चांदी (Silver) हे अत्यंत मौल्यवान, चमकदार पांढरे आणि मऊ रासायनिक मूलद्रव्य आहे (अणुक्रमांक ४७). सोन्यापाठोपाठ चांदीचा वापर दागिन्यांसाठी, भांड्यांसाठी, गुंतवणुकीचे माध्यम म्हणून आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. चांदी हा एक चमकदार मौल्यवान धातू आहे. लॅटिनभाषेत “चमकदार” किंवा “पांढरा” ह्या शब्दाला आर्जेन्टम असे म्हणतात. त्यामुळेच Ag असे चिन्ह चांदीसाठी वापरले जाते. शुद्ध, मुक्त मूलभूत स्वरूपात चांदी, सोने आणि इतर धातूंचे मिश्रण आर्जेन्टिटा आणि क्लोरारगिराइट सारख्या खनिजांमध्ये आढळते. चांदीचा फार आधीपासून चलनातील नाण्यांमध्ये वापर केला गेला आहे.
ब्रिटिश राजवटीत एक रुपयांचे १६ ग्राम चांदीच्या वजनाचे नाणे अस्तित्वात होते हे बऱ्याच जणांना आठवत असेल. चलना व्यतिरिक्त, गुंतवणूकीचे माध्यम म्हणून (नाणी व सराफा) चांदीचा वापर केला जातो. सौरऊर्जा पटल, दागिने आणि भांडी ह्यात चांदीचा विशेष वापर होतो. विद्युत उपकरणे, रासायनिक प्रतिक्रियांचे उत्प्रेरक, आरसे बनवण्यात चांदी वापरली जाते. तसेच चांदीची संयुगे फोटोग्राफिक आणि एक्स-रे फिल्ममध्ये वापरली जातात. चांदीच्या नायट्रेट आणि इतर चांदीच्या संयुगेचे जंतुनाशक म्हणून वापरले जाते.
चांदी (रूपे) या शब्दाचे मराठीतील प्रमुख समानार्थी शब्द रौप्य, रजत आणि रुपेरी हे आहेत. सोन्या-चांदीची ‘कांब’ (धातूचा भरीव तुकडा) या शब्दाला मराठीत प्रामुख्याने लगड, वीट, बार, सळी किंवा बिस्किट हे समानार्थी शब्द वापरले जातात. पृथ्वीच्या शिलावरणातील प्रमाण प्रती दशलक्ष भागांत चार भाग असते. एक हजार भागांत किती भाग चांदी आहे यावरून चांदीची प्रत (फाइननेस) ठरवितात. शुद्ध चांदी ९९९ फाइन असते. चांदीचा वर्ण पांढरा असून तिला झळाळी चांगली असते. ती नरम, तन्य (तार काढता येण्याजोगी) व वर्धनशील (ठोकून पत्रे करता येण्याजोगी) आहे. ती उत्तम उष्णता व विद्युत् संवाहक आहे.
चांदी ज्या परिमाणात मोजतात त्याला भार म्हणतात, तर 1 भार म्हणजे किती ग्रॅम?
एक भार चांदीचे वजन 10 ग्रॅम असते. या हिशोबाने 10 भार म्हणजे 100 ग्रॅम आणि 100 भार म्हणजे एक किलो चांदी चांदीचे भाव शक्यतो किलोत असतात. चांदी हा सोन्याच्या तुलनेत कमी किंमतीचा धातू आहे. त्यामुळे वजनात सोन्याइतका बारकावा नसतो. वजनातील किरकोळ फरक सोन्याप्रमाने किंमतीत फार मोठा फरक करीत नाही. व्यवहारात चांदी बहुतेक वेळा अर्धा भार एक भार अशी खरेदी केली जाते मात्र सोने मिली ग्रॅम पर्यंत बारकाव्याने खरेदी केले जाते. किमतीतील मोठ्या फरकामुळे हे होते. सोन्याचे भाव तोळ्यात असतात. एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम. या हिशोबाने 100 तोळ्याचा एक किलो होतो.
