नवीन लेखन...

प्रेरणा

Q to Q  नांवानी प्रसिध्द झालेल्या ‘कयामत से कयामत ‘  सिनेमासाठी, मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले व उदित नारायण यांनी गायलेले खालील गाणे कॅालेजला जाणाऱ्या मुलांमध्ये खुप प्रसिध्द झाले होते.

पापा कहते है बडा नाम करेगा.
बेटा हमारा ऐसा काम करेगा.
मगर ये तो,कोई ना जाने.
के मेरी मंजिल है कहॅां…..

त्यांत कॅालेजच्या शेवटच्या दिवशी सेंड ॲाफ पार्टी मध्ये हे गाणे म्हणुन , वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे भविष्यासाठी आश्वस्त झालेल्या अमिरखान मध्ये आत्मविश्वास जागृत झालेला दाखवला आहे. हे पण खरेच आहे की  ‘ करीन ती पुर्व ‘सिध्द करायचे ते वयच असते पण त्यामागे कोणाची तरी “प्रेरणा” अत्यावश्यक असते.तेच वय स्वप्न पहायचे असते, पण आपले पुर्व राष्ट्रपती व मिसाईल मॅन,भारत रत्न डॅा एपीजे अब्दुल कलाम म्हणतात तसे” ती स्वप्नच नाहीत, जी झोपेत बघितल्या जातात,खरी स्वप्ने ती असतात जी आपली झोप उडवतात.” बरेच जण इतके आळशी असतात की चाललंय तस चालु द्या ,काही नवीन करायची, काही शिकायची,निदान जे काही करतोय त्यांत सर्वोच्च ध्येय गाठायची धडपड सुध्दा करायला नको असते. त्यांची वृत्ति ’ हम दोनो’ सिनेमातल्या ,साहिर लुधियानवीं नी लिहिलेल्या ,मोहम्मद रफी नी गायलेल्या –

मै जिंदगी का साथ निभाता चला गया.
बरबादियों का जश्न मनाता चला गया ..
जो मिल गया उसी को मुकद्दर समज लिया……

या गाण्या सारखी असते.अर्थात सगळेच काही गांधी, मिसाईल मॅन वा मोदी होऊ शकत नाहीत.भरारी उंच नक्कीच हवी पण अशी नव्हे की अपयश आल्यावर आपण डिप्रेशन मध्ये जाऊन डॅाक्टर कडे जावे लागेल. यश व अपयश यांचा लपंडाव सुरुच असतो त्यामुळे अपयश आल्यास हार मानु नये. ”अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाच्या शिखरावर  पोचु शकत नाहीत “ हेच खरे.

लहान मुल पण थोडा समज येताच नकळत आईचे बाबांचे अनुकरण करायला लागते. मुलांमधे नक्कल  करणे ही जात्याच सवय असते परंतु तसे करता करता आई-वडील त्याचे प्रेरणास्त्रोत बनतात, आई सांगेल ते प्रमाण व नंतर अजुन मोठे झाल्यावर बाबा हे त्याचे आदर्श ( रोल मॅाडेल )बनतात. प्रेरक बनल्यामुळे आईवडीलांवर मोठीच जबाबदारी येते, मुल थोडे मोठे झाल्यावर शाळेत जायला लागल्यावर त्याचे शिक्षक,मॅडम त्याचेसमोर आदर्श अर्थात प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारे बनतात म्हणुन बऱ्याच मुलांना तर मोठे होऊन टिचर बनायचे असते !’ प्रेरणा ‘आणी ‘प्रोत्साहन ‘हे खरे तर पर्यायवाची शब्द झाले पण त्यांचा उपयोग बरेचदा वेगळ्या वेगळ्या अर्थानी होतो. प्रेरणा कोणाकडेतरी बघुन त्याच्या न कळत मिळते, प्रेरकाला ते माहीत असणे आवश्यक नाही याउलट प्रेरणे अनुसार एखादी गरज भागवण्यासाठी वा उद्दिष्ट मिळवण्याकरता जे प्रयत्न केल्या जातात त्यासाठी कोणाकडून जी मदत मिळते ते झाले आपल्याला मिळालेले प्रोत्साहन.माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज ( निकड )असते तेंव्हाच तो ती प्राप्त करण्या करता धडपड करतो म्हणजेच कुठल्याही प्रयत्नांसाठी ‘गरज’ ही पूर्वापेक्षीत ( prerequisite ) असतेच. म्हणुनच तर म्हण आहे ‘गरज ही शोधाची जननी आहे’ . आपण काही काही रासायनिक प्रक्रियां साठी catalyst ( उत्प्रेरक )वापरतो ज्याच्यामुळे ती क्रिया सुलभ रितीने म्हणजे समजा कमी तापमानावर,किंवा कमी वेळात,वगैरे पुर्ण होते.त्याचप्रमाणे एखादी गोष्ट उत्कृष्ट पणे किंवा निश्चीत पणे करायला आपल्या मनाला जी प्रेरणा मिळते ती जीवनांत उत्प्रेरकासारखे काम करते.

