नवीन लेखन...

अंतराळवीरांचे पोशाख

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील अनिल लचके यांचा हा पूर्वप्रकाशित लेख

अंतराळवीरांच्या गरजा या आवश्यकतेनुसार बदलत असतात. अंतराळयानात वावरतानाच्या गरजा वेगळ्या, तर अंतराळयानाच्या बाहेर पडल्यानंतरच्या गरजा वेगळ्या. या गरजांनुसारच त्यांच्या पोशाखात बदल होत असतो. अंतराळवीर वापरत असलेल्या या पोशाखांची ही ओळख…

अंतराळवीर म्हटलं की चांद्रभूमीवर उतरलेले नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांचं चित्र आपल्या नजरेसमोर येतं. विशेषत:, त्यांचा तो काहीसा आगळावेगळा आणि ढगळ वाटणारा श्वेतगणवेश, मागे बॅकपॅक, जाडजूड मजबूत बूट, तसंच डोक्यावरील मोठं शिरस्त्राण आपलं कुतूहल जागृत करतं. याचा अर्थ, चंद्रासारख्या उपग्रहावर सहजासहजी वावरता येणं अवघडच आहे आणि ते खरं आहे.

चांद्रभूमीवर चालायचं… ही क्रिया मुळातच असामान्य आहे. चंद्र पृथ्वीच्या तुलनेत आकारानं फक्त एक-चतुर्थांश भरतो. त्याचं वस्तुमान तर पृथ्वीच्या तुलनेत फक्त एक टक्का इतकंच आहे.

साहजिकच, चंद्रावर गुरुत्वाकर्षणाचा जोर कमी आहे. अॅलन शेफर्ड यांनी चंद्रावर एका गोल्फच्या चेंडूला तडाखा मारला, तेव्हा तो जवळजवळ एक किलोमीटर दूर फेकला गेला. ज्या व्यक्तीचं वजन पृथ्वीवर 60 किलोग्रॅम असतं, त्या व्यक्तीचं चंद्रावरचं वजन फक्त 10 किलोग्रॅम भरेल.

चंद्रावर हवा नाही. त्यामुळे हवेचा दाब नाही; म्हणजेच तिथं बहुतांशी पोकळी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचं तापमान दिवसा 107 अंश सेल्सियस आणि रात्री उणे 153 अंश सेल्सियस असतं. ते सावलीत अतिशीत आणि उन्हात अतिउष्ण असतं. येथे उल्कापात, अशनीपात होत असतात. वैश्विक किरणांचं प्रमाणही बरंच जास्त असतं. चंद्रावरील जमीन राखेसारखी असून बरीच मऊ असल्यानं त्यावर चालणं जिकिरीचं असतं. याचा अर्थ एवढाच, की अशा विपरीत ठिकाणी भेट देण्यासाठी विशिष्ट पोशाख घालणं अत्यावश्यक आहे.

अंतराळवीराच्या पोशाखात कुठंही काही कमतरता राहिली असेल, तर चंद्रावरचा यात्री सुरक्षित राहणं निव्वळ अशक्य आहे. साहजिक संशोधकांनी बरंच संशोधन करून अंतराळवीरांचा पोशाख ठरवलेला आहे. यामध्ये नेहमी काही ना काहीतरी सुधारणा होत असते. अंतराळवीरांना एकावर एक अशा वेगवेगळ्या सात स्तरांपासून बनलेले पोशाख चढवावे लागतात. हे स्तर अंतराळवीराचं अवकाशातील कोणत्या ना कोणत्यातरी धोक्यापासून संरक्षण करतात. या पोशाखात मलनिस्सारणाची सोय केलेली असते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा पोशाखात केलेला असतो. सर्वांत वरचा थर मजबूत असतो आणि तो दाब-नियंत्रित असतो. अंतराळातील शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी हा स्तर घेतो. तसंच, यातून ऑक्सिजन पुरवायला मदत होते. पोशाखाचा बाह्यस्तर आणि शिरस्त्राण यांच्यामुळं अंतराळातील संभाव्य घातक वस्तू व प्रारणाचा अनुचित परिणाम होत नाही. हा पोशाख अंतराळवीरावरचा सूर्याकडून होणाऱ्या अतिनीलकिरणांचा मारा थोपवतो.

