नवीन लेखन...

स्फिंक्सची निर्मिती

काही तज्ज्ञांनी हा स्फिंक्स ‘यारडांग’ प्रकारच्या खडकापासून तयार केला गेला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कारण अनेक यारडांग खडकांचे आकार हे बसलेल्या प्राण्यासारखे असतात. सतत एकाच दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे व त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे वाळवंटातल्या काही खडकांची विशिष्ट प्रकारे धूप घडून येते. या धूपेदरम्यान खडकांतला ठिसूळ भाग हा त्या खडकापासून वेगळा होतो व त्या खडकाच्या आतला मजबूत भाग त्याच जागेवर मागे राहतो. विशिष्ट दिशांनी धूप झाल्यामुळे, या खडकांना विशिष्ट आकार व विशिष्ट दिशा लाभलेली असते. हे खडक म्हणजेच यारडांग खडक. वाळवंटी भागात आढळणाऱ्या या खडकांची उंची काही मीटरपासून ते शंभर मीटरपेक्षा अधिक असू शकते. अशा यारडांग खडकांनी भरलेले प्रदेश हे कित्येक किलोमीटरपर्यंत पसरलेले असू शकतात. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क विद्यापीठातील सॅम्यूएल बॉअरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, धूपेमुळे खडकांना कोणते आकार प्राप्त होऊ शकतात, याचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन हाती घेतलं. हे संशोधन या स्फिंक्सच्या निर्मितीलाही लागू होतं का, ते त्यांना तपासायचं होतं.

आपल्या संशोधनासाठी, सॅम्यूएल बॉअरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गिझा इथलं भूशास्त्रीय स्वरूप लक्षात घेतलं आणि त्याला अनुरूप परिस्थिती आपल्या प्रयोगशाळेतच छोट्या स्तरावर निर्माण केली. मात्र प्रयोग जलद पार पाडण्यासाठी, प्रत्यक्ष प्रयोगात त्यांनी काही बदल केले. मुख्य म्हणजे आपल्या प्रयोगात त्यांनी, खडकातील धूप होणाऱ्या भागाला पर्याय म्हणून बेंटोनाइट या प्रकारच्या चिकणमातीचा वापर केला; तर खडकातील मजबूत भागासाठी त्यांनी प्लास्टिकचा सिलिंडर वापरला. तसंच जलदरीत्या धूप घडवून आणण्यासाठी हवेच्या झोताऐवजी पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला. प्रयोगातला खडक बनवण्यासाठी या संशोधकांनी प्रथम चिकणमातीत योग्य प्रमाणात पाणी घालून, त्या चिकणमातीचा घट्ट लेप बनवला. त्यानंतर त्यांनी प्लास्टिकच्या सिलिंडरवर या लेपाचे एकावर एक, असे अनेक थर देऊन, गोळा तयार केला. धूपेमुळे निर्माण झालेल्या यारडांग खडकांना, धूप होण्याच्या अगोदर कुठलाही विशिष्ट आकार नसावा असं गृहीत धरून, या गोळ्यांना या संशोधकांनी साधा, काहीसा अंड्यासारखा लांबट आकार दिला. या गोळ्याचा आकार सुमारे दहा सेंटिमीटर इतका होता. हा गोळा त्यानंतर सेकंदाला दहा सेंटिमीटर इतका वेग असलेल्या, पाण्याच्या प्रवाहात ठेवण्यात आला. या लांबट गोळ्याच्या अक्षाची दिशा आणि पाण्याच्या प्रवाहाची दिशा एकच ठेवण्यात आली.

काही तास केल्या गेलेल्या या प्रयोगात, या चिकणमातीच्या गोळ्याच्या आकारात होणारे बदल, थोड्याथोड्या कालावधीनंतर सर्व बाजूंनी, त्रिमितीय पद्धतीनं चित्रित केले गेले. या चित्रीकरणात, या पृष्ठभागावरील ०.१ मिलिमीटर इतक्या आकाराचा तपशीलही स्पष्टपणे निरखण्यात आला. पाण्याच्या प्रवाहामुळे या गोळ्यातली चिकणमाती हळूहळू ढकलली जाऊन मागे सरकू लागल्याचं, काही वेळातच दिसून आलं. त्यामुळे आतला प्लास्टिकचा सिलिंडर एका बाजूनं उघडा पडू लागला. काही तासांनी या चिकणमातीच्या गोळ्याला विशिष्ट आकार प्राप्त झाला. या आकारानुसार, सिलिंडर हा एखाद्या प्राण्याच्या डोक्यासारखा दिसू लागला. या सिलिंडरच्या खालच्या बाजूची चिकणमाती ही पलीकडे सरकल्यामुळे, या प्राण्याच्या डोक्याखालचा भाग बराचसा मोकळा होऊन तो मानेसारखा दिसू लागला. त्याचबरोबर मागे ढकलल्या गेलेल्या चिकणमातीला प्राण्याच्या शरीराचं रूप प्राप्त झालं होतं! मानेच्या खालच्या बाजूला असलेल्या तळाकडची चिकणमाती मात्र तशीच राहून, तिला प्राण्याच्या पुढच्या पायांसारखा आकार मिळाला. बसलेल्या स्थितीत असलेल्या या प्राण्याचं तोंड अर्थातच ज्या दिशेनं पाणी येत आहे, त्या दिशेला रोखलेलं होतं. एखाद्या खडकाला धूपेमुळे, बसलेल्या प्राण्याचा आकार प्राप्त होणं, शक्य असल्याचं या प्रयोगातून दिसून आलं.