एकदा एक व्यापारी कुठलासा व्यापार करत असतो. त्यात निट जम बसत नाही म्हणुन तो कोणच्या तरी कंपनीची एजंसी घेतो .काही काळ बरा जातो पण हवा तसा फायदा होत नाही,मग तो investment market ( गुंतवणुक ) मध्ये मोठी रक्कम गुंतवतो.हवा तसा लाभ (returns )मिळत नाही म्हणुन तो हताश होतो.असाच मरगळलेला बसला असताना त्याला त्याच्या गुरूंची आठवण होते व तो तडक त्यांच्याकडे जातो.त्यांचे कुशल मंगल विचारल्यावर  तो स्वत: च्या धंद्याबद्दल सांगतो  की वेगवेगळे प्रयत्न करुन सुध्दा कशी निराशाजनक स्थिती आली.काय उपाय करावा असे पण विचारतो.गुरू महाराज म्हणतात चल आपण थोडे फिरुन येवु म्हणजे कसे उत्साहीत वाटेल.जाता जाता वाटेत त्यांना एक शेत लागते ज्यांत दुर दुर अंतरावर पाच सहा ठिकाणी मोठमोठ्ठे खड्डे केलेले असतात. ते बघितल्यावर व्यापारी विचारतो की इतके खड्डे कसे काय केले असतील ? त्यावर गुरु म्हणतात शेतकऱ्यानी विहीर खणायसाठी गड्डा केलेला दिसतो आहे पण पाणी लागले नाही म्हणुन दुसरीकडे प्रयत्न केला असावा.असे त्याने पाच सहा ठिकाणी प्रयत्न केले असावेत.शेतकरी मुर्ख असावा,अनेक ठिकाणी पाच सहा फुट खोल जाण्यापेक्षा पहिल्याच जागी, एकाच ठिकाणी वीस पंचवीस फुट खोल गेला असता तर पाणी नक्कीच लागले असते,पैसा अडका कमीच लागुन वेळ पण वाचला असता. गुरु महाराजांना अधिक बोलावेच लागले नाही,व्यापारी समजला की चिकाटीने एकच उद्योग केला असता तर नक्कीच फायदा झाला असता,धरसोड उपयोगाची नाही असे त्यांना दर्शवायचे आहे.नंतर त्याने चिकाटीने व्यापार म्हणजे व्यापार च केला व यशस्वी झाला .गुरूमहाराजांनी न बोलता दिलेला समज हीच त्याचेसाठी सकारात्मक प्रेरणा ठरली.

“प्रेरणा “ एक प्रकारची ‘ प्रबळ ’ शक्ती आहे जिच्यामुळे मनुष्य  अकल्पित काम करू शकतो. मुळत: प्रेरणा सकारात्मक व चार प्रकारांची असते, अंतर्गत प्रेरणा, बाह्य प्रेरणा, भय प्रेरणा , प्रोत्साहन प्रेरणा.क्वचित प्रसंगी प्रेरणा नकारात्मक असु शकते.

