नवीन लेखन...

अरेरे, आता पुणेही चालले ! पानिपत,पानशेत आणि आता ?

माझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने – कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर आणि प्रसिद्ध व्यक्तींचे सहज दर्शन होत असे. ७ / ८ मराठी दुकानांनंतर १ /२ अन्य भाषिकांची दुकाने असत.

पण भारताच्या राज्यघटनेने कुणालाही कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले असल्याने आणि ते फक्त मराठी मुलुखाला लागू होत असल्याने, संपूर्ण देशातून मुंबईत सुनामीसारखी माणसे येऊन कोसळायला लागली. इथली स्थानिक भाषा, पेहेराव, संस्कृती, खाद्यपदार्थ, दुकाने, आस्थापने,नोकऱ्या, सणवार, पद्धती, सिनेमा, नाटके, प्रकाशने, राहत्या इमारती, वृत्तपत्रे, इतिहास आणि त्यातील आमचे आदर्श, इत्यादी शेकडो गोष्टी टिपून टिपून मारल्या गेल्या आणि आम्ही मराठी मंडळींनी अगदी एकजूट करून त्या त्यांना मारू दिल्या.

आज आम्ही हिंदीतच बोलतो. मराठी बोलतांना १० शब्दांमध्ये ४/५ शब्द हिंदी आणि इंग्रजी वापरतो. उडुपी, पंजाबी, चायनीज , थाय, कॉन्टिनेन्टल ” फूड” ( “जेवण”म्हणू नये –त्यामुळे त्याची ग्रेसच जाते) खातो. मिसळ पाव, वडापाव, झुणका भाकर इत्यादी गोष्टी या ” गावठी” ठरल्या आहेत. ! मिसळ हा अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे हे जागतिक पातळीवरही मान्य झालंय तरीही तो कॉन्टिनेन्टल होत नाही. एखादा मराठी माणूस भेटला तरी आम्ही बरेचसे हिंदीतच बोलतो आणि काही कारणाने आमचे भांडण सुरू झालेच आणि ते मात्र अर्वाच्च मराठी भाषेत चालते.

मुंबईतून पुण्यात शिरलो की बराच फरक जाणवतो. पुण्यात आलो की मी कुणाशीही चक्क मराठीत बोलू शकतो. उठसूट मला “excuse me ” ने सुरुवात करावी लागत नाही. रसवंती गृह, क्षुधाशांती गृह, खाऊवाले, पोटपूजा, मंगल कार्यालय, वस्त्रालय, गंडेरी, मऊ भात, मेतकूट भात, मंडई, बोळ ,केशकर्तनालय …. अहो, हे पुण्यात सहज वापरले जाणारे मराठी शब्दही मला आता भरजरी वाटतात. हे शब्द आजही लोकं वापरतात आणि ते सर्वांना कळतातही ! ब्राह्मणी गोड चविष्ट पदार्थांपासून ते झणझणीत कोल्हापुरी पदार्थांपर्यंत, मराठी अन्नपूर्णेचे समग्र दर्शन ठायीठायी होते. तुळशीबागेत गुडदाणीवाला पाहून तर मी जुन्या मराठी वाङ्मयातील मजकुरात थेट पोचलो. गोल निळ्या पाट्या, तेथे पूर्वी कोणती थोर व्यक्ती राहत होती ते सांगतात. ठिकठिकाणी दिसणाऱ्या अशा पाट्या पुण्याचे सांस्कृतिक संचितच दर्शवितात. मराठीला वैभवसंपन्न करणारे किती तरी प्रकांड पंडित लेखक, कवी, नाटककार, तसेच संशोधक,अभ्यासक,वैज्ञानिक, अभिनेते, चित्रकार, मूर्तिकार …. पुण्यात पूर्वी तर होतेच आणि आजही आहेत.

व्यासंग जपण्याच्या वृत्तीमुळे पुण्यात २५ हून अधिक विविध संग्रहालये आणि व्यक्तिगत पातळीवर विविध गोष्टींचा संग्रह करणारे शेकडो संग्राहक आहेत. सामाजिक चळवळी ,लढे,,राजकीय पक्ष, धार्मिक आणि वैचारिक पंथांच्या नेत्यांची नुसती नावे लिहायलासुद्धा २ /३ पाने कमीच पडतील. भारतातल्या सगळ्या भागात अत्यंत चमत्कारिक आणि विचित्र वागणारे भरपूर लोक आहेत. पण पुण्यातल्या पाट्या आणि “विनोदी किस्से” यांच्या आम्हीच करीत असलेल्या कुचेष्टेसारखी कुचेष्टा मात्र कुठेही होत नाही.