चांदीबद्दलची सविस्तर माहिती:
वैशिष्ट्ये
चांदी हा मऊ, लवचिक व वाकवता येण्याजोगा धातू आहे. चांदीची विद्युत वाहकता सर्व धातुंपैकी सर्वात जास्त आहे, तांबेपेक्षा देखील जास्त आहे, परंतु जास्त किंमतीमुळे या चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही. यु.एस. मध्ये दुसऱ्या महायुद्धा दरम्यान तांब्याच्या युद्धाच्या कमतरतेमुळे, युरेनियम समृद्ध करण्यासाठी विद्युत चुंबकांमध्ये कित्येक टन चांदी वापरली गेली. शुद्ध चांदी कोणत्याही धातूपेक्षा सर्वात जास्त औष्णिक वाहकता असते. चांदीमध्ये कोणत्याही धातूपेक्षा सर्वात कमी संपर्क प्रतिकार असतो.
समस्थानिक: (ISOTOPE)
नैसर्गिकरित्या उद्भवणारी चांदीचे Ag१०७ व Ag१०९ हे दोन स्थिर समस्थानिक आहेत. ज्यात Ag१०७ किंचित जास्त प्रमाणात (५१.८३९% नैसर्गिक भरपूर प्रमाणात) आहे. चांदीचे अठ्ठावीस किरणोत्सारी समस्थानिक आहेत. त्यातील सर्वात स्थिर Ag१०५ (अर्धआयुष्य (Half life ४१.३ दिवस), Ag१११ (अर्धआयुष्य ७.४७ दिवस) आणि Ag११२ (अर्धआयुष्य ३.१३ दिवस) आहेत.
प्रतिक्रिया:
चांदी हवामानाशी प्रतिक्रिया देत नाही आणि म्हणूनच किमियागारांनी सोन्यासह चांदीला थोर धातू मानले आहे. चांदीची प्रतिकीय द्यायची क्षमता तांबे आणि सोन्याच्या दरम्यानची असते. तांबे प्रमाणेच, चांदी सल्फर आणि त्याच्या यौगिकांसह प्रतिक्रिया देते. त्यांच्या उपस्थितीत, चांदीवर सल्फाईडचे डाग पडतात.
इतिहास:
सोने, तांबे आणि चांदी यांचा उपयोग मानव अगदी सुरवातीपासून करीत आला आहे. असा क्रम ठरविण्याचे कारण सोने बऱ्याच वेळा शुद्ध स्वरूपात आढळते, तर तांब्याची खनिजे विपुल प्रमाणात सर्वत्र विखुरलेली आढळतात, चांदीचा क्रम तिसरा ठेवण्याचे कारण एकतर चांदीची खनिजे सर्वत्र पसरलेली नाहीत व ती सल्फाइडांच्या रूपात शिशात दडलेली आढळते. अरण्यातील वणव्यामुळे अथवा वस्त्यांना लागलेल्या आगीत चांदीच्या धातुकामधील (कच्च्या स्वरूपातील धातूमधील) चांदी वितळून बाहेर आली असावी व मानवाला तिचा शोध लागला असावा. उपलब्ध पुरातन पुरावे व जुने कागदपत्र यांवरून असे म्हणता येईल की, इ.स.पू. ४००० वर्षाच्या काळापासून सोने व चांदी यांची नाणी वापरात आली असावीत.
चांदीचा आणि सोन्याचा उपयोग विनिमयासाठी, नाण्यांसाठी त्याचप्रमाणे दागदागिने व शोभेच्या वस्तू यांसाठी होऊ लागल्यावर चांदीची मागणी वाढली. औद्योगिक क्षेत्रात व तंत्रविज्ञानात चांदीचा उपयोग माहीत झाल्यावर ही मागणी फार वाढली. त्यामुळे चांदीच्या शुद्धतेवर नियंत्रण आवश्यक झाले. शुद्ध चांदी अतिशय नरम असल्यामुळे तीवर काम करण्यासाठी तीत थोडे तांबे मिसळावे लागते. ही भेसळ साधारणपणे १० टक्क्यांच्या आत असते.
