नवीन लेखन...

आमचंही – ‘खमंग आणि खुशखुशीत’

मी खाण्याचा भोक्ता आहे. एका महात्म्याने जगण्यासाठी खाणारे आणि खाण्यासाठी जगणारे अशी माणसांची वर्गवारी केली होती. मी दुसऱ्या प्रकारात मोडणारा. खाणं म्हणजे मला जीव की प्राण. घरी पत्नीला आग्रह करुन वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी पिच्छा पुरविणे आणि बाहेर हॉटेल्समधलं, (प्रसंगी रस्त्यावरचंही) खाणं चवीने फस्त करणे हा माझा खाक्या. अगदी बालवयातच माझ्यात ही खवैय्येगिरीची आवड जोपासली गेली. वयोमानानुसार जिभेचे चोचले वाढतच गेले. आता खाण्याची क्वान्टिटी कमी झाली आहे. मात्र क्वालिटीची ओढ अबाधित आहे. कुठे काय मिळतं आणि कुठे कशावर ताव मारायचा याचे ठोकताळे मनात पक्के रुजलेले आहेत. त्या विशिष्ट ठिकाणी जाणं झालं की मी काळवेळ न बघता तिथल्या रुचकर पदार्थांवर ताव मारुनच पुढे सरकतो. गेली कित्येक वर्षे माझ्या या आवडीच्या सवयीत खंड पडलेला नाही.

लहानपणी परळच्या आमच्या आर.ए.एम. भट हायस्कूल समोर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असे. मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर त्याच्या टोपलीतल्या आणि गाडीतल्या खाण्यांवर ताव मारण्याची कला मी बालवयातच आत्मसात करुन घेतली. अर्थात घरच्यांनी रोज आणा दोन आणे हातावर ठेवून या छंदाला खतपाणीच घातलं.

त्या फेरीवाल्यांत एक रगडा विकणारा भैय्या होता. त्याच्याकडे चवीने जिरवलेल्या रगडयाची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. पांढऱ्या वटाण्याच्या घट्ट उसळीत कांदा, टोमॅटो. कोथिंबिर मिसळून तो भैय्या मस्त रगडा बनवित असे. वर अर्थातच वेगवेगळ्या मसाल्यांचं मिश्रण खुमारी वाढविण्यास सिद्ध असे. असा रगडा आजकाल पॅटीस बरोबर वगैरे देतात.

पण आमच्या लहानपणी हा रगडा आम्ही नुसताच खात असू. एका पुरचुंडीत वाळलेल्या पानाचा चमचा बनवून या रगडयाचं सेवन करावं लागे. या रगडयाने माझ्या आयुष्यात खाद्यसंस्कृतीचा श्रीगणेशा केला. बाहेरच्या पदार्थांचा आस्वाद लुटण्याची सवय नंतर आयुष्यभर अंगी जडली.

आज आठवणींत रमताना परळच्या नाक्यानाक्यावरची हॉटेल्स आणि तिथले खाद्यपदार्थ डोळ्यांसमोर येतात. परळला आम्ही वाडिया हॉस्पिटलसमोर रहात असू. थोडं पुढे कोपऱ्यावर एक मेडिको डायनिंग नावाची गुजराथी खानावळ होती. परळच्या हॉस्पिटल्समध्ये शिकणारे मेडिकलचे विद्यार्थी या खानावळीत भोजनासाठी आलेले मी कधी पाहिले नाहीत. मात्र त्या खानावळवाल्याला तू तुझ्या खानावळीचं नाव मेडिको डायनिंग का ठेवलंस हे विचारण्याच्या मी कधी भानगडीत पडलो नाही. या खानावळीत डबा आणण्याचे काम घरी माझ्यावर सोपविले जाई. डबा नेणाऱ्या गिऱ्हाईकांना थेट भटारखाना गाठावा लागे. तिथे मोठमोठाल्या टोपांत अस्सल गुजराथी चवीच्या भाज्या शिजवून तयार असत. पूर्णतः एकजीव झालेल्या डाळीची गोडी आमटी एका भल्या मोठ्या टोपात चूलीवर खदखदत असे. बाजूलाच दुसऱ्या चुलीवर एका मोठ्या तव्यावर पाचसहा फुलके दिसत. त्यातला एकेक फुलका तिथल्या आचारी लोखडाच्या लांब सळीने उचलून थेट चूलीच्या रखरखत्या विस्तवात सोडीत असे. तिथे तो फुलका फुटबॉलसारखा फुलून आला की त्याच सळीने शेजारच्या ताटात फेकला जात असे. त्या गरम फुलक्यावर उलटया वाटीने तूप (की तेल? ) फासायचं काम खानावळीतल्या नवशिक्या पोरांवर सोपवलं जाई. असे गरमागरम सातआठ फुलके डब्यात पडले की कधी एकदा घरी जाऊन ते जेवण फस्त करतो या आशेने तोंडात लाळ जमा होई. मेडिको डायनिंगने जोपासलेली गुजराथी थाळीची आवड नंतर मला गिरगाव चौपाटीवरल्या क्रीम सेंटरच्या थाळीपर्यंतचा प्रवास घडवून गेली. विशेष प्रसंगी चर्चगेटच्या पुरोहित कडे चांदीच्या ताटात गुजराथी थाळी जेवणे हा एक शिरस्ता बनून गेला.

