नवीन लेखन...

कोकणातील देवराया

जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे.

गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा

हे गाणं ऐकलं की मन थेट धावतं ते कोकणच्या ओढीने. कोकण म्हणजे हिरवीगार वनराई, कोकण म्हणजे निळाशार समुद्र, कोकण म्हणजे लाल माती, कोकण म्हणजे चिऱ्याचा दगड, कोकण म्हणजे शांत आणि समृद्ध सागर किनारे, कोकण म्हणजे प्रचंड समृद्ध खाद्य संस्कृती, कोकण म्हणजे संस्कृती

जपणारी माती. काय आणि किती वर्णन करावे त्या कोकणाचे जसे; तुलसीदासांनी रामाला उपमा देताना तो रामासारखाच श्रेष्ठ असं म्हटलं तसं कोकणाला इतर कोणतीही उपमा कमीच पडेल. कोकण म्हणजे कोकणच.

भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलो तर सप्तद्वीपांची नगरी असलेल्या मुंबईच्या उत्तरेहून कोकण सुरू होतो तो थेट जाऊन पोहोचतो सिंधुदुर्गातील दोडामार्ग पर्यंत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे आपल्या पोटात सामावणारा कोकण; पण त्याची खरी ओळख केली जाते ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांवरून.

समृद्ध अशा कोकणाची जी अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील वनसंपदा आणि या वनसंपदेत आपले मानाचे स्थान राखून असलेल्या आणि कोकणाच्या विविधतेत भर घालणाऱ्या कोकणातील देवराया. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. अगदी देव नसले तर भूत, खेत, वन्यप्राणी ज्यांना देवत्व दिलेले आहे अशांच्या नावाने राखलेले जंगल. या जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील अगदी गवताच्या काडीला देखील आपल्या घरी आणायचे नाही जे काही आहे ते त्या देवाचे आहे त्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे आणि जर का हे पाळले नाही तर त्या देवाचा कोप होतो आणि गावावर अरिष्ट ओढवते या श्रद्धेपोटी कित्येक शतकापासून जपलेली ही जंगल.

याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा पण यातून ही देवाच्या नावाने राखलेली जंगले जैविक विविधतेने समृद्ध बनली. अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी, कीटक, सरिसृप यांच्या निवाऱ्याचे ठिकाण बनली, एवढेच नाही तर कोकणातील कितीतरी नद्यांचा उगम हा अशाच कोणत्या ना कोणत्या देवराईतून होतो हे देखील विशेष. म्हणजेच एका अर्थाने देवराया या नद्यांना जन्म घालणाऱ्या आणि पाणी पिकवणाऱ्या सिद्ध झाल्या.

देवराई या संकल्पनेची सुरुवात नक्की कोणी केली हे सांगणे कठीण आहे, पण ज्यांनी कोणीही संकल्पना राबवली ती मंडळी फार दूरदर्शी, अत्यंत अभ्यासू आणि संवर्धन क्षेत्रातील मातब्बर असतील यात मात्र शंका नाही. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आपल्याला देवराई ही संकल्पना राबवलेली दिसते त्यांची नावे वेगवेगळे असतील, कारणे वेगवेगळी असतील पण मूळ तत्व सारखेच जाणवते.

अनेक अभ्यासक म्हणतात, देवराईच्या निर्मिती मागे कोणतीही वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा नियोजन दिसत नाही पण थोडा सखोल विचार केला तर जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे. देवराई अशाच प्रकारचा लोकमान्य प्रयोग आहे असे पाहायला मिळते.

कोकणातील देवरायांच्या बाबत म्हणायचं झाल्यास आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या देवरायांचा शोध कोकणात लागला आहे. गावाच्या बाहेर असणाऱ्या, देवराया गावाच्या मध्यावर असणाऱ्या देवराया, वेशीवरच्या देवराया अगदी एक झाड किंवा काही झाडांचा समूह म्हणजे अगदी छोट्या क्षेत्रफळापासून ते एक हेक्टर पासून थेट शंभर हेक्टर पर्यंत किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रफळाच्या देवराया कोकण विभागात पाहायला मिळतात. यातील कितीतरी देवरायांमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश करायला गावाने बंदी घातलेली आहे. कितीतरी देवरायांमध्ये आपण चप्पल घालून जाऊ शकत नाही अनवाणीच जावे लागते त्यामुळे नैसर्गिकरित्याच फिरण्यावर मर्यादा येतात आणि जंगल मानवी हस्तक्षेप विरहित राहते. कोणत्याही प्रकारचे हत्यार जसे विळा, कोयता, कुर्‍हाड घेऊन देवराईत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. कितीतरी देवरायातून अगदी औषध म्हणून वनस्पती देखील घ्यायची असेल तर देवाला कौल लावला जातो. आपल्याला या अंधश्रद्धा वाटत असतील पण निसर्ग संवर्धनाची ही परमोच्च पातळी आहे असे लक्षात येते. कोकणातील अगदी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत नोंदवलेल्या देवरायांची संख्या – मुंबई -1, ठाणे – 32, रायगड – 21, रत्नागिरी- 1736, सिंधुदुर्ग – 1495.

