नवीन लेखन...

छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम

मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही.

महाराष्ट्राच्या पश्चिमेला 720 किमी लांबीचा अरबी समुद्रकिनारा आहे, तर दक्षिणोत्तर धावणारा लांबीचा सह्याद्री पर्वत आणि त्याच्या उत्तरेकडून पूर्व-पश्चिम पसरलेला सातपुडापर्यंत असून या दोन्ही पर्वतांमध्ये त्रिकोण साधत झालेला पूर्वेकडील प्रचंड पठारी प्रदेश आणि पश्चिमेला सह्याद्रीच्या पायतळी उत्तरेकडील दमणगंगेपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत निसर्ग श्रीमंतीने नटलेली चिंचोळी कोकणपट्टी, हे आहे. महाराष्ट्राचे हे भौगोलिक स्थळविशेष होय. या स्थळ वैशिष्ट्याने महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण झाली आहे. इथल्या गिरिशिखरांवर, जमिनीवर, सागरकिनारी गड-किल्ले, लेणी, मंदिरे, वाडे हुडे, तलाव, विहिरी, घाट, वाटा इत्यादींचा प्राचीन व मध्ययुगीन खुणा जागोजागी दिसतात. विशेषतः या इतिहास खुणांचा केंद्रबिंदू आहे दक्षिणोत्तर धावत गेलेली सह्याद्रीची मुख्य रांग आणि त्याच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या उपशाखांच्या शिखर माथ्यावरील दुर्ग.

या दुर्गांची संकल्पना व निर्मिती फार प्राचीन आहे. सह्याद्री व सातमाला रांगातील, गिरी-शिखरांवरील दुर्गनिर्मितीला सातवाहन काळापासून सुरुवात झाली. अपरान्तातून (कोकण) देशावर जाणारे थळघाट, कातुरबाघाट, माळशेज, नाणेघाट, बोरघाट, कावळ्याघाट,  लिंग्याघाट, उंबरखिंड, भोरघाट, कुंभार्लीघाट, अंबाघाट, तिवऱ्याघाट, फोंडाघाट, वरदावा अशा अनेक घळ्या सह्याद्रीत नैसर्गिकरित्या तयार झाल्या असून प्राचीन व मध्ययुगीन काळात त्यांच्या माध्यमातून कोकण व देश जोडले गेले आहेत. यातील काही घाट सातवाहन काळात बांधण्यात आले होते. त्यातून मनुष्य, बैल, घोडे, खेचरे यांच्या साहाय्याने लमाण व्यापारी तळकोकण ते देशावर वाहतूक करीत असत. घाटमाथ्यावर तेव्हा अनेक दुर्ग बांधण्यात आले. त्याचा उपयोग प्रवासी,  व्यापारी मालाचे संरक्षण करणे एवढाच असे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत, दऱ्याखोऱ्यात युद्ध झाल्याचे एकही उदाहरण तत्कालीन इतिहासात सापडत नाही. युद्ध होत ती मोकळ्या मैदानावर किंवा राजधानी असलेल्या भुईकोट वा नगराभोवती. पण पुढे उत्तरेकडून आलेल्या मुस्लीम टोळधाडीत ही सर्व नगरे भुईसपाट झाली. मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा  अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर शिवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही.

शिवाजी महाराज, सह्याद्री आणि सागर या तीन ‘स’कारात सामावलेल्या गड-किल्ल्यांचा स्फुर्तिपद, प्रेरणादायी इतिहास मराठी मुलखातील तमाम घराघरातून आबालवृद्धांच्या तनमनात घट्टपणे रुजला आहे. हा इतिहास रुजविणारा राजा कसा होता?

निश्चयाचा महामेरू। बहुत जणांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥

