दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले. १९५५ साली दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणीच्या वास्तूत उभारल्या गेलेल्या दूरदर्शन केंदाने निर्मिलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले ते १५ सप्टेंबर १९५९ रोजी. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी “दूरदर्शन” असे नाव सुचवले होते. पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी जो एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता, त्यात पपेट शो, वैजयंती माला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणा-या घटकांचा अंतर्भाव होता. प्रायोगिक तत्त्वावरचं हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होतं- पण ते पाहायला खुद्द दिल्लीकरांकडेही टीव्ही सेट होते कुठे ! त्यामुळे टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला १९६५ मध्येच, त्यामुळे काहींच्या मते तीच सुरवात मानली जाते.
रंगत खरी वाढली ती १९८२ नंतर, जेव्हा टीव्ही खरोखर ‘रंगीत’ दिसू लागला. तोपर्यंत ‘कश्मी्र की कली’ आणि ‘नवरंग’सुद्धा ‘ब्लॅक अँड व्हाइट’मध्येच पाहावे लागले होते. १९८२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !
“हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उच्चांक मांडले होते. ७ जुलै १९८४ रोजी पहिल्यांदा हिचा पहिला भाग प्रसारीत झाला होता. नटवर्य अशोककुमार बोलत होते, ‘‘…लेकीन बसेसर था कहाँ और किस उलझन में?… मंझलीने माँ को क्याह बताया था? कल की सुबह अपने साथ क्याह लाने वाली है?… बेखबर तो मैंभी हूँ – पर बेआस नहीं… होता है क्याा. कल देखेंगे, ‘हम लोग’ !’’ त्यानंतर हिंदीतल्या बुनियाद, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. ‘रामायण’ व ‘महाभारत’ या दोन महाकाव्यांचा भारतीय मनावरचा चिरंतन ठसा या दोन महामालिकांनी पुन्हा एकदा उजळला. १९८७ ते १९९० या चार वर्षांत या मालिकांचं जनमानसावरचं जे गारुड दिसलं, त्यानं ‘टीव्ही’ या माध्यमाची अक्षरशः विस्मयित करणारी ताकदच दाखवून दिली. रविवारी सकाळी या मालिकांवेळी देशभर जणू ‘कर्फ्यू’ लागणारी परिस्थिती होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply