नवीन लेखन...

नाटकाचे ठेकेदार

मराठी भाषा मोठी गमतीदार आहे, शब्दांचे अर्थ तुम्ही कोणत्या भावनेनं तो शब्द वापरताय यावरही अवलंबून असतात. ‘ठेकेदार’ या शब्दाला खरंतर एक नकारात्मक, उपहासात्मक अर्थ चिकटलेला आहे. पण या लेखनाच्या शीर्षकात मात्र तो अतिशय कौतुकाने, आपलेपणाने वापरला आहे. ठाणे शहरात जेव्हा बंदिस्त नाट्यगृहच नव्हते, तेव्हा स्टेज बांधण्यापासून ते रस्त्यावर फिरून नाटकाच्या जाहिराती वाटण्यापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनपूर्वक पार पाडून ठाणे रसिकांची नाटकांची हौस पुरवणाऱ्यांना ‘नाटकाचे ठेकेदार’ नाही म्हणायचे, मग काय म्हणायचे?

1960च्या दशकात ठाणे शहरात नाटकांचे प्रयोग होत ते एम. एच. हायस्कूल, आर्य ा*ीडा मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल येथील मोकळ्या पटांगणात. त्या काळात या ओपन थिएटरमध्ये नाटक करायचे म्हणजे काही वेळा स्टेज बांधण्यापासून सुरुवात करावी लागे. ही सगळी मेहनत करून, केवळ व्यापारी दृष्टिकोन न ठेवता, नाट्यप्रेमाने नाट्यप्रयोग आयोजित करणाऱ्या ‘रंगवैभव’, ‘नाट्यनिनाद’ आणि ‘कलाविद्या’ या तीन मुख्य संस्था होत्या.

यातील ‘रंगवैभव’ ही संस्था सुरू केली मोहन जोशी यांनी 1967 साली. त्यांचे मेहुणे करंदीकर तेव्हा मुलुंडमध्ये नाटकांचे प्रयोग आयोजित करायचे. तिथून जोशींना प्रेरणा मिळाली. 1 नोव्हेंबर 1969 साल त्यांनी मो. ह. विद्यालयात ‘नाट्यसंपदा’च्या ‘अश्रूंची झाली फुले’चा प्रयोग आयोजित करून आपल्या वितरण कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे 1979 पर्यंत म्हणजे दहा वर्षे मो. ह. विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल येथे जोशी सातत्याने नाट्यप्रयोग आयोजित करत होते. ‘नाट्यसंपदा’, ‘चंद्रलेखा’, ‘कलावैभव’, ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘रंगधारा’, ‘दुर्वांची जुडी’, ‘श्रीरंग साधना’ या सगळ्या नामवंत व्यावसायिक नाट्यसंस्थांचे नाट्यप्रयोग जोशींनी ठाण्यात आयोजित केले. प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यापासून ते आलेल्या नाट्यकलाकारांचे चहा-पाणी बघण्यापर्यंत सगळी कामे करायला जोशींनी तेव्हा एक टीम उभारली होती. भाऊ डोके, केशवराव फडके, मामा घाग, हेमंत काणे, जगदीश बर्वे, प्रकाश कुलकर्णी, सुनील कातकडे (नंतर डॉक्टर झाले), अभय लेले, दिलीप दातार असे जोशींचे हक्काचे व्हॉलेंटियर्स होते. ‘कृष्ण स्टोअर्स’च्या छबूनाना जोशींकडून लाकडी घडीच्या खुर्च्या भाड्याने आणायच्या. नयन रेडिओच्या पाठारेंकडून साऊंड सिस्टिम आणायची आणि शाळेच्या पटांगणाचं रूपांतर नाट्यगृहात करायचं. त्या काळात शाळकरी वयातल्या आनंद दिघे साहेबांनीदेखील व्हॉलेंटियर म्हणून काम केल्याची आठवण जोशी सांगतात.

