नवीन लेखन...

व्यथा

“आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”.

“नवरे कशे हे असे? हे तर बुजगावणे आहेत आपले. यांचा एकही पैसा लागत नाही कधी संसारासाठी, घरासाठी. पण आमची कमाई मात्र सलते यांच्या डोल्यात. संसार हाकायला एकाची तरी कमाई नको का?”

‌ ” शिक्षण नाही आम्हाला, हात पाय धड आहेत म्हणून तुमच्या सारख्या लोकांकडे कामं तरी करता येतात. हे नवरे काय असून नसून सारखेच.”

मी आणि माझी कामवाली मावशी, बोलत होतो,”बाई, दररोजच्या बघण्यातलं गल्लीतलं पोरगं हो शंकऱ्या, सकाळी फाशी घेतली त्यानं.” हे ती सांगत असतानाच, तीस बत्तीस वर्षे वय असणारी सारिका, शेजारी काम आटोपून परतत होती काम करुन. आणि हे वाक्य कानावर पडलं तिच्या. एका दमात उपरोक्त स्वगतयुक्त संवाद साधून गेली आमच्याशी. व लगेच झटकन चालती झाली दुसऱ्या घरी काम करण्यासाठी.

जणूकाही तिच्या व तिच्या सारख्या इतर अनेक मायबहिणींच्या संसाराची गाथाच वाचून काढली तिने असे वाटले मनात.

तिचा हा संवाद संपला आणि क्षणभर मलाच अंतर्मुख व्हायला झाले, खरंच केवढे पूर्णसत्य सांगून गेली आहे ती. आमच्या सारखी काही मंडळी मात्र त्यांच्या एका एका खाड्याचा हिशेब लावण्यात धन्यता मानते. जाऊदे, गृहिणींच्या अशा मानसिकतेचा हा स्वतंत्रपणे चर्चेचा विषय होऊ शकतो, येथे तो महत्वाचा नाही.

पण, आज, स्त्री मुक्ती चळवळीचे,स्त्री च्या अस्मितेला जागरुक करण्याचे वारे वाहत असताना, अशा हातावरचे पोट असणाऱ्या कामकरी महिला,ज्यांचे कमाई करून संसाराचे रहाट गाडगे ओढताना शिक्षणा वाचून कांहीही आडत नाही. किंबहूणा आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे न डगमगता उभे राहून आणि कोणाच्याही नव्हे, नवऱ्याच्या आधाराचीही अपेक्षा न करता व्यवस्थित संसार करून आपल्याला नाही तरी, आपल्या मुलांनी यापेक्षा चांगल्या परिस्थितीत जगले पाहिजे. डोक्यावर स्वतःच्या मालकीचे छप्पर पाहिजे. अशा साध्या सोप्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.

रूपाली,बऱ्याच वर्षानंतर दोन मुलींच्या पाठीवर आणखी एकदा आई बनू बघत आहे.’का गं ? मुली मोठ्या झाल्या तरीही.’ ‘हो नं बाई मुलगा होईल या आशेने’. वाढत्या पोटाकडे नजर टाकत मला म्हणाली. माझ्या घरी कामाला नाही तरीही जाता येता दररोज हास्य भेट घडवत एखादे वाक्य चालता चालता बोलून जाणारी.आज सहज विचारलं तिला, ‘रूपाली कशी आहे तब्येत? काय काय खावसंवाटतं नवीन? यावर ती उत्तरली, ‘कसलं हो ताई,काही वेगळ खावसं असं वाटलंच नाही कधी, रोजची कामं करायची आणि भाजी भाकरी खायची बस्स.’ तिचे हे उत्तर ऐकले आणि श्रीमंती कोषात वावरणाऱ्या महिलांच्या गरोदरपणाचे होणारे कौतूक सोहळे डोळ्यासमोर तरळून गेले.

वंदना, अशीच एक तेहतीस चौतीस वर्षांची खूप कमी शिक्षण झालेली पण होतकरु. पोटात शिरुन काम करणारी. वयात येण्या ईतपत मोठ्या झालेल्या दोन मुलींची आई. पण, सासू व नवरा यांना ‘मुलगा हवा’ म्हणून तिसरी संधी घेणारी स्री. मुलगा जन्माला घालायचाच पण त्याच्या भविष्याची चिंता मात्र आईनेच करावयाची. पण मुलगा हवा हा हेका कायम. हातावरचे पोट असणाऱ्या या कुटुंबाने, महाराष्ट्रात बंदी आहे म्हणून शेजारच्या कोणत्या तरी राज्यात जावून लिंगनिदान चाचणीसाठी वीस हजार रुपये मोजले होते. आणि मुलगा जन्माला घातला होता तिने.अंगमेहनतीचे काम करणाऱ्या वंदनाने केवळ दोन महिने सुट्टी घेत पुन्हा काम चालू केले.बाळाला शेजारणीकडे सोपवून, अगदी मोबदला देण्याच्या तयारीने.

