नवीन लेखन...

अतुल्य भारत

सप्त महासागरावर तरंगणारे हे अंडाकृती विश्व म्हणजे एक प्रकारचे महान बेटच आहे आणि या महाबेटाचे मध्यवर्ती ऊर्जा केंद्र म्हणजेच अलौकिक अशा अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे ‘जंबुद्वीप’ (Rose apple island) म्हणजेच आपला हिंदुस्थान होय. प्राचीन ग्रंथात या जंबुद्वीपाचे वर्णन, महत्त्व सांगितले आहेच. इतर कुठल्याही देशामध्ये आढळून न येणारी इतकी विविधता, संपन्नता आपल्या देशामध्ये एकवटली आहे. एकाचवेळी उत्तरेकडे विस्तारलेल्या हिमालयामध्ये बर्फवृष्टी सुरू असते तर तिकडे राजस्थानमध्ये अमर्याद पसरलेल्या शुष्क व तापलेल्या वाळवंटामध्ये आपल्या अंगाची काहिली होत असते. आणि दक्षिणेत केरळच्या हिरव्याकंच डोंगररांगांवर काळ्याभोर मेघांचे सावट पसरलेले असते आणि मधूनच बेधुंद पावसाची मोठी सर कोसळत असते. निसर्गाचे लहरीपण आणि विविधता केवळ आपल्या देशातच बघायला मिळते. याशिवाय भाषा, खाद्यसंस्कृती, रीतिरिवाज, परंपरा, सणवार, उत्सव यामध्ये सुद्धा विविधता व्यापून उरली आहे. अनेक जण निसर्गाचे चमत्कार बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी विनाकारण परदेशात जातात. परंतु मित्रांनो तुम्हाला अपेक्षित असलेले निसर्गाचे सौंदर्य, चमत्कार, वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स केवळ आपल्या भारतात आहेत हे दुर्देवाने माहितीच नसते. आजच्या तरुण पिढीला असे सांगावेसे वाटते की प्रथम आपला अख्खा भारत तर बघा डोळसपणे आणि नंतर मग हवे तर परदेशात जा.

आपल्या विशाल आणि समृद्ध देशात काय नाही? हिमशुभ्र शिखरे आहेत, विशाल नद्यांची पात्रं आहेत आणि त्यांच्या तीरांवर वसलेली अनेक धार्मिक अधिष्ठाने आहेत. पराक्रम, शौर्य आणि बलिदानाचा, ऐतिहासिक वारसा सांगणारे बेलाग, उत्तुंग किल्ले आहेत, बौद्ध धर्माचे नाते सांगणाऱ्या पुरातन काळातल्या लेण्या आहेत. अजिंठा, वेरूळ सारखी अभिजात कलेची दालने आहेत, तर ताजमहाल, कुतुबमिनार सारखे उच्च प्रतिभेचे वरदान लाभलेले कलावैभव आहे. पश्चिम किनारपट्टीवर सिंधुसागराच्या लाटा जणू अहोरात्र आपल्याशी सुसंवाद साधत असतात तर घनगर्द झाडांच्या कोंदणात लपलेली व नक्षीकामाने सजलेली अनेक सुंदर मंदिरे आहेत.

आपल्या सरकारने संपन्न अशा भारतातल्या विविध स्थळांचे सौंदर्य, विविधता, परंपरा पाहण्यासाठी अतुल्य भारत सारखा उपक्रम राबविला आहे.

देश-विदेशातील करोडो पर्यटक इथल्या प्राचीन, ऐतिहासिक संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी तर कोणी केवळ भटकंतीसाठी आपल्या देशात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रांतात सतत भेटी देत असतात. २९ राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांनी व्यापलेल्या या समृद्ध देशात पाहण्यासारखे भरपूर काही आहे. २०१७ च्या सर्वेक्षणानुसार जागतिक पर्यटनामध्ये एकूण १३६ देशांच्या यादीत आपल्या भारताचा ४० वा नंबर लागतो. प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येक संस्कृतीची वेगळी खासियत आहे, त्या राज्याला एक वेगळीच ओळख आहे. उदा. राजस्थान मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण सतत वाढत आले आहे. तिथले राज्य, तिथले शासन केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांसाठी अनेक उत्तमोत्तम योजना आखीत असते. तेथील हवेल्या, किल्ले, संगीत, कलात्मक राजवाडे, विविध उत्सव यामुळे पर्यटक हा उत्सुक असतो. त्याचप्रमाणे भारताचे हृदय समजले जाणारा मध्यप्रदेशमध्ये देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे. राजवाडे, किल्ले, स्तूप, भीमबेटका सारख्या प्राचीन गुंफा, अप्रतिम कलाकुसरीने सजलेली खजुराहोची मंदिरे, कान्हा, बांधवगड, पेंच सारखी समृद्ध अभयारण्ये पर्यटकाला भुरळ घालीत असतात. आणि आपला महाराष्ट्र? ७२० कि.मी अंतराचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभेलला महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांनी पावन झालेले रायगड, शिवनेरी, प्रतापगड सारखे अजोड किल्ले, अजिंठा-वेरूळ लेण्यासारखी कलेची मंदिरे, प्राचीन लेणी, अभयारण्ये, वस्तुसंग्रहालये सारं वैभव पाहण्यासारखे.

आपल्या भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने इथल्या पर्यटन स्थळांचा, पर्यटकांना मिळणाच्या सुखसुविधांचा, दळणवळणाचा, तेथील एकूण सामाजिक स्थितीचा, विविध उत्सवांचा, सणांचा आणि सर्वात महत्वाचे तेथील स्थानिक लोकांचा, त्यांच्या उपजीविकेचा, रोजगाराचा सूक्ष्म अभ्यास विचार करून भारतात या पर्यटनाचे अवकाश कसे समृद्ध होईल याचा ध्यास घेऊन सरकारने २००२ मध्ये ‘अतुल्य भारत’ म्हणजेच “Incredible India’ सारखे मिशन सुरू केले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना या अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर केले आणि अखंड जाहिरातींच्या, विविध कार्यक्रमांच्या आणि उपक्रमाच्या माध्यमातून या अभियानाचे महत्त्व सर्वच राज्यांमध्ये सरकारने अधोरेखित केले. या अभियानामध्ये प्रामुख्याने इथली लोकसंस्कृती जाणून घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना आपल्या भारताकडे खेचून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यास उत्तम असा प्रतिसाद देखील लाभत आहे. या अभियानात प्रारंभी हिमालय, वन्यजीव, तीर्थक्षेत्रं, योग आणि आयुर्वेद यावर विशेष भर देऊन परदेशातील पर्यटकांना आकर्षित केले गेले. त्यासाठी सर्वप्रथम पर्यटन स्थळाचे रुपडे पालटून गेले, रस्ते, रेल्वे, विमानसेवा सक्षम केली गेली. हॉटेल व्यवसाय मजबूत केला गेला. त्यांना अनेक सवलती देण्यात आल्या. रोजगार वाढू लागला. याचेच फलित म्हणजे अधिकाधिक परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भारतात येऊ लागला.

या अभियानामुळे गेल्या अठरा वर्षात केवळ राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश मध्येच पर्यटन वाढले नाही तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देखील पर्यटक वाढू लागले हे सर्वात महत्त्वाचे. अतुल्य भारत हे केवळ अभियान नव्हे तर ती एक पर्यटन चळवळ आहे. ती अधिकाधिक वाढवणे ही तर काळाची गरज आहे.

–रामदास खरे

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..