ब्रह्मानंदाचे माहेरघर स्वामींचे अक्कलकोट धाम !

स्वामी भक्तांनो……

परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेले अक्कलकोट हे भू-वैकुंठ धाम आहे. या ठिकाणी जाणारा प्रत्येक जीव हा आपल्या सर्व भवव्यथेतून मुक्त होतो. सतत 23 वर्षे अक्कलकोटच्या भूमीत परब्रह्माने मुक्काम केला होता. ईश्वराचे नामस्मरण करणारे संत ज्या भूमीत वावरतात, ती भूमी सुध्दा श्रध्दाळूंचे दु:ख दूर करण्यास सहाय्यभूत ठरते. इथे तर सर्व देवतांचा ही देव असणारा स्वामीदेव स्वत:च भक्तकाजार्थ अवतीर्ण झाला होता. तेव्हा या अक्कलकोट भूमीचे महत्व वर्णावे तेवढे कमीच आहे. ज्याच्या सत्ते वारा वाहे, ज्याच्या सत्ते वेद बोले ! अशा पुर्णब्रह्माने आपल्या वास्तव्यासाठी काशी, हरिद्वार सोडून अक्कलकोट सारखे अपरिचित गाव निवडावे, यामागे फार मोठी शिकवण तर आहेच, तसेच या अक्कलकोटचे भाग्य ही तेवढेच थोर होते. असेच म्हणावे लागेल.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

ईश्वराची प्रत्येक गोष्ट ही पुर्वनियोजित आणि मानवी बुध्दिला आकलन होण्यापलिकडील असते. ईश्वर लीला आपल्या तोकड्या बुध्दिने कधीही जाणता येत नाही. म्हणूनच म्हणतात की, ईश्वर हा ज्ञानाने नाही तर भक्तीने वश करावा लागतो. हिच शिकवण देण्यासाठी स्वामींनी अक्कलकोट हे गाव निवडले असावे. एक प्रकारे स्वामी महाराजांनी मला ओळखण्यासाठी आपली अक्कल, बुध्दिमत्ता माझ्या चरणी लीन करा, मी सर्वोपरी असणारा अनादि-अनंत आहे,  हेच शिकवण्याचे काम  केले आहे.

अशा या तीर्थराज, तीर्थ शिरोमणी अक्कलकोट भूमीचे महत्व श्री स्वामीसुत महाराजांच्या आणखी एका दिव्य आणि स्वानुभूतीपर रचनेद्वारे जाणून घेऊ या……!

अक्कलकोटीचें हे सुख । नोहे त्याचा कांही लेख ॥1॥

देवदानव ज्यासी ध्याती ।  तेंचि ब्रह्म पाहो प्रीतीं ॥2॥

परमानंद होतो चित्तीं ।  पाहूनि समर्थांची मूर्ति ॥3॥

संधी साधवी बरवी । जन्मव्यथा चुकवावी ॥4॥

आतां पहातां तुम्हीं काय ।  वेगी धरा तेंचि पाय ॥5॥

स्वामीसुत म्हणे सुख ।  खरे अक्कलकोटीं एक ॥6॥

सद्गुरूंच्या केवळ मस्तकी हस्त स्पर्शाने ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या हरिभाऊवरील मायेचा प्रभाव समुळ नष्ट झाला होता. मनातील विचाराचे द्वंद कधीच निमाले होते. आता समोर दिसत होते, ते फक्त सर्वव्यापी सर्वेश्वर स्वामी महाराज आणि त्यांची अमर्याद सत्ता. अशा सर्वसत्ताधिश परब्रह्मानेच हरिभाऊला आपले लेकरू म्हणून स्विकारल्यामुळे, हरिभाऊंची वाणी ही केवळ स्वामी चरणीच वाहिलेली असणे स्वाभाविक आणि इष्ट होतेच. परंतु असे असूनही स्वामीसुतांच्या वाणीतून निघालेल्या प्रत्येक शब्दात स्वामीनिष्ठेसोबतच स्वानुभूती ही ओतप्रोतपणे भरलेली असल्यामुळे हे शब्द आणखीनच जास्त प्रभावशाली व खात्रीशीर झाले होते. अशा खात्रीशीर शब्दातून व्यक्त झालेले अक्कलकोट माहात्म्य हे अजरामर तर झालेच आहे, परंतु साधकांना एका फार मोठ्या मार्गदर्शकाचे काम ही करत आहे. तेव्हा पाहू या, अक्कलकोट भूमीचे माहात्म्य……