अंतर्गत  प्रेरणा  : आपल्याला काही करण्याची / मिळवण्याची भावना मनांतुन उस्फुर्त व  उत्कटतेने  येते व त्यानुसार वाटेल तितके प्रयत्न करून आपण ते मिळवतोच,ही झाली ‘अंतर्गत प्रेरणा’.ही  प्रेरक शक्ती झाली, कारण त्या जिद्दीवर कितीही कष्ट पडो, आपण अडचणींवर मात करतो. उदा- एखादी प्रतियोगी परीक्षा पास करायचे ठरवले तर पुस्तके घेऊ,गाईड घेऊ ,ट्युशन लावु,रात्री रात्री जागु,परिक्षा द्यायला गावाला जावु वगैरे वाटेल ते करु ,कारण आतुन ती इच्छा झाली आहे.

बाह्य  प्रेरणा  : आपल्या बरोबरीचा पण सिनीयर मित्र साधारण आपल्याच बौध्दिक पातळीचा व आर्थिक स्तराचा एखादी परिक्षा पास करतो,चांगला कोर्स करतो, चांगली नोकरी मिळवतो तेव्हा आपण मनाशी खुणगाठ बांधतो की मी पण काही झाले तरी तसे करणारच.ही झाली ‘बाह्य प्रेरणा’.आपली इच्छाशक्ती वाढते व मग अर्जुनाचे जसे माश्याच्या एकाच डोळ्यावर लक्ष केंद्रीत असते तसे आपले एकच लक्ष असते व आपण ते मिळवुन राहातो.

भय  प्रेरणा  : आपण नवीन नवीन पोहायला शिकतो ,बऱ्यापैकी पोहणे जमते,पण प्रथमच उंचावरुन उडी मारुन डाईव्ह घेतो पण खालुन वर यायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो तेव्हा खुप भिती वाटते ,श्वास रोखुन ठेवलेला असतो तरी वाटते आता आपण मेलो मग त्या मनस्थितीत जिवापाड शक्ती लावतो आणी सहज वर येतो.तसे पण हात पाय हलवत राहिलो असतो तरी अनायस वर आलो असतोच पण त्या उत्कट क्षणी आपल्याला एक प्रकारची प्रेरणा आपल्याला जास्तीची शक्ती लावायला भाग पाडते .ती झाली ‘भय प्रेरणा ‘.

प्रोत्साहन  प्रेरणा  : आपण नवीन नवीन सायकल चालवायला शिकत असु. तसे बऱ्या पैकी तोल पण सांभाळता येतो, हे आपल्याला पण जाणवते परंतु सुटे चालवायची हिंमत होत नाही,वाटते आपण पडु. त्यावेळी आपल्याला वडील किंवा भाऊ किंवा मित्र मागुन धीर देतात,उगीचच म्हणतात ( खोटे ! ) अरे मी मागे आहे,किंवा मी धरले आहे पण तेवढ्याने आपला आत्मविश्वास बळावतो व मागे न पाहाता आपण चक्क सायकल चालवत असतो.ही झाली ‘ प्रोत्साहन प्रेरणा ‘.केवळ प्रोत्साहनाने आपली शक्ती वाढलेली असते.

