ष्मी ही अत्यंत कुशल अशी घोडेस्वार होती. घोड्याचे लगाम आपल्या दातात धरून दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होणारी लक्ष्मी सर्वांच्या ओळखीची होती.’
दुसऱ्या एका चौकटीत लिहिले होते, “छोटी मनू अगदी बालपणापासूनच आश्चर्यकारक वाटावी अशी शूर होती. तिच्या संबंधातील एका कथेनुसार एक दिवस मनू केवळ सात वर्षांची असताना एका जंगली हत्तीने तिच्यावर चाल केली होती. हत्ती अगदी जवळ येताच पटकन उडी मारून त्याच्या एका दातावर ती चढून बसली आणि तिथून तिने हत्तीला शांत केले. ”

विशेष म्हणजे एका चौकटीत लिहिले होते, “ब्रिटिशांशी लढून झाशीचा मुख्य किल्ला वाचविण्यासाठी राणीने स्त्रियांच्या एका छोट्या लष्करी तुकडीस प्रशिक्षित केलेले होते. ”

अमेरिकन लेखिका झाशीच्या राणीचे व्यक्तिमत्त्व मोजक्या शब्दांत व मर्यादित दोन-तीन पृष्ठांत कसे चितारते हे पाहणे उत्सुकतेचे होते. परक्या राष्ट्रातील सैन्याशी आपली क्रांतीकारक राणी प्राणपणाने लढली होती. आता परदेशी अमेरिकन लेखिकेस राणीचे हे शौर्य आणि तो बलिदानाचा इतिहास कसा चित्रित करावासा वाटतो हे पाहण्यासारखे होते.

लेखिकेने राणी लक्ष्मीबाईसंबंधात लिहिले होते, “लक्ष्मीबाई उर्फ ‘मनू’ म्हणून बालपणी ओळखली जाणारी मुलगी बनारस येथे १८३० मध्ये जन्माला आली. तिचे वडील राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सल्लागार होते. त्यामुळेच त्या काळातील बहुतांशी तरुण मुलींना ज्या संधी उपलब्ध नव्हत्या त्या मनूला सहज उपलब्ध झाल्या. तिला तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे तसेच बहुतेक सर्व खेळांचे शिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे त्या काळात दुर्मीळ वाटणारे अत्यंत कष्टप्रद स्वरूपाचे परंतु उच्च प्रतीचे पारंपरिक पुस्तकी शिक्षणही तिला दिले गेले. मनूचे भवितव्य जणू प्रारंभापासूनच निश्चित झाले असावे. मनू तिच्या पुढील आयुष्यात सामर्थ्यशाली पद भूषवील असे तिची भविष्यकुंडली सांगत होती अशी वदंता आहे.

“झाशीच्या राजाशी जेव्हा मनूचे लग्न झाले, तेव्हाच तिचे भवितव्य ठरल्यासारखे झाले. याच वेळी तिचे नाव लक्ष्मीबाई होऊन ती झाशीची राणी झाली. गादीला वारस निर्माण करू न शकल्याने राजा-राणीने एक मुलगा दत्तक घेतला. लग्नानंतर दहा वर्षांनी राजाचे निधन झाल्यावर आपल्या दत्तकपुत्रासह आपण राज्य करू शकू असे राणीने गृहीत धरले. परंतु त्या काळात भारतात ब्रिटिशांचे सत्तावर्चस्व होते. ब्रिटिशांनी अकस्मात जाहीर केले की, राणीच्या दत्तकपुत्रास राज्याचा कायदेशीर वारस म्हणून ते मान्यता देणार नाहीत. त्याचप्रमाणे झाशीचा प्रदेश ते स्वतःचा म्हणून आपल्या प्रदेशाला जोडून घेतील. या जाहीरनाम्यामुळे भारतीय जनता अवाकच झाली.

“भारताच्या इतिहासात राणीने आपण अत्यंत कार्यक्षम नेतृत्व करू शकतो हे जनतेला दाखवून दिलेले होते. अत्यंत धूर्त राजकारणपटू म्हणून राणी प्रसिद्ध होती. रोज पहाटे तीन वाजता उठून ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास प्रारंभ करीत असे. ब्रिटिशांच्या जाहीरनाम्यामुळे राणीच्या मनाला धक्काच पोहोचला होता. ती असहाय होती. ‘मी माझी झाशी देणार नाही,’ असा उद्घोष तिने केला होता. असे सांगितले जाते.’

कोणतीही कृती करण्याची संधी राणीला मिळण्यापूर्वी सतत चार वर्षे मानसिक ताणाच्या अवस्थेत राणी होती, हे सांगून अमेरिकन लेखिका म्हणते, “भारतीयांनी जेव्हा १८५७चे सुप्रसिद्ध बंड वा स्वातंत्र्यलढा संघटित केला, तेव्हा राणीने त्यांना मदत करण्याचा निश्चय केला होता. ”

राणी लक्ष्मीबाईच्या गुणांचा गौरव करीत लेखिकेने मुक्तकंठाने तिच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करताना लिहिले होते, “राणी लक्ष्मीबाईच्या नैसर्गिक नेतृत्वाच्या गुणांमुळे आणि लष्करी डावपेचांवरील तिच्या पकडीमुळे लष्करी सल्लागार म्हणून तिला लवकरच महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. झाशीच्या मुख्य किल्ल्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने तिने सैन्य संघटित केले. त्यानंतर ब्रिटिशांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार तिने अतिशय शौर्याने आपल्या सहकाऱ्यां बरोबर राहून केला होता.”