या संपूर्ण पोशाखाचं वजन सुमारे 90 किलोग्रॅम भरतं. सुदैवानं चंद्रावर मात्र त्याच पोशाखाचं वजन 15 किलोग्रॅम भरतं. यामुळं चांद्रवीरांना काही प्रकारच्या हालचाली करणं शक्य झालं आणि नियोजित प्रयोग करता आले. हे गणवेश त्यांच्या शरीराचं तापमान सुसह्य ठेवतात. अंतराळवीरांच्या श्वसनासाठीची व्यवस्थापण पोशाखाशी संबंधित आहे. त्वचेलगतचा थर पाण्यामुळं थंड राहणाऱ्या वस्त्रांचा असतो. यामुळं थंड किंवा उष्ण तापमानाचा त्रास खूप कमी होतो.

अंतर्वस्त्रं ही मायलार धाग्यांची असतात. मायलार हे एक पॉलिएस्टर मटेरिअल असून ते अतिशय लवचीक आणि पारदर्शी असतं. त्यावर धातूचं विद्युत विलेपन करता येतं. त्याच्या धाग्यांवर अॅल्युमिनिअमचा थर असतो. त्यावर डेक्रॉनचे चार थर असतात. हे पॉलिमर वजनाला खूप हलकं असतं. ते पॉलिएस्टरसारखंच असतं. ते बनवण्यासाठी एथिलिन ग्लायकॉल आणि टेरेफ्थॅलिक आम्ल वापरतात. यामुळं गारवा किंवा उष्णता रोखली जाते. त्यानंतर कॅपटॉन नामक पॉलिमरचे दोन जास्तीचे थर असतात. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या टेफलॉनचे दोन थर असतात. हे थर जल उष्णता – गारवा आणि आगरोधक असतात. हा पोशाख बनवताना विविध प्रकारच्या पॉलिमरचा उपयोग करून घेतलाय. त्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत: स्पँडेक्स, गॉर्टेक्स, नॉमेक्स, केव्हलार, नायलॉन, डेक्रॉन आणि युरेथेन कोटेड नायलॉन,

या संपूर्ण पोशाखालाच बूट आणि हातमोजे जोडलेले असतात. हातमोज्यांसाठी उच्च दर्जाचं रबर वापरलेलं असतं. डोक्यावर एक टोपीसारखं आवरण असतं. त्यातच दळणवळणाची साधनं बसवलेली असतात. चंद्रावर, आपल्या सहप्रवाशाबरोबर, समोर दिसत असूनही बोलता येत नाही. कारण, ध्वनिलहरींसाठी हवेसारख्या माध्यमाची गरज असते. साहजिक, दोघेही रेडिओलहरींमार्फत संवाद साधतात. यासाठीच्या उपकरणाचा उपयोग पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशीही संपर्क साधण्यासाठी होतो. साहजिकच, त्यांच्या बॅकपॅकमध्ये रेडिओ ट्रान्समीटर आणि रिसीव्हर असतो. नंतर अवकाशवीर प्लॅस्टिकचं शिरस्त्राण चढवतात. हे प्लॅस्टिक म्हणजे उच्च दर्जाचं पॉलिकार्बोनेट असतं. प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून त्यावर दर्जेदार गॉगल/ फिल्टर बसवलेला असतो. या पोशाखाला काही ठिकाणी दिवे लावलेले आहेत चंद्रावरची सावली गडद असते. तेथील मातीचे नमुने घेण्यासाठी नीट दिसणं गरजेचं आहे. त्या वेळी या दिव्यांचा प्रकाश उपयोगी पडतो.

चांद्रवीरांच्या पाठीवर एक बॅकपॅक दिसून येईल. याला ‘प्रायमरी लाइफ सपोर्ट सबसिस्टिम’ म्हणतात. यात ऑक्सिजनचा साठा असतो. तसंच, उच्छवास (कार्बनडायॉक्साइड) गोळा करायचीपण सोय आहे. हा वायू शोषून घेण्यासाठी लिथियम हायड्रॉक्साइडची योजना केलेली असते. या सर्व अवडंबरासाठी विद्युत्प्रवाहाची गरज असते. ती वीजनिर्मितीपण तिथंच होते. या बॅकपॅकमध्ये ‘सेफर’ नामक यंत्रणा आहे. अंतराळयात्री स्पेस स्टेशनपासून जर दूर गेला, तर तो सेफरच्या साह्यानं स्पेस स्टेशनकडे परत येऊ शकतो.