माझ्या घरी काम करणारी मावशी मंजुळा.मूल झाले नाही म्हणून नवर्‍याला दुसऱ्या लग्नाला परवानगी दिलेली. पण सवतीला बहिणीसारखे वागवणारी आणि तिच्या मुलांना पोटच्या मुलांचे प्रेम देणारी. किबहूणा जन्मदात्या आई पेक्षाही हिच्यावर अधिक प्रेम करणारी ही मुले. या आईने आपल्या गेल्या पण्णास वर्षांच्या घरकाम करत मिळवलेल्या कष्टाच्या पैशांवर चारही मुलांना एका ओळीत स्वतंत्र संसार उभे करुन दिले. शिवाय प्रत्येकाच्या घरी फ्रिज पासून साऱ्या वस्तू सारख्या घेऊन दिल्या आहेत. कुणाला सुद्धा राग लोभ नको म्हणून. शिवाय कामं करत हल्ली नातवंडांना शाळेत, शिकवणीला नेऊन आणून सोडण्याचे काम जबाबदारीने पार पाडते. वयाच्या सत्तरीकडे झुकलेल्या या अशिक्षित वृध्देकडे बघितले की तिच्यातील आत्मविश्वास आणि करारी बाणा यांचा अचंबा वाटतो !
नवरा गेल्यानंतर ही बाई, केवळ पाच दिवस घरी बसली., “काय करु बाई? घरी राहून ? व्हायचे होते ते तर होऊन गेले. आता रोजचे काम तर केलेच पाहिजे ना? लोकांनी दुसऱ्यांना दिली कामं तर ते आता कुठं शोधत बसू?”तिने मलाच प्रतिप्रश्न केला. ‘माझ्या सारख्या म्हाताऱ्या बायकांना काम देत नाही कोणी, साऱ्यांना झटपट काम करणाऱ्या मुली हव्या असतात हल्ली.’,ती बोलतच राहिली.

मी गमतीने एकदा मंजूळा मावशीला विचारले, ‘कोणत्या मुलामध्ये रहाता मावशी तुम्ही?’ “बाई झोपायला माझी मला रूम तर हाएच. दिवस तर कामं करत तुम्हा लोकांच्या घरी जातो,तिकडेच जेवण होतं, घरी मी एकदाच जेवते संध्याकाळी. बाहेर अंगणात बसलेली असताना, जो पहिले जेवायला ये माय, म्हणतो त्याच्या कडे जाते जेवायला.”मावशी म्हणाली.

सुशिक्षित, स्वयंपुर्ण समाजात आईवडिलांची भावंडांमध्ये वाटणी करु बघणाऱ्या मुलांना बघितले की, उच्चभ्रू समाज किती खालच्या पातळीवर उतरू शकतो या विचाराने अस्वस्थ व्हायला होतं.

सारिका,रुपाली, वंदना, मंजूळा या केवळ प्रातिनिधिक स्रिया आहेत.यांच्या सारख्या कितीतरी जणींना आपण अवतीभोवती बघत असतो. कोणतीही शैक्षणीक पात्रता,आर्थिक क्षमता नसताना सुध्दा कोणाच्याही मदतीशिवाय समर्थपणे जेंव्हा,या आपल्या संसाराचा डोलारा एकखांबी तंबू वर पेलताना दिसतात, तेंव्हा खरोखरच अशा स्रियांच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम करावासा वाटतो. असेल त्यांचे आकाश मर्यादित, छोटे पण तरीही उंच भरारी घेण्याची त्यांची ऊर्मी, प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.

आज स्त्री पुरुष समानतेच्या झेंडा फडकवणाऱ्या आपल्या समाजात अशा अशिक्षित पण स्वावलंबी कामकरी स्त्रिया,समानतेच्या शर्यतीत न आडकता जेंव्हा संसाराचा एक खांबी तंबू पेलत न डगमगता उभ्या दिसतात ना !जेंव्हा त्यांच्या या तारेवरची ही कसरत आपण बघतो ना,!तेंव्हा त्यांच्या या कार्य कर्तृत्वाला मनापासून दाद तर द्यावीच वाटते.

पण तथा कथित सुशिक्षित म्हणवणाऱ्या स्त्रिया ज्या वेळी आपल्या कमाईचा टेंभा मिरवताना दिसतात,त्या वेळी त्यांची कीवही करावीशी वाटते.

हातातोंडाचा ताळमेळ घालण्यात व्यस्त असणाऱ्या स्त्रिया आपल्या व्यथेची धार शब्दांतून व्यक्त होत बोथट करतात.पण उच्चभ्रु वर्गात ती स्त्री व्यक्त न झाल्याने अशा धारेला कायम टोकदारच ठेवले जाते.हे वैशम्य कधी कधी संसाराचे तीन तेरा करण्यात यशस्वी ठरते.हिच मोठी शोकांतिका आहे.

© नंदिनी म. देशपांडे.
nmdabad@gmail.com

“मराठीसृष्टी”च्या फेसबुक पेजवरुन

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..