नवीन लेखन...

‘इराकची निर्माती आणि अरेबियाची अनभिषिक्त सम्राज्ञी’ – गरटूड बेल

‘इराकची निर्माती आणि अरेबियाची अनभिषिक्त सम्राज्ञी’

इंग्लंडच्या गरटूड बेल या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपण स्वतःला कशी करून द्यावी, असा प्रश्न मला पडतो. जगप्रवासी, राजकारणपटू, मानववंशशास्त्रज्ञ, कवयित्री, भाषातज्ज्ञ, गिर्यारोहक, फोटोग्राफर आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबियन’ची म्हणजे टी.ई. लॉरेन्स याची हितचिंतक आणि त्याला वैचारिक बळ व दिशा देणारी त्याची मैत्रीणही ती होती! चर्चिलबरोबर वाळवंटातून उंटावरून प्रवास करतानाचाही तिचा फोटो मी अमेरिकेत एका पुस्तकात पाहिलेला आहे. तिचे पूर्ण नाव गरटूड मागरिट लोथियन बेल असे आहे.

एखाद्या चित्रपटाच्या नायिकेचे, विशेषतः ‘ॲक्शन’ चित्रपटाच्या नायिकेचे असावे असे तिचे व्यक्तिमत्त्व होते. ज्या काळात इंग्लंडमधील बऱ्याचशा बायका आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पाळण्यात व्यग्र होत्या. त्या काळात गरटूड ही पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण ‘व्हिक्टोरियन’ ड्रेस घालून घोड्यावर किंवा उंटावर बसून वाळवंटातून खडतर प्रवास करीत असायची!

गरटूडला प्रवासाची नुसती आवडच नव्हे, तर वेडच होते! राजकारणपटुत्व तिच्या रक्तात होते. कोणत्याही काळातील मापदंड लावला तरी गरटूड ही प्रतिभावान राजकारणी होती, असेच भल्याभल्यांना म्हणावे लागेल. त्यामुळेच तिला ‘अरेबियाची अनभिषिक्त सम्राज्ञी’ म्हणूनच संबोधले जाते!

गरटूडच्या जीवनाला ‘व्हिक्टोरियन’ पार्श्वभूमी असूनही सर्व जगप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंतःकरणात तिला महत्त्वाचे स्थान होते. त्यांना ती अतिशय विश्वसनीय मार्गदर्शक वाटत होती.

शरीर होरपळवून टाकणाऱ्या आणि धुळीने व्यापलेल्या उष्ण हवामानात उंटावरचा प्रवास दिवसच्या दिवस गरटूडने केला होता. अरबी टोळ्यांच्या हल्ल्यांच्या सततच्या धाकाखाली तापलेल्या वाळवंटातून तिला तो प्रवास करावा लागला होता. तिच्या नैसर्गिक वाक्पटुत्वामुळे आणि राजकारणपटुत्वामुळे तिने अनेकदा धोकादायक प्रसंगांतून सहीसलामत मार्ग काढलेला होता.

पहिल्या महायुद्धानंतर मध्यपूर्वेकडील देशांतील नव्याने केलेल्या सीमाआखणीच्या कामावर गरटूड बेलचा फार मोठा ठसा उमटलेला होता. विशेष म्हणजे, इराक देशाच्या स्थापनेत गरटूडचा सिंहाचा वाटा होता, असे म्हटले जाते.

गरटूडच्या राजकारणपटुत्वाविषयी वारंवार फार प्रशंसात्मक बोलले गेले आहे. या संदर्भात आपण स्त्री असल्यामुळे जर आपली कोणत्याही कारणास्तव प्रशंसा केली जात असेल, तर ती आपणास मान्य नाही, असे ती अत्यंत वैतागून म्हणत असे. तिच्या लेखनाबाबत प्रशंसा केली गेली असता प्रतिक्रिया म्हणून ती म्हणाली होती, ‘ज्याप्रमाणे एखादा कुत्रा मागील पायांवर उभा राहिल्यावर आश्चर्याने पाहावे तसे एखाद्या स्त्रीने लेखन केले म्हणून आश्चर्याने प्रशंसात्मक बोलणे योग्य नव्हे!’

अशा या जगप्रसिद्ध राजकारणपटू गरटूड बेलचा जन्म इंग्लंडमधील वॉशिंग्टन हॉल डरहॅम कौंटीतील मिडलबरो (Middlesbrough) मधील एका सुखवस्तू घरात १४ जुलै १८६८ रोजी झाला होता. मात्र तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी तिची आई मृत्यू पावल्याने तिच्या बालपणावर मातृवियोगाच्या दुःखाची गडद छाया कायमची राहिली होती. ती आठ वर्षांची असताना तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. फ्लॉरेन्स ऑलिफे (Florence Olliffe) या सावत्र आईचा फार महत्त्वपूर्ण आणि विधायक स्वरूपाचा ठसा गरटूड बेलच्या बालपणावर उमटला होता. फ्लॉरेन्सने स्वतंत्र विचारसरणी आणि धाडसी वृत्तीबाबत गरटूडला प्रोत्साहनच दिले. छोट्या ‘गर्टी’नेही आपल्या सावत्र आईचा उपदेश स्वतःच्या अंतःकरणात बिंबवून घेतला होता. आपल्या वडिलांना म्हणजे ह्यू बेल (Hugh Bell) यांना ‘गर्टी’ दैवतच मानत होती. जिचे वडील तिला नेहमी सांगत, ‘मात करण्यासाठीच अडचणी आलेल्या असतात!’

गरटूड बेल ही फार सुदैवी होती. तिच्या काळात स्त्रियांवर बऱ्याच सामाजिक मर्यादा होत्या. असे असूनही गरटूडच्या कुटुंबाने तिच्या शिक्षण घेण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्काबाबत तिला पूर्ण सहकार्य देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे आश्चर्यजनक वेगळे धोरण आखले होते.

त्या काळी इंग्लंडमध्ये मुलींना शिक्षणासाठी प्रवेश देणारी दोनच महाविद्यालये होती. ऑक्सफर्ड हे त्यापैकी एक होते. म्हणून गरटूडला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी (प्रथम घरीच शिक्षण देऊन नंतर) पाठविण्यात आले. तेथे ती प्रथम वर्गात विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..