नवीन लेखन...

अभ्यासिका

साठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत.
त्याच काळात शहरांमध्ये म्युन्सिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करुन अनेक दिग्गज, नामवंत झालेले, मी पुस्तकांतून वाचलेले आहे. आहे त्या परिस्थितीत एकाग्रतेने अभ्यास केल्यावर यश हे मिळतेच.
मी दहावीत असताना सदाशिव पेठेतील छोट्या घरात अभ्यास करणे शक्य नसल्याने शनिवार वाड्यात जाऊन अभ्यास केलेला आहे. त्याकाळी शनिवार वाड्यात जाण्यासाठी प्रवेश मूल्य आकारले जात नव्हते. माझ्यासारखे कित्येकजण झाडाखाली, पायऱ्यांवर, गवतावर, जिथे शांतता व सावली असेल तिथे पुस्तक वाचत बसलेले दिसायचे. यामध्ये काही बाहेरगावाहून पुणं पहायला आलेले दमून भागून निवांत झोपलेले प्रवासीही असायचे.
त्यावेळी हातात २१ अपेक्षित किंवा नवनीतचं गाईड असायचं. दुपार टळून गेल्यावर सायंकाळी मी घराकडे निघत असे. कधी खडकमाळ आळी भागातील शाहू बागेत जाऊन अभ्यास करीत असे. तर कधी लांब जायचा कंटाळा आला तर भारत इतिहास संशोधन मंडळाच्या इमारतीमध्ये एखाद्या जिन्यात बसून पुस्तक वाचत बसे.
काॅलेजला गेल्यावर लायब्ररीत बसून अभ्यास करीत असे. परीक्षा जवळ आली की, मित्राच्या वाड्यातील रुममध्ये चार पाच जण अभ्यासासाठी जमत असू. रात्री एक वाजला की, झोप अनावर व्हायची. मग लक्ष्मी रोडला अंबादास हाॅटेलवर जाऊन आम्ही चहा मारुन येत असू तर कधी रिगलला जाऊन इराणी चहा पिऊन परतत असू. सकाळी लवकर जाग येण्यासाठी माझा मित्र एक शक्कल लढवायचा, मोरीमध्ये एक पातेले नळाखाली उलटं ठेवायचा. नळ चालू ठेवल्यामुळे पहाटे पाणी आलं की, पाण्याच्या आवाजाने आम्हा सर्वांना जाग येत असे.
कधी आम्ही मित्र, काॅलेजच्या होस्टेलवर राहणाऱ्या मित्राकडे अभ्यासाला जमायचो. अशावेळी मात्र अभ्यास कमी, गप्पाच अधिक होत असत. मी कधी सहकारनगरला वैद्य नावाच्या मित्राकडे, तर कधी सुनील क्षीरसागर नावाच्या गोखलेनगर मधील मित्राकडे अभ्यासाला जात असे. काॅलेज झालं आणि एकत्र बसून अभ्यास करण्याची मौज काळाच्या ओघात नाहीशी झाली.. दरम्यान वीस वर्षांचा कालावधी निघून गेल्यावर अभ्यास, शिकवणी यात आमूलाग्र बदल झाले. प्रसिद्ध क्लासेस बंद झाले व चौका-चौकात क्लासेसच्या पाट्या दिसू लागल्या. त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या फोटोंसह फ्लेक्स झळकू लागले.
स्पर्धा परीक्षांचं महत्त्व वाढू लागलं. पुण्यामधून या परीक्षा देण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यांतील, राज्यातील मुला-मुलींचा ओघ सुरु झाला. त्यांच्यासाठी अनेक अॅकडमी सुरु झाल्या. साहजिकच त्यांना अभ्यास करण्यासाठी निवांत जागेची आवश्यकता भासू लागली.
काही समाजसेवी संस्थांनी अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु केल्या. ते पाहून ज्यांच्या मालकीचे मोठे हाॅल होते, त्यांनी एक व्यवसाय म्हणून अभ्यासिका सुरु केल्या. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनवार पेठ, कसबा पेठ, सहकारनगर, अशा ठिकाणी अभ्यासिकांचं पेव फुटलं. या व्यवसायात स्पर्धा वाढल्यानं इतरांपेक्षा आमची अभ्यासिका कशी वेगळी आहे, हे कळण्यासाठी रस्त्यावरील भिंतींवर पोस्टर्स दिसू लागली. मराठी व इंग्रजी भाषेत वैशिष्ट्ये लिहून विद्यार्थ्यांना आकर्षित करणे सुरु झाले.
अभ्यासिकांना काहींनी नावं योग्य दिली, काहींनी नाविन्यपूर्ण म्हणून वाट्टेल ती दिली. भगीरथ, ध्यास, गुरू, ध्रुव, विजयपथ अशी विषयाला साजेशी वाटली. ग्रिफीन, स्टडी हब, स्पर्श, रिडर्स क्लब, माय मराठी, शिवराय ही जरा वेगळी वाटली.
यांच्या सुविधा पहायला गेलं तर ही अभ्यासिका आहे की लाॅज? हेच कळत नाही. एसी, नाॅन-एसी ही लाॅजची सुविधा असते. मोफत वायफाय. कुलींग वाॅटर सुविधा. मोबाईल चार्जिंगची सुविधा, म्हणजे वाचनापेक्षा मोबाईल महत्त्वाचा. आरामदायी बैठक व्यवस्था, म्हणजे डुलकीही काढता येईल. स्वतंत्र कंपार्टमेंट, म्हणजे पूर्ण एकांत. चर्चा करण्यासाठी डिस्कशन रूम. सर्व मासिके व वर्तमानपत्रांची सुविधा. एका जाहिरातीत लिहिलं होतं, ‘Night free’ या सुविधेचा अर्थ काय लावायचा? ‘चोवीस तास चालू’ हे समजू शकतं, पण आपण काय लिहितो हे सुद्धा यांना कळत नाही. सर्वच जाहिरातीत एक मजकूर लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे ‘प्रवेश फी नाही, डिपाॅझीट नाही’ भाडे फक्त नऊशे रुपये.
कोरोनाच्या काळात सर्व अभ्यासिका रिकाम्या होत्या, आता हळूहळू भरु लागल्या आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला लागले आहेत. त्यांच्या परीक्षेच्या यशाची जसे त्यांचे पालक वाट पहातात, तशीच मी देखील पहातो आहे…. सर्व अभ्यासू विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
– सुरेश नावडकर ७-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..