नवीन लेखन...

आप्पांचा वानप्रस्थाश्रम

आप्पांची सहचारीणी, माई, सोडून गेल्याला दोन महिने झाले होते.
आप्पांनी आपला बेत सर्वांना सांगायचा निश्चय केला.
आप्पा ६७ वर्षांचे होते आणि माई त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान.
त्या गेल्या त्या दिवसापासूनच आप्पांचे मन संसारावरून उडाले.
घर भरलेले होते.
दोन मुलगे, सुना, नातवंड, गांवातच सासर असलेली मुलगी, तिची मुलं, ह्या सर्वांमुळे घरांत नेहमी गजबज असे.
आप्पांचा एक मजली बंगला महालासारखा नसला तरी एवढ्या सर्वांना घरांत मनसोक्त वावर करतां येईल असा होता.
सर्वांना आपल्या आपल्या खोल्या होत्या.
नातवंडानाही दोघां दोघांत एक खोली होती.
घरांतली पहिल्या मजल्यावरची सर्वांत प्रशस्त खोली आप्पांची होती पण आता तीच त्यांना नकोशी झाली होती.
शालिनी उर्फ माईंशिवाय ती खोली त्यांना खायला उठत होती.
शालिनी गेल्यापासून तिथली प्रत्येक वस्तू त्यांना तिची आठवण करून देत असे.
मग आप्पांनी हेतुतः सर्व गोष्टीपासून मन दूर ठेवण्याचे ठरवले.
त्यांच्या मनांत वैराग्य येऊ लागलं.
त्यांचे संबंध सर्वांशी पूर्वीप्रमाणेच होते पण मनाने ते सर्वांना दूर ठेऊ लागले.
दोघे प्रेमळ मुलगे, रोहित आणि ललित, आप्पांशी खूप गप्पा करत.
आप्पांच्या बोलण्याला कधीच ते कटकट समजले नाहीत.
मुलगी शोभना माहेरी आली की प्रथम आप्पांच्याकडे येई.
आप्पांशी मनसोक्त बोलल्यावर ती माईशी बोलत असे.
नातवंडे तर आप्पांवर हक्कच गाजवत.
लहानपणी त्यांचा घोडा करणारी, त्यांच्याबरोबर बागेत जाणारी मुलं आता शाळेचा अभ्यासही आजोबांकडेच करत.
ह्या सर्वांतून आप्पांनी अंग काढून घ्यायचं ठरवलं.
त्यांनी मनाशी ठरवून हे पाश दूर करायला सुरूवात केली.
नातवंडांना अभ्यास करायला आपापल्या आयांकडे जा म्हणून सांगू लागले.
मुलांशी गप्पा करणे टाळू लागले.
शोभना आल्याची चाहूल लागताच बाथरूममध्ये जाऊन बसू लागले.
परिवारापासून मनाने दूर होण्याचे त्यांचे हे मार्ग फार यशस्वी होत नव्हते.
धाकटा नातु हट्ट करून अभ्यासाला त्यांच्याकडेच बसे.
शोभना बाथरूमचे दार ठोठावत, “आप्पा, अहो आप्पा, बरे आहांत ना ! मी आलेय, लवकर बाहेर या.”
असं म्हणून तिथेच थांबे.
मग आप्पांना माघार घेणं भाग पडे.
एका रविवारी आप्पा निवांतपणे वर्तमानपत्र चाळत होते.
रविवारी वर्तमानपत्रांत विविध विषयांवर लेख असतात.
त्या दिवशी कोणीतरी कुठल्यातरी एका वृध्दाश्रमाबद्दल मोठा लेख लिहिला होता.
त्यांत त्या वृध्दाश्रमाची खूप भलावण केली होती व ती पटवूनही दिली होती.
तिथलं वातावरण कसं छान ठेवलं जातं.
वृध्दांचा दिवस मजेत जावा म्हणून किती छान सोयी केल्या आहेत, ह्याचं वर्णन होतं.
तेथील जेवणाची स्तुती केली होती.
काही आनंदी वृध्दांचा गृप फोटोही होता.
