नवीन लेखन...

मेक्सिकोतील वीरांगना डुलोर्स, ज्युआना आणि बीट्रीझ

मेक्सिकोतील वीरांगना

मेक्सिको या देशात जेव्हा क्रांती झाली आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध जेव्हा तेथील जनतेने स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले तेव्हा त्या देशातील कानाकोपऱ्यातून तेथील महिलाही त्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या होत्या. परंतु पांचो व्हिला (Pancho Villa) आणि एमिलिआनो झापटा (Emiliano Zapata) यांच्यासारखे पुरुष मेक्सिसोच्या स्वातंत्र्यलढ्यातील नायक म्हणून जसे प्रसिद्ध झाले, तशा त्या लढ्यात अत्यंत धीराने व शौर्याने लढलेल्या ज्या महिला नेत्या होत्या त्यांची नावे त्या देशाच्या इतिहासातून हरवल्यासारखीच दिसतात.

विसाव्या शतकात १९१० साली जी मेक्सिकन क्रांती झाली ती अतिशय नाट्यमय होती. तळागाळापासून बुद्धिमंतांपर्यंत सर्वजण या क्रांतीत सहभागी झाले होते. डोंगरदऱ्यांतून आणि खेड्यापाड्यांतून सामान्य लोक जसे आले तसे शाळांतील बुद्धिवंतही आपल्या ध्येयाकरिता लढण्यासाठी एकत्र आले होते. विशेष म्हणजे, असंख्य स्त्रिया या बंडखोरीत उतरून नेतृत्वही करीत होत्या. स्वातंत्र्यलढ्याच्या अग्रभागी राहून व्यासपीठावरून भाषणे करण्याचे आणि आपल्या नव्या भविष्यासंबंधी जाहीरनामे लिहून प्रसिद्ध करण्याचे कर्तृत्वही महिला त्यावेळी दाखवीत होत्या.

अशा मेक्सिकन महिला नेत्यांमध्ये डुलोर्स जिमेनेझी मुरो (Dolores Jimenezy Muro) ही अग्रभागी होती. मेक्सिकोतील तत्कालीन हुकूमशहा डुलोर्सचा द्वेष करीत असत. डुलोर्स ही अत्यंत धीरोदात्त, स्पष्टवक्ती आणि आपल्या देशासाठी कोणत्याही प्रकारच्या संकटास तोंड देण्यास तयार होती. खरोखरच ती अतिशय महान अशा नेत्यांपैकी एक अशी त्या क्रांतियुगातील महिला होती. तिच्या भावनाप्रधान शब्दांनी आणि राजकीय टीकाटिप्पणीने वा भाष्याने लोक खवळून उठत असत.

डुलोर्स ही त्या चळवळीच्या काळांत अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय होती. तिला तिच्या लोकप्रियतेची आणि पुढारीपणाची किंमत मोजावीच लागली. तिला अटक होऊन, धाकदपटशा दाखवून तिची रवानगी तुरुंगात केली गेली. जसजशी तिची कीर्ती वृद्धिंगत होत गेली आणि तिचा जनमानसावरील प्रभाव वाढत गेला, तसतशी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना आणि सरकारला ती मेक्सिकोतील अत्यंत धोकादायक पुढारी वाटू लागली. त्यामुळे तिला वारंवार त्रास दिला गेला. तिला क्लेशकारक वागणूक दिली गेली.

चळवळीतील डुलोर्सचे स्थान इतके महत्त्वाचे होते, की जेव्हा बंडखोरांचा नेता इमिलिआनो झापाटा (Emiliano Zapata) याने स्वतःचे लष्कर संघटित करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने डुलोर्सची ब्रिगेडिअर जनरल म्हणून निवड केली होती.

डुलोर्स केवळ मेक्सिकोतील झाशीची राणी नव्हती, तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरही होती! १९१७ मध्ये जेव्हा मेक्सिकोची नवी राज्यघटना तयार करण्यात आली, तेव्हा डुलोर्सचे अत्यंत महत्त्वाचे योगदान राज्यघटनेची चौकट तयार करण्यात होते.

डुलोर्सने वयाच्या उत्तरार्धातही आपल्या देशासाठी क्रांतिकार्यात खंड पडू दिला नाही. ती सत्तर वर्षे वयाची असतानाही तिला पकडण्यासाठी तत्त्कालीन सरकारने फार मोठ्या रकमेचे पारितोषिक जाहीर केले होते.

