नवीन लेखन...

भज गोविन्दम् – भाग २ – चतुर्दशमंजरिका – चर्पटपंजरिका – मराठी अर्थासह

भज गोविंदम् स्तोत्राच्या या भागाला चर्पटपंजरिका असेही नाव आहे. ‘चर्पट’ चा अर्थ चिंधी किंवा लक्तर (कापडाचा तुकडा) असा आहे. आपण ब्रह्मपद रूपी शाश्वत सुखाच्या भरजरी वस्त्राऐवजी ऐहिक क्षणभंगुर सुखांच्या चिंध्यांच्या मागे लागतो आहोत अशा अर्थाने तो २२ व्या श्लोकात आला आहे.  


का ते कान्ता धन गतचिन्ता, वातुल किं तव नास्ति नियन्ता  ।
त्रिजगति सज्जनसंगतिरेका, भवति भवार्णवतरणे नौका  ॥ १३॥

मराठी- अरे विवेकशून्या, तुला पत्नी आणि संपत्तीची इतकी चिंता का वाटते, (जणू काही) त्यांच्यावर नियंत्रण असणारा कोणीच नाही ! तिन्ही लोकी सज्जनांचा सहवासच या भवसागरातून तारून नेणारी एक नौका आहे.

पत्नी पैसा कशा काळजी, नसे नियामक वेडया कुणी रे का ?
सुजनसंगती तिही जगी भवाब्धिमाजी तरण्या एकमेव नौका ॥ १३

श्लोककर्ता- पद्मपादाचार्य.

जटिलो मुण्डी लुञ्छितकेशः, काषायाम्बरबहुकृतवेषः  ।
पश्यन्नपि च न पश्यति मूढः, उदरनिमित्तं बहुकृतवेषः  ॥ १४॥

मराठी- कोणी एक आपल्या डोईवर जटाभार बाळगतो, कोणी सफाचाट करतो, तर कोणी आपले केस उपटून टाकतो, कोणी भगवे तर कोणी विविध प्रकारचे कपडे परिधान करतो. पोट भरण्यासाठी नाना प्रकारचे वेष घालणारा मूर्ख हे बघूनही न बघितल्यासारखे करतो.

जटा वाढवी सफाचाट वा कचा उपटती भगवा धारी l
पोटाची खळगी भरण्या, नाना वसने दृष्टिआड तो मूर्ख करी  ॥ १४

श्लोककर्ता- तोटकाचार्य.

अङ्गं गलितं पलितं मुण्डं, दशनविहीनं जातं तुण्डम्  ।
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं, तदपि न मुञ्चत्याशापिण्डम्  ॥ १५॥

मराठी- गात्रे गळलेली, मस्तक (केस पिकल्यामुळे) पांढरे, मुखातील दात नाहीसे झालेले, असा म्हातारा (हाती) काठी घेऊन जातो, तरीही तो आशेची उंडी काही सोडत नाही.

गात्रे गळली केसहि पिकले रदन न उरले तोंडा  ।
वृद्ध चालतो घेउन दंडा, त्यागु शकेना आशापिंडा  ॥ १५

श्लोककर्ता- हस्तामलकाचार्य.

अग्रे वह्निः पृष्ठेभानुः, रात्रौ चुबुकसमर्पितजानुः  ।
करतलभिक्षस्तरुतलवासः, तदपि न मुञ्चत्याशापाशः  ॥१६॥

मराठी- (थंडी निवारणासाठी) आगीसमोर,पाठीवर सूर्याचे ऊन,रात्री गुडघ्यांमध्ये हनुवटी खुपसून (बसणे), झाडाखाली मुक्काम आणि ओंजळीत भीक मागणे, तरी (हा) आशेचा पाश काही सोडत नाही.

पाठीवर रवि, धुनी समोरी, रात्री खुरमुंडी करी  ।
करात थाळी, घर वृक्ष तळी, परि सुटते नच आशा दोरी ॥ १६

श्लोककर्ता- सुबोधाचार्य.

कुरुते गङ्गासागरगमनं, व्रतपरिपालनमथवा दानम्  ।
ज्ञानविहिनः सर्वमतेन, मुक्तिं न भजति जन्मशतेन  ॥ १७॥

मराठी- सर्व धर्म विचारसरणींनुसार, (पुण्यप्राप्तीसाठी) अज्ञानी मनुष्य गंगासागरी (स्नानाला) जातो, कोणी व्रत वैकल्ये पाळतो किंवा दानधर्म करतो, (परंतु) त्याला शंभर जन्मांनंतरही मोक्षमिळत नाही.

