नवीन लेखन...

बालपणीचे कुतुहल


वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची. बालमनाला तो आनंद वाटायचा.

आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे. रस्ते विकास त्याकाळी म्हणावा तितकासा चांगला नाही. त्यामुळे दळणवळण तसं काहीसं कमीच.ही साधारण पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती तशी आता ही परिस्थिती बरीचशी बदलली आहे.अधिकच चांगले नाही पण आता आमच्याकडे रस्ते बरे झाले आहेत.

आमच्या लहानपणी गावात एखादं वहान येणं खरं तर आमच्यासाठी कुतुहलाचीच गोष्ट.तसं तर गावात सायकल जवळपास प्रत्येक घरात असायची.जवळपासचा प्रवास सायकलवरच असायचा‌.मोटारसायकल वर एखादा पाहुणा गावात आला तर लहानपणी आम्ही त्या मोटार सायकलच्या बाजूला गर्दी करुन तीचं निरीक्षण करायचो.चारचाकी गाडी कधीतरीच यायची ती पाहण्यासाठी हौस असायची.कारण अशी वहानं येण्यासाठी मुळात तसे रस्तेच नसायचे.

दिवाळीच्या आसपास पावसाचं प्रमाण कमी झाले की , आमच्या वाडीत एस.टी.बस यावी यासाठी डोकिरबा पासून रस्ता मुरुम टाकून नीट केला जायचा. एक दोन दिवस गावातर्फे श्रमदान घेतलं जायचं. बैलगाडीतून मुरुम भरुन आणला जायचा ती बैलगाडी रस्त्यात खाली केली जायची मग घमेल्यानं मुरुम रस्त्यावर पसरवून खोऱ्याफावड्यानं समतल केला जायचा. असा गाड्या येण्यासाठी रस्ता तयार झाला की गावात एस.टी.बस सुरू व्हावी यासाठी वाई आगारात निवेदन दिले जायचं. मग चारआठ दिवसांनी वाईतून एस.टी.बस मधून कोणीतरी एखादा अधिकारी रस्त्याची पाहणी करण्यासाठी यायचा.त्याच्या पसंतीस रस्ता पडल्यास बस सेवा सुरु व्हायची. वाडीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागून घरं असल्यामुळे बस वाडीतून वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही अडथळा असेल तर तो दूर केला जावा अशा सूचना यायच्या.मग एखाद्या घराची भिंत किंवा घराची वळचण आवश्यकतेनुसार तितकी मागे घेतली जायची.एस.टी.ची सुविधा सर्वांचीच गरज असल्यामुळे प्रत्येक जण सहकार्य करुन भिंत, वळचण किंवा दारापुढील कट्टा मागं घेऊन गावाला सहकार्य करत असायचा.

मुरुमाच्या रस्त्यावरुन बसची आणि इतर गाड्यांची येजा होऊन तयार झालेल्या चाकोरीतून लहानपणी आम्ही लोखंडी ‘चक्र’ तार लावून पळवत अगदी डोकिऱ्यापर्यंत जायचो.सायकल या चाकोरीतून चालवताना मज्जा यायची.

अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा एस.टी.बस यायला लागली तेव्हा वाडीच्या खाली भैरोबाच्या देवळाजवळ वळायची पण नंतर ही जागा त्या मालकानं द्यायचं बंद केलं तेव्हा मग एस.टी.बस वाडीतून वर येऊन मंदिराजवळ वळायला लागली.त्यामुळे वाडीतून मंदिरापर्यंत बस येण्यासाठी अशी काही घरांची अडचण आल्यास घरमालक काहीही आढेवेढे न घेता तसं सहकार्य करत.

तर ह्या बसच्या दोन फेऱ्या होत असत सकाळी साडेअकरा आणि दुपारी तीन वाजता बस यायची.ही सेवा आमच्यासाठी त्याकाळी फक्त सहा सात महिन्यांपर्यंत सुरू असायची ‌.जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली की पुन्हा बस गावात येणं बंद. प्रवासी संख्या हा एक मुद्दा असायचा महामंडळाच्या वाई आगारातून अशी अट असायची की त्यांना अपेक्षित किमान प्रवासी तरी रोज वाईला येजा करीत असतील तर बस गावात यायला काही हरकत नाही.मग त्यासाठी रोज दहा घरांची निवड केली जायची त्या दहा घरातून एकजण वाईला बसमधून जात असे.प्रवास खर्च स्वतः करायचा ही अट गावाची असायची.वाईला बाजाराला जाणं तसंही गरजेचं असायचं. धुराळा उडवत गावात येणारी एस.टी.बस आमच्या बच्चे कंपनीसाठी कुतुहलाचा विषय.ही लालपरी पाहण्याची लहानपणी भारी हौस‌.कधीतरी वाईला बसमध्ये बसून जाण्यासाठी लहानग्यांचा घरात हट्ट असायचा‌.मग एखाद्या वेळेस हा हट्ट पुरवला जायचा पण हा दिवस एक दुसराच यायचा त्यापेक्षा जास्त नाही.मग त्या बसमध्ये घरातील कुणाच्या तरी सोबतीनं वाईला जायचं.बसच्या सीटवर बसलं की लहानपणी त्या वयात एक मज्जा अनुभवायला मिळायची.या आनंदापुढं आभाळ ढेंगणं वाटायचं.वाहक तिकिट काढण्यासाठी जवळ येताना टिकटिक असा हातातील पंचने करायचा तो आवाज भारी वाटायचा.