अंतराळयानाच्या आत कार्यरत असलेल्या अंतराळवीरांना विशेष वेगळा पोशाख घालायची गरज पडत नाही. कारण, ज्या भागात अंतराळवीर असतात, तिथं तापमान – हवेचा दाब – ऑक्सिजनचं प्रमाण -आदी घटक पृथ्वीवर जसे असतात, तसेच राखण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेव्हा अंतराळयानाच्या बाहेर येऊन काही प्रयोग करायचे असतील, तेव्हा मात्र अंतराळवीरांना विशेष प्रकारचा पोशाख परिधान करावा लागतोच.

‘कोलंबिया’, ‘डिस्कव्हरी’, ‘एन्डेव्हर’, ‘चॅलेंजर’ अशी स्पेस शटलची नावं आपल्याला माहीत आहेत. (आता ही स्पेस शटल इतिहासजमा झाली आहेत.) अग्निबाणासह अंतराळात जाणारं हे एक मोठं विमानच असायचं. स्पेस शटलसारख्या यानांतील तापमान, आर्द्रता सामान्य ठेवतात आणि दाब समुद्रसपाटीवरील दाबाइतकाच राखलेला असतो. अंतराळवीर हे पुनर्वापर करता येईल असे शर्ट घालूनच स्पेस शटलमध्ये कार्यरत असतात. ते कापड आणि त्याची शिवण सर्वसामान्यच असते. त्यांचे शर्ट, पँट, हाफपँट, पायात चढवायला साध्याच स्लिपर्स आणि अंडरवेअर्स पृथ्वीवर सर्वसामान्यतः जसे वापरले जातात, तसेच असतात. या सर्वांकरिता जे कापड वापरतात, ते मात्र आगरोधक धाग्यांचं असतं. शर्टाला भरपूर खिसे ठेवलेले असतात. कारण अंतराळवीराला पेन, पेन्सिल, डायरी, विविध सूचनांची सूची, गॉगल, चाकू, कात्री, रुमाल आदी अनेक जिनसा हरघडीला लागतात. ‘एक नूर आदमी और दस नूर कपडा’ ही म्हण अंतराळवीरांनापण लागू पडते.

या यानात प्रत्येक अंतराळवीराच्या नावाचं स्वतंत्र कपाट असतं. कारण, प्रवासात ज्याला जे नेमून दिलेलं कार्य असतं, त्याला अनुसरून साजेसा पेहराव असावा लागतो. तो आटोपशीर असणं हे महत्त्वाचं. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष अवकाशात झेपावताना तसंच पृथ्वीकडे परत येताना जो पोशाख असतो, तो वेगळा असतो. या पोशाखात विशिष्ट दाब राखला जाईल अशी योजना असते. वर जाताना आणि खाली येताना जाणवणाऱ्या दाबातील बदलामुळं, अंतराळवीराचा रक्तदाब कमी-जास्त होऊ शकतो. अशा वेळी अंतराळवीराकडे एक जय्यत तयारीचं पॅराशूट आणि शिरस्त्राणही असतं. खास बनावटीच्या धाग्यांनी बनवलेले हातमोजे-बूट यांसह त्यांच्या ताब्यात दळणवळणाची साधनं असतात. आणीबाणीच्या प्रसंगी ऑक्सिजनची गरज पडली तर त्यांच्या पोशाखात पुरेसा ऑक्सिजन भरायचीपण सोय असते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना तेथून बाहेर पडून विशेष कार्याकरिता स्पेस-वॉक घ्यायची वेळ येते. सध्याच्या पोशाखात ते अंतराळयानाच्या बाहेर जास्तीतजास्त सात तास कार्य करू शकतात. या पोशाखाची किंमत 72 कोटी रुपयांपर्यंत जाते.

मानव जेव्हा मंगळावर पदार्पण करेल, तेव्हा तेथील वातावरण चंद्रापेक्षा खूप वेगळं असेल.
सामानाचं बरंचसं वजन स्वतःच्या अंगावर बाळगण्याऐवजी रोव्हर किंवा स्पिरिटसारख्या वाहनाचा तिथं वापर केला जाईल. कदाचित, एखाद्या यंत्रमानवाचाही तिथं चतुराईनं उपयोग करून घेतला जाईल!

-अनिल लचके
anil.lachke@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..