नवीन लेखन...

एमी पॅक, माता हरी,- काही महिला हेर

रुथ ब्युरटॉन, क्रेझी बेट: काही महिला हेर

हेररगिरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वभावविशेषच वेगळे असावे लागतात. मूळ पिंडच सर्वसामान्य माणसांपेक्षा दुर्मीळ स्वरूपाचा असावा लागतो. पोलादी रक्तवाहिन्या, धाडसी वृत्ती, मृत्यूविषयी बेपर्वा वृत्ती आणि वेगळे काही करून दाखविण्याची तीव्र ओढ, हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीत असावी लागते. त्याखेरीज इतर अनेक स्वभाववैशिष्ट्यांचीही अपेक्षा असते.

हेरगिरीच्या जगात महिलांनी दिलेले योगदान हे ऐतिहासिक स्वरूपाचे असल्याचे दाखले पुनः पुन्हा निर्विवादपणे जगात सर्वत्र अनुभवास आलेले आहेत. किंबहुना हेरगिरीच्या शस्त्रगारातील अत्यंत महत्त्वाचे शस्त्र म्हणून स्त्रीत्वामुळे महिला हेरांचा उपयोग होतो. एखाद्या धावपळीत असणाऱ्या गृहिणीमध्ये किंवा गंभीर दिसणाऱ्या एखाद्या सौंदर्यवतीमध्ये एक गुप्त स्वरूपाची, धाक दाखविणारी आणि अत्यंत धोकादायक ठरणारी गूढ आणि आकर्षक महिला हेर आहे, असा कुणाला संशय तरी येऊ शकतो का?

एमी थोरपे पॅक (Army Thorpe Pack) ही हेरगिरीच्या इतिहासातील चित्तथरारक कथाच ठरलेली सौंदर्याचा साक्षात् ॲटमबॉम्बच होती. सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि अत्यंत थंड चित्तवृत्ती अशा गुणांचे विलक्षण मिश्रण एमीच्या स्वभावात होते. अगदी सहजपणे कुठलाही पुरुष आपल्या सौंदर्यास भुलू शकतो आणि तो आपल्या कह्यात येतो हे एमीला फार लवकरच जाणवले होते.

किंबहुना आपल्या अत्यंत देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आपण कुणाही पुरुषाची शिकार सहजपणे करू शकतो हे ती चांगल्या प्रकारे जाणत होती. पुरुषाचे सावज टिपण्याची आपल्या सौंदर्याची शक्ती तिने निर्दयपणे वापरून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनला शत्रूपक्षाची गुपीते मिळवून दिली होती. तिच्या हेरगिरीच्या कारकिर्दीत तिने अनेक यशोदायी मोहिमा पूर्ण केल्या होत्या. परंतु वॉशिंग्टन डी. सी. मधील तिची हेरगिरीची कामगिरी म्हणजे कळसाध्यायच ठरली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीचे हस्तक असलेल्या आणि मित्रराष्ट्रांच्या विरुद्ध असलेल्या विचि फ्रेंच सरकारच्या वकिलातीतून (मिलिटरी कोड) लष्करी सांकेतिक लिपी चोरून आणण्याची विशिष्ट हेतूची कामगिरी एमीवर सोपविलेली होती. एमीने तिच्या सहकाऱ्यांसह एक अत्यंत धाडसी योजना आखली होती. या योजनेनुसार विचि फ्रेंच सरकारच्या वकिलातीत रात्रीच्या वेळी चोरून प्रवेश करून तिजोरी फोडून, खिडकीतून सांकेतिक पुस्तके (कोडबुक्स) बाहेर नेऊन, त्यांचे फोटो काढून पुन्हा पहाटेपूर्वी जसे होते तसे ठेवण्याची योजना होती. मनाला विषणता यावी अशी ती रात्र एमीच्या आयुष्यात आलेली होती. एमीला अत्यंत वेगाने भराभर निर्णय घेऊन कृती करावयाची होती. एखाद्या रहस्यकथेतील यशस्वी नायकासारखे, चित्रपटात दाखवितात तसे सारे करावयाचे होते. एमीच्या कर्तृत्वाची ती कसोटीची रात्र होती.

एमीचे नशीब बलवत्तर होते. योजनेबरहुकूम सर्व घडले. सकाळ उजाडण्यापूर्वीच एमीने कामगिरी फत्ते केलेली होती. एमीने ब्रिटिशांना लष्करी कोड पोहोचते केले होते.

