नवीन लेखन...

जगणे सुंदर व्हावे 

आता जे उदाहरण मी देणार आहे ते मी अनेक ठिकाणी दिलंय. तेच उदाहरण द्यायचं कारण असं की, ज्या शब्दाचा अर्थ मला कित्येक पुस्तकं वाचून कळला नसता तो एका अशिक्षित स्त्रीनं सांगितला. तेव्हापासूनच न शिकलेल्या स्त्रियांना अडाणी म्हणणं मी सोडून दिलं. अडाणी म्हणजे अज्ञानी. म्हणजे या स्त्रिया औपचारिक शिक्षणाचा औपचारिक अर्थ घेतला जातो. त्या अर्थाने शिक्षण घेतलेल्या नसतील. पण जगण्याचा अर्थ, इतरांना आपल्या जगण्यात सामावून घेणं, समान संस्कारित जगणं, संवेदनशीलता अशा कितीतरी गोष्टी मी अशिक्षित पण सुसंस्कृत स्त्रियांत अनुभवल्या. तर ही घटना अशी की-

एकदा मी व्याख्यानाला चालले होते. झाडाचं जंगल होतं. जंगलात झोपडी. गाडी बंद पडली. मी झोपडीत बाहेरून हाक मारली, ‘कोणी आहे का घरात? ‘ ‘व्ह्य. हायना. पर तू कोन गं?’ आतून आवाज आला. मी म्हणाले, ‘मी आहे.’’ पुन्हा आतून आवाज आला, ‘अगं मी म्हंजी कोन! तुला काय नाव गाव हाय का न्हाय… या मी नच समदा घोटाळा केलाय…’ माझ्या लक्षात आलं तिच्या जगण्याला आध्यात्मिक पाया आहे. मी तिच्या झोपडीत शिरले. तिनं गुळाचा खडा नि पाणी दिलं. दमलेली, कंटाळलेली मी एकदम ताजीतवानी झाले. आणि ती जे बोलू लागली त्या ओव्याच होत्या. पुन्हा माझ्यातली उतरवून घेणारी शिक्षित स्त्री जागी झाली. तेव्हा ती पटकन मला म्हणाली, ‘किती गं लिव्हशील तुझा कागुद राहील कोरा । माझ्या गं वव्या जसा खट्याळ ग वारा…’ जगणं वाचायला शिकवतं ते शिक्षण. पुस्तकातल्या अडकलेल्या माझ्यासारखीला तिनं जागं केलं नि मी खडबडून जागी झाले. मला तिनं जे शिकवलं ते शिक्षण जिथे जाऊन पोचलं नाही अशा ठिकाणी जाऊन काम करायचं या विचाराला पक्का पाया मिळाला. म्हणूनच तर लोकांना आश्चर्य वाटेल अशी भल्या पगाराची नोकरी सोडून बिनपगारी कामाला सुरुवात झाली. तिथेही एकविसाव्या शतकात भीषण वास्तव माझ्या समोर आलं. रानातली बाई देवीला नवस बोलते ‘माझ्या मुलीला न जाण्याची बुद्धी दे…’ तेव्हा मी हरलेच. डिग्र्यांच्या कागदाच्या बिंडाळ्यांचं काय करायचं असं वाटलं.

इथे हेही लक्षात घेऊया कितीतरी जणी आपण शिकलोय, पण न आवडणारी नोकरी करत जगतोय. विचार करूया की, असं अजून काम करायला संधी आहे की, जिथं शिकलेल्या स्त्रियांनी जायची, झोकून देऊन काम करायची गरज आहे. हे तेव्हा घडेल जेव्हा शिक्षणाचा खरा अर्थ आपण समजून घेऊ. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी अशा त्या काळातल्या कितीतरी स्त्रियांनी सुरू केलेल्या शिक्षणातून समाज शिक्षणाशी स्त्री सकट बांधला गेला. अन्यथा स्त्रिया घरात पाहून, ऐकून समंजसपणे शिकत्या होत होत्या. पण घरात, घराबाहेर पडणं, बाहेरचं जग समजून घेणं आणि अन्यायाला वाचा फोडणं हे या शिक्षण प्रवाहामुळे सुरू झालं. अजूनही हा प्रवाह नवे अर्थ आणि नवा संदर्भ देऊन बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कुटुंबव्यवस्था विस्कटू लागलीय. दोघंही लहान सहान घटनांवरून विभक्त होऊन स्वातंत्र्य शब्दाचा वेगळाच अर्थ घेऊन जगतायत नि नव्या पिढीचे (त्यांनी जन्माला घातलेल्या) प्रश्न निर्माण झाले आहेत. काळ बदलतो. नवयुग येतं, रचना बदलते नि समस्याही बदलतात. म्हणून केवळ स्त्रीच नाही तर कुणाही व्यक्तीनं समंजसपणे, समजूदारपणे, सामोपचाराने एकत्र येण्याची गरज आहे. ‘आता शिकलोय आम्ही?’ हा माज उतरायलाच हवा.