कोठे सापडते?:
नॉर्वे, चिली व पेरू हे देश चांदीबद्दल प्रसिद्ध आहेत. इतर धातूंच्या मानाने चांदीची शिलावरणातील उपस्थिती अल्प आहे आणि ती बरीच विखुरलेली आहे. नॉर्वेमध्ये ७०० किग्रॅ. वजनाचा चांदीचा गोळा सापडला होता अशी नोंद आहे.
भारतात बिहारमधील टण्डू, कर्नाटकातील कोलार व हुट्टी येथील सोन्याच्या खाणींतून व राजस्थानमधील झवार येथील जस्त-शिशाच्या खाणीत थोडी चांदी सापडते. हिमाचल प्रदेशात सतलजच्या खोऱ्यात ३,३०० मी. उंचीवर नैसर्गिक शुद्ध रूपात चांदी मिळते. उंचीमुळे व इतर अडचणींमुळे हा भाग अद्याप अशोधित राहिला आहे.
चांदी कशी वेगळी केली जाते?
विरल मिक्स धातू सोडियम वा पोटॅशियम सायनाइडामध्ये ऑक्सिजनाच्या उपस्थितीत चांदी विरघळवून नंतर जस्ताच्या साहाय्याने तिचे अवक्षेपन करणे (न विरघळणाऱ्या घन पदार्थात रूपांतर करणे). या पद्धतीला सायनाइड पद्धती वा ओली पद्धती असे नाव आहे.
रासायनिक गुणधर्म:
• संज्ञा (Symbol): Ag (लॅटिन नाव ‘आर्जेन्टम’ वरून).
चांदीवर क्लोरीन वायूचा विशेष लवकर परिणाम होतो. त्यामानाने ब्रोमीन, आयोडीन व गंधक यांचा परिणाम सावकाश होतो. चांदीवर हायड्रोक्लोरिक आम्लाचा तसेच विरल सल्फ्यूरिक अम्लाचा परिणाम होत नाही. परंतु उकळत्या संहत सल्फ्यूरिक अम्लात तसेच विरल नायट्रिक अम्लात ती विरघळते. उकळत्या सल्फ्यूरिक अम्लाबरोबरच्या चांदीच्या विक्रियेत सिल्व्हर सल्फेट व सल्फर डाय-ऑक्साइड वायू हे बनतात व सौम्य नायट्रिक अम्लात सिल्व्हर नायट्राइट आणि नायट्रिक ऑक्साइड वायू हे तयार होतात. हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया न होण्याचे कारण असे की, चांदीच्या पृष्ठभागावरच तिच्या क्लोराइडाचा थर बसतो आणि पुढील विक्रिया (सिल्व्हर क्लोराइड हायड्रोक्लोरिक अम्लात अथवा पाण्यात अविद्राव्य असल्यामुळे) थांबते. गरम संहत हायड्रिआयोडिक अम्लात चांदीचे चूर्ण विरघळविल्यास सिल्व्हर आयोडाइड आणि हायड्रोजन वायू तयार होतात. पण हायड्रोफ्ल्युओरिक अम्लाचा चांदीवर मुळीच परिणाम होत नाही.
उपयोग : चांदीचे अनेक उपयोग आहेत.
1. दागिने, पात्रे तसेच नाणी बनविण्यासाठी आणि विनिमयासाठी चांदीचा उपयोग होतो.
2. तसेच औषधांसाठी व निर्जंतुक पात्रे बनविण्यासाठीही चांदीचा उपयोग होतो.
3. चांदीच्या तौलानिक दुर्मिळतेमुळे व किंमतीमुळे सोन्याबरोबरच तिलाही अभिजात धातू म्हणून मान्यता मिळालेली आहे.
4. चांदीच्या संयुगांचा उपयोग औषधांत करतात.