एक गोष्ट कुठेशी वाचलेली आठवते ती अशी- एकदा बऱ्यापैकी मोठा झालेला एक मुलगा आजोबांकडे रेल्वेने एकटा जाण्याचा बाबांपाशी हट्ट करतो.ते समजावतात की थोडा अजुन मोठा झाला की मग जा पण तो ऐकत नाही. शेवटी वडील तयार होतात व त्याला स्टेशनवर सोडायला जातात.त्याचा निरोप घेताना त्याला एक चिठ्ठी देतात व म्हणतात आता तु पण माझे ऐकायचे,ही चिठ्ठी वाटेत उघडायची नाही,पोचल्यावर उघडायची. मुलाला आत्मविश्वास असतोच ,गाडी कधी नव्हे ती खुप लेट होते, अंधार व्हायला लागला तस तसा मुलगा बेचैन व्हायला लागला. आजोबांचे गांव येता येता तो घाबरा घुबरा झाला असतो,आजोबा स्टेशनवर आले असतील नं,नसतील तर काय करावे असा विचार करत होताच तर त्याला बाबांनी दिलेली चिठ्ठी आठवली व त्याने ती शेवटी उघडली.चिठ्ठीत लिहीले होते “ घाबरू नकोस,मी मागच्याच डब्यात आहे “.ही गोष्ट अशासाठी शेअर केली कारण त्यांत चारही प्रकारच्या प्रेरणा दिसुन येतात.अजुन एक गोष्ट म्हणजे ह्यात वडील मुलाला हट्ट न करण्या बद्दल ,काही वेळेपर्यंत ,मन वळवण्याचा प्रयत्न करतात ( कारण हट्टामुळे अडचणीत येण्याची शक्यता होती ) ते झाले नकारात्मक प्रेरणेचे उदाहरण.

अनुकूलन हा माणसाचा स्वभावधर्म च असतो त्यामुळे तो ‘ परिस्थितीप्रमाणे गरजा भागवायचा प्रयत्न करतो’ ( अंथरूण पाहुन पाय पसरतो ) ‘ किंवा ‘गरजांप्रमाणे परिस्थिती बनवायला जातो’ ( नवीन अंथरूण विकत आणतो ).हा स्वप्रेरणेचाच भाग असतो व असे करताना मनुष्य आपल्या गरजांची प्राथमिकता ठरवतो,अर्थात ह्या गरजा प्रत्येकाच्या वैयक्तिक  असतात व त्यांचा क्रम ठरवणे कठीण आहे. तरी सुध्दा गंमत म्हणजे अशा गरजांचा सखोल अभ्यास करुन त्यांना “मुलभुत गरजा  ते आत्मसन्मान /आत्मबोधपर निकड “, अशा क्रमानुसार त्यांना तालिकाबध्द केल्या गेले आहेत.

निकड किंवा गरजा भागवण्याच्या वरील संदर्भात, प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लो यांनी १९५४ मध्ये “मास्लो  सिध्दांत  “ मांडला तो म्हणजे हा की माणसाच्या गरजा ह्या त्याच्या प्राथमिकतेच्या आधारावर पिरॅमिड च्या आकारात उतरंडी मध्ये दर्शवतां येतात.पिरॅमिड च्या तळाशी मुळ ‘भौतीक गरजा’ ( तहान,भुक,वस्त्र ,कामवासना ) असतात.त्यांची पुर्तता झाली की दुसऱ्या  पायरीवर ‘सुरक्षितता’ (निवास,रक्षण ) येते.या दोन पायऱ्यांवर बहुतेक सर्वाधिक माणसे असतात. ह्या गरजा भागल्या की माणसं आवश्यकतेनुसार काम करायला प्रवृत्त होतात. तीसऱ्या पायरीवर येते ’ सामाजीक गरज’ ( कुटुंब,मित्रमंडळी,समाज ) म्हणजे समाजात स्वत:ची ओळख स्थापित करणे,प्रतिष्ठा जपणे .ह्यांत पुर्णता आल्यावर चौथ्या पायरीवर असते एस्टिम नीड ‘आत्मसन्मान’व नोकरी,धंद्यात समाधान.ह्या पायरीपर्यंत येणाऱ्यां माणसांची संख्या कमी असते. ह्या समाधान प्राप्ती नंतर शेवटच्या पायरीवर असते ‘ आत्मबोध’किंवा सेल्फ ॲक्चुअलायझेशन ज्यांना कामाची आंतरिक प्रेरणा असते. पैसा, मानमरातब, सत्ता ह्या बाबींच्या ते पुढे गेले असतात. आईन्स्टाईन ,एडिसन सारखे खुपच कमी लोक ह्या पातळींवर पोचु शकतात .