वृध्दाश्रमाचा, तिथल्या स्वतंत्र खोलीचा फोटोही होता.
वृध्दांच्या सुरक्षिततेसाठी आवारांत कॅमेरे लावले होते.
शब्दांमधून वृध्दाश्रमाचे अतिशय छान चित्र रेखाटले होते.
लेखकाने शेवटी म्हटले होते की हा वृध्दाश्रम वाटतच नाही तर ही सहलीला आलेली ज्येष्ठ मंडळी आहेत, असं वाटतं.
परदेशांमधे असे वृध्दाश्रम बरेच असतात.
आपल्याकडेही आले, तर वृध्द घरांत रहाण्यापेक्षा इथे येऊन रहाणे पसंत करतील.
आप्पांनी तो लेख कितीदा तरी वाचला.
नंतर ते वर्तमानपत्र त्यांनी आपल्या कपाटांतच ठेऊन दिलं.
त्यांच्या विचारांना त्या लेखाने गती दिली होती.
त्यातला वानप्रस्थाश्रम शब्द त्यांच्या मनांत घोळू लागला.
आपलंही वय वानप्रस्थाश्रम घेण्याचच आहे, हे त्यांना पटलं.
त्यांनी पुढील आठवड्यात वृध्दाश्रमाच्या संचालकाकडून अधिक माहिती मिळवली.
आपल्यासाठी स्वतंत्र खोली मिळू शकेल कां, हे विचारून घेतलं.
किती पैसे कसे कसे भरावे लागतात, इतर नियम काय, हे सर्व समजून घेतलं.
आप्पानी त्या वृध्दाश्रमांत रहायला जायचा निश्चय केला.
संसारात राहून विरक्तीची स्वप्ने पहाणे अशक्य आहे.
शालिनी संसारातून निघून गेली होती आता त्यांनी विरक्त व्हायला हवं होतं व त्यासाठी अशाच जागी जाऊन रहायला पाहिजे होतं.
आता फक्त हे मुलांना सांगायचं बाकी होतं.
एक दिवस रात्रीच जेवण झाल्यावर आप्पांनी रोहित, ललित आणि सूनांना बोलावले व आपण ठरवलेला वानप्रस्थाश्रमाचा बेत सांगितला.
सर्वांनाच तो बेत ऐकून धक्का बसला.
रोहित सांवरला आणि म्हणाला, “आप्पा, कां चेष्टा करताय आमची ? मला माहित आहे, तुम्हाला वृध्दाश्रमात एक दिवस देखील चैन पडणार नाही.”
आप्पा म्हणाले, “ही चेष्टा मुळीच नाही. मी निश्चय केलाय. माझं संचालकांशी बोलणं झालंय. तारीखही ठरवलीय.”
ललित म्हणाला, “आप्पा, पण कां जाणार तुम्ही वृध्दाश्रमांत ? इथे कुणी कांही बोललं कां ?”
दोन्ही सूनांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.
मोठी म्हणाली, “आप्पा, आम्ही दोघी तुम्हांला आमचे वडिलच मानतो.
आमचं कांही चुकलं असेल तर कान धरा पण असे जाऊ नका.”
धाकटी म्हणाली, “आप्पा, मी तुम्हाला जाऊच देणार नाही.
आम्हाला आणि आमच्या मुलांना पोरकं करून जाऊ नका.
माई आमच्या आईसारख्या.
त्यांना परमेश्वराने नेलं.
आमचा नाईलाज झाला.
आता तुम्ही असं सोडून जाऊ नका.”
त्यानंतर आप्पांचा बेत घरांत सर्वांना कळला.
शोभना, नातवंड, ह्या सर्वांनी रडून झालं, आप्पांना शपथा घालून झालं पण आप्पांचा निश्चय बदलला नाही.
‘एका वयानंतर, विशेषतः साथीदार गेल्यावर, दुसऱ्याने स्वेच्छेने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे’, ह्या आपल्या मतावर ते ठाम राहिले.
अनेक पर्याय त्यांना सुचवले पण त्यांनी ते नाकारले.