5. छायाचित्रणात, विद्युत् आणि इलेक्ट्रॉनीय उपकरणांत तसेच मिश्रधातूंत व डाख देण्यासाठी लागणाऱ्या मिश्रधातूंत चांदीचा फार उपयोग होतो.
6. विद्युत् व इलेक्ट्रॉनीय उपकरणांत चांदीचा उपयोग तिच्या उत्तम विद्युत् संवाहकता, उत्तम उष्णता संवाहकता व क्षरण (झीज) आणि ऑक्सिडीभवनास विरोध या गुणांमुळे होतो.
7. चांदीचा नरमपणा, उच्च विद्युत् प्रवाहामुळे वितळणे आणि यांत्रिक भंगुरता हे चांदीचे अवगुण योग्य मिश्रधातू बनवून टाळता येतात.
8. उत्तम चकाकी असलेल्या चांदीच्या पृष्ठभागावरून ९५% प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे धातूवर चांदीचा मुलामा देऊन आरसे केले जातात. त्याचप्रमाणे चांदीच्या संयुगाचे क्षपण (Reduction / Depletion) करून काचेवर चांदीचा थर देऊनही आरसे बनवितात.
9. चांदीच्या संयुगावर प्रकाशीय परिणाम होत असल्यामुळे छायाचित्रण फिल्मवर चांदीच्या आयोडाइड, क्लोराइड किंवा ब्रोमाइड या संयुगाचा पातळ थर दिलेला असतो.
10. पिचलेले हाड जोडण्यासाठी हाडांतील सांध्यासाठी चांदीचे पत्रे, सळ्या वगैरेंचा उपयोग होतो.
11. काही ऑक्सिडीकारक विक्रियांमध्ये व अमोनियापासून खते तयार करण्यासाठी चांदीचा उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारा पदार्थ) म्हणून वापर करतात.
12. विद्युत् संचायक घटमालेत व विद्युत् विलेपनात चांदीचा उपयोग होतो. चांदीच्या दोन तारांच्या टोकांमध्ये पाण्याखाली विद्युत् प्रज्योत पाडून कलिलरूप (अतिसूक्ष्म कणांच्या रूपातील) चांदी मिळवता येते. या कलिलरूप चांदीचा औषधात उपयोग करतात.
13. विमानांच्या इंजिनात वापरण्यात येणारे धारवे (फिरते दंड योग्य स्थितीत राखण्यासाठी दिलेले आधार, बेअरिंग) बनविण्याच्या मिश्रधातूंचा एक घटक चांदी असते. 14. चांदी, कथिल व थोड्या प्रमाणात तांबे व जस्त यांची बारीक पूड पाऱ्याबरोबर मिसळली तर ते मिश्रण कोठी तापमानास (सर्वसाधारण तापमानास) थोडा वेळ मऊ राहून नंतर कठीण बनते. असे मिश्रण दंतवैद्य किडलेले दात भरण्यासाठी वापरतात.
15. याचा उपयोग सौर पॅनेलच्या निर्मितीमध्ये केला जातो.
16. वातानुकूलन – याचा उपयोग सर्वसाधारण वातानुकूलकांच्या निर्मितीमध्ये केला जातो.
17. जलशुद्धीकरण – फिल्टरमध्ये शेवाळ आणि जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी वॉटर प्युरिफायरमध्ये याचा वापर केला जातो.
18. छायाचित्रण आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे
19. वैद्यकीय उपकरणांवर प्रतिजैविक लेप म्हणून वापरले जाते
20. औष्णिक किंवा इन्फ्रारेड लेपनासाठी चांदीचा वापर केला जातो, कारण ती ॲल्युमिनियमपेक्षा काही तरंगलांबी अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करते.
विषबाधा :
1. चांदीची विरघळणारी संयुगे अविद्राव्य संयुगांपेक्षा विषारी असतात.
2. चांदीच्या संयुगांच्या कारखान्यात काम करणाऱ्यांना सततच्या संपर्कामुळे ‘अर्जेरिया’ नावाचा रोग होण्याचा संभव असतो. यात कातडीचा रंग राखी, निळा आणि काळासुद्धा पडतो. हा फरक सूर्यप्रकाशामुळे अधिक उठून दिसतो.
