हमो या अद्याक्षरानी परिचित असलेले मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक ह मो मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला.
आपली नेमकी जन्मतारीख काय आहे हे हमोंनाही माहीत नव्हते. हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या १०-१२ व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६ साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२ साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
ह.मो. मराठेंच्या ’काळेशार पाणी’ ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. ना.सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. साधनाचे विश्वस्त एस.एम. जोशी यांनी १९७३ च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला. ह. मो. त्यांच्या आत्मचरित्रपर बालकांड या पुस्तकामुळे पुन्हा प्रसिद्ध झाले.
ह. मो. मराठे यांचे २ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply