![p-10712-pomegranate](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2014/01/p-10712-pomegranate.jpg)
दुष्काळ म्हटल्यावर डोक्यावर हंडे घेऊन वणवण फिरणाऱ्या स्त्रिया, जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगा, खोल गेलेल्या विहिरी असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. आपला देश कृषीप्रधान आहे, म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांना मौसमी पावसावर अवलंबून राहावं लागतं.
प्रतिकूल परिस्थितीतही माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा.
बुलढाणा हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा. गायकवाड कुटुंबाची गिराडा येथे ४० एकर जमीन आहे. या जमिनीत कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही नेहमीचीच पिकं त्यांच्या शेतात घेतली जायची. दिवसेंदिवस उत्पादनात आणि बाजारभावात होणारी घट ज्ञानेश्वर गायकवाड यांना त्रासदायक ठरत होती. मनात काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती.
आकर्षक रंग आणि सुबक दाण्याची रचना असलेले डाळिंब हे फळ आपल्याला भुरळ पाडतं. पण गायकवाड यांना हे फळ बघून डाळिंबाची शेती करण्याची कल्पना सुचली. त्या दृष्टीने विचार चालू झाले. ते डाळिंब उत्यादनासबंधीच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झाले. त्यांनी डाळिंबाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. डाळिंबाच्या शेतीसाठी पैसा आणि कष्ट यांची जोड असायला पाहिजे, असा सल्ला त्यांना रमाकांत पवार या अनुभवी शेतकऱ्याकडून मिळाला. कष्ट करण्याची तयारी तर होतीच. पैशाची थोडीशी अडचण होती. इच्छा तिथं मार्ग सापडतोच असं म्हणतात. गायकवाड यांची पैशाची सोय झाली. त्यांच्या शेतात पाच विहिरी आहेत. यांपैकी कोणत्याच विहिरीला पुरेसं पाणी नव्हतं. चार दिवसांनी तीन विहिरीत ठिबक संचातून आणि शेजारच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवला. शेताला आकाशझेप असं साजेसं नाव दिलं.
१२७८ झाडांची प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. शेतातील बागेला पाणी देणं, बागेची राखण यासाठी घरातील व्यक्तींची, मित्र-परिवाराची खूप मदत झाली. तीन एकरात २५० ते ३०० ग्रॅम वजनाच्या २१ टन दर्जेदार डाळिंबांचं उत्पादन मिळवण्यात गायकवाड यशस्वी झाले. त्वातून तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळालं !
–– सुचेता भिडे ( कर्जत)
मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने
Leave a Reply