नवीन लेखन...

चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी

Smita Patil

मृत्यू हे ऐकमेव अटळ सत्य मान्य करूनही काही व्यक्तींचे नसणे हे अविश्वसनीय असते. म्हणजे आम्हाला ती व्यक्ती आता हयात नाही हे पचविणे जड जाते. मानविय संवेदना आणि जाणीवा सर्वत्र सारख्याच असतात त्याला वंश, वर्ण, देश, भाषा, लिंग याचा अडसर येत नाही. मानवी मनाचे उभे आडवे धागे ऐकमेकात बहुतेक वेळेला घट्ट विणले जातात. मग कधीतरी एखादा आघात असा होतो की धाग्यांची ही वीण उस्कटू लागते. जगातील सर्वच साहित्यात अशा नात्यांना केंद्री ठेवून लेखकांनी साहित्यीक रचना केल्या आहेत. नाटक आणि चित्रपटातही मग अशा रचनांचा वापर मोजक्याच लेखक–दिग्दर्शकांनी केला आहे. साहित्य हे अक्षरधन असल्यामुळे लेखकाला आपल्या संवेदना पाहिज्या तितक्या विस्ताराने मांडता येतात. चित्रपट वा नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे कथा कादंबरीची पटकथा तयार करावी लागते. नाटक ज्या रंगभूमिवर सादर होते तिलाही जागेच्या क्षेत्रफळाची मर्यादा असल्यामुळे सर्व भिस्त अभिनेते आणि दमदार संवाद या वरच अवलंबून असते. नाटक संवादाने उलगडत जाते तर चित्रपटाचा कॅनव्हास मात्र प्रचंड मोठा असतो. पण या माध्यामात सर्वकाही दृष्याद्वारे सांगावे लागते. मनाची घालमेल, घुसमट, ओढ, प्रेम, राग वगैरे शब्दांद्वारे रंगवून सांगता येतो मात्र हे सर्व पडद्यावर दाखविताना धांदल उडते. कसबी दिग्दर्शकाला यासाठी अनेकदा प्रतिमांचा वापर करावा लागतो. अनेकदा या प्रतिमा जीवंत हाडामासाच्या रूपातही आपल्याला भेटू शकतात. स्मिता पाटील या पैकी एक.

१९७२ ते १९८६ म्हणजे अवघी १४ वर्षे. हा एखाद्या कलावंतासाठी हा काळ खूपच लहान ठरतो मात्र स्मिताने ही सर्व वर्षे व्यापून टाकली. स्मिता ही एक अशी अभिनेत्री होती जिने आमच्या आकांक्षा पार वरच्या थराला नेऊन ठेवल्या. या क्षेत्रात समजुतदारपणा खूप आभावानेच आढळून येतो. स्मितामध्ये तो मोठ्या प्रमाणात होता. सत्तरच्या दशकात समातंर सिनेमाची चळवळ जोमात होती. मी पाहिलेला स्मिताचा पहिला चित्रपट “सामना”. केवळ एक दृष्य. नंतर बघितला तो श्याम बेनेगलचा “निशांत”. स्मिताचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहीला प्रवेश. या चित्रपटाची सुरूवात एका नि:शब्द मोतांज दृष्याने होते आणि स्मिताच्या संवादाने ही शांतता भंग पावते. संपूर्ण चित्रपटात ६ ते ७ दृष्य अहेत स्मिताचे. या दृष्यांतुन तिने अगतिकता, चीड, घुसमट, संताप, प्रेम सर्व काही साकारले. पंडीत सत्यदेव दुबेनी अगदी मोजकेच संवाद तिच्यासाठी लिहीले.. स्मिता हे संवाद तोंडाने बोलायची व न लिहलेले संवाद डोळ्यांनी….हे अजब कसब मला आभावानेच इतर कलावंतात आढळले. “मंथन” चित्रपटात तर संवाद जवळपास नहीतच. पण तिच्या बिंदू या व्यक्तीरेखेच्या देहबोलीने ही कसर भरून काढली. १९७७ मध्ये हंसा वाडकर यांच्या जीवनावर बेतलेला “भूमिका” हा श्याम बेनेगल यांचा चित्रपट आला.  स्मिताचा तिसऱ्या वर्षातला ६ वा चित्रपट. या चित्रपटाने स्मिताला राष्ट्रीय पूरस्कार मिळवून दिला. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचे झाकलेले वा अनावृत्त देहदर्शन बघणाऱ्या प्रेक्षकानां स्मिताच्या अभिनयाने चारी मुंड्या चित केले.