स्वामीसुत म्हणतात, अक्कलकोटामध्ये राहणाऱ्या लोकांचे सुख किंवा त्यांचे भाग्य हे काय वर्णावे ! हेच सूचत नाही. ज्यांच्या  पुण्याईचा लेखाजोखा ठेवणे हे विधात्याला ही शक्य होत नाही. तेथे ईतरांचा काय पाड ? एऱ्हवी सर्वांच्या बऱ्या वाईट कर्माचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त आणि त्याच्यावर नियत्रंण ठेवणारे ब्रह्मदेव हे दोघेही स्वामी भक्तांचा आणि स्वामींच्या अक्कलकोटांशी संबंध असणाऱ्या भाविकांचा लेखाजोखा ठेवण्यास असमर्थ आणि हतबल आहेत. एवढे सर्वश्रेष्ठ अक्कलकोट धाम आहे. या अक्कलकोटाला ही वैकुंठावस्था प्राप्त करून देणाऱ्या श्री स्वामी देवांचे सर्वच देवी देवता ध्यान करतात. सर्व देवता त्यांना शरण जातात. फक्त देवताच नाही तर सर्व दानव ही स्वामींच्याच चरणी नतमस्तक आहेत. या सर्वांचा उध्दारक व स्वामी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आहे. त्यामुळेच हे सर्व देवी देवता व दानव सुध्दा नित्य नियमाने स्वामींचे ध्यान करतात. स्वामींची पूजा आराधना करतात. हे दृश्य पाहून विधाता ब्रह्मदेव ही धन्य होऊन अतिशय प्रीतीने ही लीला पाहात उभा आहे. आपल्यासह सर्वांचा परब्रह्म असणारा हा श्री स्वामी देव किती सर्वश्रेष्ठ आहे, याची लीली किती अगाध आहे, याचाच अति हर्षाने विचार करत ब्रह्मदेव स्वामी पायी लीन झाला आहे. असे स्वामीसुत वर्णन करताना दिसतात.

ब्रह्मांडनायक स्वामी महाराजांचे हे वैभव पाहून, अक्कलकोट येथिल राजस दरबार पाहून आणि या दरबाराला शोभा आणणारा सत् चित्‍ आनंद असणारा परब्रह्म पाहून प्रत्येकालाच परमानंदाची प्राप्ती होत आहे. जो तो परमानंदात आकंठ बुडालेला आहे. एवढे सर्वांगसुदंर स्वामी महाराज आहेत. जो परमानंद प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष खडतर तपश्चर्या करावी लागते किंवा 1400 वर्ष तप करूनही चांगदेवाला जो परमानंद प्राप्त झाला नाही. तो दुर्लभ परमानंद या अक्कलकोटी केवळ स्वामींच्या मंगलमूर्तीरूप दर्शनाने अगदि सहज प्राप्त होतो. हिच महती स्वामी चरणांची व अक्कलकोट भूमीची आहे, असे स्वामीसुतांना वाटते.

यापुढे जाऊन स्वामीसुत सांगतात की, हजारो वर्ष खडतर साधना करणाऱ्या साधकांना ही दुर्लभ असणारा परमानंद हा केवळ स्वामी दर्शनाने आळंदीच्या नृंसिह सरस्वतीला सहज प्राप्त होऊन भाव समाधी लागते. हिच स्वामी चरणांची ख्याती आहे. किंवा नाना प्रकारच्या युक्त्या करून, असंख्य गुरूंचे उंबरठे झिजवून ही न मिळणारे ब्रह्मज्ञान हे केवळ स्वामींचा मस्तकी हस्त पडल्याने सहजतेने होते. हा माझ्या स्वामींच्या सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. तेव्हा सज्जनहो, हिच संधी तुम्ही साधा, माझ्या स्वामींना शरण जा. तात्काळ अक्कलकोट जवळ करा आणि माझ्या स्वामी पायी नतमस्तक होऊन ही जन्मव्यथा चुकवा. तुम्हाला या भवतापातून केवळ माझे स्वामींच तारतील. तुमचे कल्याण ही अक्कलकोटची भूमीच करेल. तेव्हा त्वरित अक्कलकोटी जाऊन स्वामींचे चरण धरा. एका क्षणाचाही वेळ व्यर्थ न दवडीता वेगाने स्वामींचे धाम जवळ करा. स्वामींचे चरण धरा. हेच तुमच्या उध्दाराचे साधन आहे.

तुम्हाला हवे असणारे इहलोकीचे व परलोकीचे सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण हे अक्कलकोटच आहे. या अक्कलकोट शिवाय अन्य कोठेही तुमचे कल्याण होणार नाही. तुम्हाला अन्यत्र कोठेही परमानंदाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला हवे असणारे शाश्वत सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामीधाम अक्कलकोट हेच आहे. याशिवाय कुठेही तुमचे हित साधणार नाही. तेव्हा त्वरेने अक्कलकोट जवळ करून, स्वामीपायी धाव घ्यावी, स्वामीचरणी नतमस्तक व्हावे, यानेच तुमचे सर्वस्वी कल्याण होईल. जे स्वामी चरण सर्व देवतांचा उध्दार करतात. जेथे दानव ही चरणी लीन होतात. ते दिव्य स्वामी चरण तुमचे आमचे नक्कीच सर्वस्वी कल्याण करतील. माझा समर्थ तुमच्या जीवनाचे सार्थक करण्यास समर्थ आहे. तेव्हा त्वरित त्याला शरण या…… अशी साद अभंगाच्या शेवटी स्वामीसुत घालताना दिसतात.

चला तर आपल्या जीवनाचे सार्थक होण्याकरीता अक्कलकोटी जाऊन स्वामींना शरण जाऊ या, आणि स्वामींच्या पवित्र पावन मंगलमय नामाचे ध्यान करू या…….!

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।

सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥

अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

॥ श्री स्वामीसुत महाराज की जय ॥

॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥

— सुनिल कनले 

सुनिल कनले
About सुनिल कनले 16 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..