नवीन लेखन...

अधिष्ठान

काढून टाका ताई ते चाफ्याचं झाड…पार वठून गेलंया !
घरामागच्या मोकळ्या जागेत, वाढलेलं गवत काढायला आलेले वयस्कर काका म्हणाले.आता काय ते पुन्यांदा फुटणार नाही…उगाच बोडक्या अंगाने उभय झालं कवाधरनं!
गेल्या येळेस तुमाला म्हणलो हुतो मी…ते काय पुन्यांदा फुटायचं नाही.

उगा आळं आडवून ठेवलया. खिडकीतून बघणाऱ्या सासूबाई ऐकतच होत्या…अरे बाबा,तू गेल्या वर्षीपासून म्हणतोयस,आम्ही गेली चार पाच वर्षे झाली तिला सांगतोय…पण ऐकेल तर खरं!त्यांनी फणकाऱ्याने मला सुनावलंच.
ते काढून दुसरं लावलं असतं तर एव्हांना फुलं येतं झाड झालं असतं.पण त्या वठलेल्या झाडाला पाणी घालणाऱ्यास न बोलणंच बरं.उगाच वाद होतात मग…त्या खिडकीपासून बाजूला होत बोलल्या.

वठलंय काका ते झाड,मलाही दिसतंय…कळतंय…पण मुळापासून त्याला काढवत नाही…का कुणास ठाऊक…मला वाटतं ते कधीतरी परत नव्याने फुटणार…पांढरा चाफा नव्याने बहरणार…दादांनी (माझे सासरे) लावलय ते…मला चाफा आवडतो म्हणून!ते अचानक गेले अन् फुलं येतं झाड आपलेआप वठत गेलं.त्यांनीच लावलेले आंबा,जांभूळ जास्वंद, मोगरा जोमात वाढले फळं फुलं ही भरपूर आली/येतात…

ते मला नेहमी म्हणायचे…आंबा जांभूळ काढशील तेंव्हा माझी आठवण काढ बरं…आजोबांनी झाड लावावं आणि मुला नातवंडांनी फळ चाखावीत!
त्यांची आठवण मागच्या बागेत गेलं की येतेच…
पण वठल्या चाफ्यावरुन हात फिरवताना एक उसासा निसटूनच जायचा…
एखादा चाफा लावा दादा मागं! मला फार आवडतो.आणि माझ्या साध्या साध्या इच्छांचा सन्मान करणं,त्यांना जमूनच गेलं होतं.इतके दिवस दोन मुलांचा बाप होतो…आता एका मुलीचा पण बाप आहे मी…!असं म्हणत त्यांनी चाफ्याचे कलम आणून लावले होते.
त्यांनी माझ्या स्त्रीत्वाचा सून,मुलगी,गृहलक्ष्मी म्हणून अनेक मार्गांनी सन्मानच केला.त्यातील एक सन्मान म्हणजे हा चाफा….
साध्या सोप्या रंगगंधाचे ते पंचपाकळीचे फूल
चार चार दिवस झाडावर टवटवीत राहतं.फारशा देखभालीची अपेक्षा न करता.उनपावसात एकलाच ,आपल्यातच मग्न चाफा…पानगळीत भग्नता ही अगदी सहज *सुखदुःखे समकृत्वा* च्या अविर्भावात पेलणारा चाफा,मला फार जवळचा वाटतो.
तुला पुन्हा फुटायचंय…मी चाफ्याला मनोमन बजावायचे.ते चाफ्याचे झाड म्हणजे माझ्या हट्टीपणाची निशाणीच झाले जणू!
जवळपास सात आठ वर्षे,माझ्या उंचीएवढा, तो एकदांडीचा भुंडा चाफा व्रतस्थ योग्यासारखा मोगऱ्याच्या शेजारी उभा होता.ना फांद्या ना पानं…फुलं तर लांबचीच गोष्ट…
आणि…आणि… एक दिवस…मोगऱ्याची फुलं काढताना…
त्या एकदांडीच्या टोकावर…हिरवट पांढुरकं बोंड फुटल्यासारखं जाणवलं….ओंजळीतली मोगऱ्याची फुलं मोगऱ्यावरच टाकून…मी चाफ्या जवळ गेले…अन् विश्वास बसणार नाही…पण अगदी नखाएवढं किरमिजी पालव त्या शेंड्यावरुन डोकावत होतं.माझ्या डोळ्यात पाणीच आलं…माझी आंतरिक इच्छा जाणणाऱ्या त्या चाफ्याच्या ओबडधोबड देहावरुन मी हात फिरवला, परत पानाफुलात बहर रे…!मी अजिजीने त्याच्यावर झुकले.जिथं इतक्या वर्षांची माझी इच्छा त्याला समजली तिथं हा स्पर्शही त्याच्या वठलेल्या देहमनास समजला असणार.फुटू लागलेल्या कोवळ्या पालवाचे बाल्य ते पान हा प्रवास मग हळूहळू घडतच गेला…अजूनही दोन चार पानं त्या वठल्या कुडीस फुटली. अन् थंडीची चाहूल लागली…शिशिराच्या पानगळीत आलेली पानं ही गळून गेली…!
परत सडाफटिंग चाफा आपला एकला उभा! पण आशेचा एक किरण मनात उगवला…दोन तीन पानात फुटला म्हणजे पुन्हा नव्याने फुटणार…संपून गेलेल्या चैतन्यांत नव्याने जागे झालेले चैतन्य, मनाला फार गुंतवते.
मग मात्र त्या चाफ्याच्या वर मी रोजच लक्ष ठेवून राहू लागले.फक्त इतर झाडांबरोबर घातलं गेलेलं पाणी आणि माझ्या मनात खोलवर असलेला चाफ्यावरचा विश्वास… इतक्या भांडवलावर…पाच सहा वर्षांनंतर चाफ्यात हळूहळू नवचैतन्य जागं झालं आणि पानं,फांद्या…चक्क फुलंसुद्धा वर्ष दीडवर्षात येऊ लागली.आताशी चाफा गच्च पानाफुलात बहरता असतो…

हा चाफ्याचा वठणं ते बहरणं प्रवास म्हणजे मला माझा सन्मान च वाटतो….
*तुमच्या इच्छा आकांक्षा,कर्मांना चांगल्या,निर्मळ हेतूंचे अधिष्ठान असेल तर…चराचरात कुठेतरी त्याची नोंद मग आपोआप होत असतेच…आणि कधीतरी इच्छापूर्ती देखील होऊन जाते.* फक्त अधिष्ठान सकारात्मक हवे…
इतकंच…!

-सौ विदुला जोगळेकर
आम्ही साहित्यिक या फेसबुक वरुन…

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..