धर्म सांगती जन अज्ञानी जाती गंगा स्नानी किंवा रमती दानी ।
करिती व्रतपालन शतजन्मी, परी न मोक्षा जाती कोणी ॥ १७

श्लोककर्ता वार्तिककार (सुरेश्वराचार्य).

सुरमंदिर तरुमूल निवासः, शय्या भूतलमजिनं वासः  ।
सर्वपरिग्रह भोगत्यागः, कस्य सुखं न करोति विरागः  ॥ १८॥

मराठी- देवळात किंवा झाडाखाली रहाणे, जमिनीवर झोपणे, हरिणाचे कातडे पांघरणे, सर्व तर्हेच्या मालकीच्या वस्तूंचा व सुखोपभोगांचा त्याग करणारे वैराग्य कोणाला सुख देत नाही बरे ?

वृक्षतळी वा देउळी वसे, निजे भूतळी, ओढी हरिणाजिना ।
प्रियजन, गोष्टी त्यागुन कैचे सुख नच मिळे विरक्तांना ॥ १८

श्लोककर्ता- नित्यानंद .

योगरतो वा भोगरतो वा, सङ्गरतो वा सङ्गविहीनः  ।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं, नन्दति नन्दति नन्दत्येव   ॥ १९॥

मराठी- कोणी योगात मग्न असेल तर कोणी चैनबाजीत, कोणी इतरेजनांच्या सहवासात दंग, तर कोणी एकांतात. परंतु ज्याचे मन ब्रह्मामध्ये रमते तो आनंदी होतो, आनंदी होतो, आनंदी होतोच.

साधना करी वा चैन करी, सग्यांसवे वा एकला घरी ।
ब्रह्मा जयाच्या वसतो उरी, आनंद आनंद तया घरी ॥ १९

श्लोककर्ता- आनंदगिरी.

भगवद् गीता किञ्चिदधीता, गङ्गाजललवकणिका पीता  ।
सकृदपि येन मुरारि समर्चा, क्रियते तस्य यमेन न चर्चा  ॥ २०॥

मराठी- ज्याने भगवत् गीतेच्या थोड्याश्या भागाचे का होईना अध्ययन केले आहे, गंगेचे पाणी थेंबभर का होई ना प्यायले आहे, जो विष्णूचे निदान एकदा तरी पूजन करतो, त्याच्याबद्दल यम चर्चा देखील करत नाही.

पठण करी थोडे गीतेचे, गंगाजलपानहि किंचितसे ।
हरिचे पूजन कधितरि करिता काळ शब्द नच काढतसे ॥ २०

श्लोककर्ता- दृढभक्ती.

पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनम्  ।
इह संसारे बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि मुरारे  ॥ २१॥

मराठी- फिरून एकदा जन्म घेणे, पुनः एकदा मृत्यु होणे, परतून मातेच्या उदरी वास करणे………. हा संसार पार करण्यास फार अवघड आहे. हे गोविंदा, मजवर कृपा करून माझे रक्षण कर.

पुनः जन्म घेणे पुनः मृत्यु होणे पुनः माउलीच्या पोटी रहाणे  ।
दया दावुनी तार मजला मुरारी, सोपे नसे पार संसार करणे  ॥ २१

श्लोककर्ता- नित्यानंद.

रथ्याचर्पटविरचितकन्थः, पुण्यापुण्यविवर्जितपन्थः ।
योगी योगनियोजित चित्तो, रमते बालोन्मत्तवदेव ॥ २२॥

मराठी- रथाखाली तुडवल्या गेलेल्या कपड्यांची गोधडी पांघरणारा, जेथून पाप-पुण्य नाहीसे झाले आहेत अशा मार्गावर चालणारा, आपले मन (पूर्णपणे) योगात गुंतवणारा साधक देहभान हरपलेल्या लहान मुलाप्रमाणे रमतो.