3. बाह्यतः निरूपद्रवी वाटणारी ही स्थिती कायमची होऊन बसते.
4. जठर-आंत्रीय ऊतकांचा (पोट व आतडे यांतील समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचा) दाह हे विषबाधेचे लक्षण होय. याला उपाय म्हणून मिठाचे पाणी रोग्याला देतात. चांदीच्या विद्राव्य लवणांचे रूपांतर अविद्राव्य सिल्व्हर क्लोराइडात होते व विषबाधेस उतार पडतो.
मिश्रधातू :
चांदीच्या मिश्रधातू चांदीपेक्षा कठीण असतात. चांदी उत्कृष्ट विद्युत् व उष्णतावाहक आहे, पण फार मऊ असल्यामुळे तीच्यामध्ये १०% तांबे व थोडे कॅडमियम ऑक्साईड मिसळून बनविलेले मिश्र धातू विद्युत् उपकरणात वापरणे सोयीचे असते. २८% तांबे मिसळून केलेली मिश्रधातू ७७९० से. ला वितळते. शुद्ध चांदी ९६०० से. ला वितळते. सोने किंवा पॅलॅडियम व चांदी यांच्या मिश्रधातू मऊ व तन्य असतात. त्या रत्नजडित अलंकार करण्यासाठी व विद्युत् संपर्ककारी (एका संवाहकामधून दुसऱ्या संवाहकात विद्युत् प्रवाह वाहून नेताना ज्यांचा स्पर्श होतो असे संवाहकांचे भाग) म्हणून वापरतात. ४०-५० पॅलॅडियम किंवा यापेक्षा जास्त प्रमाणात सोने असलेल्या मिश्रधातू सल्फाइड निरोधक असतात.
चांदीसाठी ८०/५० चा नियम काय आहे?
नियम अगदी सोपा आहे: जेव्हा हे गुणोत्तर ८० च्या वर जाते, तेव्हा गुंतवणूकदार चांदीकडे वळतात कारण सोन्याच्या तुलनेत तिचे मूल्य कमी मानले जाते. जेव्हा हे गुणोत्तर ५० च्या खाली येते, तेव्हा ते पुन्हा सोन्याकडे वळतात कारण चांदी तुलनेने महाग झालेली असते. चांदी परिधान करण्याचे 10 प्रमुख फायदे येथे आहेत:
1. तणाव कमी करण्यास मदत करते: चांदी एक शांत धातू आहे. ते धारण केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
2. झोप सुधारते: चांदी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे चांगली झोप येते.
3. सूज कमी करते: चांदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात.
4. त्वचेसाठी फायदेशीर: चांदी त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
5. रोगप्रतिकारशक्ती वाढवते: चांदी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो.
6. हृदयासाठी फायदेशीर: चांदी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
7. डोकेदुखीपासून आराम: चांदीमुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
8. मासिक पाळीच्या वेदनापासून आराम: चांदी मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी करण्यास
मदत करते.
9. बॅक्टेरियापासून संरक्षण: चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करतात.
10. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण: चांदीला एक संरक्षक धातू मानले जाते जे नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करते.
11. निरोगी आयुष्य हवय? मग चांदीचा उपयोग करा, आयुष्याची ‘चांदीच चांदी’ होईल
संयुगे :
चांदीची बरीच संयुगे आहेत. त्यापैकी आपण महत्वाच्या संयुगांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. ब्रोमीन, आयोडीन, चांदीची फक्त तीन साधी लवणे नायट्रेट, फ्ल्युओराईड व परक्लोरेट.
a. सिल्व्हर नायट्रेट याला ल्यूनर कॉस्टिक असेही नाव आहे.
b. सिल्व्हर ऑक्साइड: चांदीचे तपकिरी रंगाचे हे संयुग पाण्यात जवळजवळ अविद्राव्य आहे.