आमच्या संस्कृतीत स्त्रीयानां देवत्व बहाल केले आहे. नवरात्रीत देवीचा अखंड जागर आम्ही करत असतो. तिला आदीशक्ती मानून पूजा करण्यासाठी पुरूष प्रधान सत्तेने उदार मनाने काही दिवस पूजनासाठी बहाल केले आहेत. देवी आणि देवदासी या दोन जात्याच्या पाळू मध्ये तिचे स्वातंत्र्य बंदीस्त केले आहे. स्त्रीचा एक माणूस म्हणून विचार करावा असे मोजकेच पुरूषानां वाटते. तिचा आवाज चार भिंती बाहेर पडणार नाही यांची तजवीज अनेक प्रथा परंपंराद्वारे केली जाते. यामुळे साहित्य वा नाटक चित्रपटामध्ये येणारे स्त्रीचे चित्रणही बहूतांशी असेच. मात्र स्मिताने केलेल्या भूमिका याला छेद देणाऱ्या होत्या.

बहूदा ७८ साल असावे गिरगावच्या साहित्य संघात वामन तावडे लिखित “छिन्न” हे नाटक बघण्याचा योग आला. आयएनटीने हे नाटक रंगभूमिवर आणले होते. सदाशिव अमरापूरकर या नाटकाचे दिग्दर्शक आणि भूमिकेतही होते. दिलीप कुलकर्णी आणि आशालता सोबत स्मिताची महत्वपूर्ण भूमिका यात होती. मला आठवतं पहिल्या अकांत शाळकरी पोर असणारी शालू आणि दुसऱ्या अकांत मनस्वी अव्यक्त प्रेम करणारी शालू. नाटकात स्त्री संवेदनाचे घालमेल करणारे नाट्य नाटककाराने अप्रतिम सादर केले होते. सर्वच कलावंताच्या अभिनयाने हे नाटक नटले होते. मी पहिल्यांदा रंगभूमीवर स्मिताला बघितले ते या नाटकात.  नंतर मात्र  ती चित्रपटातच स्थिरावली. पडद्यावरील स्मिताची अवघी देहबोली तर थेट भिडणारी…डोळ्यातुनच संवाद अंगावर येऊन आदाळायचे. स्मिता अभिनय करणारी नटीबिटी होती असे कधी वाटायचे नाही. पडद्यावरचा तिचा वावर अगदी सहज. प्रत्येक संवेदनशील मनाचा आर्त हुंकार म्हणजे स्मिता..

एकाच वेळी समातंर आणि मुख्य प्रवाहातल्या चित्रपटातील स्मिताचा वावर अगदी सहज असायचा. “जैत रे जैत मधील” चिंधी आणि “गमन” मधील खैरून हुसेन अगदी दोन टोकाच्या व्यक्तीरेखा. एक निसर्गाच्या खडकाळ मातीतले फुलणारे वनवासी फुल तर दुसरे मातीच्या चार भिंतीआड नजर लावून वाट पहात बसलेली उदास बेगम… “सर्वसाक्षी” मधील मराठमोळी सुजाता आणि “मिर्च मसाला” मधील मिरची सारखीच तिखट सोनबाई…….”आक्रोश” मधील नागी आणि “चक्र” मधील अम्मा… “बाजार” मधील नजमा…..”मंडी” मधील झिनत…या सर्व स्त्रीया म्हणजे समाज जीवनातील प्रखर वास्तव…पिचलेल्या, शोषीत….पुरूषी वर्चस्वाच्या विळख्यात जखडलेल्या…. या सर्व स्त्रीयांच्चा दबलेला आवाज म्हणजे स्मिता….

वृत्तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनय क्षमता ओळखून तिला १९७५ मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. पहिल्याच चित्रपटातील तिच्या  अभिनयाचे कौतुक झाले. मग मा़त्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.१९७०-८० च्या  दशकात समांतर चित्रपटांची लाट होती. समाजातील अनेक प्रश्नानां डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनत होते. स्मिता म्हणजे जणूकाही आपल्‍या मनातली एक भावना आहे, असे त्याकाळीच्या अनेक स्त्रीयानां मना पासून वाटत असे. स्मिता आपल्या अभिनयामुळे वयापेक्षा अधिक मोठी होत गेली. ‘शक्ती’, ‘नमकहलाल’ हे तिचे व्यावसायिक चित्रपटही सुप‍रहिट झाले. फ्रान्समध्येला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा चक्क महोत्सव भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान फक्त स्मिताला मिळाला.

