नवीन लेखन...

भाऊ भाऊ

विनय आजगांवकर माझा कॉलेजचा मित्र. कॉलेजात आम्ही सतत एकमेकांच्या सोबत असायचो. कॉलेजच्या कॅन्टिन मध्ये जाऊन हादडणं, लेक्चर्स बंक करुन पिक्चरला जाणं, मुलींविषयी बोलताना दुसऱ्या कुणालाही कळणार नाही अशा सांकेतिक भाषेत बोलणं असले नाना उपद्व्याप आम्ही दोघे एकत्रच करीत असू. विनय तेव्हा कॉलेजच्या जवळच राहात असे. विनयची आई, त्याचा मोठा भाऊ दादा आणि त्याची वहिनी हे सगळेच मला जणू त्यांच्या घरचाच समजत. विनयचे वडील तो लहान असतानाच निवर्तले. मात्र वडिलांच्या मायेची उणीव त्याच्या दादाने त्याला कधीच भासू दिली नाही. दादा आणि वहिनी दोघांनीही त्याला मायेनं सांभाळलं. विनयही त्या दोघांविषयी बोलताना हळवा होऊन जिव्हाळ्याने बोलत असे. त्या दोघांविषयी त्याची कृतज्ञता त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून पदोपदी जाणवे.

कॉलेजलाईफ संपल्यावर माझे विनयचे संबंध विरळ होत गेले. कधी नाही तरी दोघांच्या वाढदिवसाला नक्की भेटायचं हा मैत्रीचा अलिखित करार नंतर शिथिल होत गेला. फक्त कॉलेजातील मित्रांच्या आमची भेट होऊ लागली. नंतर खुद्द विनयचंही लग्न झालं. तो त्याच्या संसारात स्थिरावला. माझाही संसार सुरु झाला.

संपर्क संपुष्टात आल्यावर मित्रांकडून उडत उडत येणाऱ्या बातम्यांवरुन आम्हाला एकमेकांची खुशाली समजू लगली. काही वर्षांनी विनय दादा वहिनींपासून वेगळा झाल्याची बातमी मला कळली. विनयची वहिनी आणि विनयची बायको यांचं एकमेकींशी पटत नसल्याने विनय वेगळा झाल्याचं माझ्या कानावर आलं. घरोघरी मातीच्याच चूली या म्हणीनुसार असले प्रकार घडायचेच असा विचार करुन मी त्या बातमीला विशेष महत्त्व दिलं नाही. मात्र अगदी अलीकडे म्हणजे जवळ जवळ तीसएक वर्षांनी विनयचा दादा मला अचानक एकदा रस्त्यात भेटला आणि त्याने जे काही मला सांगितलं ते ऐकून मी अक्षरशः हादरुन गेलो.

रस्त्यात अचानक समोरासमोर आल्याने दादाने मला खुणेनंच थांबायला सांगितलं. एकमेकांची विचारपूस करण्याचे सोपस्कार संपल्यावर त्याने मुद्यालाच हात घातला.

“विनय भेटतो की नाही तुला?” भुवया उंचावत दादांनी मला विचारलं. त्याच्या आवाजातली कणव मला स्पष्टपणे जाणवली.

“नाही, बऱ्याच वर्षात आमची भेट झालेली नाही,” मी उत्तरलो.

“विनय तुला काय भेटणार, तो आम्हालादेखील विसरला.” दादाच्या डोळ्यात टचकन् पाणी दाटून आलं.

त्यानंतर दादाने विनय त्यांच्यापासून कसा दुरावत गेला याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. विनयची पत्नी आणि वहिनी यांच्यातील जावाजावांची परिचित भांडणं हा त्या कहाणीचा मतितार्थ. मात्र हा सगळा इतिहास सांगत असताना दादाचा विनयविषयी अथवा त्याच्या पत्नीविषयी तक्रार करीत असल्याचा सूर नव्हता. विनय आपल्यापासून दुरावला या दुःखाची कढ तक्रारींहून कितीतरी पटीने गडद होती. दादाचं हार्टचं ऑपरेशन झालं, दादा गंभीर आजारातून बरा झाला तरीही दादाला भेटायला विनय फिरकला नव्हता!

“तू घरचा म्हणून तुला सगळं सांगितलं, ” हे शेवटचं वाक्य उच्चारताना दादानं आवंढा गिळला आणि माझ्या खांद्यावर थोपटून तो निघून गेला.

मी अवाक् होऊन विचार करु लागलो. मला कॉलेजातले ते सर्व दिवस आठवले. विनयच्या घरी गेल्यानंतर दादाच्या आणि वहिनीच्या चेहऱ्यावर उमटणारे विनयच्या कौतुकाविषयीचे भाव क्षणात माझ्या नजरेसमोर आले. मोठा मुलगा धाकटयाची मायेने काळजी घेतो आहे या सुखात उगाचच खदखदून हसणारी विनयची आई आठवली. तोच दादा काही वर्षांनंतर विनय आम्हाला विसरला हे सांगताना व्यथित झालेलाही मला दिसला. “हा दैवाचा खेळ निराळा, नाही कुणाचा मेळ कुणा” या ओळी माझ्या ओठांवर आल्या. मी माझ्या मार्गाने निघून गेलो.

