नवीन लेखन...

भाग्यवती

गुणी, समंजस आणि कर्तुत्ववान-समाधानी पतीची साथ, हे माझं सौभाग्य! सुसंस्कृत, कलासक्त माणसांनी भरलेला सासर परिवार, हे माझं सौभाग्य! उत्तम जाणकार आणि विवेकी मित्रपरिवार, हे माझं सौभाग्य! आस्वादक व चोखंदळ वाचक लाभणं हे माझं सौभाग्य!!!! म्हणून म्हणते आहे मी स्वतःला सौभाग्यवती!! तेव्हा कृपया ते सौ. लिहिलेलं खोडू नका!’

भाग्यवती मी भाग्यवती गं… भाग्यवती ॥ध्वृ॥
चंद्र नभीचा खाली आला
तिलक कपाळी माझ्या झाला
मीच माझ्या सौभाग्याची …
भाग्यवती गं भाग्यवती ॥

एकोणनव्वद वयाच्या आजी आपल्या कापऱ्या पण गोड आवाजात मला गाऊन दाखवत होत्या. गोरापान पण सुरकुतलेला चेहरा, नाजूक झालेली देहयष्टी,  बारीक कापलेले मऊसूद पांढरे केस, तोंडाच्या बोळक्याला झाकणारे पातळ गुलाबी ओठ, असंख्य आठवणी साठवून ठेवलेले हळवे डोळे आणि स्निग्ध हातांचा आशावादी स्पर्श….  केअर सेंटर मधल्या ह्या आजींचं नाव मी नाही विचारलं! मला माहीत आहे ते मालती, वसुधा, सुमती, उषा, कावेरी, इंदू… असंच काहीच असणार!आजीला कुठे नाव असतं कां?? ती आजी असते! तिच्या नजरेतून, स्पर्शातून, वासातून, हाकेतून, समजावण्यातून, काळजीतून फक्त अनुभवी आपुलकीच जाणवते…. कदाचित ह्या आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण आली

असेल म्हणून मी स्वतःहून त्यांच्या जवळ जाऊन

त्यांना विचारलं, ‘आजी, तुम्ही गाता??’ डोळ्यांतून सगळ्या भूतकाळ चमकला त्यांच्या… गळ्यातून न फुटलेल्या आवाजात त्यांनी होकार

पोहोचवला.. ‘म्हणता काहीतरी? मी रेकॉर्ड करू?..’ सुरकुतलेली कळी हुशारली!! पूर्ण उठता येत नव्हतं तरी उशीवर कोपर रोवून त्यांनी पाठ उचलली आणि गाऊ लागल्या…

‘भाग्यवती मी भाग्यवती गं भाग्यवती..!’

आता मला आजी दिसेनाशा झाल्या माझ्या डोळ्यात भरून आलेल्या पाण्यामुळे… केअर सेंटरमधले वयाने थकलेले, वार्धक्यानी कोमेजलेले आजी आजोबा आणि या पार्श्वभूमीवर हे गाणं….. घरापासून दूर, रक्ताच्या नातलगांपासून विलग असणाऱ्या आजी, गाणं म्हणा म्हटल्यावर ‘भाग्यवती मी भाग्यवती’ हे गाणं म्हणत असतील तर त्यांचं आयुष्य किती रसरशीतपणे आणि आनंदाने जगल्या असतील हे कोणी सांगायला हवं का??

कोण भाग्यवती? कोण सौभाग्यवती??

काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवडला जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. समारंभाची सुरुवात माझ्या नृत्यवंदनेनी झाली आणि मग मी श्रोत्यांमध्ये सामील झाले. मंचावर सर्व आमंत्रित सत्कार मूर्तींची नावे बॅनर वर लिहून त्यांचे अभिनंदन केले होते.

