नवीन लेखन...

जिवंत जीवाश्म

सन १९९४ मधली गोष्ट… ऑस्ट्रेलिआतल्या सिडनीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या, वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील डोंगरदऱ्यांतून काही जणांची भटकंती चालू होती. या भटकंतीदरम्यान, डेनिस नोबल यांना पाइनच्या प्रकारातलं एक अनोळखी सूचिपर्णी झाड आढळलं. वनस्पतिशास्त्राची ओळख असणाऱ्या डेनिस नोबेल यांना, हे झाड कोणत्यातरी अज्ञात जातीचं असल्याची शक्यता वाटली. त्यांनी हे झाड राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणलं. या कर्मचाऱ्यांनी या झाडाच्या पानांचे नमुने, सिडनीच्या ‘रॉयल बॉटॅनिक गार्डन्स’ या वनस्पती उद्यानातील डब्लू.जे.जोन्स या वनस्पतितज्ज्ञाकडे पाठवले. या झाडाचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर हे झाड अरॉकॅरिएसी या, आज अस्तित्वात नसलेल्या कुळातलं असल्याचं स्पष्ट झालं. मुख्य गोष्ट म्हणजे हे कूळ अतिप्राचीन काळातलं होतं. कित्येक कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या कुळातील वनस्पती, नंतरच्या काळात नष्टही झाल्या होत्या. डेनिस नोबेल यांना सापडलेली ही अतिप्राचीन काळातली वनस्पती वोलेमाय पाइन या नावानं ओळखली जाऊ लागली. कालांतरानं या वनस्पतीला ‘वोलेमिआ नोबिलिस’ हे शास्त्रीय नावही दिलं गेलं.

वोलेमाय पाइन हे अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहेत. हे वृक्ष फक्त वेलोमाय राष्ट्रीय उद्यानात आढळले असून, त्यांची एकूण संख्या फक्त साठ इतकीच आहे. हे सर्व वृक्ष, सुमारे दहा चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळात, परंतु चार वेगवेगळ्या ठिकाणी पुंजक्यांच्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. ही सर्व झाडं डोंगरांतल्या खोल घळ्यांमध्ये वसलेली आहेत. हे वेलोमाय पाइन वृक्ष सदाहरित वृक्ष असून, ते चाळीस मीटरची उंची गाठू शकतात. या झाडाच्या खोडाचा व्यास सुमारे सव्वा मीटरपर्यंत असू शकतो. प्रत्येक झाडाच्या खोडाच्या आजूबाजूचा भाग हा, याच वृक्षाच्या खालच्या भागाला धुमारे फुटून, त्यापासून निर्माण झालेल्या नव्या वृक्षांनी व्यापला आहे. त्यामुळे प्रत्येक मूळ झाड हे, अनेक झाडांनी वेढलेलं दिसतं. या मुख्य झाडाच्या खोडाभोवतालच्या इतर खोडांची एकूण संख्या चाळीसपर्यंत असू शकते. या प्रत्येक खोडाचं आयुष्य दीर्घ असून, ते चारशे-साडेचारशे वर्षांपेक्षा अधिक आहे. या झाडांची साल पातळ आणि नाजूक असून ती काळसर तपकिरी रंगाची आहे. हे वृक्ष द्विलिंगाश्रयी असल्यानं, या झाडांचं पुनरुत्पादन एकाच झाडापासून होऊ शकतं. असं असलं तरी प्रत्यक्षात, या झाडांचं पुनरुत्पादन मुख्यतः फुटनातून, म्हणजे मूळ वृक्षाच्या खोडापासून होणाऱ्या अनेक वृक्षांच्या निर्मितीद्वारेच होत असल्याचं दिसून आलं आहे. काही उद्यानांत मुद्दाम लागवड करून, या अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वृक्षांचं जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वोलेमाय पाइन हे वृक्ष ज्या कुळातले आहेत, त्या अरॉकॅरिएसी या कुळातल्या वनस्पती प्राचीन काळी, दक्षिण गोलार्धात मोठ्या प्रमाणात आढळत होत्या. या वनस्पतींचे जीवाश्म दक्षिण गोलार्धात,  द. अमेरिका, अंटार्क्टिका, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिआ, अशा अनेक ठिकाणी सापडले आहेत. हे सर्व जीवाश्म नऊ कोटी ते पंचवीस लाख वर्षांपूर्वीपर्यंतच्या, दीर्घ काळातले आहेत. म्हणजे या कुळाची निर्मिती डायनोसॉर अस्तित्वात असतानाच्या काळात झाली आहे. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर नष्ट झाले, त्या काळात वनस्पतिसृष्टीत मोठे बदल घडून आले. मात्र या बदलातही या वोलेमाय पाइन वृक्षांनी तग धरला. त्यानंतरही ही वनस्पती कोट्यवधी वर्षं अस्तित्वात राहिली. ही वनस्पती सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी नष्ट झाली असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती.