देवराई हे एक उत्तम दर्जाच जंगल असतं. अनेक गवताच्या जाती, कंदमुळे, लहान-मोठे झाडे, उंच वृक्ष, उक्षी- गारंबी- पळसवेल सारख्या वाढणाऱ्या वेली आणि इतर वनस्पती, कीटक, फुलपाखरे, अनेक प्रकारचे पक्षी, शैवाल, बुरशी, जंगली प्राणी अशी अनेक समृद्ध जैवविविधता आपल्याला देवराईच्या पोटात दडलेली पाहायला मिळते. त्यातील कितीतरी वनस्पती, पक्षी, मासे हे प्रदेशनिष्ठ देखील आहेत. आपल्याकडे देवराई या विषयावर अनेक मंडळींनी अभ्यास केलेला आहे. त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे धन जगासमोर खुले केले आहे. आजही अनेक नवनवीन कीटक, वनस्पती यांचा शोध या माध्यमातून लागतो आहे. देवराया या अनेक औषधी वनस्पतींचे भांडार आहेत. हिरडा, बेहडा, सर्पगंध, आवळा, गुळवेल, धायटी, मुरुड शेंग, कुडा, खैर, चित्रक, गारंबी, बिब्बा, पळस, मोह, टेंभुर्णी, गेळ अशी एक ना अनेक वनस्पती देवराई पाहायला मिळतात. अनेक रानभाज्या या देवराईमुळे आजही सुसंपन्न अवस्थेत पाहायला मिळतात. विविध प्रकारचे ऑर्किड म्हणजे अमरी, अतिशय दुर्मिळ असणारे कंदील पुष्प चे अनेक प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी, लायकेन म्हणजे दगडफूल वर्गीय वनस्पती असे एक ना अनेक वनस्पतींचे प्रकार देवराईत बहरतात. या सर्व वनसंपदेमुळे अनेक प्रकारचे जंगली पक्षी, शिकारी पक्षी, पाणथळीचे पक्षी देवराईत नांदताना दिसतात. अनेक वनस्पतींवर गुजराण करणारी विविध फुलपाखरे देवराईच्या संपन्नतेत भर घालतात. दाट जंगलामुळे सरीसृप प्राणी आणि कित्येक वेळेला जंगली प्राणी यांचे अतिशय महत्त्वपूर्ण वास्तव्य देवराईत दिसते. देवराईमुळे स्थानिक परिसंस्थेच्या बाबतीत, तेथील मूळ जंगल संपदेच्या बाबतीत, पशु, पक्षी, कीटक, प्राणी यांचे बाबतीत अनेक ठोकताळे बांधता येतात. कित्येक शतके मानवी हस्तक्षेप विरहित असल्याने ही जंगले एक समृद्ध असा अधिवास आहे.

देवराईत अगदी माती विटा वापरून किंवा अगदी मोकळ्या जागेत एखाद्या झाडाखाली दगडाचे देव मांडलेले पाहायला मिळतात. पक्की मंदिरे क्वचितच. आता काळाच्या ओघात पक्की मंदिरे बांधण्याचे खूळ वाढलेले दिसते. कितीतरी ठिकाणी लाकडावर वाघ, नाग, इतर प्राणी कोरलेले आणि त्यावर शेंदूर फासून त्याची पूजा केलेली देवराई पाहायला मिळते.

सध्या वाढत्या शहरीकरणाचा परिणाम हा देवरायांवर देखील होताना दिसत आहे. पैशांच्या हव्यासापुढे श्रद्धा कमकुवत झाल्याने अनेक ठिकाणच्या देवरायांवर कुर्‍हाड चालवलेली पाहायला मिळते. अतिहव्यासातून आपल्या पूर्वजांनी प्राणापलीकडे जोपासलेला हा ठेवा आता धोक्यात आहे असे पाहायला मिळते, यावर विचार होणे आणि फक्त विचार नाही तर तातडीने कार्यवाही करून हे धन जपने गरजेचे आहे. आजही देवरायांमध्ये वार्षिक उत्सवांच्या निमित्ताने गावातील लोक एकत्र जमतात, त्यामुळे का होईना नवीन पिढीला या समृद्ध परंपरेची ओळख होत आहे. नवीन पिढी विज्ञानाधिष्ठित नजरेने या सगळ्याकडे पाहून, या जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या देवरायांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलतील अशी अपेक्षा. या वर्षी कोकणात गेलात तर नक्की एखाद्या देवराईला भेट द्या. तेथील जैविक विविधता समजून घ्या आणि हो एक सजग पर्यटक आणि नागरिक म्हणून या देवरायांच्या संवर्धनात हातभार लावा. देवराईत गेलात की खरंच आपले पूर्वज किती हुशार होते याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय येणार ना कोकणात देवराई पाहायला…

येवा कोकण आपलाच असा…

-भारत गोडांबे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..