पण… पण गेली २ / ३ वर्षे माझ्या प्रत्येक पुणे भेटीत कुठेतरी फार मोठा फरक वेगाने दिसायला लागलाय. दाही दिशांनी पुण्याला हजारो इमारतींचा वेढा पडलाय. हजारो मराठी शेतकरी त्यांच्या जमिनींसह नाहीसे झाले. पुण्याशी कसलेही देणेघेणे नसलेले लाखो लोक येथे येउन वसले आहेत. अन्य राज्यांतून हजारो मंडळी रोजगारासाठी पुण्यात घुसली आहेत.पुण्याच्या कित्येक रस्त्यांवरील, फेऱ्या मारून फुटकळ वस्तू विकणारे विक्रेते हे परप्रांतीय आहेत. मराठी माणसांच्या काही त्रुटींचा पुरेपूर फायदा उठवत ही मंडळी पडेल ते काम करून येथे रुजतायत. असे नोकर कमी पगारात दिवसभर राबतात. रात्री दुकानाबाहेरच झोपतात. रात्रभर दुकानाचे रक्षण करणारे आणि सकाळी तात्काळ हजर होणारे असे हे नोकर, वेगाने आपल्या मराठी मंडळींच्या नोकऱ्या काढून घेतायत. उडुप्यांची हॉटेले वेगाने वाढतायत. त्यामुळे आता मराठी पदार्थांची रेलचेल असलेल्या खाणावळी, क्षुधाशांती गृहे, भोजनालये बंद पडू लागतील. रग्गड भाडे देणारे अन्य प्रांतीय आणि विदेशी भाडेकरू पुण्याच्या आतपर्यंत शिरलेत. प्रचंड देणग्या मिळतात म्हणून अशा मंडळींना आमची थोर विद्यापीठे लाल गालिचे अंथरतायत.

यापुढे पुण्याची अत्यंत वेगळी ओळख जपणारे सगळे मारुती, गणपती, देविदेवता, हौद, चौक हे वाहतूक कोंडी करतात म्हणून हटविले जातील. त्यामुळे आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध होईल. मोठमोठया व्यक्तींची स्मारके, विकासाच्या आड येतात म्हणून हलविली ( पाडली ) जातील. आता विविध पेठांच्या जागी, जुन्या संस्कृतीला कायमचे आडवे करणारे छान छान टॉवर्स उभे राहतील. अशा टॉवर्सची नावेही सफायर, ब्ल्यू माऊंट, ला मॉन्द, ऑलीम्पिया अशी असतील. त्यामुळे आपले गावठीपण आपोआप नाहीसे होईल.नाहीतरी पुण्यात झालेल्या ” स्मार्ट (पुणे) सिटी” कार्यक्रमातून मराठी पूर्णपणे हाकललेले होतेच . बाहेरून आलेल्यांची गैरसोय होवू नये, त्यांना नीट कळावे म्हणून आपल्या मराठी मंडळींनी आता हिंदीतून आणि इंग्रजीतून बोलायला सुरुवातही केली आहे. पण वाहतूक सिग्नल तोडला म्हणून मराठी पोलिसांनी पकडले की दंड होवू नये म्हणून एरवी मराठी येत नसल्याचा आव आणणारी ही बाहेरून आलेली मंडळी,त्याच्याजवळ मात्र अगदी शुद्ध मराठीतून घडाघडा बोलतात. दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन लाखो वारकरी पुण्यनगरीला पावन करीत असतात. आता या पालख्यांमुळे

