नवीन लेखन...

‘एक अभूतपूर्व सामना’

हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) व मास्तर (श्रीराम लागू) यांच्यामधील रंगलेला ‘सामना’ पाहिलेला नाही असा मराठी सिने रसिक विरळाच. या सिनेमातली या दोन अतिशय ताकदीच्या कलाकारांमधील ही अभिनयाची जुगलबंदी म्हणजे आपल्यासारख्या चित्रपट प्रेमींना मेजवानीच आहे. तसा हा साधारण दोन तासांचा संपूर्ण सिनेमा, या दोन ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी आपल्याच खांद्यावर पेलला आहे. जरी यात मोहन आगाशे, विलास रकटे, लालन सारंग यांसारखी काही मोठी नावं देखील होती, पण हा सिनेमा सर्वार्थाने निळू फुले व डॉ.श्रीराम लागू यांचाच आहे.
मला वैयक्तिक या सिनेमाचा जर कोणता भाग सर्वात जास्त आवडतो तर तो म्हणजे जेंव्हा हिंदुराव व मास्तर यांची सिनेमाच्या अगदी सुरवातीला जी पहिली भेट होते तो. सिनेमाच्या अभ्यासकांनी जरुर अभ्यासावा असा तो सीन. आदल्याच दिवशी रात्री उशीरा आपल्या जीपने घरी परतत असताना हिंदुरावांना एक म्हातारा रस्त्यात पडलेला दिसतो. तो दारु पिउन तर्र झालेला माणूस आपल्या जिपमधे घालून, हिंदुराव त्याला घरी, आपल्या वाड्यावर, घेउन येतात. नोकराला सांगून त्याची झोपायची व्यवस्था करतात. तो म्हातारा म्हणजेच मास्तर.

दुस-यादिवशी नोकराला सांगून हिंदुराव त्या मास्तरांना आपल्या दिवाणखाण्यात बोलवून घेतात. दिवाणखाण्यात येता येता हिंदुरावांचा कुत्रा मास्तरवर भुंकतो तेंव्हा मास्तर म्हणतात ‘अरे वा..उच्च जातीचा दिसतो..जातीचा ज्वलंत अभिमान..!!’ इथे हा चिमटा लेखक विजय तेंडूलकर नकळत काढतात तो लक्षात येत नाही..

लांब अशा त्या डायनींग टेबलच्या एका बाजूला बसलेले हिंदुराव व त्यांच्या दिवाणखाण्यात भीत भीत प्रवेश करणारा तो म्हातारा. अशा पद्धतीने सीन सुरु होतो. हॉलमधे काही शिकार केलेल्या वाघांची मुंडकी अडकवलेली पाहून ‘समस्त व्याघ्र मंडळी सुखी असोत’ असे मास्तर उद्गारतात ते मजेशीर वाटते.

सत्तरच्या दशकातली ही गोष्ट. ग्रामीण भागातले पुढारी असलेले हिंदुराव धोंडे पाटील. त्यांनी सहकारी साखर कारखाना, दूध डेअरी व पोल्ट्री फार्म अशी अनेक विकास कामे सहकाराच्या माध्यमातून या गावात आणले आहेत. आपल्यामुळे या गावाचा विकास झाला याची हिंदुरावांना खात्री आहे व त्याचा त्यांना तितकाच गर्व देखील आहे.

पैशामुळे व सत्तेमुळे हिंदुरावांच्या वाड्यात, घरात आलेली सुबत्ता प्रथमदर्शनीच दिसून येते आहे. भिंतींवर टांगलेली वाघांची मुंडकी देखील त्याचेच प्रतिक. त्यामुळे अशा या घराच्या दिवाणखाण्यात प्रवेश करताना म्हातारा मास्तर बावचळेल यात काही नवल नाही.
‘राजवाडाच म्हणायचा ss..!’ आत शिरताच मास्तर अनाहुतपणे उद्गारतो…’कोणत्या राजाचा?’ असंही पुढे अगाउपणे विचारतो.
खाली जमिनीवर बसू पाहणा-या, मास्तरला हिंदुराव खुर्चीत बसायला सांगतात. संकोचलेले मास्तर हिंदुरावांसमोर बसतात. हिंदुराव स्वतःच्या हाताने चहा बनवून त्यांच्या समोर सरकवतात ‘घ्या..’ निळू फुले आपल्या त्या खर्जातल्या धीर गंभीर आवाजात मास्तरांना चहा घ्यायला सुचवतात.

काय जरब आहे त्या आवाजात…अंगावर काटा येतो. एका फाटक्या माणसाला एक मोठा माणूस स्वतः चहा बनवून देतोय याचं आश्चर्य मास्तरच्या बघण्यात, बोलण्यात झळकतं. वरतून बिस्कीट देखील खायला मिळतात तेंव्हा मास्तर अत्यानंदाने अजूनच लाचार भासतात.

त्याच लाचारीने जेंव्हा मास्तर हिंदुरावांना बोलतात ‘आता दारु मिळेल असे सांगू नका..! मिळाली तर नक्की घेउ..न द्याल तर मागून, हिसकावून घेउ..’ तेंव्हा एरवी दारु न पिणारे हिंदुराव त्यांच्यावर रागावतात. दारु पिणा-यांचा तिटकारा त्यांच्या बोलण्यात जाणवतो.