प्रत्यक्ष युद्धप्रसंगातील राणीचे वर्णन करताना लेखिकेने लिहिले होते, “आपल्या हातात उंचावर फडकणारा झेंडा घेतलेली राणी लक्ष्मीबाई संपूर्ण लढाईत दोन्ही बाजूंनी तळपताना दिसत होती. भारतीयांचा प्रतिकार जेव्हा निराशाजनक दिसला तेव्हा राणी तिच्या चार साथीदारांसह युद्धातून पळाली. ब्रिटिशांचा प्रखर पाठलाग चालू असताना घोड्यावर स्वार झालेली राणी जवळच्या काल्पी किल्ल्याच्या आसऱ्यास गेली. एका दिवसात शंभर मैलांचे अंतर तिने ताडले होते. तिच्यातील प्रतिकारशक्ती आणि घोडेस्वारीचे कौशल्य तिच्या उपयोगी पडले होते. तिथे राहूनच अन्य भारतीय नेत्याच्या आणि आपल्या सैन्याच्या सहकार्याने राणीने झाशीचा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीतून जिंकण्याची योजना आखली होती. राणीची योजना यशस्वी होऊन तिने बजावलेल्या भूमिकेबद्दल ग्वाल्हेरच्या खजिन्यातील मोत्यांचा सुंदर हार देऊन तिचा गौरव केला होता. ”

राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांशी लढलेली अखेरची लढाई आणि त्यात तिचा झालेला मृत्यू या संदर्भात लेखिकेने मोजक्याच शब्दांत चित्रमयी वर्णन केलेले आहे. लेखिकेने लिहिले आहे, “ब्रिटीश आपला गेलेला किल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी आणि दुसरी सुप्रसिद्ध लढली गेलेली लढाई करण्यासाठी लवकरच परतले. पुन्हा एकदा राणी लढाईच्या मध्यभागीच होती. परंतु या वेळी मात्र ती जिवंत राहू शकली नाही. तिच्या सैनिकांशेजारीच लष्करी वेष परिधान केलेली आणि प्रतिकात्मक अशी ती तिच्या शौर्याच्या आणि विजयाच्या संदर्भातील मोत्याची माळ घातलेली लक्ष्मीबाई मृतावस्थेत धारातीर्थी पडलेली होती. मृत्यूसमयी ती अवघी बावीस वर्षांची होती.”

राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर तिच्या शूरवीर आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाविषयी भारतीयांना, एकूण इतिहासाला आणि साक्षात तत्कालीन ब्रिटीश अधिकारी वा समीक्षकांना काय जाणवले हेही अमेरिकन लेखिका मोकळ्या मनाने कशी लिहिते हे वाचण्यासारखे आहे.

ती लिहिते, राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूपासून सुप्रसिद्ध झालेली ती झाशीची राणी भारतीयांची अत्यंत पूजनीय नायिका ठरली. तिच्या शौर्याच्या तपशिलांनी भरलेली पाने ऐतिहासिक पुस्तकांतून दिसतात. ब्रिटिशांनीसुद्धा तिच्या नेतृत्वगुणाला (हिरॉइझमला) मान्यता दिलेली आहे. सर ह्यूज रोझ याने आपल्या लिखित स्वरूपाच्या एका नोंदीत म्हटले आहे, “तिच्या मृत्यूने एका बंडखोर, शूर आणि कुशल लष्करी नेतृत्वास राष्ट्र मुकले!’

“भारतीय संस्कृतीत राणी लक्ष्मीबाई कशी अमर झालेली आहे हे सांगताना अमेरिकन लेखिका म्हणते, “भारतीय संस्कृतीत असंख्य पोवाडे, गाणी आणि कथांच्या माध्यमातून झाशीच्या राणीच्या आख्यायिका अमर झालेल्या आहेत.”

आपल्या लेखाच्या अखेरीस लेखिकेने राणी लक्ष्मीबाईचे दरबारातील जे व्यक्तीदर्शन थोडक्याच शब्दांत चित्रित केलेले आहे ते वाचून आदराने मन थक्क होते. आदर वाटतो तो राणीबद्दल आणि लेखिकेबद्दलही! अमेरिकन लेखिका राणी लक्ष्मीबाईचे वर्णन करताना लिहिते, “डोक्यावर फेटा, हातात हिऱ्यांच्या बांगड्या, तलवार आणि दोन चांदीची पिस्तुले जवळ बाळगणारी राणी लक्ष्मीबाई. दरबारात राणीला आणि योद्ध्याला शोभेल असाच वेष परिधान करून जात असे.”

भारतातील वास्तव्यात शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत अनेकदा झाशीच्या राणीविषयी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून आणि चरित्रवाङ्मयातून झाशीच्या राणीचे विविध स्वरूपातील दर्शन मला घडलेले होते. भारतातील प्रवासात दोनचार वेळा झाशी स्टेशन लागले होते. प्रत्येक वेळी दिवसा व अपरात्रीही मी त्या झाशी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उतरून मनोमनी झाशीच्या राणीला अभिवादनही दाटून आलेल्या मनाने व डोळ्यांनी केलेले होते!

अमेरिकेतील छोट्याशा वास्तव्यात अनपेक्षितपणे जेव्हा एका अमेरिकन लेखिकेने इंग्रजी भाषेतून अतिशय समर्पक व आदरयुक्त शब्दांतून आपल्या राणी लक्ष्मीबाईचे मनोहारी दर्शन घडविलेले मी पाहिले तेव्हा क्षणभर मी झाशीच्याच रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर उभा राहून भरलेल्या मनाने व डोळ्यांनी राणीला अभिवादन करताना स्वतःलाच स्वतः पाहत होतो!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..