मुळात स्मिता एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आली असल्यामुळे  तिला सामाजिक प्रश्नांविषयी कळकळ होती. त्यामुळे स्त्रीप्रधान व्यक्तीरेखा अत्यंत समर्थपणे ती साकारीत असे. ‘अर्थ’मधील कविता सान्याल, सामनातील कमळी, अर्धसत्य मधील ज्योत्सना, ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन…..या सर्व वास्तवातील जीवंत व्यक्तीरेखा…स्मितामुळे या कधीच बेगडी वाटल्या नाहीत. स्मिता किंवा तिच्या सारख्या अभिनेत्रीच्या सर्व भूमिका बघतानां प्रेक्षक मनावर काही परीणाम खरोखरच होत असेल का? हा प्रश्न मला आजही पडतो. स्वत:ची अशी एक ठोस भूमिका घेणारी स्त्री आजही आम्हाला आमच्या घरात नको असते, ती शेजारच्या घरात असेल तर आम्ही कौतूक करणार. ही मानसिकता इतकी रूजलेली आहे की यातुन बाहेर पडण्यासाठी आम्ही कोणतेच बदल स्वत:मध्ये करण्यास तयार नसतो.

स्मिता समातंर चित्रपटातील सर्वच दिग्दर्शकाची पहिली पसंत होती मात्र  हे करत असताना ती चक्क व्यावसायिक चित्रपटात तितक्याच ताकदीने आली. दिल-ए-नादान, नमक हलाल, शक्ती, घुंगरू, हादसा, आज की आवाज, पेट प्यार और पाप, गुलामी, आखीर क्यूँ?, अमृत, दिलवाला अशा अनेक मेनस्ट्रीम मधल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने  दरारा निर्माण केला. खरे तर मेनस्ट्रीम मधील चित्रपटाच्या नायिका बऱ्याचदा वास्तविक जीवनातील स्त्रीयां पासून कोसे लांब असणाऱ्या पण स्मिताने याही नायिकेना नवीन चेहरा दिला. तिच्यातल्या अभिनेत्रीमध्ये आम्ही आमच्याच जवळच्या चरीत्राचे प्रितीबिंब बघत होतो…ती आम्हाला कधीच कल्पनेतील स्त्री वाटलीच नाही. प्रेक्षकानां अशी जाण देणे हे तिचे चित्रपट क्षेत्रातील महत्वाचे योगदान आहे. स्मिता मला माझ्याच घरातली, अंगणातली, बैठकीतली, बेडरूम मधली सोबती वाटायची. खूप आश्वासक, दृढ आणि ठाम. स्मिता आत आणि बाहेर सारखीच. चित्रपटसृष्टी असो की वैयक्तिक ती तिच्या मुद्यावर ठाम असे.

स्मिताच्या वैयक्तीक जीवनात राज बब्बर या विवाहित अभिनेत्याचा प्रवेश मात्र खळबळजनक होता. खरे तर चित्रपटातील व्यक्तीरेखा साकार करणारे अभिनेते वा अभिनेत्री जेव्हा सेलेब्रेटी बनतात तेव्हा प्रेक्षक आपल्या अनेक अपेक्षांचे गाठोडे त्यांच्यावर लादत असतात. आता हे हे योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा असू शकतो. गमंत म्हणजे त्यांचे व्यक्तीगत आयुष्यही आमच्या कल्पने नुसार असावे अशी एक सुप्त इच्छा आमच्या मनात असते मग त्याला तडा गेला की आम्ही कडवट प्रतिक्रिया देऊ लागतो. आजही आमच्या समाजातील अनेक जाती समूहात मुलींना कौमार्य चाचणी द्यावी लागते. ती जर त्यात नापास झाली तर जाती बाहेर काढली जाते. यात आम्हाला काही वावगे वाटते नाही कारण ती प्रथा आहे चालत आलेली परंपंरा आहे. म्हणून पुरूषांनी असे काही केले की आम्हाला ते फारसे  खळबळजनक वाटत नाही.

