नवीन लेखन...

आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.

तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.

थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.

एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.

एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, “बाळ, नाव काय तुझं…?”

मी नाव बोललो

कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?

मी पुन्हा बोललो

त्या हसत हसत बोलल्या “अच्छा . छान आहे नाव”

त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, “डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?” मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, “नाही ओ आजी”. का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, “काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा”

हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.

घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, “आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील”

मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.

दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.

संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.

मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, “आजी काय करताय हे ?”

त्या हसल्या आणि बोलल्या…बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.

कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.

त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.

कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.

जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या “आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू… मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो….साहेब होशील मोठा तू ”

मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.

पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.

मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.

मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, “इथल्या आजी कुठे आहेत ?” त्याने मला पाहिलं आणि बोलला, “अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.

मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.

अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!

आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..