डुलोर्स ही त्यावेळच्या सरकारची क्रमांक एकची शत्रू मानली जात होती. डुलोर्सनंतर तीस वर्षानंतर जन्मास आलेली ज्युआना बेलेन गुटिरेझ डी मेंडोझा (Juana Belen Guiterrez de Mendoza) ही मेक्सिकोच्या स्वातंत्र्य चळवळीतील डुलोर्सची खरीखुरी वारसदार ठरली. ज्युआना ही अत्यंत स्पष्टवक्ती पुढारी होती. अगदी लहान वयातच ती बंडात सामील झालेली होती. तिच्या आजोबांच्या शौर्याच्या गोष्टी ऐकून तिने क्रांतिकार्यात उडी घेण्याची प्रेरणा घेतली होती. तिच्या आजोबांनी त्यांच्या राजकीय तत्त्वनिष्ठेसाठी गोळीबार करणाऱ्या शिपायांसमोर आपल्या प्राणांचे बलिदान केलेले होते.

तरुणपणात ज्युआनाने सर्वशक्तीनिशी क्रांतिकार्यात आपले योगदान दिले. शि.म. परांजपे, लो. टिळक किंवा भोपटकर-आगरकरांप्रमाणे गुटिरेझने क्रांतिकार्यासाठी वृत्तपत्र काढले. व्हेसपर नावाचे तिचे वृत्तपत्र हे क्रांतिकारकांचे मुखपत्र होते आणि तत्कालीन समाजव्यवस्थेवर कठोर टीका करणारे होते. तत्कालीन सरकारला गुटिरेझच्या लेखनाची एवढी दहशत वाटली, की त्यामुळे तिचा प्रिटिंग प्रेस सरकारकडून जप्त झाला, तिला तुरुंगात डांबण्यात आले आणि शेवटी देशाबाहेर तिची हकालपट्टी करण्यात आली.

ज्युआना अत्यंत तत्त्वनिष्ठेने स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली होती, झापटिस्टा आर्मीत ती कर्नलपदावर होती. आपले सारे तारुण्य तिने राज्यक्रांतीच्या लढ्यासाठी दिले होते. वयाच्या साठाव्या वर्षी तिने आतमा मेक्सिकाना हे वृत्तपत्र प्रसिद्ध केले होते. तिने आपल्या मुलाखतकारास आपण आपल्या कार्यातून कधीही निवृत्त होणार नाही, हे सांगताना म्हटले होते, जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात दुःख भरून राहिलेले आहे. मी त्या दुःखाला दुर्लक्षित करीत नाही आणि भित्र्यासारखी मी त्या दुःखापासून पळूनही जाऊ इच्छीत नाही!

ज्युआना आणि डुलोर्स दोघींनीही अत्यंत तत्त्वनिष्ठापूर्वक आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत स्वदेशासाठी कार्य केले. त्यांच्या देशाच्या भवितव्यावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मेक्सिकोच्या जनतेचे भविष्य त्यांनी घडविले.

ज्युआना आणि डुलोर्सप्रमाणेच बीट्रीझ गोनझालेझ ऑर्टगा (Beatriz Gonzalez Ortega) ही मेक्सिकोच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणखी एक वेगळीच क्रांतिकारक! मात्र लढण्यापेक्षा लढाईतील जखमींच्या जखमांवर उपचार करणे हे तिने आपले जीवितकार्य मानले.

बीट्रीझचे वैशिष्ट्य असे होते की, ती अथकपणे युद्धभूमीवर परिचारिकेची भूमिका पार पाडत असे. ही भूमिका करताना जखमी हा आपला आणि तो शतूपक्षातला असा भेदभाव ती करत नसे. दोनही पक्षांतील जखमींवर ती उपचार करीत असे. एका लढाईनंतर दि ग्रेट पांचो व्हिला यास तिने आपण कोणत्या प्रतिपक्षाच्या रुग्णांवर उपचार केले हे सांगितले नव्हते. तिने जर तसे सांगितले असते, तर पांचो व्हिलाने त्या रुग्णांना सुळी दिले असते, हे तिला ठाऊक होते. तिने त्या क्रांतिकारक रुग्णांची नावेच लपवून ठेवली नाहीत, तर त्या कमनशिबी रुग्णांचे गणवेषही तिने लपवून ठेवले होते! त्यासाठी तिला चाबकाचे फटकेही खावे लागले होते!

डुलोर्स, ज्युआना किंवा बीट्रीझ यासारख्या मेक्सिकोच्या स्वातंत्र्य-लढ्यातील झाशीच्या राण्यांच्या कार्याचा विचार करताना मला ज्युआना गुरिटेझ दि मेंडोझा हिच्या कार्याचा व लेखनाचा आढावा घेणाऱ्या लेखातील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला मजकूर उद्धृत करावासा वाटतो. तो मजकूर असा! जेव्हा अनेक पुरुष हतबल होतात आणि भित्रेपणामुळे लढाईतून पळ काढतात, तेव्हा आपल्या तत्त्वांसाठी लढण्यास अनेक शूर स्त्रिया तयार असतात!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..