ज्येष्ठ सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला.
भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्य वादनाची प्रचंड आवड होती.
अब्दुल खान यांनी सतार वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली व रागांवर आधारीत एका कार्यक्रमात अब्दुल खान यांच्या सतारवादनाचे प्रसिद्ध भारतीय संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी कौतुक केले होते. उस्ताद खान यांनी सतारवादनात स्वतःचा `जाफरखानी’ बाज निर्माण केला होता. तसेच त्यांनी संगीत जगतात स्वतःची एक स्वतंत्र सतारवादनाची शैलीही त्यांनी निर्माण केली होती.
हिंदी सिनेसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर-जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. `मधुबन मे राधिका नाचे रे’, `ये जिंदगी उसी की हैं’, या चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यातील सतार वादन उस्ताद अब्दुल खान यांनी केले. तसेच `मुगल-ए-आझम’, `झनक झनक पायल बाजे’ या भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यातील त्यांच्या सतार वादनाने गाण्यांना एक उंची मिळाली.
अब्दुल खान यांच्या सतार वादनाच्या दिलखेच शैलीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. सतारवादनाच्या क्षेत्रातली त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान. पं.रवीशंकर, उस्ताद विलायतखान आदी दिग्गज व प्रसिद्ध सतारवादकांच्या बैठकीत अब्दुल हालीम जाफर खान यांना मानाचे स्थान मिळाले. तसेच त्यांच्या बरोबरीने उस्ताद अब्दुल खान यांचे नाव घेतले जाऊ लागले. तसेच भारतीय सिनेसृष्टीसाठी उस्ताद खान यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
उस्ताद अब्दुल खान यांना संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, जीवन गौरव,`पद्मश्री’, `पद्मभूषण’ यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अब्दुल हलीम जाफर खान यांनी लहान वयात यश आणि कीर्ती संपादित केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि अचाट कल्पनाशक्ती. सतारवादन ध्रुपदाच्या अंगाने करणारी एक शैली आहे. रविशंकर या अंगाने वाजवत. विलायत खान गायकी अंगाने वाजविण्याचा दावा करीत. त्यांची शैली ही मध्यसप्तकप्रधान आहे. हलीम खान यांनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली. सतारीतून वेगवेगळे नाद निर्माण करणारी, सतारीची भाषा समृद्ध करणारी आणि अधिकाधिक सांगू पाहणारी. पुढे त्यांनी त्याला ‘जाफरखानी बाज’ असे नाव दिले. हलीम खान यांनी दक्षिण भारतीय संगीतातील अनेक राग हिंदुस्तानी पद्धतीत आणले. ‘किरवाणी’, ‘लतांगी’, ‘कनकांगी’ वगैरे राग यापूर्वी आपल्याला अपरिचित होते. त्यांची चित्रपट संगीताच्या क्षेत्रातली कामगिरी अतुलनीय आहे. सर्व प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि गाण्यांचे माधुर्य वाढविले.
सतारवादनाची कला त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता १९७६ ला मुंबईत `हलिम अकादमी ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.
उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले. तसेच पुरस्कार व प्रसिद्धीपेक्षा त्यांनी कलेलाच अधिक महत्त्व दिले. ते अखेरपर्यंत कलेची निष्ठेने सेवा करत राहिले.
अब्दुल हलीम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply