नवीन लेखन...

शूर जया

शोभा गोखलेचं लग्न होऊन ती रानडेंच्या घरात सून म्हणून आली आणि ते घर आनंदाने भरून गेलं. तिच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने तिने सगळ्यांची मने जिंकली होती. घरात सासरे दिनकरराव, सासूबाई रमाबाई, मोठे दिर श्रेयस व जाऊबाई वैदेही वहिनी आणि त्यांची चिमुरडी मुलगी जया या सर्वांना शोभाने आपलंस केलं होतं. पती मयुर तर तिच्यावर जिवापाड प्रेम करायचे, शोभा रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी करायची, वैदेही वहिनी घरीच असायच्या. घरातील सगळी कामे त्या तिघी मिळून करायच्या. कामावरून त्यांच्यात कधीच भांडणं व्हायची नाहीत.

लग्नानंतर शोभाची पहिली मंगळागौर आली. सगळ्यांनी ती जोरात व उत्साहाने करायचं ठरवलं. सर्वांना आमंत्रणे गेली. गुरुकृपा सोसायटीत सर्वांना सांगितलं गेलं. त्या मंगळवारी शोभाने ऑफिसमधून रजा घेतली होती. जयाचा उत्साह दुथडी भरून वहात होता. जया म्हणजे त्या घरातील चैत्यन्य होतं. तिने शोभाचं मन जिंकलं होतं. ती सारखी शोभाकाकीच्या मागे मागे असायची.

शोभाचंही तिच्यावर खूप प्रेम होतं. जया पाचवीत शिकत होती. अभ्यासातील अडचणी ती शोभालाच विचारायची, जयाला मोबाईलचं अतिशय वेड होतं. घरात प्रत्येकाचा मोबाईल असल्याने ती सर्वांचे मोबाईल हाताळायची, गेम खेळायची. मोबाईलमध्ये ती तरबेज होती.
आजोबांचा मोबाईल तिच्या हक्काचा होता. आजोबा फक्त आलेले फोन घ्यायचे व फोन करायचे. बाकी त्यांना व आजीला फोनमधलं काही कळत नव्हतं. मग जया त्यांना शिकवायचा प्रयत्न करायची. आई-बाबा तिला मोबाईलवरून सारखे ओरडायचे. बाबा म्हणायचे, ‘माझ्या मोबाईलला हात लावू नकोस. त्यात माझे महत्वाचे फोन असतात. ते उडून जातील.’ आजी म्हणायची, ‘तुझ्या मैत्रिणींना तू फोन करू नकोस, माझा बॅलन्स संपतो, मी काही नोकरीला नाही किंवा तुझ्या आजोबांसारखी मला पेन्शन नाही. तुझ्या बाबांकडून मला मागावं लागतं.’ जया म्हणायची, ‘अगं आजी, मी मोठी होऊन नोकरीला लागल्यावर तुला पैसे देत जाईन.’ आजी म्हणायची, ‘तू नोकरीला लागेपर्यंत कोण जगतंय बाई!’ जया म्हणायची, ‘असं नको बोलूस आजी. तू मला आणखी शंभर वर्षे हवी आहेस.’ आजी कौतुकाने जयाच्या तोंडावरून मायेने हात फिरवायची व तिची पापी घ्यायची. आजीला खूप भरून यायचं.

मंगळागौरीच्या दिवशी संध्याकाळी वैदेही वहिनी, शोभा व सासूबाई पैठणी साड्या नेसून भरपूर दागिने घालून पूजेसाठी सज्ज झाल्या. शोभाने जयाला जरीचा परकर-पोलका शिवून घेतला होता. त्या कपड्यात जया खूप छान दिसत होती. जयाचा स्वभाव फार जिज्ञासू होता. प्रत्येक गोष्टीबद्दल ती चौकशी करायची व प्रश्न विचारून सर्वांना भंडावून सोडायची. तिच्या प्रश्नांना आजोबांच फक्त समाधानकारक उत्तरे द्यायचे – अगदी न कंटाळता, जयाला आजोबा खूप आवडायचे आणि जया आजोबांचा जीव की प्राण होती. शाळेतून यायला उशीर झाला तर ते अस्वस्थपणे गॅलरीत फेऱ्या मारायचे आणि जया गळ्यात पडायची. आई म्हणायची, ‘अगं, आधी आल्याबरोबर आजोबांच्या कपडे बदल, हातपाय धू मग त्यांना त्रास दे.’ आजोबा म्हणायचे, ‘अगं सूनबाई, मला काही त्रास होत नाही.

उलट तिच्या प्रेमाने माझा सगळा शीण नाहीसा होतो. माझ्या अंगात उत्साह निर्माण होतो.’ सूनबाई म्हणायची, ‘चालू द्या तुमचं आजोबा-नातीचं कौतुक! मला बोलायलाही वेळ नाही.’

मंगळागौरीची पूजा मांडली गेली. सगळ्या बायका उत्साहाने येऊन बसल्या. गौरीची आरती झाली. प्रत्येकीने गौरीची हळद-कुंकू वाहून पूजा केली. सगळ्यांना चकल्या, चिवडा, पेढा, कचोरी व मसाल्याचं दूध दिलं. बायकांना फराळाच्या बशा द्यायला शोभाबरोबर जयाही मदत करीत होती. बायकांना तिचं फार कौतुक वाटत होतं. कॉलनीतही ती सर्वांची लाडकी होती. शाळेत हुशार असल्याने सगळ्या शिक्षकांची ती आवडती विद्यार्थिनी होती. शिक्षकांनाही ती वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांची पंचाईत करायची. वर्गशिक्षिका दीक्षित बाई तर म्हणायच्या, ‘अगं, जास्त अभ्यास नको, पण तुझे प्रश्न आवर!’