प्रतिक बब्बर हा स्मिता आणि राज यांचा मुलगा. त्याला बघितले की हमखास स्मिताच आठवते. राजकारणी वडील आणि समाजसेविका आई अशा दुहेरी संस्कारातुन स्मिताचा पिंड घडत गेला. स्मिताचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते.  दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे. मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले.  वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्‍याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५ मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. पहिल्‍याच चित्रपटातील त्यांच्‍या अभिनयाचे कौतुक झाले. त्‍यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

१९७०-८० च्या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली. समाजातील अनेक प्रश्‍नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले. मुळात स्मिता या एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्‍यामुळे त्यांना सामाजिक प्रश्‍नांविषयी कळवळा होता.  स्मिता यांनी स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्‍यामुळे ‘मिर्च मसाला’मधील सोनबाई, ‘अर्थ’मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली. मराठीतील ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणूकाही आपल्‍या मनातली एक भावना आहे,  असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटत असे.. ‘शक्‍ती’, ‘नमकहलाल’ हे व्‍यावसायिक चित्रपटही सुप‍रहिट झाले. श्‍याम बेनेगल, रमेश सिप्‍पी, बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्‍दर्शकांना स्मिता या आवडत्या अभिनेत्री होत्या. ‘चक्र’मधील अम्मा ह्या भूमिकेबद्दल अभिनयासाठी स्मिता यांना ‘सुवर्णकमळ’ मिळाले होते.

केतन मेहताचा “मिर्च मसाला’’ हा मला वलेल्या स्मिताच्या अनेक चित्रपटापैकी एक. यात स्मिताची अत्यंत प्रभावी भूमिका आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या एका प्रसंगात गावातल्या सर्व स्त्रीया एका वाड्यात सुरक्षिततेसाठी स्वत:ला बंद करून घेतात. सुभेदार (नसरूद्दीन शहा) आपल्या शस्त्रसज्ज गावगुंडाच्या मदतीने या वाड्यावर चाल करून येतो. तो वाड्याचा भला मोठा दिंडी दरवाजा लाकडी ओंडक्याच्या साह्याने तोडतो व आत प्रवेश करतो. आत जिकडे तिकडे लाल मिरच्या पोत्यात भरून ठेवलेले साठे असतात. या सर्व स्त्रीयाना मदत करणारा अबू मिया(ओम पूरी) यात मारला जातो. मगरूर सुभेदार आत प्रवेश करतो आणि अचानक आतील स्त्रिया त्याच्या तोंडावर लाल तिखटाचे पोते रिकामे करतात…या पार्श्वभूमिवर हातात विळी घेतलेली सोनबाई  (स्मिता) डोळ्याने अंगार ओकत सूभेदाराजवळ येऊन उभी राहते… आणि चित्रपट संपतो. एकूणात स्त्रियाच्या जीवनात मिर्च मसाला चूली सोबत कायम जोडलेला आहे….हे जळजळीत तिखट व्यंग स्मिताने अप्रतिम साकारले आहे……यात मुक्तीचा मार्ग स्वत: सुभेदारानेच दार तोडून खुला केलाय. सरजांमशाहीला ग्रामीण परिवेषातील एक सामान्य स्त्री धक्का देऊ शकते इतका आत्मविश्वास या व्यक्तीरेखेने नक्कीच दिला आहे.

दूरदर्शन वरील वृत्तनिवेदिका म्हणून सुरू झालेला स्मिताचा प्रवास एक समर्थ अभिनेत्रीच्या पदा पर्यंत येऊन पोहचला. स्मिता पाटील यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच स्मिता या कोमात गेल्या होत्या. १३ डिसेंबर १९८६ रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी स्मिताने या जगाचा निरोप घेतला. स्मिताला जाऊन आज ३२ वर्षे होत आहेत परंतु चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री कोण असा प्रश्न उपस्थित झाला की आजही स्मिताचे नाव हमखास डोळ्यासमोर येते. स्मिताचे डोळे खूप बोलके होते. तिच्या नजरेत वेगळी चमक होती. जे अनेक संवादातुन साधता येत नसे ते ती फक्त डोळ्याच्या भाषेतुन प्रेक्षका पर्यंत सहज पोहचवित असे विलक्षण अभिनय, सुंदर डोळे, अतिशय हुशार आणि सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिताला आजही विसरणे शक्य नाही.  शबाना आझमी, दिप्ती नवल या तिच्या समकालीन आजही­ तिच्या आठवणीने व्याकूळ होतात. भरपूर आयुष्य अनेकाना लाभते पण त्यातला खूप मोठा भाग निरर्थक असतो. स्मिताला खूप कमी आयुष्य लाभले पण तिने त्याचे सार्थक केले.

……………………आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन.

— दासू भगत

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..