या योग्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जलशास्त्र, भूशास्त्र, स्थापत्यशास्त्र. थोडक्यात 14 विद्या आणि 64 कलांमध्ये पारंगत असा हा शूर, पराक्रमी, जिद्दी, मुत्सद्दी, दूरदृष्टीचा आणि अखंड सावधचित्त असा होता शिवाजी महाराजांकडे आपल्या आणि परराज्यातील वस्तू वास्तूंचे आणि तिथल्या भौगोलिक स्थानाचे अचूक ज्ञान होते. पूर्व इतिहास, भूगोल, भूगर्भशास्त्र, जलशास्त्र, स्थापत्यशास्त्र या ज्ञानाच्या जोरावर त्यांचा वावर नवख्या ठिकाणीही सुरक्षित व सहजपणे होत  असे. हे आपण त्यांच्या 5 जानेवारी इ.स. 1664 व 2 ऑक्टोबर इ.स. 1670 ची सुरतेची दोनदा केलेली लूट, इ.स. 1666 मध्ये शेकडो मैल  दूर असलेल्या आग्र्याहून सहीसलामत करून घेतलेली सुटका किंवा इ.स. 1676-77 सालातील दक्षिण दिग्विजयाची मोहीम वाचल्यावर लक्षात येते. बातमी काढणारा हेर हा त्यांचा तिसरा डोळाच. या त्रिनेत्राच्या जोरावर शिवाजी महाराजांनी अनेक अकल्पित व अविस्मरणीय साहसे यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्यांनी बांधलेले राजगड, प्रतापगड, रायगड हे डोंगरी किल्ले आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरीसारखे सागरी किल्ले ते उत्कृष्ट स्थापत्य विशारद असल्याचे ग्वाही देतात.

हे माझे राज्य आहे असे रयतेला वाटायला लावणारे कल्याणकारी स्वराज्य निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी इ.स. 1646 मध्ये गुंजन मावळातील वेल्हा गावाच्या मागे उभ्या असलेल्या प्रचंडगडाला तोरण बांधून स्वराज्य उद्योगास सुरुवात केली. तोरणागडाच्या डोंगर धारेवरच मुरुंब देवाचा बेलाग डोंगर होता. पंख्याप्रमाणे त्याला सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती माची असून मधल्या उंच बेलाग कड्यावर बालेकिल्ला बांधून तिन्ही माचींना तटा  बुरुजाच्या अंगडेटोपड्याने सजविण्यात आले. राजांचा हा आवडता गड. त्याला चढण्यास अवघड दुर्घट आणि दुर्गम करण्यात येऊन तिथे स्वराज्याची पहिली राजधानी बनवण्यात आली. स्वराज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा राजगड हा साक्षीदार आहे. शाहिस्तेखानाची  फजिती, प्रतापगड युद्ध, पन्हाळागडावरून सुटका, जयसिंगाशी तह, आग्र्याहून बालराजे संभाजी व सर्वसोबत्यांसह सुरक्षितपणे करून घेतलेली सुटका, सुरतेची लूट याबरोबर काही दुखःद घटनाही घडल्या. महाराजांची आवडती राणी सईबाई यांचा मृत्यू, जिवाभावाचा सखा तानाजी मालुसरा याला सिंहगडावर आलेले वीरमरण, राजगडाभोवती शाहिस्तेखानाने टाकलेला फास आणि औरंगजेबाच्या स्वराज्याच्या दिशेने वाढत चाललेल्या हालचाली पाहून  स्वराज्यासाठी सुरक्षित व अभेद्य स्थळांचा शोध ते घेऊ लागले.

महाराजांचा तोरणा ते रायगड हा 28 वर्षांचा प्रवास म्हणजे ज्वलंत इतिहास आहे. राज्य करायचे ते वाढवायचे, रयतेची काळजी घ्यायची म्हणजे त्याला आर्थिक बळ हवे. ते बळकट करायचे म्हणजे  त्यासाठी समुद्र, बंदरे आणि घाटमार्ग स्वराज्यात असायला पाहिजेत. ती संधी लवकरच त्यांच्याकडे चालून आली. इ.स. 1648 साली चंद्रराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरे (चंद्रराव ही  त्यांची पदवी होती) जावळी बळकावून अधिकार गाजवू लागला. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबारातून त्याचे पारिपत्य करण्यासाठी अफझल खानाला पाठविण्यात आले. अफझलखानाला घाबरून चंद्रराव मोरे याने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलविले, परंतु पुढे याची जाण न ठेवता मोरे शिवाजी महाराजांविरुद्धच उलटला. या संघर्षात इ.स. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेचा पूर्ण पाडाव करून जावळी काबीज केल्यावर जावळी प्रांतातील व कोकणातील किल्ले आणि देश व कोकणला जोडणारे महत्त्वाचे मार्ग ताब्यात घेतले. लष्करी हालचालींच्या दृष्टीने हे घाट अतिशय महत्त्वाचे  होते. शिवाय राज्याच्या खजिन्यात व्यापारी मालावरील जकातीची भर  पडू  लागली. यात पारघाटातील एका डोंगराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव ‘ढोरप्या डोंगर’. महाराजांनी तटा-बुरुजांनी त्याला भक्कम व बळकट केला. अफजलखानाच्या वधाने स्वराज्यावरील संकट टळले.

-सदाशिव टेटलिवलकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..