नवीन लेखन...

अगतिक (भयकथा)

यंदाच्या वर्षी पाऊस पाणी दरसालापेक्षा चांगलं आलेलं. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघे आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमाने शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह तिच्या हालचालीत जाणवत होता कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या दीड च वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याचवेळी घरची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता. मेहनती बायको, सोन्यासारखा मुलगा आणि मोत्याने लगडलेलं शिवार त्याच्या डोळ्यात तरळत होतं. रोहिणी सरल्या. मिरगाचं आभाळ गरजू लागलं. धबाबा बरसू लागलं. त्यांचं खोपटं लहानसं तरीही आटोपशीर होतं. पण यंदा घरच्या लगबगीने त्याला खोपटं साकारायला सवडच मिळाली नाही आणि मालकीची जमीन नजरेआड केली तर तोंडचा घास तोंडाजवळ येईपातूर मागं जायचा अशी परस्थिती आलेली. सावित्री त्याला सतत धीर देत असायची. पावसाळा सुरू झाला. झोपडीच्या कडेने आतल्या बाजूला पाणी गळायला सुरुवात झाली. पाऊस हा हा म्हणता कधी मोठा व्हायचा आणि रिमझिम सरी कधी मुसळधार कोसळू लागायच्या कळायचं देखील नाही.

आज सकाळी सूर्यदेवाने दर्शनही दिलं नव्हतं. आकाशात मळभ दाटून आलं होतं. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उदासपणा भरून राहिला होता. आज काहीही करून तिला शेतात भात लावायचा होता. शेजारपाजाऱ्यांना आणि लांबच्या मामा-मावश्याना कधीच सांगावा धाडलेला. भाताच्या लावणीची रोपं तयार होती. आज ती घरातून लवकरच निघालेली. तांबडं फुटायच्या आतच तिची न्ह्यारी तयार झाली. सुखदेव पण सर्व आवरून तयार झाला. तो इरलं आणि काठी घेऊन शेताकडे रवाना झाला. ती मागाहून जाणार होती. कान्होबाला तिने कडेवर घेतलं एका हातात शिदोरी घेतली आणि शेताकडे निघाली.

लागलीच पावसाची रिपरिप सुरु झाली. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ झाकोळून गेलं. डोंगरमाथ्यावर विजा चमकू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लांबवरचे मामा-मावशी पावसाचा रागरंग बघून आलेच नाहीत. शेजारणींपैकी ज्या आल्या त्याही लवकर घरी जायला निघाल्या. पाऊस अशा भयानक रुपात चाल करून येत होता की सर्वच घाबरून घरात बसले होते. सुखदेव सुद्धा झालेली थोडीफार पेरणी करून घरी जायला निघाला. इकडे सावित्री शेतात पोहोचली. दोघांची चुकामुक झाली. एव्हाना सुखदेवही घरी येऊन पोचला. तो दारात सावित्रीची वाट पाहात होता. शेतात कोणीच नव्हतं. आज तिला नेहमीसारखी झोळी बांधून कान्होबाला त्यात झुलवत ठेवता आलं नाही. त्याला जवळच झाडापाशी उभं करून ती ती ढासळलेला बंधारा नीट करू लागली.दोनेक घटका झाल्या नाही तोच पावसाचा जोर वाढला. डोईवरलं इरलं सावरत ती कान्होबाकडे धावली. त्याला उचलून घेत मनोमन पावसाळा शिव्या घालू लागली.

आता तिथे थांबणं अशक्य होतं. सुखदेव कुठेच दिसत नव्हता. म्हणजे तो घरी गेला असेल अशी तिची खात्री पटली. पाऊस वाढत चालला होता. एका इरल्यात ती आणि बाळ राहू शकत नव्हते म्हणून तिने इरलं हातात धरून चालायला सुरुवात केली. पावसाचा कहर झाला. ती एका घळीच्या पांदीत झाडाच्या आडोशाला थांबली. घळ जरा खोलगट होती. तिच्या वरून मोठालं चिंचेचं झाड त्याचा पसारा सावरून उभं होतं. ती व बाळ पूर्ण भिजले होते. पाऊस ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हळूहळू पांदीत पाणी वाढू लागले. गुढघ्यापर्यंत…. कमरेपर्यंत…. नंतर नंतर तर तिच्या खांद्यापर्यंत पाणी आलं. बाळ हातात असल्याने तिला इतर कसली हालचाल देखील करता येत नव्हती. नंतर पाणी तिच्या नाकातोंडात जाऊ लागले.