पुन्हा एका स्त्रीकडे येते. ही पण स्त्री अशिक्षित निसर्गाची बोली शिकलेली नि जगण्याचा अर्थ नीटपणे समजून घेतलेली. इकडे शिकलेली स्त्री ‘आम्ही का मंगळसूत्र, बांगड्या घालायच्या?’ म्हणून प्रश्न विचारतेय नि इकडे न शिकलेली स्त्री आपल्या नवऱ्यावर नितांत प्रेम करणारी अन् जणू ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ असं मानणारी! नवरा गेला तर ती म्हणते मंगळसूत्राचा अर्थ परस्परांनी समजुतदारपणे बांधलं जाण्याची शपथ घेणं, ते तुटलं तरी शपथ तशीच आहे. दागिन्यांचा संदर्भच ही बाई बदलते. ही असते बहिणाबाई चौधरी. हिच्या घराच्या शेजारी असणारी गुलमोहराची झाडं उपयोगी नाहीत म्हणून लोक तोडतात. तेव्हा ती म्हणते, ‘सगळी झाडं फळं देणारी नसतात. काही झाडं डोळ्यांना आनंद देणारी असतात. शेवटी जगण्यात आनंद महत्त्वाचा…’ किती मिळवायचं, कसं भोगायचं, कसं उधळायचं असे प्रश्न विचारून मनाने उत्तर देणाऱ्या स्त्रीपेक्षा बहिणाबाईसारख्या स्त्रिया जगायचं कसं हे शिकवतात.

अर्थात अशिक्षित स्त्री सगळीकडे अशीच आहे असं नाही. पण वेगळी आहे हे भान शिक्षित स्त्रीच्या पार्श्वभूमीवर लक्षात येतं. आपण शिकलो कारण आपल्याला संधी मिळाली. आपण सुखरूप आहोत. कारण आपण सुरक्षित आहोत म्हणून. आपल्या अंगावर कपडे आहेत नि गरजेपेक्षा जास्त कपडे आपल्या कपाटात आहेत. कारण आपण कमावतो म्हणून! कंटाळा आल्यावर आपला गॅस आपण बंद करतो. कारण आपलं कुणाचं तरी अनुकरण करतो म्हणून! हे सगळं नसलेली आपली मैत्रीण वेगळं जगतीय. जिचं जगणं आपण क्वचित पडद्यावर बघतो इतकंच! आपल्या आलेल्या आर्थिक शक्तीनं स्त्री-स्त्रीमधील दरी रुंदावलीय. एका बाजूला प्रगतीची टोकं गाठताना आपली कुठेतरी अधोगती नाही ना होत याचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. आपलं जगणंच ड्युप्लीकेट झालंय, कुणाचं तरी अनुकरण करणारं झालंय. हे करताना तारतम्य आपल्यात आहे का?