मात्र १९९४ साली डेनिस नोबल यांना लागलेल्या शोधानुसार, हे वृक्ष अजूनही अस्तित्वात असल्याचं स्पष्ट झालं आहे. इतक्या प्राचीन काळातल्या जातीच्या वृक्षांचं, अशाप्रकारे आजही टिकून राहणं, हे एक आश्चर्यच आहे. न्यूयॉर्क बॉटॅनिकल गार्डन या वनस्पती उद्यानातील तज्ज्ञ डेनिस स्टिव्हन्सन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच या वृक्षाचा संपूर्ण जनुकीय आराखडा तयार केला. या आराखड्यावरून या संशोधकांनी, ही वनस्पती आज इतकी दुर्मिळ असण्यामागच्या कारणाचा आणि या वनस्पतीच्या इतिहासाचा शोध घेण्याचाही यशस्वी प्रयत्न केला. डेनिस स्टिव्हन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन, ‘बायो-अर्काइव्ह’ या संकेतस्थळावर प्रकाशनपूर्व स्वरूपात प्रसिद्ध झालं आहे.

डेनिस स्टिव्हन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनासाठी वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील, हे वृक्ष अस्तित्वात असणाऱ्या सर्व ठिकाणांना भेटी देऊन, तिथल्या वोलेमाय पाइन वृक्षांच्या विविध भागांचे नमुने गोळा केले. त्याचबरोबर या संशोधकांनी या वृक्षांचे ऑस्ट्रेलिअन बॉटॅनिकल गार्डन, न्यूयॉर्क बॉटॅनिकल गार्डन, बॉटॅनिकल गार्डन ऑफ पदुआ (इटली), इत्यादी ठिकाणच्या, मुद्दाम लागवड केलेल्या वोलेमाय पाइनचे नमुनेही आपल्या संशोधनासाठी वापरले. डेनिस स्टिव्हन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्व नमुन्यांचं तपशीलवार जनुकीय विश्लेषण केलं व त्यातून या वृक्षांचा जनुकीय आराखडा उभा केला. हा जनुकीय आराखडा वैशिष्ट्यपूर्ण आहे. वोलेमाय पाइनच्या या जनुकीय आराखड्यावरून, त्यात कित्येक कोटी वर्षं बदल झाला नसल्याची शक्यता दिसून येते. मात्र त्याचबरोबर या वनस्पतीच्या जनुकीय आराखड्यात, इंग्रजीत ज्यांना जंपिंग जीन – म्हणजे उड्या मारणारे जनुक – म्हटलं जातं, त्या प्रकारचे जनुक मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत.