भावभावांची भांडणं हा तसा आपल्याला अगदी परिचित विषय. अगदी महाभारत घडलं तेव्हापासूनचा. अर्थात महाभारतातील भांडणाला सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू होता. साम्राज्य कुणाच्या हाती राहणार यावरुन तो वाद झाला. बहुतेक भावाभावांतील भांडणांना प्रॉपर्टीची वाटणी हाच मुख्य विषय असतो. मात्र विनयच्या घरच्या भांडणाला या कारणाची छटा देखील नव्हती. इथे वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा प्रश्न नव्हता. दादा, वहिनी, विनय, त्याची पत्नी सर्वच सुस्थितीतले. चांगली नोकरी करणारे. चांगले पगारदार. साहजिकच पैशाची वाटणी हा विषय इथे बाद होत होता. मग घरात प्रमुख कोण हा इगो प्रॉब्लेम त्यांच्या भांडणाला कारणीभूत ठरला असावा का? दादा वहिनी मायेबरोबरच विनयवर हक्कही बजावत असावेत का? विनयचं आता लग्न झालं आहे, त्याचं वेगळं आयुष्य सुरु झालं आहे, त्याला त्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपण द्यायला हवं हा मुद्दा दादा वहिनींच्या ध्यानात राहिला नसेल का? की विनयची बायकोच भांडकुदळ होती? मुख्य म्हणजे विनय तिच्या एवढा आहारी का गेला? मनात उमटणाऱ्या प्रश्नांना उत्तरं सापडत नव्हती. एका चांगल्या कुटुंबातील हा कलह मात्र माझ्या जीव्हारी घाव करुन गेला.

वडिलांच्या मृत्यूनंतर आईला कोणी सांभाळायचं हा देखील भावाभावांतील भांडणाचा एक विषय असतो. जन्मदात्या आईला कोणी सांभाळायचं यावरुन भांडण! कल्पना अगदी हीन स्वरुपाची वाटते. कुटुंबातील नातेसंबंधाच्या अस्तित्वालाच काळीमा फासणारी . पण असंही कुठेकुठे घडतं. आमच्या परिचयातील एका कुटुंबात अगदी असाच एक प्रसंग घडला. कुटुंब चार भावंडांचं. चारही भाऊ वेगवेगळे राहणारे. त्यांची

सर्वात धाकटया मुलाकडे राहात असे. भावाभावांचे अगदी घनिष्ट नाही परंतु जुजबी संबंध होते. मोठे भाऊ आईची विचारपूस करण्यासाठी अधूनमधून फिरकत जाताना आईच्या हातावर थोडे पैसेही ठेवून जात. कधीकाळी कुणी साडी वगैरेही आणून देत.

एक दिवस आई आजारी पडली. उपचारांसाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये चारही भाऊ आईची देखभाल करण्यात तत्पर राहिले. सूना नातवंडं सेवा बजावण्याचं काम कसोशीने पार पाडीत होते. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या हाताला गुण आला आणि आई बरी झाली. उद्या डिस्जार्च मिळणार, आई घरी परतणार हे नक्की झालं. नेमकं त्यावेळी धाकट्या सूनेने थैमान मांडलं! आम्ही आईला आमच्या घरी नेणार नाही, नेहमी आम्हीच का आईला सांभाळायचं, आता दुसऱ्या भावांनी आईची जबाबदारी स्वीकारावी या हट्टाला ती पेटली. आश्चर्याची गोष्ट अशी की मोठया तीन भावांपैकी मी आईला सांभाळतो हे वाक्य उच्चारायला एकही भाऊ पुढे आला नाही! शेवटी त्यांच्या चुलत भावाने या समस्येतून तोडगा काढण्यासाठी स्वतःच्या घरी या चार भावांची मिटिंग घेतली. मिटिंगचा अजेंडा होता आईचा सांभाळ! चुलत भावानेच जबरदस्तीने काहीतरी तोडगा या भावांच्या माथी घातला आणि आईला हॉस्पिटलमधून डिस्जार्च मिळाला!

भावाभांवातील भांडणं या विषयावर आजवर अनेक कथा कांदबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, अनेक चित्रपट निघाले आहेत आणि नाटकंही. असं असूनही विषय ताजातवानाच राहिला आहे. पंचवीस तीस वर्षे एकाच कुटुंबात एकत्रच लहानेचे मोठे झालेले भाऊ पुढे परस्परांचं तोंड देखील न बघण्याइतके का दुरावतात? या प्रश्नाला नेमकं उत्तर कधी सापडणार? नातेसंबंधांच्या बैठकीलाच तिलांजली देणारी ही समस्या कधी संपुष्टात येणार? भावाभावांनी वेगळं राहणं हे वास्तव आपल्या समाजाने आता सहजरित्या स्वीकारलं आहे. धाकटा भाऊच का, एकुलता एक मुलगा देखील आता  आईवडिलांपासून वेगळा राहतो आणि यात कुणाला काही गैर वाटत नाही. प्रश्न वेगळं राहण्याचा अथवा एकत्र राहण्याचा नाहीच आहे, प्रश्न आहे माया कोरडी का होते याचा. हा प्रश्न कायम अनुत्तरीतच राहणार आहे.

सुनील रेगे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..