/आत्मबोध  .\

/आत्मसमाधान.\

/सामाजीक  निकड .\

/सुरक्षा- आवश्यकता. \

/भौतीक  व  शारिरीक  गरजा \

“मास्लो “च्या वरील उतरंडी पिरॅमिड मध्ये विवीध स्तरे दर्शवली आहेत, ज्यांत मनुष्य शक्य होईल तस-तसे खालुन वरती जातो.माणसाच्या मुळ गरजा सगळ्या खालच्या दोन पायरींवरच्या असतात ज्या भागणे आता तितक्याशा कठीण नाहीत परंतु त्यांच्या वरच्या गरजा पुर्ण करायच्या तर विशेष प्रयत्न करावे लागतात.त्यासाठी कोणीतरी प्रोत्साहीत करावे लागते किंवा कुणाकडुन प्रेरणा मिळाली तर ते सोपे जाते.आता प्रेरणा द्यायला कोणी मुद्दाम तर येत नाही  तर बरेचदा ती गुरुंकडुन सहजच मिळते. प्रेरणास्त्रोत बनतील असे गुरु मात्र असायला हवेत.तसे बघितले तर ज्याच्या जवळुन आपण काहीतरी शिकतो,ज्याला बघुन आपण प्रेरीत होतो तो गुरु .

मानवी उत्क्रांतीमधे मनुष्याला प्राणी, पक्षी, जीवजंतु  यांचेकडुन प्रेरणा मिळाली जसे मुंगीकडुन साठवण करणे,प्राण्यांकडुन (कळपात) समुहात राहाणे,पक्ष्यांकडुन( घरटे) घर बनवणे,कमी शक्तीच्या जीवाला भक्ष बनवणे,निसर्गप्रेरीत स्थलांतर करणे वगैरे. त्यांना निसर्गत: अंत:प्रेरणा असते तर माणसाला बुध्दी. प्रेरणा मिळण्याच्या संदर्भात असे सांगतात की त्रिगुणात्मक त्रिमुर्ती( ब्रम्हा,विष्णु,महेश ) श्री दत्तात्रयांनी तर पृथ्वी,सुर्य,चंद्र,आकाश ,वायु व कबुत्तर, …..हत्ती असे काही पक्षी, प्राणी धरुन एकुण चोवीस गुरु केले होते .उदाहरण द्यायचे तर कबुतराचेच बघा -“ एक कबुतराचा जोडा जाळ्यात सापडलेल्या आपल्या पिलांना सोडवायला जावुन स्वत: च जाळ्यात अडकतो , हे पाहुन त्यांना हा धडा मिळाला की कोणावर पण केलेल्या अती प्रेमामुळे आपल्यालाच दु:ख प्राप्त होते “ .ज्यांच्या ज्यांच्या कडुन त्यांना काही शिकतां आले,प्रेरणा मिळाली, त्यांना त्यांनी गुरूच मानले.  श्री दत्तात्रय निर्गुण आणी निराकार अशा ब्रम्हतत्वाची अनुभूती करुन देतात, कैवल्याची  मुर्ती असुन मूर्तिमंत ज्ञान आणी सच्चिदानंदरूप असतात म्हणुन श्री दत्तात्रयांना सर्व गुरुंचा गुरू म्हणुन सद्गगुरू अशी मान्यता आहे.