1972 साली वादग्रस्त ठरलेल्या ‘सखाराम बाईंडर’चा प्रयोग ठाण्यात जाहीर झाल्यावर खळबळ माजली आणि विविध राजकीय पक्षांनी या प्रयोगाला विरोध दर्शवला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ते ठाण्याच्या कलेक्टरपर्यंत अनेकांना भेटून त्यांचे सहकार्य कसे मिळवले आणि ‘बाईंडर’चा प्रयोग कसा सुरळीत पार पडला, याची आठवण जोशींच्या मनात आजही ताजी आहे. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर तिथेही पहिली दहा वर्षे जोशींनी नाट्यवितरक, कॉण्ट्रक्टर म्हणून प्रेक्षकांची नाट्यसेवा केली.

त्या काळातली ‘मोरे-कोल्हटकर’ ही जोडी प्रेक्षकांना आजही आठवते, ती नाटकाचे ठेकेदार म्हणूनच. रमेश मोरे आणि जयंत कोल्हटकर यांनी ‘नाट्यनिनाद’ संस्था सुरू करून 1963 ते 1978 या काळात ठाण्यातल्या नाट्यप्रेमींची हौस पुरवली. त्यांच्या जोडीला विष्णुनगर मधले दादा रेडकरही असायचे. ‘कथा ही राम जानकीची’ हा सचिन शंकर यांचा बॅले आयोजित करून रमेश मोरेंनी ठेकेदार म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘गुंतता हृदय हे’, ‘मला काही सांगायचंय्’, ‘ती फुलराणी’, ‘वाऱ्यावरची वरात’ अशी त्या काळातली सगळी लोकप्रिय नाटकं मोरेंनी ठाण्यात आणली. एकदा न्यू इंग्लिश स्कूलचा ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’चा प्रयोग संपल्यानंतर रात्री दोन वाजता जेवताना वरण भातावर तूप हवं म्हणून बाळ कोल्हटकर हटून बसले, तेव्हा मोरेंनी लगेच आपल्या घरी घंटाळीच्या ‘लक्ष्मी निवास’मध्ये माणूस पाठवून तूप आणले आणि बाळासाहेबांची ‘विच्छा’ पुरी केली. एकदा मोरेंनी पुण्याच्या श्रीस्टार्स कंपनीचे ‘देव नाही देव्हाऱ्यात’ लावले होते. पण काही कारणाने बुकिंग झाले नाही. आता गल्लाच जमला नाही तर नाटक कंपनीचे ठरलेले पैसे कसे देणार? मग मोरेंनी घरून आपल्या पत्नीचे दागिने आणले आणि श्रीस्टार्सच्या बाबुराव गोखल्यांसमोर ठेवले. ते पाहून बाबुराव गोखले म्हणाले, ‘मोरे, वेडे आहात काय? बायकोचे दागिने काय देता? पुढच्या वेळी पैसे द्या’. अर्थात मोरेंनी न विसरता बाबुरावांचे ठरलेले पैसे थोडे थोडे करून दिले. रंगायतन सुरू झाल्यावर तिथेही नाटकाचे प्रयोग लावणारे रमेश मोरे 1988 साली मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’मध्ये मॅनेजर म्हणून रुजू झाले. गडकरी रंगायतनमध्ये पहिला नाट्यप्रयोग चंद्रलेखाच्या ‘मृगतृष्णा’ या नाटकाचा मोरेंनीच आयोजित केला होता.

ओपन एअर थिएटरच्या जमान्यात न्यू इंग्लिश स्कूल, एम. एच. हायस्कूल येथे आपल्या ‘कलाविद्या’ या संस्थेतर्फे नाट्यप्रयोग आयोजित करणारे उत्साही नाट्यप्रेमी म्हणजे विद्याधर ठाणेकर. 31 डिसेंबर 1969 रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर ‘वेलकम थिएटर्स’च्या ‘निर्माल्य वाहिले चरणी’ या नाटकाचा प्रयोग (कलाकार-राजा परांजपे, भारती मालवणकर, सतीश दुभाषी) आयोजित करून ठाणेकरांनी आपल्या नाट्यवितरण कारकीर्दीचा शुभारंभ केला. पुढे
1978 साली रंगायतन उभे राहीपर्यंत ठाणेकर सातत्याने नाट्यप्रयोगांचे आयोजन करत होते.

‘नाट्यसंपदा’, ‘रंगधारा’, ‘कलावैभव’, अशा नामवंत नाट्यसंस्थांच्या दर्जेदार, लोकप्रिय नाटकांचे प्रयोग ठाणेकरांनी त्या काळात आयोजित केले. आपण आयोजित केलेल्या प्रयोगांची चर्चा व्हावी, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा, म्हणून ठाणेकर नवनवीन शक्कल लढवत असत.