जुनाट वाकळ वाटेवरती, जेथे पुण्य नि पातक नसे ।
एकतान मन योगी रमता साधक भासे मूल जसे ॥ २२

श्लोककर्ता- योगानंद

कस्त्वं कोऽहं कुत आयातः, का मे जननी को मे तातः ।
इति परिभावय सर्वमसारम्, विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम्  ॥ २३॥

मराठी- तू कोण, मी कोण,कुठून आलो,माझी आई कोण,माझा बाप कोण ? या निरर्थक विश्वाला एखाद्या स्वप्नाप्रमाणे दूर सारून या सर्वाचा विचार करा.

तू कोण, मीही, कुठला, कशी ती माता नि माझा पिता असावा ।    स्वप्ना जसे विश्व असार टाका, विचार सारा मनी करावा ॥ २३

श्लोककर्ता- सुरेंद्र

त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुः, व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः  ।
भव समचित्तः सर्वत्र त्वं, वाञ्छस्यचिराद् यदि विष्णुत्वम्   ॥२४॥

मराठी- तुझ्यात माझ्यात आणि इतरांच्यातही एक विष्णूच समाविष्ट आहे. अरे असहिष्णु माणसा, तू उगीचच माझ्यावर रागावतोस. तू जर विष्णूपदाला जाऊ इच्छित असशील तर सर्व ठिकाणी समान भावना ठेवणारा हो.

उगा राग हा मजवर द्वेष्ट्या, मी तू सर्वां एक हरी ।
सर्वां असु दे समता, इच्छा विष्णुपदाची मनी जरी  ॥ २४

श्लोककर्ता- मेधातितीर.

शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ, मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ  ।
सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं, सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम्  ॥ २५॥

मराठी- (आपले) मित्र, संतती, नातलग यांच्यावर प्रेम करण्याचा किंवा शत्रूचा द्वेष करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या सर्वांमध्ये तू स्वतःलाच पहा आणि अज्ञानातून येणारी भेदाची भवना टाकून दे.

करू नको तू यत्न, शत्रुचा द्वेष सग्यां पुत्रां प्रीती ।
अजाण भेदा टाकुन मानी स्वतः तया संगती ॥ २५

श्लोककर्ता- भारतीवंश

कामं क्रोधं लोभं मोहं, त्यक्त्वाऽत्मानं भावय कोऽहम्  ।
आत्मज्ञानविहीना मूढाः, ते पच्यन्ते नरकनिगूढाः  ॥ २६॥

मराठी- काम,क्रोध,लोभ,मोह हे सोडून देऊन स्वतःशीच विचार कर की मी कोण आहे. आत्मज्ञान नसलेले मूर्ख लोक अंधकारमय नरकात यातना सहन करत पडतात.

राग वासना लोभ लालसा सोड, कोण मी मनी  ।
मूर्ख अडाणी पिचती तेवी नरकी घोर तमी  ॥ २६

श्लोककर्ता सुमती.

गेयं गीता नामसहस्रं, ध्येयं श्रीपति रूपमजस्रम्  ।
नेयं सज्जनसङ्गे चित्तं, देयं दीनजनाय च वित्तम्  ॥ २७॥

मराठी- गीतेचे नित्य पठण कर, श्रीविष्णूची सहस्र नावे व त्याचे विशाल रूप यांचे ध्यान कर. आपले मन सुजनांच्या संगतीत ने (रमव) व गरीब दुबळ्यांना धन दान कर.

गीता, नावे हजार हरिची, विशाल रूपा ध्यान करी  ।
ने मन सज्जनसंगे, दीना धनसंपत्ती दान करी  ॥ २७

श्लोककर्ता सुमती.

सुखतः क्रियते रामाभोगः, पश्चाद्धन्त शरीरे रोगः  ।
यद्यपि लोके मरणं शरणं, तदपि न मुञ्चति पापाचरणम्  ॥ २८॥

मराठी- सुख मिळविण्यासाठी मनुष्य स्त्रीसंग करतो, ज्यानंतर, अरेरे, शरीरात रोग उत्पन्न होतो. जरी शेवटी सर्वांना मृत्यूलाच शरण जावे लागते, तरीही (तो) पापी वर्तन सोडत नाही.

सुखहव्यासे स्त्रीसंगाने नाना व्याधी जडत तनूला ।
अंतिम मजल जना मृत्यूची तरिहि न सोडित दुराग्रहाला  ॥ २८

अर्थंमनर्थम् भावय नित्यं, नास्ति ततः सुखलेशः सत्यम्  ।
पुत्रादपि धनभाजाम् भीतिः, सर्वत्रैषा विहिता रीतिः  ॥ २९॥

मराठी- संपत्ती ही अनर्थकारी आहे, तीपासून किंचितही सुख मिळत नाही, हे खरे आहे, हे सदोदित जाणून रहा. श्रीमंतांना आपल्या मुलापासूनही भीती असते……… सगळीकडची हीच रीत आहे.