c. सिल्व्हर आयोडाइड: सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात पोटॅशियम आयोडाइटाच्या विद्रावाची भर घातल्याने हे संयुग बनते.
d. सिल्व्हर हॅलाइड : छायाचित्रणात उपयोग.
e. सिल्व्हर सल्फेट : चांदी संहत सल्फ्यूरिक अम्लामध्ये विरघळविली म्हणजे सिल्व्हर सल्फेट तयार होते.
f. सिल्व्हर सल्फाइड : सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावातून हायड्रोजन सल्फाइड वायू प्रवाहित केला असता सिल्व्हर सल्फाइडाचा काळा अवक्षेप (साका) मिळतो.
g. सिल्व्हर सायनाइड : चांदीच्या लवणाच्या विद्रावात पोटॅशियम सायनाइडाची भर घातली असता सिल्व्हर सायनाइडाचा पांढरा अवक्षेप (precipitate) मिळतो.
चांदी व धार्मिक श्रद्धा:
धार्मिक श्रद्धेनुसार अनेक धातू (Metal) आणि रत्ने धारण करणे किंवा वापरणे शुभ मानले जाते. लोक सहसा एखाद्या विशिष्ट धातूशी संबंधित वस्तू घालतात आणि वापरतात, त्यापैकी एक उत्तम धातू म्हणजे चांदी आहे. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार, चांदीची (Silver) उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाली आहे. चांदीचा संबंध शुक्र, धनाचा कारक आणि चंद्र, मनाचा कारक आहे असे म्हटले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
चांदीचे महत्त्व काय आणि यामुळे नशीब कसे बदलू शकते-
एखाद्याला घबाड लाभले की त्याची चांदी झाली असे म्हणतात. धन लाभासाठी चांदी विशेष आहे ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की चांदी मनाला बळ देते तसेच मन तीक्ष्ण करते. जीवनात चंद्राचा अशुभ प्रभाव पडत असेल तर चांदी धारण करणे फलदायी असते.
पैसे कमविण्यासाठी चांदीचा वापर:
ज्योतिष शास्त्रानुसार सर्वात लहान बोटात चांदीची अंगठी घातल्यास ते खूप चांगले असते. यामुळे चंद्राचा शुभ प्रभाव जीवनावर पडतो आणि समस्या सोडवून धनप्राप्ती होते. शरीर निरोगी बनवते शुद्ध चांदी शरीराला निरोगी बनवण्यासाठी देखील प्रभावी आहे. चांदीचे ब्रेसलेट घातल्यास कफ, पित्त व वात तसेच थायरॉईड इत्यादी विकार नियंत्रणात राहून शरीर रोगांपासून दूर राहते. म्हणून भारतीय स्त्रियांच्या अंगावर चांदीची आभूषणे असतात.
अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी असतो:
शुद्ध चांदीची साखळी गंगेच्या पाण्याने शुद्ध करून गळ्यात घातल्यास वाणीत मधुरता येते आणि कोपलेल्या ग्रहांना शांतता मिळते. याशिवाय मन एकाग्र राहते.
चांदीच्या वापरात काळजी घ्या:
जर चांदी शुद्ध असेल तर ते अधिक फलदायी असते. त्याचा योग्य वापर केला नाही तर त्याचा जीवनावरही वाईट परिणाम होतो. वृश्चिक, मीन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी चांदी धारण करणे शुभ असते. असे मानले जाते की चांदी सिंह, धनु आणि मेष राशीसाठी अनुकूल नाही.
चांदी व धार्मिक श्रद्धा हा भाग लोकांच्या व भविष्यकारांच्या मान्यतेवर लिहिला आहे.
संदर्भ:
१. मराठी शब्दकोश पहिली आवृत्ती.
२. Abbot, D. Inorganic Chemistry, London, 1965.
३. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966.
४. देशपांडे, ज्ञा. मा., ठाकूर, अ. ना.
५. गुगल वरील अनेक लेख
६. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
ता. २९.०६.२०२६


Leave a Reply