नवीन लेखन...

बिस्कुट

पन्नास वर्षांपूर्वी आमच्या खेडेगावात माझ्या काकांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या दुकानात सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रीला होत्या. दुकानात सारखी येणारी गिऱ्हाईकं म्हणजे लहान मुलंच असायची. त्यांची खरेदी असायची ती गोळ्या व बिस्कीटांची! पाच, दहा पैसे देऊन हातात दिलेली बिस्कीटं घेऊन ती धूम पळायची. त्याकाळी बिस्कीटांचे मोठे पुडे मिळायचे. प्राणी, पक्ष्यांच्या आकाराची ती बिस्किटे आकर्षक दिसायची, शिवाय षटकोनी आकाराची छोटी खारी बिस्किटे देखील मिळायची.

पुण्यात आल्यावर प्राथमिक शाळेत घेऊन जाताना आई मला वाटेवरील एका बेकरीतून ग्लुकोजच्या चार बिस्कीटांचे पॅकेट घेऊन द्यायची. त्याकाळी पार्ले ग्लुकोज, ब्रिटानिया मारी, साठे अशी मोजक्याच कंपन्यांची बिस्कीटे असायची. त्यावेळी चहाबरोबर खाण्याचा एक पदार्थ एवढीच बिस्कीटांची मर्यादा होती. सदाशिव पेठेत पेरुगेट जवळ मनोहर बेकरी होती. तिथे सकाळच्या वेळेत मैदा, साखर व डालडा दिल्यावर संध्याकाळी बिस्कीटं करुन मिळायची. हिंदुस्थान बेकरीची बिस्कीटे नियमित खरेदी करणारे असंख्य ग्राहक आजही आहेत.

हळूहळू बिस्कीट निर्मितीचा व्यवसाय वाढला. अनेक कंपन्यांनी बिस्कीटांचे विविध प्रकार व आकार मार्केटमध्ये आणले. मारी बिस्कीटांचेच मारी लाईट, मारी गोल्ड, शुगर फ्री असे प्रकार मिळू लागले. ब्रिटानिया कंपनीने आॅरेंज क्रिम, पायनापल क्रिम बिस्किटे आणली. बुरबून बिस्किटे ही चाॅकलेट क्रिमची, ओरिओ व्हॅनिला क्रिमची मिळू लागली. रामदेवबाबा बरोबरच इतर गुरूदेव, बापू, बाबांनी देखील बिस्कीटांचे उत्पादन सुरु केले. आज भारतात २५ हजार कोटींची उलाढाल या व्यवसायात होते आहे.

कोणताही समारंभ असेल तर पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी चहापानाची व्यवस्था केली जाते. चहाबरोबरच विविध बिस्कीटांनी सजवलेली डिश समोर ठेवली जाते. घरीदेखील कोणी पाहुणा आला की, चहाबरोबर बिस्कीटांचा आग्रह केला जातो.

बिस्कीट कोणतेही असो त्याचा आकार हा गोल, चौकोन, आयताकृती असाच असतो. नावीन्यपूर्ण अशा हृदयाच्या आकाराचीही ‘लिटील हार्ट’ नावाची बिस्किटे मिळतात. साखर लावलेली, जिऱ्याच्या स्वादाची, बटरच्या स्वादाची, काजु, बदाम घातलेली ‘गुड्डे बिस्किटे’ लोकप्रिय आहेत.

मोनॅकोची खारी बिस्किटे मी लहानपणापासून पहातो आहे. अलीकडे फिफ्टी फिफ्टी, ट्वेंटी ट्वेंटी, बोर्नव्हिटा असे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे बिस्किटे खरेदी करणाऱ्याला भरपूर पर्याय आहेत.

आयुर्वेदाचा विचार केला तर बिस्कीटं खावीत का? हा प्रश्र्न पडतो. कधीतरी प्रवासात किंवा चहाबरोबर खाल्ले तर ठीक आहे. मात्र रोज उठून बिस्कीटच खात असाल तर ते चुकीचे आहे. माझ्या भाचीने शालेय जीवनात भरपूर बिस्किटे खाल्ली. काही वर्षांनंतर तिला अॅसिडीटीचा त्रास सुरु झाला, जो अजूनही चालू आहे.

आयुर्वेदानुसार बिस्कीट हा पदार्थ शिळा आहे. आपण दोन दिवसांची शिळी चपाती कधी खातो का? नाही ना..मग बिस्कीट तोच प्रकार आहे. नेहमी बिस्किटे खाल्ल्याने अॅसिडीटी, अपचन, दमा, मूळव्याध, मधुमेह, मलावरोध व स्थूलता असे आजार होऊ शकतात. ज्यांना हे आजार आहेत त्यांनी बिस्कीटांपासून चार हात दूरच रहावे.

बिस्किटे ही मैद्यापासून तयार केली जातात. मैदा हा पोटात चिकटून बसतो. तो आरोग्याला अपायकारक आहे. जवळपास सर्वच बिस्किटे ही डालडा (वनस्पती तूप) वापरुन करतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. काही कंपन्या आमच्या बिस्कीटांमध्ये फायबर, प्रोटिन्स, मिनरल्स आहेत अशी जाहिरातबाजी करतात, ती ‘फेअर अॅण्ड लव्हली’ सारखीच खोटी जाहिरात आहे!

याचा अर्थ असा नाही की, बिस्किटे कधीही खाऊ नका. अवश्य खा, पण ‘कधी तरी’…त्यांचा रतीब नको. त्याऐवजी आपले नेहमीचे पोहे, उपमा, शिरा हे पदार्थ शतपटीने उत्तम!!!

– सुरेश नावडकर ५-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on बिस्कुट

  1. माहितीपूर्ण लेख. सध्या काळ्या ऐवजी त्या पेक्षा घातक असे पाम तेल वापरतात. आम्ही या बिस्किटांना भुसकट म्हणत असू व ते खरोखरच त्याची अन्न म्हणून भुसकटच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..