नवीन लेखन...

आग्री कलेचा मुशाफीर – श्रीकांत तगारे

काही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ते सर्जनशील ठरतात; त्यासाठी पणाला लागते ती प्रयत्नांची काष्ठ, संयम, आणि आपलं लक्ष्य गाठण्याची वृत्ती. त्यातल्या त्यात जर क्षेत्र चित्रपट माध्यमाचं असेल तर थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतात; पण तुम्ही विचार करत असाल की चित्रपटाचा प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार हे मेहनत घेतातच, मग त्यात वेगळं ते काय? यामध्ये अनोखेपण हेच की नवी मुंबईच्या श्रीकांत तगारे या कलाकारानं आग्री भाषेत पहिल्या वहिल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. म्हणजे आग्री भाषेमध्ये “शोले” आणि “दीवार” या सिनेमांचा रिमेक केला. विशेष म्हणजे श्रीकांत तगारे हा मुळत: आग्री भाषिक नाही पण लहानपणापासून सतत आग्री लोकांमध्ये राहिल्यानं ही भाषा त्याला अवगत होती. याबाबत बोलताना श्रीकांत म्हणतो की “महाराष्ट्रामध्ये अनेक भाषांना एक वेगळी गोडी आहे, त्याचा समाज मोठा आहे, पण तितकाच मर्यादित पण आहे, मग अशा भाषिकांसाठी जर त्यांच्या बोलीतून एखादा चित्रपट करुन पाहायला काय हरकत आहे.”

सुरुवातीला तर ही संकल्पना जेव्हा मी माझ्या मित्रमंडळींना आणि सहकलाकारांना सांगितली त्यावेळेला तर माझी चक्क थट्टाच केली. एका अर्थी त्यांचं बरोबर ही होतं, कारण आपल्याकडे जर का अशा दुर्दम्य बोली भाषांमधून चित्रपटांची निर्मिती करायची असेल तर पुढे आर्थिक प्रश्नांचा ही मुद्दा असतोच, पण तरीही हे शिवधनुष्य पेलायचचं यावर श्रीकांत ठाम होता. त्यासाठी त्यांनी अनेक निर्मात्यांशी बोलून चित्रपटाची सहिता आणि कल्पना याबाबत माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन अखेर या चित्रपटाच्या तयारी साठी राजी तर केलेच पण इतर कलाकार जे होते त्यांनाही संपूर्ण वास्तवाची जाणीव करुन दिली; आगरी “शोले”चं रिमेक करताना विशेषत: सर्व कलाकारांकडून शुद्ध आगरी संवाद वदवून घेणं, तसेच चित्रपटामध्ये सफाईदारपणा आणि उत्तम तंत्र ही असलं पाहिजे याकडे श्रीकांतचा कटाक्ष होता; कदाचित या सर्व बाबी जुळून आल्यामुळे त्याचा आगरी शोले अपेक्षेपेक्षा ही जास्तच चालल्याचा श्रीकांत सांगतो. कारण जिथे जिथे आगरी भाषिक वर्ग आहे म्हणजे कोळी वस्ती, मालवण, रायगड सारख्या ठिकाणी किंवा अगदी पुण्यात ही प्रेक्षक फक्त आगरी भाषा ऐकण्यासाठी आणि उत्सुकता म्हणून चित्रपट पहायला यायचे, “यासाठी सोशल नेटवर्कींग साइटचा वापर केल्यानं लोकापर्यंत हा सिनेमा बर्‍यापैकी पोहोचल्याचं श्रीकांत सांगतो. याचप्रकारे आगरी भाषेत “दिवार” सिनेमाचा ही त्यांनी रिमेक केला होता, पण त्या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य सांगता येईल की चित्रपटामध्ये खलनायक किंवा इतर कलाकारांचा मृत्यू दाखवला जात नाही कारण त्या चित्रपटाची विनोदी ढंगानी निर्मिती केल्यामुळे शेवट हा ”Happy Ending” नेच होतो.

चौतीस वय असणार्‍या श्रीकांत तगारेला विविध विषयांचे वाचन करायला आवडते सोबतच विनोदी लेखक-नाटककरांची पुस्तकंही जाणीवपूर्वक वाचायला आवडतात कारण त्यांच्याकडून विनोद निर्मितीची प्रेरणा मिळत जाते. “महाविद्यालयानंतर कोणतीही नोकरी करायची नाही असा ठाम निर्धार केलेला, त्यापेक्षा कला क्षेत्रात येऊन वेगळी वाट चोखाळत नाटकांमध्ये, डबिंग आर्टिस्ट, मिमीक्री किंवा विनोदी कलाकार होण्यासाठीच माझा कल होता आणि निश्चय ही.” “त्यासाठी शिरीष लाटकर यांच्याकडून अभिनयाचं आणि तांत्रिक बाजूंचं मार्गदर्शन घेतलं; व्यावसायिक नाटकांमधून, रंगभूमीवर अभिनयाचे धडे गिरवलेत” यामध्ये “अंधारी यात्रा” सारखं सामाजिक धाटणीचं नाटक असेल किंवा “एक झेप आकाशी” यासारखं नाटक असेल यामुळे माझ्यातला कलाकारही घडत गेला.” असं श्रीकांत म्हणतो. “पोट धरुन हसा” या स्वत:च्या बॅनर अंतर्गत अनेक वर्षांपासून जॉनी रावत यांच्यासह मिमीक्रीचे प्रयोग सुरु आहेत. जे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात होत आहेत. याबरोबरच जिंगल्स आणि जाहिरातींसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम सुरु आहे. भविष्याबाबतच्या योजनेबद्दल विचारले असता श्रीकांत सांगतो की, “अनेक लुप्त होत चाललेल्या भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती करायची आहे, तशी आखणी ही सुरु आहे, कारण आज माझ्याकडून काहीतरी मी योगदान दिलं तरच ह्या भाषा भविष्यात टिकतील ही! सोबतच कॉमेडीमध्ये वैविध्यता आणून सामान्य प्रेक्षकांना ही आपलसं वाटेल अशा विनोदाची निर्मिती करायाची आहे.” खरं तर वेगळी संकल्पना आणि चौकटीबाहेरचा विचार करणार्‍या श्रीकांत तगारेच्या कलात्मक कारकीर्दीसाठी दाद हवी हवीशी वाटते.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

1 Comment on आग्री कलेचा मुशाफीर – श्रीकांत तगारे

  1. Shrikant Tuzya Agri language madhun
    Intertenment Karan , film banavn it’s not easy. Different language Agri Select Karun, Jantechi Intertenment kartos. God bless you. Shree. Proud of you.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..