सॅम्यूएल बॉअरी आणि त्यांचे सहकारी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांना या रचनेभोवतीचे पाण्याचे प्रवाह अभ्यासायचे होते, तसंच ही चिकणमाती धूपेमुळे हळूहळू मागे कशी सरकते, हेसुद्धा तपशीलवार पाहायचं होतं. यासाठी या चिकणमातीच्या सूक्ष्म कणांची हालचाल कशी होते, हे तात्कालिक स्वरूपात स्पष्टपणे दिसणं आवश्यक होतं. फक्त चिकणमाती वापरून हे समजणं, शक्य होत नव्हतं. या संशोधकांनी रंगद्रव्याचा वापर करून हे साध्य केलं. प्रथम या संशोधकांनी आपल्या प्रयोगात वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या त्रिमितीय चित्रांवरून, त्या-त्या वेळी दिसणाऱ्या प्लास्टिकच्या रचना तयार केल्या. या प्लास्टिकच्या रचनांवर, फ्लुओरेसिन हे रंगद्रव्य मिसळलेल्या चिकणमातीचा पातळ थर दिला व त्यावरून आधीच्या प्रयोगाप्रमाणेच पाणी सोडलं. पाण्याच्या प्रवाहामुळे या प्लास्टिकच्या रचनेवर दिल्या गेलेल्या लेपाचे कण बाहेर पडू लागले. न्यूऑन दिव्याचा प्रकाश पाडल्यानंतर, चिकणमातीचे हे सूक्ष्म कण त्यातील फ्लुओरेसिन या रंगद्रव्यामुळे चमकू लागले. चमकणारे कण दिसू लागताच, या रचनेभोवती पाण्याचा प्रवाह कसा वाहतो, पाणी कुठे एकवटतं, कुठे भोवरे निर्माण होऊ शकतात, याची या संशोधकांना पूर्ण कल्पना आली. या प्रवाहांवरून या चिकणमातीच्या गोळ्याला प्राण्याचा आकार कसा प्राप्त होतो, हे समजू शकलं. किंबहुना या निरीक्षणांवरून, यारडांग खडकांचा आकार हा एखाद्या बसलेल्या प्राण्यासारखा असणं, ही नैसर्गिक बाब असल्याचं स्पष्ट झालं.

सॅम्यूएल बॉअरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘फिजिकल रिव्ह्यू फ्लुइड्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. या संशोधनातून ग्रेट स्फिंक्सच्या निर्मितीवर प्रकाश पडला आहे. हा ग्रेट स्फिंक्स ज्या खडकातून निर्माण केला गेला त्या खडकाला धूपेमुळे, बसलेल्या प्राण्याचा आकार अगोदरच लाभला असावा. या प्राणिसदृश आकारात, खाफ्री राजवटीतल्या लोकांना पुराणातील स्फिंक्सशी साम्य दिसलं असावं. साहजिकच त्यांना या खडकाला स्फिंक्सचा आकार देण्याची कल्पना सुचली असावी. या खडकावर कोरीव काम करून या स्फिंक्सची निर्मिती करण्यात आली असावी. प्रचंड आकाराच्या स्फिंक्सची ही निर्मिती म्हणजे मानवी कल्पकता आणि कौशल्य यांचा तर मिलाफ आहेच; परंतु स्फिंक्सच्या या निर्मितीत माणसाबरोबरच निसर्गाचाही मोठा वाटा असल्याचं, या संशोधनावरून दिसून आलं आहे!

(छायाचित्र सौजन्य – Barcex/Wikimedia, Michael Welland, NYU’s Applied Mathematics Laboratoty)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..