घरी परत आल्यावर मित्रांना प्रवासाचं वर्णन सांगताना डोळ्यातील आणि मनातील आनंद ओसंडून व्हायचा.

हा वाईला एस.टी.बसने केलेला प्रवास अविस्मरणीय असायचा.बसमधून केलेला प्रवास एक वेगळाच आनंदी अनुभव देऊन जायचा.मागे पळणारी झाडं आणि एक एक गाव मागं टाकत एस.टी.प्रवासी घेऊन वाईत पोहचायची.

वाई तसं खेड्यांच्या मानानं मोठं शहर.इथली गर्दी , दुकानं,बाजारपेठ माणसांच्या गर्दीनं गजबजलेली.गर्दीत चुकामुक होऊ नये म्हणून मुलांना एका हातात पकडून दुसऱ्या हातात बाजाराची पिशवी धरून आई बाजार करायची. कुठे वडापावची गाडी दिसली की हातात धरलेल्या मुलाचा वडापाव खाण्यासाठी हट्ट सुरु व्हायचा. मग त्याला एक वडापाव घेऊन दिला जायचा आणि घरच्यांसाठी पार्सल घेतलं जायचं.एखादं खेळणं,खापराची पाटी,अंकलिपी पेन्सिल असं शालेय साहित्यही घेतलं जायचं.शेतकरी वर्ग असल्यामुळे गुरांसाठी लागणारी वेसण,म्होरके, गळ्यातील घंटा अशा वस्तूंची खरेदी होत असे‌. दुपारपासून बाजाराची खरेदी करताना मोठ्या माणसांची धावपळ दमछाक व्हायची तर सोबत असणाऱ्या आमच्यासारख्या लहानाची पायपीट.गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं अशी सोबतच्या लहान मुलांची गत व्हायची. परतीच्या बसच्या वेळेत स्टँड वर येऊन बसमध्ये जागा पकडली जायची.गावात बस पोहचली की बसमधून उतरताना वाटायचं परत वाईला जावं.
बस प्रवासाचा हा अनुभव त्या लहानवयात संस्मरणीय ठरायचा.आता जरी हे सर्व आठवलं की हसू येतं पण त्या वयात हे सगळं बालमनाला आनंद देणारं होतं.खेडेगावातील राहणीमान त्यावेळी सोयीसुविधांचा अभाव असलेलं असंच होतं.आता त्यात खूप बदल झाला आहे खेडी सुधारली आहेत शहरात जे मिळतं ते गावातही सहज उपलब्ध आहे.

आता तर शहरीकरणामुळे मोठ्या शहरात राहणं नको वाटतं. शहरातीलच लोकं धकाधकीच्या जीवनातून काही काळ विश्रांती साठी बदल म्हणून गावाकडं राहायला येतात. गावखेड्यांचा झपाट्याने विकास होत आहे. रस्ते,पाणी,वीज या सुविधा सर्वत्र पोहचल्या आहेत. गावातही प्रत्येकाच्या घरातील अंगणात चारचाकी गाडी उभी आहे. चारतासात मुंबई ते गाव प्रवास होतोय.त्यामुळे वरील कुतूहल आताच्या मुलांना राहिलं नाही कदाचित त्यांना हे सर्व हास्यास्पदही वाटेल. पण आम्ही हे कुतूहल अनुभवलयं ते तसंच मनाच्या कोपऱ्यात जपलयं.त्याकाळी गावात येणाऱ्या बसच्या वेळेवर गावातील माणसांचं कामाचं वेळापत्रक ठरायचं. आता डांबरी रस्ते झाले गावात तर सिमेंट काँकरेटचा रस्ता होतोय.पण आमच्या लहानपणी असं गावातून मातीचा धुरळा उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागं धावत जाणं आमच्यासाठी आनंद देणारं होतं.एकमेकांच्या शर्टला पकडून तोंडाने गाडीचा आवाज काढत गाडी चालवण्याचा आनंद घेणारे आमच्यानंतरच्या लहान मुलांनी घेतला नाही‌. ते एक कुतूहल होतं.आणि असं कुतूहल अनुभवणारी आमची शेवटची पिढी असावी.आता अशी मुलं एस.टी.बसचा पाठलाग करत नाहीत, चारचाकी गाडीचीही उत्सुकता त्यांना राहिली नाही.

माझ्या लहानपणीच्या कुतुहलावर आपली प्रतिक्रिया जरुर कळवावी.

— हिंदुराव गोळे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 336 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..