मग रोहित आणि ललित गुपचूप त्या वृध्दाश्रमाची पहाणी करून आले.
वृध्दाश्रम चांगला होता.
संचालक तरूण होता व स्वभावाने छान होता.
त्यांनी आप्पांना निरोप द्यायची तयारी सुरू केली.
आप्पांनी तिथे काय काय बरोबर न्यावं, याची यादीच केली.
नाईलाजाने कां होईना सर्वांनीच आप्पांना आनंदाने निरोप द्यायचा ठरवले.
जायच्या दोन दिवस आधी घरांतच मोठा निरोप समारंभही केला.
आप्पांचे एकुलते एक मित्र भैय्यासाहेब वर्तक यांनाही त्या दिवशी बोलावलं.
समारोप करतांना भैय्यासाहेब म्हणाले, “आप्पाच्या निश्चयाला सलाम.
हे कांही त्याच्यासाठी सोपं नाही.
तुमच्यासारखं प्रेमळ कुटुंब असतांना आणि कसलीच उणीव नसतांना त्याने असं ठरवलं, हे कठीण आहे.
त्याच्या वृध्दाश्रमांतील निवासासाठी मी आपणां सर्वांतर्फे त्याला शुभेच्छा देतो.”
आप्पांचेही डोळे पाणावले पण त्यानंतर दोन दिवसांनी ते नव्या मुक्कामाला जायला निघालेच.
रोहित व ललित त्यांना वृध्दाश्रमांत सोडून आले.
तो वृध्दाश्रम खरंच चांगला होता.
सगळं वेळच्या वेळेवर मिळे.
सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व ठराविक वेळी तयार असेच पण कांही कारणाने एखाद्याला नंतर जेवायचे असेल तर तशीही सोय असे.
एकत्र जेवलांत तर पंगतीचा आणि संगतीचा लाभ मिळे.
चहाचंही तेच.
एखाद्या वृध्दाला चहाची तल्लफ मधेच आली तरी त्याला केव्हांही गरम चहा मिळे.
आप्पा पहिले दोन दिवस स्वतःच्या खोलीबाहेर पडलेच नाहीत.
त्यांना सर्व खोलीतच हवं त्यावेळी मिळालं.
ते चांगलं होतं, नांव ठेवायला जागा नव्हती तरीही आप्पांना सूनबाईच्या हातच्या घरच्या चहाची आठवण झालीच.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा बाहेर आले.
आश्रमातच एक बाग होती.
तिथे फिरायला गेले.
संचालकही त्यांच्याबरोबर होता.
तो आप्पांना म्हणाला, “आप्पा, ही बाग आमचेच सर्व सदस्य सांभाळतात हं.
तसा एक माळी येतो दोन तासांसाठी पण झाडे लावण्याचे, जोपासण्याचे काम अनेकांचे आहे.”
आप्पा म्हणाले, “वा ! म्हणजे इथे वेळ चांगला जात असेल त्यांचा !”
संचालक म्हणाला, “हो, तर ! कोठले झाड कोणाचे, हे सर्वांना ठाऊक आहे.”
आप्पांना तेवढ्यांत एका झाडावर सुंदर गुलाब फुललेले दिसले.
आप्पा उत्सफूर्ततेने म्हणाले, “अरे व्वा ! काश्मिरी गुलाब वाटतोय ! ह्या झाडाला संभाळणं कठीण असतं.”
संचालक म्हणाला, “ते मालिनीकाकीच झाड आहे.
ती मुलासारखी काळजी घेते झाडाची.
कोणीही फुलाला हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद आहे त्यांची.”
आप्पांना आठवण झाली, त्या लेखांत स्पष्ट म्हटलं होतं की वृध्दाश्रमात स्त्री-पुरूष दोन्ही सदस्य होऊ शकतात.
त्यामुळे कुणा बाईंचं नाव ऐकून त्यांना धक्का बसला नाही.
ते म्हणाले, “अहो, बरोबरच आहे त्यांचं.
फुलं झाडावरच छान दिसतात.