पु.लं.च्या ‘वाऱ्यावरची वरात’चा प्रयोग त्यांनी लावला होता. तेव्हा प्रवेशद्वारापाशी येणाऱ्या प्रेक्षकांवर सुगंधी फवारणी करायला लग्नाच्या मांडवात वापरतात तसे सेंटचे फॅन उभे केले होते. त्यातून होणाऱ्या थंडगार सुगंधी शिडकाव्यांनी सारे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. ‘वरात…’मध्ये भूमिका करणारे श्रीकांत मोघे तर इतके खूश झाले की ते या सुगंधी पंख्यासमोरून हलेचनात. शेवटी त्यांनी सांगितले की, ‘ठाणेकर, मी तुमच्या या फॅनचाच ‘फॅन’ झालो आहे!’
मराठी रंगभूमीवरील एक बोल्ड, धाडसी विषयावरील नाटक ‘दोघी’चा प्रयोग ठाणेकरांनी प्रथमच लावला होता. बाहेर कुठेही या नाटकाला बुकिंग नव्हते. मग ठाणेकरांनी स्टेशन रोडवर आंबेडकर चौकात (सध्याचा अलोक हॉटेलचा चौक) या नाटकाची जाहिरात करण्यासाठी ‘ए’ या अक्षराचा मोठ्ठा कटआउट लावला आणि त्यावर अक्षरे लिहिली, फक्त प्रौढांसाठी ‘दोघी’. या जाहिरातीने खळबळ माजली आणि एम. एच. वर बुकिंगसाठी गर्दी जमली.

नाटकाच्या दिवशी कंपनीची बस मुंबईहून गोखले रोडवरून एम. एच. कडे जाऊ लागली तेव्हा एम. एच. समोरची गर्दी पाहून मागेच थांबवावी लागली. ‘ही गर्दी कसली?’ तर नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांची हे कळल्यावर नाटकवाल्यांना धक्काच बसला.

विद्याधर ठाणेकरांच्या नाट्यसंयोजन पर्वातील एक अविस्मरणीय कार्या*म म्हणजे 28 एप्रिल 1974 रोजी त्यांनी पहिल्यांदाच ‘नाट्यसंगीत रजनी’ आयोजित केली होती. या रजनीत तेव्हाचे सगळे नामवंत कलाकार म्हणजे प्रसाद सावकार, रामदास कामत, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, शरद जांभेकर, प्रकास घांग्रेकर, प्रकाश कारेकर असे सगळे सहभागी झाले होते. गणेश सोळंकीनी या रजनीचं निवेदन केलं होतं. रात्री सुरू झालेली ही नाट्यसंगीताची मैफील पहाटेपर्यंत सुरू होती. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकरांनी सांस्कृतिक कार्या*मांच्या संयोजनाकडे आपले लक्ष केंद्रित केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून सावरकरांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचे काम ते आता करतात.

ज्या काळात एम. एच. किंवा न्यू इंग्लिश स्कूलला नाटके व्हायची, तेव्हा तिकीट दर असायचा रु. 7 , 5, 3, 2. त्या काळात एम. एच.मध्ये बक्षी, पाटकर, दोंदे या तिघीजणी ‘त्रिवेणी’ नावाने कॅण्टिन चालवायच्या. मध्यंतरात प्रेक्षकांना चवदार बटाटे वडा आणि गरम चहा देण्याबरोबरच नाटक संपल्यावर नाट्यकलाकारंासाठी घरगुती चविष्ट जेवण देण्याची जबाबदारीही ‘त्रिवेणी’ पार पाडायची.

रंगायतन सुरू झाल्यावर ही खुली नाट्यगृहे मागे पडणे स्वाभाविक होते. पण एकेकाळी याच नाट्यगृहांनी ठाणेकरांना नाटके बघायची सवय लावली, म्हणूनच या नाट्यसंमेलनात एम. एच. हायस्कूल येथे खास कार्याक्रम आयोजित केले आहेत.

साभार- ठाणे रंगयात्रा २०१६.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..