संपद मान अनिष्ट सदा, लवही सुख ये नच दारी  ।
धनवंता सुत धोकादायी, रीत जगाची असे खरी  ॥ २९

प्राणायामं प्रत्याहारं, नित्यानित्य विवेकविचारम्  ।
जाप्यसमेत समाधिविधानं, कुर्ववधानं महदवधानम्  ॥ ३०॥

मराठी- प्राणाचे नियमन, प्रत्याहार करून शाश्वत आणि अशाश्वत यांचा विवेकपूर्ण विचार करून, जप आणि त्यातून अत्यंत सावधतेने समाधि अवस्था प्राप्त करून, आपले अशांत मन शांत कर.

प्राणायामे प्रत्याहारे स्थिर-चंचल तू तर्क करी ।
जप, बहुयत्ने लाव समाधी, चंचल मन तू शांत करी ॥ ३०

टीप-  योगाभ्यासाचे वर्गीकरण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. यापैकी चौथे अंग ‘प्राणायाम’ म्हणजे (प्राण आणि आयाम) श्वासांना स्थिर हालचालींशी जोडण्याचा सराव आहे किंवा श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कृती आहे. श्वासावर नियंत्रण ठेवण्यास शिकल्यामुळे मनावर नियंत्रण ठेवण्यातही मदत मिळते.

ध्यानाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे असलेले अंग ‘प्रत्याहार’ म्हणजे (नकारात्मक किंवा सकारात्मक) वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींतून आपल्या संवेदना काढून घेणे. मनाची प्रतिकारशक्ती बळकट करण्यात याचा उपयोग होतो. प्रत्याहार या शब्दाचा अर्थ ‘सर्व बाजूंनी मागे वळविणे’. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या पाच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस, गन्ध हे विषय आहेत. इंद्रियांचे विषय हा त्यांचा आहार मानला जातो. त्यापासून त्यांना परावृत्त करणे असा प्रत्याहार शब्दाचा अर्थ होतो. प्रत्याहार पाच प्रकारचा मानला जातो. (१) विषयांमध्ये विहार करणाऱ्या इंद्रियांना बलपूर्वक विषयांपासून मागे ओढणे (२) जे जे दृष्टिपथास येईल ते ते सर्व आत्मरूप आहे असे जाणणे (३) प्रत्येक दिवशी करावयाच्या नित्य कर्मांच्या फळाचा त्याग करणे (४) लौकिक जगातील सर्व विषयांविषयी अनासक्ति बाळगणे (५) शरीराच्या निरनिराळ्या अवयवांवर चित्त एकाग्र करून बाह्यविषयांपासून आवरून घेऊन ते मागे घेणे. प्रत्याहारात इंद्रियांचा  त्यांच्या विषयांशी संबंध असला तरी ती त्याचा आकार धारण करीत नाहीत. सारांश, इंद्रिये स्वभावत:च बहिर्मुख, बाह्य विषयांकडे धावणारी असतात. त्यांच्या बहिर्मुख प्रवृत्तीला अंतर्मुख बनविणे, हाच प्रत्याहार. प्रत्याहार हा बहिरंग योग आणि अंतरंग योग यातील महत्त्वाचा दुवा आहे.

गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः, संसारादचिराद्भवमुक्तः  ।
सेन्द्रियमानसनियमादेवं, द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवम्  ॥ ३१॥

मराठी- गुरूच्या पदकमलांचा आश्रय घेणारा भक्त या संसारातून लगेचच मोकळा होतो. अशा तर्‍हेने शरीर आणि मन दोघांना आटोक्यात ठेऊन आपल्या हृदयात आसनस्थ झालेल्या परमेश्वराचे तू दर्शन घेशील.

गुरुपदकमळी आश्रय घेता, संसारातुन मुक्त होतसे ।
तनमन आटोक्यात ठेउनी, भगवद्दर्शन मनी घेतसे ॥ ३१

। श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले ‘भज गोविंदम्’ स्तोत्र समाप्त ।

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..