देवाला तर एखाद फुलंही पुरतं.”
संचालक मानेनेच समोर खूण करत म्हणाला, “त्या पहा मालिनीकाकी इकडेच येताहेत.”
आप्पांना समोरून दोन स्त्रिया येतांना दिसल्या.
एक त्यांच्या वयाच्या होत्या.
दुसऱ्या तरूण असून वृध्दाश्रमांत कां असाव्यात, असा प्रश्न आप्पांना पडला.
तरी त्यांच्या मनाने ठरवलं की त्याच हा गुलाब जोपासणाऱ्या मालिनीकाकी असाव्यात.
त्या जवळ येतांच संचालकाने दोघींची आप्पाना ओळख करून दिली.
आप्पांचा अंदाज अचूक ठरला होता.
ती तरूण वाटणारी स्त्रीच मालिनी होती.
दुसऱ्या होत्या शांतामावशी.
संचालक म्हणाला, “हे आप्पा.
मालिनीकाकी आप्पा तुमच्या गुलाबाची खूप स्तुती करताहेत.”
त्या दिवसापासूनच आप्पांची आणि मालिनीकाकींची पत्रिका जुळली.
त्या दूर गेल्यावर आप्पांनी विचारलं, “ह्या एवढ्या तरूण वाटतात आणि त्या इथे कशा ?”
संचालक हंसला आणि म्हणाला, “आप्पा नुकताच त्यांचा एकसष्टावा वाढदिवस आम्ही इथे साजरा केला.
त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थाईक झालेला आहे.
त्यांचे यजमान गेल्याला आता दीड वर्ष झालं.
मुलगा जेमतेम वडिलांच्या क्रियाकर्मासाठी आला.
जायच्या आधी आईची इथे सोय करून दिली व वडिलांचा फ्लॅट विकून टाकला.
आई कांहीच बोलली नाही.
तिला त्याच्याबरोबर अमेरीकेत जायचं नव्हतं.
तिने इथे रहाणं पसंत केलं.”
आप्पा म्हणाले, “इथे आनंदात दिसतात त्या.”
संचालक म्हणाला, “आप्पा, ज्याचा स्वभावच आनंदी असतो, तो कुठेही, अगदी तुरुंगातही, आनंदी रहातो.
आमच्या ह्या वृध्दाश्रमांत सुध्दा कांहीजण आहेत जे कशांतच आनंद मानत नाहीत.”
त्यानंतर मालिनीकाकींची व आप्पांची रोजच भेट होऊ लागली.
आप्पा पंगतीबरोबर जेवू लागले.
तिथे मालिनीकाकी वाढायचं काम करत.
आप्पांना जरा आग्रह जास्तच होई.
संध्याकाळी बागेत भेट होई.
गप्पा होत.
सर्वांचा कांही एकत्र कार्यक्रम असला तर मालिनीकाकी गाणीही गात.
मालिनीकाकी वृध्दाश्रमांतील सर्वांशीच आपुलकीने वागत पण नकळत आप्पांविषयी आपुलकी जास्त वाटू लागली खरी.
परस्परांना वाटणाऱ्या आपुलकीचं रूपांतर प्रेमांत व्हायला वेळ लागला नाही.
हे लक्षांत आल्यावर प्रथम दोघांनीही परस्परांपासून लांब रहायचा प्रयत्न केला पण तो अजिबात यशस्वी झाला नाही.
मग दोघांनीही हे उतारवयांतल प्रेम मान्य केलं.
कधीकधी शांताबाईंना गुंगारा देऊन मालिनी आप्पांना बागेत एकटीच भेटू लागली.
आप्पा आता तिला मालिनी म्हणू लागले होते.
आप्पांनीही अशाच एका क्षणी आपले मन मोकळे केले व मालिनीनेही लाजत लाजत संमती दर्शवली.
मग दोघं मिळून पुढचे विचार करू लागली.
रिलेशनशिप वगैरे दोघांनाही मान्य नव्हतेच, त्यामुळे त्यांनी विवाह करायचा ठरवले.