एमीने केलेल्या या कामगिरीची वार्ता या कानाची त्या कानालाही समजली नव्हती. अन्य कुणाची गोष्टच सोडा, फ्रेंच वकिलातीतील कुणालाही कधीही समजले नव्हते, की त्यांच्या लष्करी कोडची कुणी चोरी केलेली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्रराष्ट्रांच्या शस्त्रागार विभागास ज्या अनेक गोष्टींचा लाभ झाला त्यापैकी सर्वात जास्त लाभदायक ठरलेली गोष्ट म्हणजे एमीने पळवून आणून दिलेले लष्करी कोड ! एमी पॅकच्या वरिष्ठाधिकाऱ्यांनी लोकांचे जीव वाचल्याचे तिच्या या कामगिरीमुळे मित्रराष्ट्रांकडील एक लाख ल नंतर सांगितले होते.

परंतु विचि फ्रेंच वकिलातीत शिरून लष्करी कोड ठेवलेल्या कपाटांच्या खोलीत एमी काम करीत असताना तेथील एका सुरक्षारक्षकास संशय आला होता. तो खोलीत आत येऊ पाहत होता तो एमीच्या लक्षात आले. एमीने त्याला बाहेर जाऊन भेटून सांगितले की, ती एका मित्राला त्याने दिलेल्या वेळी भेटण्यासाठी आलेली आहे. सुरक्षारक्षकास खात्री वाटावी असे बोलण्याचे व अभिनयाचे कसब त्या अत्यंत धोकादायक क्षणी एमीने प्रसंगावधानाने दाखविले होते.

शत्रूराष्ट्राची सांकेतिक लिपी किंवा लष्करी कोड हेरांनी हस्तगत करणे ही हेरगिरीतील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जबाबदारी असते. हे कोड मिळाल्यामुळे शत्रूच्या लष्करात अंदाधुंदी निर्माण करणे शक्य होते.

एमीप्रमाणेच इतर अनेक महिला हेर आपापल्या काळात आपापल्या कार्यपद्धतीने प्रसिद्ध झाल्या आहेत. वास्तविक हेर गुप्तच असाव्या किंवा असावे लागतात. ‘प्रसिद्ध’ होऊन हेरांना चालत नाही. म्हणूनच त्यांना ‘गुप्तहेर’ म्हणतात. परंतु प्रसिद्ध पावलेले वा पावलेल्या हेर त्यांच्या जीवनाअखेरीसच बहुधा सर्वसामान्यांना ठाऊक होतात किंवा त्यांच्यापैकी जे हेर शत्रुपक्षाच्या हाती लागून त्यांची हत्या केली जाते वा त्यांना शतूकडून शिक्षा केली जाते तेव्हा त्या हेरांच्या नावाला किंवा कार्यालाही प्रसिद्धी मिळते. परंतु एरवी हेरांच्या नशिबी अप्रसिद्धीच असते.

सुप्रसिद्ध असलेल्या महिला हेरांच्या मालिकेत माता हरी ही हेर म्हणजे एक दंतकथाच मानली जाते. मागरिथ झेले (Margareth Zelle) हे तिचे खरे नाव. ती अतिशय सुंदर आणि हेर म्हणून भयंकर होती. जगावेगळी आणि खास वैशिष्ट्ये असलेली नर्तकी म्हणून आपले आयुष्य जगलेली मागरिथ हिने अत्यंत बनावट पद्धतीचा परंतु बेमालूम वाटावा असा आपला भूतकाळ तयार केला होता. तिचे वैशिष्ट्य म्हणजे सहसा कोणताही हेर व्यक्ती करीत नाही ते वारंवार पक्षबदलाचे आयुष्य ती जगली. राजकारणात सत्तेसाठी वा स्वार्थासाठी माणसे पक्ष बदलतात. परंतु हेरगिरीच्या इतिहासात आपली बाजू बदलणारी मागरिथसारखी हेरमंडळी अपवादानेच सापडतील. मागरिथ ही तशी अपयशीच हेर ठरली. कोणत्याही सरकारला कोणतीही उपयुक्त माहिती ती देऊ शकली नव्हती. ती जर्मनांना माहिती पुरविणारी हेर म्हणून जेव्हा उघडकीस आली आणि फ्रेंचांच्या गोळीबार करणाऱ्या पथकाकडून जेव्हा तिला ठार मारले गेले तेव्हाच तिच्या जीवनाची कहाणी जगापुढे प्रसिद्ध पावली होती.

हॅरिअट टबमन ही सुद्धा सामाजिक क्रांती करणारी आणि निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले आयुष्य वेचणारी महिला वैशिष्ट्यपूर्ण आणि सुप्रसिद्ध हेर ठरली होती.