हे उड्या मारणारे जनुक, सजीवाच्या जनुकक्रमात एका ठरावीक ठिकाणीच न सापडता, वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. याचं पर्यवसान वनस्पतींत उत्परिवर्तन घडून येण्यात होतं. हे उत्परिवर्तन सजीवाच्या दृष्टीनं काहीवेळा अनुकूल असू शकतं, तर काहीवेळा प्रतिकूल असू शकतं. या उत्परिवर्तनामुळे सजीवाच्या उत्क्रांतिमार्गातही बदल होतो. या उड्या मारणाऱ्या जनुकांनीच, या वोलेमाय पाइन वृक्षांत पुनरुत्पादनाच्या दृष्टीनं प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली असावी. साहजिकच या प्रतिकूल परिस्थितीमुळे या वृक्षांना पुनरुत्पादनासाठी नेहमीचा (परागकणांवर आधारलेला) मार्ग सोडून फुटनाचा मार्ग अवलंबणं, भाग पडलं असावं. त्यामुळे या वृक्षांच्या पुनरुत्पादनावर मर्यादा येऊन, हे वृक्ष दुर्मिळ झाले असावेत. मात्र त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीलाही ते अधिक सक्षमतेनं तोंड देत राहून, दीर्घकाळ टिकून राहू शकले असावेत.

डेनिस स्टिव्हन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनुकीय आराखड्यावरून वोलेमाय पाइनचा इतिहास जाणून घेण्यासाठी, एका विशेष संगणकीय प्रारूपाचा वापर केला. हे प्रारूप एखाद्या सजीवाच्या जनुकीय आराखड्यातील विविध जनुकक्रमांवरून, सजीवाचा पूर्वेतिहास उभा करू शकतं. त्यामुळे या संगणक प्रारूपाद्वारे, या वनस्पतींचं वैपुल्य कोणत्या काळात अधिक असावं व कोणत्या काळात कमी झालं असावं, याचा अंदाज या संशोधकांना बांधता आला. या प्रारूपावरून, सुमारे साठ-सत्तर लाख वर्षांपूर्वी वोलेमाय पाइनची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं, दिसून आलं. या काळात वर्षावनांचं प्रमाण घटलं असल्यामुळे सूचिपर्णी वृक्षांच्या वाढीला मोकळीक मिळाली असावी. त्यानंतरच्या काळात मात्र या वृक्षांच्या जनुकीय रचनेतील, उड्या मारणाऱ्या जनुकांची संख्या वाढत गेली. याचा परिणाम या वृक्षांचं वैपुल्य घटण्यात झाला असावा व हे वैपुल्य सुमारे तीस लाख वर्षांपूर्वी एक-पंचमांशापर्यंत कमी झालं असावं. त्यानंतर या वृक्षांच्या संख्येत किंचितशी वाढ झाली असावी. मात्र सुमारे सव्वा लाख वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगातील शुष्क हवामानात या वृक्षांचं प्रमाण पुनः कमी होऊन, ते आजच्या छोट्या प्रदेशापुरतं मर्यादित झालं असावं.

या अतिप्राचीन वोलेमाय पाइनचा इतिहास हा, उष्ण आणि शुष्क वातावरणात या वृक्षांच्या प्रमाणात घट होत असल्याचं दर्शवतो. आताही हवामान तप्त होत आहे; इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर वणवेही लागत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे, अगदी अल्प संख्येत अस्तित्वात असलेल्या या अतिप्राचीन वृक्षांचं भवितव्य काय असेल, ते सांगता येत नाही. हे वृक्ष आतापर्यंत जगात फक्त चार ठिकाणी आढळले आहेत – आणि तेही अगदी जवळजवळ असणाऱ्या चार ठिकाणी. त्यामुळे या वोलेमाय पाइन वृक्षांचा, इंटरनॅशनल युनिअन फॉर दी कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेनं लुप्तप्राय जाती म्हणून आपल्या ‘लाल यादी’त समावेश केला आहे. ही अतिप्राचीन वोलेमिआ नोबिलिस जाती डायनोसॉर युगाची साक्षीदार आहे. या जातीनं साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळात होऊन गेलेले डायनोसॉर पाहिले आहेत! म्हणूनच इतक्या पुरातन काळात निर्माण झालेले हे वृक्ष एका अर्थी ‘जिवंत जीवाश्म’ ठरले आहेत.

(छायाचित्र सौजन्य – Akerbeltz/Wikimedia / NPWS / Stephen McLoughlin)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..