आपल्या देशात विद्यमान शालेय शिक्षण पद्धती इंग्रजांनी प्रस्तावित केली होती. त्यात वर्गखोलीत बसून पुस्तकी ज्ञान देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यातून त्यांनी त्यांचे राज्यात लावण्यासाठी कारकून घडवले. मात्र पुस्तकाव्यतिरिक्त जगाचे ज्ञान आणि प्रसंगी व्यावहारिक ज्ञान देण्याची कोणतीही व्यवस्था या शिक्षणात नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू सरकारने तीच व्यवस्था पुढे सुरू ठेवली. आजही चार भिंतीच्या आड बसून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तेवढे दिले जाते. व्यावहारिक किंवा पुस्तकाबाहेरील जगाचे ज्ञान देण्याचा कोणताही प्रयत्न झालेला दिसत नाही. ही इंग्रजांनी आखून दिलेली चौकट भेदण्याचा प्रयत्न झालेला दिसत नाही.
मात्र मध्य प्रदेश सरकारने आता ही चौकट मोडण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. मध्य प्रदेश सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने भारतीय रेल्वेच्या अंतर्गत असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ म्हणजेच आय आर सी टी सी या महामंडळाशी सामंजस्य करार केला असून या महामंडळाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या ठिकठिकाणी शैक्षणिक सहली आयोजित केल्या जाणार आहेत असे वृत्त आज एका वृत्तसंस्थेने प्रसारित केले आहे.मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.
आम्ही शाळेत असताना खूप काही शिकलो, पण ते सर्व पुस्तकातून कोंढाणा किल्ल्यावर तानाजी मालुसरे ने लढाई केली आणि किल्ला जिंकला पण आपला देह ठेवला हेच पुस्तकात वाचले. त्यामुळेच या गडाला सिंहगड म्हटले गेले हे देखील आम्ही शिकलो. त्यामुळेच गड आला पण सिंह गेला ही म्हण पडली. मात्र प्रत्यक्षात हा सिंहगड मला वयाच्या ६५ व्या वर्षी बघता आला. तोच प्रकार दिल्लीच्या कुतुब मिनार चा देखील होता. कुतुब मिनार बघण्यासाठी देखील वयाची तिशी ओलांडावी लागली होती. पुस्तकात शिकलेल्या काही जागांबाबत आजही त्या कशा असतील हे बघण्याचे कुतूहल मनात आहे, मात्र त्या ठिकाणी मला जाणे शक्य झालेले नाही.
माझ्यासारख्याला किमान पाच-दहा टक्के तरी जागा बघता आल्या, मात्र आज अनेक विद्यार्थी असेही असतील की त्यांना आयुष्यभरात काही देखील बघायला मिळालेले असू शकत नसेल. तरीही शाळेत आम्ही घोकंपट्टी करत असतो. एकंदरीतच “पुढचे पाठ मागचे सपाट” असा हा प्रकार असतो.
फक्त ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांबद्दलच ही परिस्थिती आहे असे नाही, तर इतरही अनेक बाबी फक्त पुस्तकात शिकवल्या जातात. प्रत्यक्षात त्या कधीही बघितल्या जात नाहीत. आज विज्ञान विषयात वनस्पतीशास्त्रामध्ये विविध वनस्पतींबाबत माहिती दिली जाते, अर्थात ती सर्व कागदावरच असते. शाळेत किंवा महाविद्यालयात शिकलेल्या अनेक वनस्पती विद्यार्थी कधीच बघू शकत नाही. आता कालांतराने हळूहळू काही शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोग होईल अशा प्रकारची वृक्षवल्ली लावायला सुरुवात केली आहे. अर्थात ती फार थोड्या शाळांमध्ये आहे. मागे मी रोटरीचा अध्यक्ष असताना नागपुरात पशुवैद्यक महाविद्यालयात आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथल्या अधिष्ठात्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या उपयोगी होतील अशीच झाडे तुम्ही लावा असा आग्रह धरला होता. मग आम्ही सुद्धा नर्सरीत जाऊन तशा झाडांची रोपे उपलब्ध केली होती आणि त्याचे रीतसर वृक्षारोपण केले होते. माझ्या आठवणीनुसार तेथे आम्ही जवळजवळ २०० वृक्षांचे रोपण केले होते. आजही ते वृक्ष चांगले डौलदार झालेले आहेत. मात्र तिथल्या अधिष्ठात्यांनी जी एक व्हिजन दाखवली, ती आज किती शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांमध्ये असेल हा देखील संशोधनाचा विषय ठरतो.
औद्योगीकरणाबाबत देखील हाच प्रश्न येतो. विद्यार्थ्यांना शाळेत कारखान्यांमध्ये उत्पादन कसे होते हे कागदावर शिकवले जाते. विद्युत निर्मिती केंद्रात बीज कशी तयार होते हे आम्हाला शाळेत शिकवले होते. मात्र नागपूर जवळच कोराडी आणि खापरखेडा ही दोन औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असतानाही शाळेतून तिथे कधीच सहल गेलेली नव्हती. त्यावेळी सहली निघायच्या तर आदासा, धापेवाडा या देवस्थानांमध्ये किंवा मग पवनार, सेवाग्राम येथे. अर्थात या स्थळांचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व नाकारता येत नाही. मात्र त्याशिवाय देखील सर्वंकष ज्ञान विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच द्यावे असा प्रयत्न का केला जात नव्हता, हा खरा कळीचा मुद्दा आहे.
विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करायचा असेल आणि जगातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास प्रत्येक विद्यार्थी सक्षम करायचा असेल तर त्याला केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही. त्यासाठी असे विविध उपक्रम राबवावेच लागतात. मात्र शिक्षक किंवा शाळाचालक ती दृष्टी क्वचितच दाखवतात. मी शाळेत शिकत असताना अनुराधा परांडे नामक आमच्या एक शिक्षिका वेगवेगळ्या प्रयोग करून विद्यार्थ्यांना लिहिते करायच्या. शाळेत मुख्याध्यापक दर आठवड्याला विद्यार्थ्यांना प्रार्थनेनंतर एखादा विषय देऊन बोलते करायचे. त्यातून कोण विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञान वापरणारा आहे आणि कोण विद्यार्थी कल्पनाशक्ती वापरून लिहू शकणारा, किंवा स्वयंस्फूर्तीने बोलू शकणार आहे आहे असे विद्यार्थी त्या ओळखून त्यांना लेखनासाठी किंवा वक्तृत्वासाठी उत्तेजन देत असत. तसे विविध प्रयोग शाळांमध्ये करायला काय हरकत आहे? मात्र हे लक्षात कोण घेणार हाच प्रश्न आहे.
आज २१ व्या शतकात जगाने सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. अशावेळी या प्रगत जगात टिकू शकेल अशी उद्याची पिढी घडवायची असेल तर त्यांना विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी किडे बनवून चालणार नाही. त्यांचा सर्वंकष विकास कसा करता येईल या दृष्टीने नियोजन करायला हवे. तरच पुढची पिढी सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनेल आणि आपला देश जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करू शकेल, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.
अविनाश पाठक
दै. बित्तंबातमी ठाणे च्या अंकात प्रसिद्ध होणाऱ्या सहज सुचलं म्हणून या स्तंभात दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित झालेला लेख
अविनाश पाठक यांनी लिहिलेले इतर सर्व लेख वाचण्यासाठी Litterateur Avinash Pathak या त्यांच्या फेसबुक पेजला फॉलो करा. त्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा…


Leave a Reply