नवीन लेखन...

१७ माईल ड्राईव्ह

एके दिवशी आदित्य (माझा मुलगा) म्हणाला, “आपण १७ माईल ड्राईव्ह ” ला जाऊ. मग आम्ही एका रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निघालो.

‘१७ माईल ड्राईव्ह’ हा कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळून जाणारा रस्ता आहे. याचे वैशिष्ट्य असे की, तो लांबवर पसरलेला, वळणावळणाने जाणारा असून त्याच्या एका बाजूला फेसाळणारा समुद्र. कधी स्पष्ट, स्वच्छ दिसणारा तर कधी आडव्या, वेड्या वाकड्या, उंच झाडांच्या मागून लपंडाव खेळणारा. समुद्रकिनाऱ्यावर अतिशय शुभ्र वाळू (snow white sand). किनारेदेखील सरळरेषेत नाहीत. कधी ते जमिनीच्या आत घुसलेले. कधी जमिनीचा चिंचोळा भाग समुद्रात घुसलेला.

Monterery हे या मार्गावरील एक महत्त्वाचे एक शहर. समुद्रकिनाऱ्यालगतच. दुपारच्या एक वाजण्याच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो. रस्त्यालगतच नावाचे “Monterery’s Fish House” हॉटेल लागले. तिथे आम्ही जेवण घेतले. जेवण अर्थातच अमेरिकन पध्दतीचे. आम्हांला त्याची चव तशी नवीनच. त्या आधी माँटेरीजवळ आम्हांला रस्त्याशेजारीच वाळूच्या टेकड्या दिसल्या होत्या. समुद्राला छान भरती होती आणि हवाही छान होती. (आपल्याला इथल्या थंडीची कल्पना येत नाही. हवामान छान असणे ही इथे पर्वणी असते. म्हणजे पुरेशी ती ऊबदार असते. सूर्यप्रकाश स्वच्छ असतो. वाराही थांबलेला असतो. किंवा प्रसन्न वाटावा असा.)

समुद्राच्या काठाकाठाने गाडीतून प्रवास करीत आजूबाजूच्या निसर्गाचे सौंदर्य टिपणे आणि त्या विधात्याच्या निर्मितीने अचंबीत होणे एवढेच आपल्या हाती असते. आपण सुदैवी असू तर गाडी रस्त्याकडेला पार्क करून त्या वाळूवर, किंवा प्रत्यक्ष भरतीच्या लाटा पायावर घेत आनंद लुटू शकू. वेड्यावाकड्या वा धिप्पाड वृक्षराजीच्या पार्श्वभूमीवर फोटो काढू शकू.

हा समुद्र आणि सौंदर्यदर्शनाचा सिलसिला पॅसिफिक ग्रोव्हपासून सुरू होतो तो फेबलबीचला थांबतो. यावर सायप्रस पॉईंट, बर्ड रॉक, पॉईंट टो, पेसिडरो पॉईंट, फॅनशेलबीच आणि सील पॉईंट अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. कारमल आणि फेबलबीच दरम्यान अप्रतीम बंगले आहेत आणि त्यांच्या समोर समुद्र. समुद्राची गाज ऐकणे, भरतीच्या वेळी फेसाळत वेगाने सळसळत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटा पाहाणे हा इथला अद्भूत आनंद. प्रसिध्द कवी रॉबर्ट लुईस .स्टिव्हनसन आणि कादंबरीकार जॉन स्टाईनबेक इथे येत असत. या भागात एका बाजूने दाट जंगल आहे. त्याला mystical forest म्हणतात. ते Hucklebery Hills या नावाने प्रसिध्द आहे.

एक भाग Shephard’s knoll म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत रेल्वेरस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या प्रसिध्द अब्राहम डी. शेफर्ड यांचे नाव या भागाला देण्यात आले आहे.

इकडे समुद्रात ठिकठिकाणी लहानमोठे खडक दिसतात. त्यापैकी एक मोठा काळाकभिन्न खडक Bird rock नावाने प्रसिध्द आहे. तो काळा असला तरी-अनेक पक्षी त्यावर विश्रांतीसाठी येतात, तेव्हा पांढरी विष्ठा (white stuff they deposite) टाकून जातात. म्हणून तो नेहमी-काळा पांढरा दिसत असतो आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्यावर असंख्य पक्षी बसून कलकलाट करीत असल्याचे नजरेस पडते. पेलिकन्स, सील्स, सीलायन्सही तिथे आढळतात.

या भागात अनेक गोल्फची अनेक मैदाने आहेत. त्याच्या हिरव्या, कोवळ्या गवतावर अनेकदा हरणं आढळतात.

-अप्रतीम निसर्गसौंदर्याने समृध्द असलेला हा परिसर. म्हणून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे केवळ एक आनंदयात्रा अनुभवणे होय!

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..