एलिझाबेथ व्हॅन ह्यू हिने ‘क्रेझी बेट’ हे नाव धारण करून आपण मनोरुग्ण आहोत असे सोंग करून युनियन साईडसाठी अमेरिकन यादवी युद्धात शक्य ती गुप्त स्वरूपाची उपयुक्त माहिती मिळविली होती. तिची कार्यपद्धतीही जगावेगळी व कुणाला यत्किंचितही संशय येऊ न देणाऱ्या स्वरूपाची होती. युनियन सोल्जर्सना ती आतून पोकळ केलेल्या अंड्यांच्या टरफलातून निरोप पोहोचवीत असे. हे निरोप पोहोचविताना ती हातात भाजीची निरुपद्रवी वाटावी अशी टोपली घेऊन स्वतःशीच वेड्यासारखी बडबड करीत रस्त्याने जात असे.

अमेरिकन यादवी युद्धातील विरुद्ध पक्षात बेले बॉइड (Belle Boyd) ही महिला हेरही काम करणारी एक प्रसिद्ध हेर होती. युद्ध चालू असताना अग्रभागी असलेल्या लष्करी तळास स्वतःच निरोप देण्यासाठी ती शत्रुपक्षाच्या बंदुकींच्या गोळ्यांचा मारा चुकवीत रणभूमीवर निर्भयपणे वावरत असे. तिच्या या पद्धतीने वावरण्यामुळे ती अनेकदा पकडली जाऊन तुरुंगवासही भोगून आली होती. बंडखोरी वा क्रांती सफल व्हावी म्हणून निर्भयतेने ती एकनिष्ठेने जगली होती. एकदा तर तिच्या घरावर युनियन फ्लॅग लावणाऱ्या शिपायास तिने गोळी घालून मारले होते.

प्रत्येक राष्ट्रात आपआपले हेर असतातच. दुसऱ्या राष्ट्रांतील गुप्त स्वरूपाची माहिती आणि कागदपत्रे हस्तगत करण्याची जबाबदारी या हेरांची असते, ही गोष्ट सर्वज्ञात आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतःचा हेर म्हणून कुणालाही संशय येऊ नये यासाठी विविध भूमिकेतून हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीस जगावे लागते. अशाप्रकारे एका अत्यंत साध्यासुध्या, अजागळ व बावळट भासणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या बुरख्याखाली रशियाच्या अत्यंत बुद्धीमान ठरलेल्या रूथ कुकझिनस्की ब्युरटॉन (Ruth Kuczynski Beurton) या महिलेचे हेरगिरीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. तिने आपली हेरगिरीची संपूर्ण कारकीर्द ब्रिटनमध्ये अगदी साध्या राहणीमानाने राहून गाजवली. ती अगदी एका छोट्याशा कॉटेजमध्ये राहून रेडिओच्या शॉर्टवेव्हद्वारे गुप्तस्वरुपाची माहिती तिच्या देशाला पाठवीत असे.

आपल्या लहान मुलाच्या हातातील टेडी बेअरच्या खेळण्याच्या पोटात शत्रूपक्षाकडील अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती असलेली साधने दडवून रूथ ब्युरटॉन ब्रिटनमध्ये सहजपणे प्रवास करीत असे. आईच्या भूमिकेत असलेली, चार सर्वसाधारण बायकांप्रमाणे दिसणारी एक स्त्री आपल्या मुलाच्या हातातील खेळण्याचा वापर हेरगिरीसाठी करीत असेल, असा संशयही स्वतःला अत्यंत बुद्धिमान समजणाऱ्या ब्रिटिश हेरखात्यातील कुणालाही आला नाही!

ब्रिटिश हेरखात्याला रूथ ब्युरटॉनच्या कार्यपद्धतीचा शोध लागला तेव्हा ती आपली सर्व कामगिरी चोख बजावून सहीसलामत मायदेशी परतलेली होती. फसव्या व्यक्तिमत्त्वाची रूथ ही महिला, सोव्हिएटच्या हेरखात्यातील ‘सोनिया’ नामक योजनेची प्रमुख होती आणि तिने दुसऱ्या महायुद्धकाळात ब्रिटनमध्ये राहिलेल्या सोव्हिएट हेरांच्या जाळ्याचे नेतृत्व केले होते, हे ब्रिटिश हेरखात्यास फार फार उशिरा लक्षात आले होते. स्वतःला अत्यंत चाणाक्ष, धोरणी, उत्तम प्रशासक समजणाऱ्या आणि ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही, असे आत्मप्रौढीने म्हणणाऱ्या ब्रिटिशांच्या हेरखात्यावर मात करणारी रूथ ब्युरटॉन ही इंग्रजांच्या दृष्टीने अंधारातच राहिलेली एक महिला हेर होती.

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..