मालिनीला कांहीच अडचण नव्हती.
तिचा मुलगा विवाहाला येणार नाही पण आक्षेप मात्र घेईल, असं त्यांना वाटत होतं.
संचालकांनी एक दिवस विवाह नोंदणी अधिकाऱ्याला तिथे बोलावले व आप्पांचा आणि मालिनीचा नोंदणी पध्दतीने विवाह झाला.
सर्वांना संचालकाने खास जेवण दिले त्या दिवशी.
आता आप्पांपुढे मोठा प्रश्न होता.
वानप्रस्थाच्या गोष्टी करून ते इथे आले होते आणि आता विवाह करून मुलांना तोंड कसे दाखवायचे ?
मुले स्वीकारतील कां आपला हा विवाह की रागावतील ?
आपल्याला रहायला घरही हवे आहे.
शेवटी जे होईल ते होईल, आपण मालिनीला घेऊन घरी तर जायचेच असे त्यांनी ठरवले.
टॅक्सी बंगल्याजवळ आली तर त्यांना बंगल्यासमोर मांडव दिसला.
आप्पांना आश्चर्य वाटले, “मधेच हा मांडव कसला ? मुंज आहे की काय माझ्या नातवाची ? मला नाही कळवले ते ?”
तीं दोघं टॅक्सीतून उतरली तर स्वागताला सगळं कुटुंबच सामोरं आलं.
आप्पानी विचारले, “रोहित, हा मांडव कसला ?”
सगळे कोरसमधे म्हणाले, “आप्पा, तुमच्या लग्नाचा !”
रोहित म्हणाला, “आप्पा, तुम्ही आम्हाला कळवलं नाहीत पण आम्हांला संचालक सर्व माहिती देत होता.”
ललित म्हणाला, “आप्पा आणि आई, हो आईच ! आईला आम्ही ‘माई’ म्हणायचो, तुम्हांला आतां ‘आई’ म्हणणार.
तर आप्पा आणि आई, तुम्ही नोंदणी पध्दतीने विवाह केलात, त्यामुळे लग्नांत मिरवतां नाही आलं, म्हणून सुना ती हौस फेडून घेणार आहेत.”
धाकटी सून म्हणाली, “ईश्श, तुमचं आपलं काहीतरीच !”
मोठ्या सुनेने तेवढ्यांत आप्पांचे व मालिनीचे पाय धुतले.
मग दुपारी सुमूहुर्तावर मंडपात गुरूजींनी मंत्रघोषांत त्यांच लग्न लावलं.
जेवण झाल्यावर दिवाणखान्यांत सर्व जमले.
ललितने एका प्रोजेक्टरवरून पडद्यावर सर्वांना एक व्हीडीओ दाखवणार असल्याचं जाहिर केलं.
व्हीडीओ सुरू झाला.
त्यांत वृध्दाश्रमाचे आवार दिसू लागले आणि क्रमशः आप्पांचा आणि मालिनीबाईंच्या आश्रमांतील कांही भेटींचीही चलच्चित्रे दिसू लागली. मालिनी लाजेने चूर झाली.
त्यांचा नोंदणी पध्दतीने झालेला विवाहही पडद्यावर दिसला.
रोहित म्हणाला, “आई, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे.”
थोड्याच वेळांत मालिनीचा अमेरिकेतील मुलगा व सून पडद्यावर आले.
मुलगा म्हणाला, “आई, खूप खूप अभिनंदन.
आम्ही नाही येऊ शकलो गडबडींत पण आता लवकरच नक्की येणार तुम्हांला दोघांना भेटायला.
नाहीतर आप्पा, कांही महिन्यासाठी तुम्हीच इथे या ना आईला घेऊन.”
आप्पांच्या आणि मालिनीच्या डोळ्यांत एवढे आनंदाश्रु दाटले होते की त्यांना पडद्यावरचं कांही दिसतचं नव्हतं.

*- अरविंद खानोलकर.*
२४.१२.२०२०
वि.सू. – ही कथा, त्यांतील पात्रे व प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत.
साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..