वाहतुकीची प्रचंड कोंडी होते म्हणून या पालख्या, पुण्याच्या बाहेरून नेण्याची यापुढे हळूहळू मागणी होईल आणि ती मान्यही होईल. रस्ते अडविणाऱ्या गणपती उत्सवांवर सतावणूक करणारी बंधने येतील. आज पुण्यातील बहुतेक फेरीवाले मराठी आहेत. पण त्यांच्या जागी आता, रस्त्यांवर रात्री प्रचंड खरकटे फेकणारे,चोरून वीज– पाणी घेणारे, किळसवाणी घाण करणारे,वाहतुकीला बेगुमानपणे अडथळा करणारे,सर्व प्रकारचे रोग आणि प्रदूषण फैलावणारे… अशा फेरीवाल्यांचे जथ्थे येऊन बसतील. असा चमत्कार पाह्यला मिळेल की आपले लोकप्रतिनिधी, नेते, अधिकारी बाहेरच्या फेरीवाल्यांच्याच मागे खंबीरपणे उभे राहतील.एकही रिक्षावाला मराठी असणार नाही. मुंबईत मी हेच पाहत राहिलो .आज मला येथे मराठीत कुणाशीच बोलता येत नाही.

मोरारजींचा महाराष्ट्राला मुंबई मिळू न देण्याचा चंग मी पहिला होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर त्या रात्री शिवाजीपार्कवरचा जल्लोष मी पहिला आहे. आणि मराठी मुंबई अशा तऱ्हेने वेगाने बुडते आहे आणि तेही मी पाहतो आहे .

मराठी भाऊ भाऊ एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांना संपविण्यासाठी निकराने लढतायत. मराठी राज्याचे तुकडे पडण्यासाठी निष्णात मराठी मंडळीच वकिली करतायत. महापालिकेने, सरकारने अधिकृतपणे रस्त्यांना, चौकांना , वास्तुंना, गावांना पिढ्यांपिढ्यापासून दिलेली नावे बिनदिक्कत आणि तीही बेकायदेशीरपणे बदलली जातायत. आजूबाजूच्या परिसरात कुणाला माहितीही नाही अशा अगम्य “महान” व्यक्तींची नावे रस्त्यारस्त्यावर उगवली आहेत. विलेपार्ल्यासारख्या पु. लं. देशपांडे यांच्या घरात, त्यांचे नाव एका बागेला देण्याच्या तीव्र विरोधाला वर्षभर निकराने तोंड द्यावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव काय असणार ? आमची दहीहंडी, गणपती उत्सव,आमच्या सभा, सण यांच्यावर अमराठी मंडळी लक्ष ठेऊन आहेत.यंत्रे घेऊन आमचा आवाज मोजत फिरतात या मंडळींनी जर हरकत घेतली नाही तर आम्हाला हे सण साजरे करता येतात. मांसाहार करतो असे कारण दाखवून गडगंज टॉवर्समध्ये मराठी माणसाला जागाच दिली जात नाही.

आता भीती वाटते ती पुण्याची !! कारण पुण्यात ही सर्व पूर्व-लक्षणे आता वेगाने दिसतायत. पण असे काही घडू लागले असले तरी ते नाकारले जाईल अशीही शक्यता आहे. मला असे वाटते की आपण बराच काळ काहींशा गुंगीत राहतो. असे काही घडत असेल यावर आपला आधी विश्वासच बसत नाही. आपली मराठी मंडळीच ” असे पुण्यात घडणे कदापीही शक्य नाही ” असे सांगणारे लेख, परिसंवाद, चर्चा करतील ….आणि पुणे बुडणे सुरूच राहील.कारण मुंबईतही हेच घडले होते.

पानिपत आणि पानशेत ही दोन प्रलयंकारी संकटे पुण्यावर कोसळली. पण पुणे कात टाकून पुन्हा उभे राहिले. मराठी पुणे, सांस्कृतिक पुणे, विद्वानांचे पुणे, ऐतिहासिक पुणे, सामाजिक चळवळींचे पुणे …काही उणे नसणारे पुणे ! … पुन्हा उभे राहिले. पण आताचे हे संकट मात्र ही सर्व गुणवैशिष्ठ्ये पार धुवून काढील. त्यानंतरचे पुणे मात्र आपले नसेल.

अशीच धुतली जातांना मी मुंबई पाहिली, ठाणे पाहिले, डोंबिवली पाहिली ! मी पुणेकर नसलो तरी मला पुण्याबद्दल खूप आपुलकी आहे. पण दुर्दैवाने मला पुणेदेखिल असेच पाहत राहावे लागेल. मी कुणाला विचारणार –” कुठे नेऊन ठेवणार आहात पुणे ?”

— मकरंद करंदीकर.
अंधेरी-पूर्व, मुंबई.

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..