प्रेरणा देणारे कुठला तरी आदर्श वा एखादे व्यक्तिमत्व च समोर पाहिजे असे आवश्यक नाही.प्रेरणादायी जागा,परिस्थिती सुध्दा पुरते. वैष्णव देवीला जाताना १५-१६ कि मी पायी व चढावावर जावे लागते तिथे सगळे ‘ जय माता दी ‘ म्हणत- म्हणत जात असतात ,ते बघुन सगळ्यांनाच स्फुरण चढते व आपण सुध्दा कसे पोचतो ते कळत पण नाही. नवरात्रात खुप जण नऊ दिवस नुसते पाणी पिऊन उपास करतात,एरवी मात्र कधी थोडीपण भुक धरवत नाही. नुसते दोन शब्द ‘ बक अप,बक अप! ‘ सुध्दा उत्कृष्ट कोटीची प्रेरणा देतात.  तसेच एखादी घटना सुध्दा प्रेरक ठरू शकते. मी मॅट्रीकला असताना सहामाही परिक्षेत मला गणीतात पन्नास पैकी तीन मार्क मिळाले होते.मी इतके कमी मार्क मिळावे इतका ‘ढ ‘ नक्कीच नव्हतो व अभ्यासात रुची नव्हती असे ही नाही.मी त्यावेळी NCC त होतो व त्यावेळचे कमी वय व कमी उंची या उणीवां असुन मी Lanc Corporal झालो होतो.  खेळण्यात जरा जास्त लक्ष होते हे नक्कीच.एकदा रात्री वडील आईशी माझ्याबद्दल हे बोलताना ऐकले की सतीश( म्हणजे मी )इंजीनियरींग वगैरे करु शकेल असे वाटत नाही.त्याला रेल्वेत गार्ड वगैरेच्या पोस्ट साठी अर्ज करायला सांगावे असे वाटते.त्या घटनेचा माझ्यावर काय,कसा परिणाम झाला माहित नाही पण मला मॅट्रीकच्या परिक्षेत सहा विषयांत प्राविण्य मिळुन मी शाळेतुन प्रथम आलो ,नंतर प्रि युनी.ला मेरीट मध्ये येवुन मेरीट स्कॅालरशीप मिळुन पुढे मेरीटमध्ये इंजी.डिग्री पण मिळवु शकलो.अशाच घटना ,सहसा अपयशाच्या, दु:ख, विरहाच्या वगैरे तर बरेचदा माणसाला अकल्पित यशाकडे घेवुन जातात.

कधी कधी तर स्फुरणीय गाणी सुध्दा आवश्यक ती प्रेरणा देतात,जसे-‘ नया दौर ‘सिनेमातले, आशा भोसले यांनी गायलेले-

साथी हात बढाना साथी रे,
एक अकेला थक जायेगा ,
मिलकर बोझ उठाना…………..
एकमेकांशी सहयोग करण्याची प्रेरणा देते.

‘छोटा जवान ‘सिनेमातले ,वसंत देसाई यांचे,महेंद्र कपूर यांनी गायलेले-

माणुसकी च्या शत्रुसंगे ,
युध्द आमुचे सुरू.
जिंकू किंवा मरू……………..

१९६२ च्या चीन युध्दाच्या वेळी याचं स्फुर्तीगीताने त्यावेळी राष्ट्रीय एकात्मकतेची प्रेरणा दिली होती आणी अशी आणखीन बरीच उदाहरणे आहेत.

“प्रेरणा”मग ती कशी कां असेना ,अंतिम परिणाम ‘ आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं,

“स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते .”

— सतीश परांजपे 

4 Comments on प्रेरणा

  1. वेगवेगळ्या समर्पक उदाहरणांनी नटलेला प्रेरणादायी उत्कृष्ट लेख.
    खूप आवडला .
    लेखकाचे अभिनंदन .

  2. वेगवेगळ्या समर्पक उदाहरणांनी नटलेला प्रेरणादायी उत्कृष्ट लेख!
    लेखकाचे अभिनंदन !

  3. सुंदर,असे लेख लिहीण्यास चिंतन,मनन,अभिवाचन अनुभव,व,मांडणी, सर्वच आवशक असते .व समर्पक लेख लिहुन लेखकाने हे उत्तम रित्या साधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..