‘दारु आमचा प्राण आहे, आमचा श्वास आहे..’ असे मास्तर त्यांना पोटतिडकीने सांगतात तेंव्हा हा म्हातारा दारुच्या पूर्ण आहारी गेलेला आहे हे हिंदुरावांना जाणवतं. कारण स्वतःच नाव सुद्धा सांगायचं तर ‘परत मागचं आठवावं लागेल..आणि तेच तर विसरायचं आहे..म्हणून तर दारु हवी..’ असे मास्तर विष्णण्ण पणे सांगतात तेंव्हा हिंदुरावांना देखील या फाटक्या मिणसाची दया येते.
बोलता बोलता मास्तर हिंदुरावांना त्यांच्याच विषयी विचारतात. हिंदुराव मग आपली कर्तबगारी, गावाचा विकास कसा केला, वगैरे सांगतात तेंव्हा मास्तर त्यांना खिजवतात की हा त्यांचा गर्व आहे. त्यावर हिंदुराव त्यांना ‘हुशार आहात..शिकलेले दिसता..आम्ही तुम्हाला मास्तर म्हणू’ असे त्यांचे मास्तर म्हणून नामकरण करतात.

हिंदुराव मास्तरांना सप्रमाण पटवून देतात की तो त्यांचा पोकळ गर्व नसून त्यांनी गावात गेल्या दोन दशकात घेतलेल्या मेहनतीचे ते फळ होते. त्यामुळेच गावात आज पोरांना शिकायला शाळा होती, पाण्याची उपलब्धतता होती, साखर कारखाना, पोल्ट्री , डेअरीच्या रुपाने गावात सुबत्ता आली होती. हिंदुराव ज्या अभिमानाने ही गोष्ट मास्तरना सांगतात तेंव्हा त्यांचा तो संवाद, त्यांची ती संवादफेक निव्वळ अप्रतिम आहे.
खऱतर हिंदुरावांना व त्यांच्या सहका-यांना कुठेतरी शंका असते की हा मास्तर दिसतो फाटका पण प्रत्यक्षात कदाचित त्यांच्या कारभाराची गुप्तपणे चौकशी, माहिती घ्यायला आलेला सरकारी, सीआयडी चा माणूस असावा. म्हणून हिंदुराव मास्तरना आपल्या नजरेसमोर ठेउ इच्छितात..म्हणजे त्यांच्याच वाड्यात.

या सीनच्या शेवटी मास्तरला हिंदुराव सांगतात.. ‘आता आलाच आहात तर रहा इथेच काही दिवस, आमच्या वाड्यावर..तुमची सगळी सोय होइल..खाण्याची रहाण्याची..हो..अगदी दारुची सुद्धा…’ दारुची सोय झाली म्हणताच मास्तर अत्यानंदाने हिंदुरावांच्या पायावर लोळण घेतात अन तो सीन संपतो.

निळू फुले व डॉ.लागू यांचा एक छोठा सामना याआधी पिंजरा मधे झालेला होता. त्यात देखील डॉ.लागूंच्या मास्तरला, तमासगीर बाईच्या नादी लागल्याने कसे कुत्र्याचे हाल नशिबी येतात, हे हसत हसत सांगून खिजवणा-या तमाशा प्रमुखाचे काम निळू भाउंनी उत्तम केलं होतं.

पण सामना मधील त्यांची भूमीका अगदी दुस-या टोकाची. एका मुरलेल्या ग्रामीण पुढा-याचा आब, रुबाब व दरारा त्यांनी आपल्या आवाजातून व आपल्या धारदार नजरेतून उभे केलाय. या सीनलाच त्याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते. ‘बाई वाड्यावर या’ हे संवाद म्हणणा-या पुढा-याचा घिसा पिटा शिक्का नंतर त्यांच्यावर भले बसला असेल,पण या सिनेमात निळू भाउंचा एकूण अविर्भाव, गेट अप, आब हा एखाद्या खरोखरच्या, कसलेल्या ग्रामीण पुढा-याचाच होता.

दुस-या बाजूला डॉ.लागूंचा रोल हिंदुराव धोंडे पाटील यांना contrast, अगदी विरुद्ध बाजाचा आहे. एक शिकलेला, शहरी पण जीवनात हरलेला, पिचलेला, व सर्वर्स्व गमावलेला म्हातारा, जो आता केवळ शरीराने जीवंत आहे, पण ज्याचे मन आधीच मेलय, असा हा मास्तर. दारु मधे त्यांनी आपला भूतकाळ अक्षरशः गाडून टाकलाय, पण तरीही तो विसरला जात नाही, म्हणून दुःखीकष्टी असलेला हा असहाय्य पण तरीही तर्कट म्हातारा.

मराठी सिनेमाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव, प्रतिष्ठा मिळवून देणारे निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा हा तसा पहिलाच सिनेमा. याचे पटकथा लेखन व संवाद खुद्द नाटककार विजय तेंडुलकरांचे. त्यामुळे तेही तितकंच अप्रतिम. नंतर जब्बार पटेल साहेबांच्या सिहांसन, उंबरठा, जैत रे जैत, मुक्ता या व अशा अनेक सिनेमांनी खूप नाव, बक्षिसं मिळवली हे जरी खरे असले, तरी ‘सामना’ ही त्यांची सर्वोत्तम कलाकृती होती, व आहे, यात मला तरी शंका नाही. दुर्दैवाने या सिनेमाची, या सिनची चित्रफित युट्युबवर सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे माझ्या आठवणीतून हा सीन तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सुनील_गोबुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..