एका बाजूला खूप काहीबाही माहीत असलेली खेड्यातली मैत्रीण मला दिसते. परंपरा, रूढीत खुष असते. तिला रानातल्या अनेक वनस्पतींची माहिती असते. तिचा भूगोल अनुभवातून शिकलेला असतो. तिला कितीतरी कविता, ओव्या, गोष्टी येत असतात. सगळ्या घरादारात ती गुंतलेली असते. ‘आवा चालली पंढरपुरा’ अशी तिची मनाची अवस्था असते. तिच्या छोट्याशा जगात ती आनंदात असते. तिच्या या भावविश्वाला आपलं शिक्षण धक्के मारू लागतं. तिच्या घरात आलेली यंत्र तिचं जगणं बदलत असतात नि याचे तोटे तिला समजतात. शहरात आलेला बदल दुसऱ्या देशातून आलेला असतो तो झिरपत झिरपत खेड्यापर्यंत येतोय नि हळूहळू थोडफार शिकलेली ती आता आरामाच्या वेगळ्या कल्पना आपल्याशा मानू लागलीय. तिला हे जाणवतं की, शिकली बाई म्हणजे वाचू लागली, मनासारखी जगू लागली, रचना बदलू लागली, व्यवहारापासून बाजूला जाऊ लागली. अशा स्त्रीच्या मनात आता गोंधळ निर्माण झालाय. पूर्वी मी जगत होते ते खरं की आता माझ्या लेकीसुना जगतायत ते खरं, या संभ्रमात अनेकजणी जगतायत. खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला दिसतोय. आता सामान्यतः ज्या ५५-६० मध्ये आहेत, त्यांचे नि त्यांच्या लेकीसुनांचे नातेबंध यात खूप गोंधळ आहे. शिकलेली स्त्री व न शिकलेली स्त्री यात दरी आहे. शहरी आणि ग्रामीण स्त्री यात दरी आहे. आधुनिक स्त्री आणि पारंपरिक स्त्री यात फरक आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली स्त्री दोन प्रकारे सक्षम झाली. नोकरी, व्यवसाय (शिक्षणामुळे) करू लागलेली स्त्री आणि कुटुंबाची गरज म्हणून मोलमजुरी करून सक्षम झालेली स्त्री. इथेही फरक आहे. दुसऱ्या प्रकारातील स्त्रीची आर्थिक कमाई तिच्या कुटुंबाची भागभागवी करणारी आहे. त्यामुळे पैसा ते खर्च करण्याचे स्वातंत्र्य हे प्रकार तिच्याबाबतीत म्हणजे घरासाठी ते ती करते. इथेही काळानुसार बदल अगदी खेड्यापाड्यातही झाले आहेत. रोज मजुरीच्या कामावर जाणारी बाई आज जमेल तसं डाय करते, आयब्रोज करते. तिनंही छान दिसावंच आणि याला फार कोणी शंका घेतली नाही. घरातल्या दोन पिढीतल्या स्त्रिया इतपत करताना दिसतात. वेणीफणी पावडर कुंकू लक्षपूर्वक करते. पहिल्या स्त्रीच्या बाबतीत ती निर्णयाचे स्वातंत्र्य घेते, ती मनासारखे पैसे खर्च करते. खरं तर दोन पिढीतल्या ‘ती’ने संवाद साधायची गरज आहे.

एक उदाहरण देते. एक घर. घरातल्या नवीन पिढीसाठी त्यांची बेडरूम आहे. ते तिचं जग आहे. घर आधीच्या पिढीनं उभं केलंय. ती तिथे आलीय आणि आता हे माझंच हे तिने गृहीत धरलेय. तिच्या मते ती आधीच्या पिढीशी तडजोड करतेय. स्वयंपाक घरात, सगळ्यात वावरताना. पण तिचं विश्व असलेली खोली तिची आहे. ती खोलीची सजावट करायचा निर्णय घेते. सांगते. काम सुरू होतं. यात आधीची पिढी कुठेच नसते. यात काय करता येणं शक्य होतं, ‘अहो, सामान खूप झालंय. करून घेऊ का काही काम ! म्हणजे भिंतीतली कपाटं करून घ्यावी म्हणते… तुमच्या खोलीचं काही काम करायचेय?…’ कदाचित या सहजतेने आढी कमी झाली असती. स्वातंत्र्य कुणाला टोचता कामा नये ही गोष्ट महत्त्वाची नाही का? करायचं मनातलं, न पण सुसंवाद झाला तर सहजपणे स्वीकारलं जातं… नेमकी हीच गोष्ट आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या स्त्रीत दिसून येते. नातेसंबंध दोन्हीकडून जपले पाहिजेत. हे खरं असलं तरी माझे मी निर्णय घेईन हे नसावं. शेअरिंग इज केअरिंग याला महत्त्व आहेच की!

आपण आजच्या काळाच्या पायरीवर हा विचार प्रत्येक स्त्रीनं करायला हवा. निदान शिकलेल्या प्रत्येक पिढीतल्या, जुन्या गोष्टी विचार मांडून समजूतदारपणे सोडाव्याशा वाटतील त्या सोडाव्या पण संवाद हवा. आधी निर्णय नसावा. फाटत चाललेली कुटुंबव्यवस्था, मूल्यव्यवस्था, नातेबंध जपणं, सुंदर करणं हे शिक्षित, अल्पशिक्षित, निरक्षर, साक्षर प्रत्येक स्त्रीच्या हाती आहे. आजच्या जीवनविषयक नव्या रचना (Live in relationship तरुण नि वृद्धही) येत आहेत. त्या कशा रुजल्या पाहिजे, त्याचा परिणाम याचाही विचार केला पाहिजे. अर्थात दोघांनी. बरेच वेळा विघटनाला अहंकारणीभूत असतो जहाल मतवादी जगणं कारणीभूत ठरतं. हाती आकांत, आक्रोश, वेदनाच शिल्लक राहतात. म्हणून आपण प्रत्येकानं- प्रत्येकानं विचार करूया की, इतका सुंदर जन्म आहे तो सुंदरच ठेवूया. आनंदात जगूया. माणसाला माणसाची किती गरज असते हे कोरोनाने दाखवलेच आहे ना!

रेणू दांडेकर

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..