भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे निसर्गाची अनेक आश्चर्यकारक रूपे पाहायला मिळतात. यापैकीच एक ठिकाण म्हणजे आसाम राज्यातील जातिंगा हे लहानसे गाव.
दिमा हसाओ जिल्ह्यातील, हिरव्यागार डोंगरांगांच्या कुशीत वसलेले हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जेवढे ओळखले जात नाही, तेवढे ते एका गूढ आणि रहस्यमय घटनेसाठी ओळखले जाते. ही घटना आहे पक्ष्यांच्या सामूहिक आत्महत्येची.
होय, दरवर्षी एका विशिष्ट काळात येथे पक्षी मोठ्या संख्येने येऊन आपला जीव देतात. या विचित्र आणि अनाकलनीय प्रकारामुळे जातिंगा हे गाव जगभरातील संशोधक, पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय बनले आहे.
कल्पना करा, मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यातील एखादी अमावस्येची रात्र. आकाश काळ्या ढगांनी भरलेले आहे, हलका पाऊस आणि दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरली आहे. संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि जातिंगा गावावर एक गूढ शांतता आहे. अचानक, या शांततेचा भंग होतो. आकाशातून पक्ष्यांचे थवेच्या थवे वेगाने गावाच्या दिशेने झेपावू लागतात. पण त्यांचे उडणे नेहमीसारखे नसते. ते सैरभैर झालेले असतात, दिशाहीन झालेले असतात, जणू काही कोणत्यातरी अज्ञात शक्तीने त्यांना खेचून आणले आहे. हे पक्षी गावातील दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात, पण तिथे येऊन थांबत नाहीत. ते वेगाने घरांवर, भिंतींवर, झाडांवर आदळतात. काही पक्षी इतके गोंधळलेले आणि सुस्त झालेले असतात की ते जमिनीवर उतरतात आणि हालचालही करत नाहीत. गावकरी त्यांना सहज पकडू शकतात.
या घटनेत ४० हून अधिक प्रजातींचे स्थानिक पक्षी सामील होतात. ही केवळ एक-दोन वर्षांची घटना नाही, तर दरवर्षी, त्याच काळात, त्याच परिस्थितीत, न चुकता घडणारी ही एक रहस्यमय साखळी आहे.
शास्त्रज्ञांनी या घटनेमागे काही कारणे दिली आहेत, जी वरकरणी पटण्यासारखी वाटतात. पण जेव्हा आपण खोलात जातो, तेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. जसे कि, “चुंबकीय शक्ती आणि सोसाट्याचा वारा” शास्त्रज्ञ म्हणतात की, या काळात जातिंगाच्या दरीत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे येथील चुंबकीय क्षेत्रात बदल होतो. यामुळे पक्ष्यांची दिशा ओळखणारी नैसर्गिक प्रणाली (Natural Compass) बिघडते आणि ते भरकटतात.
अनुत्तरित प्रश्न: जर हे खरं असेल, तर असे चुंबकीय बदल आणि जोरदार वारे तर जगातील इतर अनेक डोंगराळ भागांमध्येही होतात. मग ही घटना फक्त आणि फक्त जातिंगाच्या १.५ किलोमीटरच्या विशिष्ट पट्ट्यातच का घडते? इतर ठिकाणी असे पक्षी का जीव देत नाहीत? “दाट धुके आणि प्रकाशाचे आकर्षण” सर्वात प्रचलित सिद्धांत हा आहे की, दाट धुक्यामुळे आणि अंधारामुळे पक्ष्यांना काही दिसत नाही. अशावेळी गावातील दिवे त्यांना आकर्षित करतात. या प्रकाशाच्या दिशेने वेगाने येताना ते मध्ये येणाऱ्या वस्तूंवर आदळतात. –
अनुत्तरित प्रश्न: पक्षी प्रकाशाकडे आकर्षित होतात हे खरे आहे, पण ते सहसा प्रकाशाभोवती घिरट्या घालतात किंवा तिथे थांबतात. ते थेट मृत्यूला कवटाळण्याइतके वेगाने आदळत नाहीत, आणि या काळात ते इतके सुस्त आणि गोंधळलेले का होतात की स्वतःचा बचाव करण्याचा साधा प्रयत्नही करत नाहीत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे पक्षी दिवसा याच परिसरात अगदी सामान्यपणे वावरतात. मग रात्रीच्या विशिष्ट वेळेतच त्यांच्यासोबत असे का घडते? “बांबूच्या वनस्पतींचा प्रभाव” काही जणांच्या मते, येथील बांबूच्या वनस्पतींमुळे हवेच्या दाबात बदल होतो, ज्यामुळे पक्ष्यांचा तोल जातो.
अनुत्तरित प्रश्न: बांबूची वने तर आसामच्या इतर अनेक भागांत आहेत. मग फक्त जातिंगातील पक्ष्यांवरच याचा परिणाम का होतो? म्हणजेच, विज्ञानाकडे तुकड्या-तुकड्यांमध्ये उत्तरे आहेत, पण या सर्व तुकड्यांना जोडून एक संपूर्ण आणि समाधानकारक चित्र तयार होत नाही. एकही सिद्धांत अनुत्तरित प्रश्नांची एकत्र उत्तरे देऊ शकत नाही.
लेखक : गणेश भुसारी
संपर्क : ८९९९३५००४४


Leave a Reply