काय करावे तिला कळेना. कान्होबाला पायाखाली घेतले तर? क्षणभर असला अघोरी विचार तिच्या मनात येऊन गेला. तिला स्वतःचीच लाज वाटली. पण सध्यातरी याशिवाय दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता. बाळ गेले तर ती दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकत होती. पण ती मेली तर पर्यायाने बाळाचाही मृत्यू झाला असता. दुसऱ्याच क्षणी तिने झट्दिशी बाळाला पायाशी घेतले आणि त्यावर चढून मान वर केली. दोन चार तासांनी पाणी ओसरलं तसं तिने बाळाला छातीशी धरून हंबरडा फोडला. त्याचं ते मृत शरीर कवटाळून ती विलाप करू लागली. परंतु मन घट्ट करून तिने त्याला त्याच झाडाच्या बुंध्याशी पुरून टाकले आणि जड पावलांनी घराकडे निघाली.

एखाद्या जिवंत प्रेतासारखी सावित्री घरी आली. तिचा अवतार भयानक दिसत होता. दारात सुखदेव तिची वाटच पाहत होता. तिच्या हातात बाळ नाहीसं पाहून त्यालाही शंका आली. त्याने त्याबद्दल विचारताच तिने टाहो फोडला आणि त्याला घडलेली हकीगत सांगितली. तिच्या या निर्णयाचं त्याला आश्चर्य वाटलं पण झाल्या प्रकाराबद्दल आता पश्र्चाताप करून उपयोग नव्हता. त्याला ही गोष्ट पटली. परंतु सावित्री स्वतःला दोषी समजत होती. स्वतःच्याच बाळाचा आपण जीव घेतला या भावनेनं ती पछाडली होती. यातून तिला बाहेर काढणं गरजेचं होतं. त्याने कसंबसं तिला शांत केलं.

जे झालं ते झालं असं समजून दोघे पूर्वीप्रमाणे आयुष्य घालवू लागले. त्या महाकाय पुराने त्यांचं शेत आणि घर तर उध्वस्त केलंच पण भरला संसारही ओरबाडून नेला. कान्होबा शिवाय घर भकास दिसू लागलं. सावित्रीला तिच्या अक्षम्य गुन्ह्यांचं शल्य नेहमी सलत असायचं. जेवणखाण, वेणीफणी यांची तिला शुद्ध नसायची. कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिला रात्रीची शांत झोपदेखील यायची नाही. चुकून लागलीच तर कान्होबाचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज तिच्या कानात घुमायचा. त्याच्या जाण्यानंतरही तिने अट्टाहासाने त्याचा झुला घरात तसाच टांगून ठेवला होता. केव्हातरी मध्यरात्री तो आपसूकच पुढेमागे झुलायचा. क्वचित त्यातून कान्होबाचे बाळसेदार पायही दिसायचे.

सुखदेव मात्र त्याच्या नित्यकर्मात व्यग्र होता. तो एक बाप तर होताच पण एक नवरा आणि त्या अगोदरही एक पुरुष होता. नवरा या नात्याने त्याने सावित्रीला सावरलं, धीर दिला. पण त्याच्यातल्या पुरुषाची भूक शांतावणं गरजेचं होतं आणि तेच कान्होबाच्या आठवणी विसरायला कारणीभूत ठरलं असतं. शेवटी त्याच्यातला पुरुष नवऱ्या पेक्षा वरचढ ठरला. तरीही सावित्रीच्या मनाला यातना होतील असं कोणतंही कृत्य त्याच्या हातून घडणार नव्हतं. त्याचं मन यासाठी तयार होत नव्हतं पण कसंही करून सावित्रीला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं आणि त्याने ते मनावर घेतलं.
काही दिवसांतच सावित्रीला पुन्हा कोरड्या उलट्या सुरु झाल्या आणि सुखदेवला तो दुसऱ्यांदा बाप होणार असल्याची बातमी मिळाली. तो खूप खुश झाला. आता तरी सावित्री त्या घटनेला पूर्णपणे विसरेल अशी त्याची खात्री पटली. आता तो तिची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागला. यथावकाश सावित्री बाळंतीण झाली. या खेपेलाही मुलगाच झाला. बाळ बाळंतीण सुखरूप होते. सावित्री आता बऱ्यापैकी सावरली होती. माणसात आली होती. सुखदेवने मनोमन देवाला हात जोडले.

चार माणसांच्या उपस्थितीत बाळाचं बारसं करायचं ठरलं. बारशाचा दिवस उजाडला. घर सजवलं. माणसं जमली.
कुणी गोविंद घ्या…. कुणी गोपाळ घ्या….
कुणी सादेव घ्या…. कुणी म्हादेव घ्या….
बायकांच्या हसण्या खिदळण्याचे आवाज घुमू लागले. पाळणा झाला.
“कुर्रर्रर्रर्र….. बाळाचं नाव…..”
बाळाचं नाव ठेवायला वाकलेली बाळाची आत्या बाळापाशी गेली, “काय बरं ठेवायचं नाव लबाडाचं….हा… काय ठेऊया बरं…”
तोच इकडे तिकडे पाहणारा बाळ तिच्याकडे मान फिरून बोबड्या बोलाने म्हणाला,”कानोबा”.

अगतिक – मराठी भयकथा – YouTube

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखिका अश्विनी चव्हाण ह्यांनी लिहिलेला हा लेख

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..