नवीन लेखन...

आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचं व्रत

आटपाट नगर होतं. तिथं एक मराठी माणूस उपाहारगृह चालवत होता. सुरुवातीला अतिशय चांगले खाद्यपदार्थ आणि चांगली सेवा दिल्याने त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला. पण हे यश डोक्यात गेले आणि हळूहळू पदार्थाँची गुणवत्ता आणि सेवेचा दर्जा घसरु लागला. जवळपास इतर काही सोय नसल्याने ग्राहक कुरकुर करुनसुध्दा येतच होते. त्यामुळे तो आणखीनच शेफारला. उर्मटपणा वागण्या बोलण्यातही डोकावू लागला.
कालांतराने तिथे इतर तयार खाद्यपदार्थांची दुकाने व उपाहारगृहे सुरु झाली. ग्राहकांना पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे ग्राहक या माणसाच्या उपाहारगृहात फिरकेनासे झाले. पूर्वीचे सारे वैभव लयास गेले. मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले.
देवी म्हणाली,“बाई गं, तुझा नवरा जेव्हा मनापासून व्यवसाय करत होता, ग्राहकांना संतुष्ट ठेवत होता तेव्हा मी त्याच्यावर प्रसन्न होते. पण जेव्हा त्याने ग्राहकांना गृहीत धरायला सुरुवात केली, त्यांचा अपमान करायला सुरुवात केली तेव्हा मला ते आवडले नाही. ग्राहक हा देव म्हणजे नारायणाचेच रुप आहे त्याचा अपमान मला कसा सहन होईल?”
यावर बायको म्हणाली,“हे देवी, मी तुला शरण आले आहे. कृपा करुन यावर उपाय सांग.”
त्यावर देवी म्हणाली,“उपाय नीट ऐक आणि नवर्‍याला समजावून सांग. त्याला म्हणावं उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. ग्राहकसेवेला प्राधान्य दे. त्याला संतुष्ट ठेव. मक्तेदारी फार काळ टिकत नसते. स्पर्धात्मक युगात काळाबरोबर बदलावं लागतं. जे बदलत नाहीत ते टिकत नाहीत. कितीही यश मिळालं तरी पाय जमिनीवरच असू देत. तुमच्या शेजारचा उपाहारगृहवाला बघ. त्याला नोटा मोजायलाहि फुरसत नाही तरी कटींग चहा घेणार्‍यालाहीतो व्यवस्थित वागवतो. तुझ्या नवर्‍याच्या उपाहारगृहासारखंच मुंबईला एक प्रसिध्द उपाहारगृह होतं. आज ते आहे पण फक्त नावापुरतं. पुण्याच्या एका प्रसिध्द व्यापार्‍याने सुरुवातीला हीच चूक केली होती, पण त्याला कुणीतरी आधुनिक व्रत सांगितलं आणि तेव्हापासून त्याने वागणूक सुधारली. त्यामुळे आता त्याने सगळीकडे शाखासुध्दा काढल्यात शिवाय परदेशातही माल पाठवायला सुरुवात केलीय. पदार्थ सगळेच बनवतात पण तुमच्या विशिष्ट दर्जामुळे तुमची ओळख बनते. हाच नियम थोड्याफार फरकाने सर्व उत्पादने किंवा सेवेला लागू आहे. तुमचा व्यवसाय हा तुमचा ब्रॅंड बनेल असे पहा, मी प्रसन्न व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करता तेव्हा ती हमखास चांगली होते हे तुलाही माहित आहेच. साधे तुझ्या घरातील उदाहरण द्यायचे म्हटले तर तू केलेली आमटी सगळेजण किती नावाजतात पण तुझ्या शेजारणीचा स्वयंपाक कसा आहे हे मी सांगायची गरज नाही. याला कारण तुझे सर्व लक्ष त्यावेळी फक्त स्वयंपाकाकडेच असते.

त्याचप्रमाणे व्यवसायाचे ज्ञान मिळवून त्याच्याकडे लक्ष दिले आणि व्यवसायाची पथ्ये पाळली, दर्जाकडे आणि ग्राहकसेवेकडे लक्ष दिले की यश तुमचेच आहे. नुसते मराठी माणसे धंद्यात मागे का असे परीसंवाद भरवून काही होणार नाही.” असे म्हणून देवी अंतर्धान पावली.
जाग आल्यावर बायकोने नवर्‍याला हि हकीकत सांगितली. नवर्‍याच्या लक्षात आपली चूक आली आणि त्याने नव्या जोमाने देवी लक्ष्मीच्या आदेशाप्रमाणे व्यवसायाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच पुन्हा जम बसवला.
ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले.

— कालिदास वांजपे

Avatar
About कालिदास वांजपे 11 Articles
कालिदास वांजपे हे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असून ते वित्तपुरवठा, कायदेशीर कागदपत्रांचे ड्राफ्टिंग आणि कंपनी लॉ या विषयात सल्ला सेवा देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..