नवीन लेखन...

बहुरूपी

“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली आरोळी खूपच घाबरून सोडणारी होती म्हणून पोरं हातातली दप्तरं तशीच पारावर सोडून पळाली!

हा पोलीस नेमका कोण? कशासाठी आला असावा हे राम व त्याचे मित्र बारीक लक्ष देऊन ऐकत होते, त्या पोलिसाच्या आजूबाजूला गावातली चार दोन रिकामटेकडी माणसं गोळा झाली अन् पोरांना जरा धीर आला. त्याला कोणी काही विचारायच्या आतच त्यानं धडाकेबाज सुरुवात केली “ पाटलाच्या कुत्र्याचं वारंट घेऊन आलोय, आमच्या बिगर लग्नाच्या मामाच्या वरातीत भाजी खाऊन पळाला, तिथून पळता पळता आमच्या गल्लीतल्या सरपंचाच्या कुत्रीसोबत सोडचिट्टी घेतली आता त्याची सुटका नाही ! बिनपगारी अन् फुल अधिकारी , सासऱ्यच्या पाप्पचं लग्न हाय ४० तारखीला, या तुम्ही वाळूची बुंदी खायला, शेंबडाची कढी बी हाये, नवरीच्या बापानं केस केली म्हण बामनावर ! काय म्हणून माझ्या पोरीचं लगीन लावलं १३ व्या महिन्यात! जामीनकीला गेला राणा खिश्यात नाही आणा अन् मला बाबुराव म्हणा, चला बिगी बीगी जोंधळ पेरले वावरत चिमण्या लागल्या भुईमुगाच्या कणसाला ! मागच्या महिन्याच्या ३२ तारखेला बायकु गेली पळून माहेरा अन् मला काही कळाना ,कोर्टात गेलं भांडण ,वकील म्हणाला आणा जामीन मुक्या बहिऱ्याला …….. आंधळ्यानं ते ऐकलं अन् जे काठी घेवून जोरात पळत सुटलं ते या गावच्या पाटलाच्या वाड्यात घुसलं, पाटील गेलं होतं काचेरीला ,ते पाहिलं कोतवालानं आंधळं म्हणलं मला कोर्टात नेवू नका लागलं तर मी तुमचं पीठ दळीतो ,तो बसला जात्यावर दळायला , पाटलाचा कुत्रा लागला भुंकायला आंधळ झालं कुत्र्यावर जाम खुश, त्याला आली त्याची कीव, आंधळं म्हणलं मी दळतो,तू लाव सुर …. बऱ्याच वेळानं कुत्र्याच्या आलं ध्यानात …आंधळं झोपलंय म्हणून… आंधळं होतं दळीत …कुत्र्यानं मारला पिठावर ताव …तेवढ्यात आलं पाटील… आर्र आरं हे काय आंधळ दळीतं अन् कुत्र पीठ खातं ….!!!!” गावातली सगळी खी खी करून हसत होती. दामूअण्णा लई दिवसांनी मोकळा हसला.

पोरं आता भिंतीच्या आडोशाला न राहता त्या पोलिसाजवळ येऊन राहिली. बराच वेळ तो असाच बोलत होता नंतर त्यानं त्याच्या पिशवीतून एक वही काढली अन् “ द्या तुम्हाला जसं जमल तसं, पोटापाण्याचा धंदा हाये आमचा.” हळूहळू मारुतीच्या पाराजवळ जमा झालेल्या सर्वांनी जसं जमेल तशी वर्गणी करून त्याच्या हवाली केली. बराच वेळ नंतर तो माणसाजवळ बोलत उभा होता . त्याचं बहुरूप्याचं नाटक आता संपलं होतं. आता तो मूळ मुद्द्यावर आला होता! जवळ उभ्या असलेल्या पोरांना आवाज देत, “पोरांनो शाळेत जात जा रे नाहीतर काही खरं नही, माझ्यासारखं बहुरूपी होवून जगावं लागंल, काही खरं नाही आमचं!!??” नंतर त्यानं त्याची वही सायकलच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीत ठेवली अन् गावकऱ्यांचा निरोप घेत शिट्टी फुकट सायकलवर टांग मारली अन् पुढच्या गावाला निघून गेला…. पोरं रस्त्याला तो जोपर्यंत दिसतोय तिथपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली होती …. तिथं बाजूलाच उभ्या असलेल्या हरिभाऊनं “ ए पोरांनो जा लवकर , शाळाचा टाईम झाला….” अन् पोरांनी पारावर ठेवलेली शाळेची दप्तरं उचलली…. राम शाळेत जाताना परत परत त्या बहुरुप्याचा विचार करत होता.

संध्याकाळी घरी आल्यावर त्यानं आईला सांगितलं. “नानी, आज आपल्या गावात त्यो पोलिस आला होता, त्यानं लई लोकांना हसवलं.कोण लोक राहत्यात ते?” शकुंतलाच्या राम काय सांगतोय हे सगळं लक्षात आलं होतं. बाजूलाच ओट्यावर बसलेला त्याचा बाप हनु म्हणाला “ ह ..तीच्या .. बहुरुपी आला होता वाटतं आज!” शकुंतला रामच्या डोक्यावरून हात कुरवाळत “ अरे राम ते खोटं खोटं असत्यात , त्यांचा तोच मोठा पाण्याचा धंदा आहे..” तेवढ्यात राम म्हणाला “ हा हा .. त्यानी नंतर पैसे गोळा करून वहीत काहीतरी लिहून घेतलं व्हतं , नानी त्यांचं घर कुठं आसंल?, खरे पोलीस त्यांला काही पगार देत्यात का?, खरे पोलीस त्यांचे कपडे जुने झाल्यावर यांला देत्यात का?” असे एका दमात राम नानी व हनुकडं बरेच प्रश्न विचारले . त्यावर हनु म्हणाला,“ ते सोनई बामणीचे बहुरूपी हाये , लै जगणं अवघड त्यांचं! त्याच्यात माझा लखन बहुरूपी चांगला जोडीदार हाये. त्यांचं पोट, घरदार याच्यावरच हाये रे , आज तोच आला होता का काय माहित?,थोडा बुटगेला जाडेला होता का सायकलवाला? ” तेवढ्यात राम म्हणाला “ हा.. हा नाना त्योच आसंल तुमचा जोडीदार लखन …. गावातल्या दामूअण्णाला माहितीय त्याचं नाव..” शकुंतला संध्याकाळच्या स्वयंपाकाला केव्हाच लागली होती अन् राम हनुला सगळं बारीक सारीक विचारत होता. स्वयंपाक आवरल्यानंतर शकुंतलानं या दोघांना आवाज देत “ चला घ्या जेवून लवकर .. उद्या सकाळी लवकर उठून घोडेगावच्या बाजारला भाजीपाला काढायचाय आपल्याला… ” अन् ते जेवायला बसले….राम जेवताना सुद्धा त्या लखन बहुरुप्याचा विचार करत होता…. त्यांची पोर काय करत असतीन? शाळेत कितवीला असतील? पुस्तक कोण देत आसंल त्यांला?……

— निवृत्ती सयाजी जोरी,

लेखक -तडजोड आत्मचरित्रात्मक कादंबरी.
मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री
छत्रपती संभाजीनगर.
9423180393.

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक निवृत्ती सयाजी जोरी ह्यांनी लिहिलेला हा लेख

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..