विविध क्षेत्रातल्या यशस्वी स्त्रियांचा सन्मान झाला . त्यांचं कार्य खरोखर वाखाणण्याजोगंच  होतं …..पण विशेष करून लक्षात राहिली ती एक ज्येष्ठ महिला लेखिका ! ज्यांचा नाव घेऊन परिचय करून दिला आणि नम्रतापूर्वक त्यांना मंचावर मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण केलं गेलं .माइक समोर येतात त्या म्हणाल्या, ‘तुम्हा सर्वांची, या आयोजक संस्थेची माफी मागते कारण तुम्ही फलकावर सर्व सन्माननीय महिलांच्या नावाआधी ‘सौ.‘ अर्थात सौभाग्यवती असं लिहिलं आहे . आपण सर्वसाधारण समज करून घेऊन, अध्याहृत धरून सौ. लिहितो पण पाहुणे मंडळींची नीटची माहिती आपण घेतली नसते . तुमची माफी अशासाठी मागते की ज्या अर्थी तुम्ही सौ लिहिलं आहे त्याअर्थी मी सौभाग्यवती नाही .माझे पती काही वर्षांपूर्वी निधन पावले पण तुम्ही माझ्या नावा पुढचं सौ. अर्थात सौभाग्यवती खोडू नका कारण ह्या ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर आल्यावर जाणवतं आहे की किती बाबतीतलं सौभाग्यच म्हणून मला आयुष्य समृद्धपणे जगता आलं आहे. उत्तम संस्कार आणि कलेचं बाळकडू देणार माहेर, भरलेलं गोकुळासारखं घर …हे माझं सौभाग्य !

गुणी, समंजस आणि कर्तुत्ववान-समाधानी पतीची साथ, हे माझं सौभाग्य! सुसंस्कृत, कलासक्त माणसांनी भरलेला सासर परिवार, हे माझं सौभाग्य! उत्तम जाणकार आणि विवेकी मित्रपरिवार, हे माझं सौभाग्य! आस्वादक व चोखंदळ वाचक लाभणं हे माझं सौभाग्य!!!! म्हणून म्हणते आहे मी स्वतःला सौभाग्यवती!! तेव्हा कृपया ते सौ. लिहिलेलं खोडू नका!’

संपूर्ण कार्यक्रम एक तरफ आणि या विदुषीने दिलेला लख्ख विचार एक तरफ !! ज्येष्ठ आणि निवृत्त माणसे अनुभवाच्या बाबतीत संपन्न, धनवान असतात हेच खरं!  डेरेदार जुन्या वृक्षाखाली विश्रामाला निवांत बसलो तर फळ, फुलं ,गारवा ,सावली ,सोबत यापैकी काही ना काही नक्की मिळणारच!  तशीच गरज आहे ती निवांत मनाने या ज्येष्ठांजवळ आपण आवर्जून बसण्याची …. काय माहीत आपल्याला काय काय मिळून जाईल !! सासरी- माहेरी – शेजारपाजारी – परिचयात असे अनेक वयोवृक्ष भेटतात आणि पटत जातं ‘भाग्यवती मी भाग्यवती गं भाग्यवती ‘ !!

निवृत्तिपरम अनुभव नेमा।
शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेवो॥

संसारात बाळगलेली वृत्ती-प्रवृत्ती ,त्यातून आलेल्या अनुभवातून जी समाधानी-समतोल वृत्ती ज्येष्ठ बाळगतात ती खरी निवृत्ती!

वृत्तींचा विलय म्हणजे निवृत्ती।
निवलेल्या वृत्तीम्हणजे निवृत्ती॥

क्षमा मागणे आणि क्षमा करून टाकणे, हा सहज भाव ज्या वयात साधतो ,ते निवृत्ती पर्व! मनःशांती हीच खरी संपत्ती, हे ज्ञान होते ती परम निवृत्ती !!

अशी निवृत्ती ज्या व्यक्तीला लाभली ती भाग्यवती गं भाग्यवती!!

-हर्षदा बोरकर

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..