परळच्या मुख्य नाक्यावरुन उजवीकडे दादरच्या दिशेने वळलं की चिकीवाल्यांची दुकानं लागत. रंगीबेरंगी लुंग्या नेसलेले उघडेबंब भैय्ये तिथे चिकी बनविण्यात दंग दिसत. थोडया शेजारीच खमण ढोकळा, पापडी, शेव विकणाऱ्या गुजराथ्याचं दुकानं होतं. अधून मधून या चविष्ट पदार्थांच्या समाचाराला मी जात असे. परळच्या मुख्य नाक्यावर आणि मागे
के.ई.एम. हॉस्पिटलसमोर इराणी हॉटेल्स होती. मुख्य नाक्यावरला फिरदोशी रेस्टॉरंटमध्ये मी प्रथम अंड्याच्या आमलेटचा स्वाद चाखला.

आमच्या घरी शुद्ध शाकाहारी भोजन शिजवलं जाई. इराण्याकडून आमलेट आणून खाण्याची सवलत आईने दिली होती. सोबत अर्थातच पाव मस्काही असे. रुचिपालट म्हणून ब्रूममस्का किंवा बनमस्का आणला जाई. खरी लज्जत येई ती फिरदोशीकडल्या पूडिंगला. तसलं पूडिंग पुन्हा कधी मला कुठे सापडलं नाही.

फिरदोशी इराण्याच्या समोरच एक बेकरी होती. या बेकरीत हरतऱ्हेची बिस्किटं मिळत. त्या बेकरीत भल्या सकाळी ब्रूम पाव खरिदण्यासाठी एकच झुंबड उडे. चर्चमधून घरी परतणारे ख्रिश्चन बांधव तिथे पाव खरिदण्यासाठी येत. परळमध्ये मांसाहारी जेवण पुरविणारी अनेक हॉटेल्स होती. मेडिको डायनिंग शेजारची गावकरांची खानावळ, के.ई.एम.समोरचं साळुंख्यांचे सह्याद्री लंच होम या हॉटेल्सनी मांसाहारी मंडळींना भरभरुन दान दिलं.

परळ, लालबाग ही मुख्यतः कामगारांची वस्ती. या कामगारांना अडीअडचणीला कर्ज देणारे आणि नंतर ते दामदुपटीने वसूल करणारे पठाणही परळला दिसत. या पठाण मंडळींसाठी कराची मुलतानी सारखी हॉटेल्स सज्ज असत. पुढे नॉनव्हेजचा मार्ग अनुसरल्यावर मी या हॉटेल्समध्ये चिकन लेग मसाला आणि नानचाही आस्वाद घेतला.

परळच्या नाक्यावरच सांडू आणि धुपकर यांची मिठाईची दुकानं होती.

राखाडी रंगाचा कोट आणि काळी टोपी घालणारे धूपकर आणि धोतर सदरा घालणारे सांडू मला अजूनही आठवतात. धूपकरांकडला दुधी हलवा अख्ख्या परळचं आकर्षण ठरला होता. छोटयाशा ताटलीतला दुधी हलवा फस्त करुन वर पियुष प्यालं की आत्मा शांत होत असे. धुपकरांच्या समोरच्या फुटपाथवर कुबलांचं मसाल्याचं दुकान होतं. या दुकानार मसाल्याबरोबर लोणचीही मिळत. लिंबाच्या केवळ रसाचं रसलिंबू नावाचं अप्रतिम चवीचं लोणचं त्या काळी बाजारात आलं होतं. वरणभाताबरोबर हे रसलिंबू चाटताना स्वर्ग सात पावलांवर आल्यासारखा भासे.

बऱ्याच वर्षांनी परळच्या बाजाराच्या रस्त्यावर बंगाली मिठाईयाँ अवतरलं. या दुकानातील रसगुल्ला आणि रबडीला परळवासियांनी गौरीशंकर छितरमल या दुसऱ्या दुकानातील मिठाई इतकच आपलंसं करुन घेतलं. आज आम्हाला परळ सोडून पस्तीसचाळीस वर्षे झाली. आता परळला फारसं जाणं होत नाही. मात्र परळच्या मार्गाने जाताना सर्व हॉटेल्स आठवतात आणि सगळ्या खाद्यपदार्थांची चव जिभेवर येते. रात्री कुल्फी विकायला येणारा कुल्फीवाला आठवतो. दुपारी पत्र्याच्या पेटाऱ्यांतून बटर बिस्किटं आणि टोस्ट विकणारा मुसलमान चाचा आठवतो आणि बोरं, करवंद विकाणारी म्हातारीही आठवते. परळमध्ये रुजलेली खाद्यपदार्थांची आवड उत्तरोत्तर वाढतच गेली. नंतर आयुष्यभर मी उत्तमोत्तम खाद्यपदार्थांसाठी अनेक रस्ते पालथे घातले, अनेक नाक्यांशी सलगी केली आणि अनेक ठिकाणांना आपलंसं केलं. खाण्याच्या आवडीमुळे आयुष्याला एक आगळा अर्थ प्राप्त झाला. आयुष्य अधिक रुचकर झालं, रंगतदार झालं.

— सुनील रेगे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..