मंगळागौरी पुढे झिम्मा, फुगडी खेळायची टूम निघाली, पण जागा अपुरी असल्याने सर्वांनी खाली चौकात जमून खेळायचं ठरवलं. अकराच्या सुमारास सगळ्या बायका चौकात जमल्या. जया व तिच्या मैत्रिणीही उत्साहाने नाचत होत्या. सगळ्याजणी खेळात अगदी रंगून गेल्या होत्या. इतक्यात एक गाडी येऊन उभी राहिली व त्यातून चार माणसं उतरून बायकांच्याजवळ येऊन त्यांनी पिस्तुलं रोखली. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. ते गुंडच होते. त्यांनी बायकांना सांगितलं, तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढून द्या. एकाने जमिनीवर एक फडका अंथरला व त्यावर दागिने टाकायला सांगितलं. सगळ्या बायका अतिशय घाबरल्या. गुंडांनी सांगितलं, ‘कोणीही ओरडायचं नाही. निमूटपणे दागिने टाका, नाहीतर गोळ्या घालू. बायकांनी दागिने काढून टाकायला सुरुवात केली.’ ते गुंड येण्यापूर्वी जयाला तहान लागली म्हणून ती तिच्या मैत्रिणींना सांगून घरी गेली होती. पाणी पिऊन येताना तिनं जिन्याच्या जाळीतून खाली पाहिलं, तर तिला ते गुंड व दागिने काढून टाकणाऱ्या बायका दिसल्या. जया मधून मधून सीआयडी ही टीव्ही मालिका पहात असल्याने सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती तशीच वर घरात गेली, आजोबांचा मोबाईल घेतला व शंभर नंबर लावून पोलिसांना फोन केला व सांगितले, ‘आमच्या कॉलनीत काही गुंड घुसून बायकांचे दागिने काढून घेत आहेत. तुम्ही लवकर या. त्यांच्याकडे पिस्तुलंपण आहेत.’ आणि तिने आपला पत्ता सांगितला. तेवढ्यात तिने आजोबांना, बाबांना व काकाला उठवून हा प्रकार सांगितला. तेवढ्यात खाली पोलिसांची जीप आली व त्यांनी एका गुंडाच्या पायावर गोळी झाडली व सांगितलं, ‘प्रत्येकांनी आपली पिस्तुल खाली टाका. नाहीतर गोळ्या घालून तुमचा जीव घेऊ.’ गुंडांनी पिस्तुलं खाली टाकली. पोलिसांना आलेलं पाहून सगळ्या बायका निर्धास्त झाल्या व मोठमोठ्याने रडायला लागल्या. तेवढ्यात जया घरातील सगळ्यांना घेऊन खाली आली. खाली झालेल्या गोंधळाने कॉलनीतील सगळी पुरुष मंडळी धावत आली. घरच्या माणसांना पाहून सगळ्या बायका रडायला लागल्या. पोलिसांनी त्या गुंडांना पकडू जिपमध्ये नेलं. इन्स्पेक्टरने बायकांना सांगितलं, ‘तुम्ही आपापले दागिने उचलून घ्या.’

सगळ्यांना आश्चर्य वाटले की पोलीस कसे योग्य वेळी आले. आजोबांनी त्यांना विचारल्यावर इन्स्पेक्टर राणेसाहेब म्हणाले, ‘आम्हाला एका लहान मुलीचा फोन आला होता. तिने घाबरत घाबरत आम्हाला हा प्रकार व पत्ता सांगितला. म्हणून आम्ही तडक निघालो. कोण आहे ही मुलगी?’ जया पुढे आली व तिने सांगितलं की, ‘मी फोन केला होता.’ सगळ्यांना जयाचं खूप कौतुक वाटलं. राणेसाहेब म्हणाले, ‘या चिमुरड्या सगळ्या बायकांचे दागिने जयामुळे वाचले. कदाचित त्या गुंडांनी बायकांचा जीवही घेतला असता, पण जयाच्या समयसूचकतेमुळे पुढचं संकट टळलं. राणेसाहेबांनी जयाला उचलून घेतलं व तिला शाबासकी दिली.’ आजी-आजोबा म्हणाले, ‘तिच्या मोबाईलच्या वेडाबद्दल आम्ही तिला नेहमी ओरडत होतो. पण त्या मोबाईलमुळेच आजच्या प्रसंगातून आम्ही वाचलो.’ सगळ्या बायकांनी जयाला उचलून घेतलं. म्हणाल्या, तुझ्यामुळे आज आमचा जीव व दागिने वाचले. तू फार गुणी मुलगी आहेस. शूर मुलगी आहेस. तू आमच्या सर्वांची लाडकी आहेसच, पण आता आणखी लाडकी झाली आहेस.

सोसायटीच्या लोकांनी जयाचा सत्कार केला. सगळ्यांनी तिच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. सेक्रेटरी म्हणाले, ‘आजपासून आपण तिला ‘शूर जया’ म्हणूया. आपल्या सोसायटीची ही झाशीची राणीच आहे. शाळेतही जयाचा सत्कार करण्यात आला. सगळ्या शिक्षकांनी जयावर कौतुकाचा वर्षाव केला. दीक्षितबाई म्हणाल्या, ‘जया तू नेहमी प्रश्न विचारून भंडावून सोडतेस, पण यापुढे मी तुझ्या जिज्ञासू प्रश्नांची उत्तरे न कंटाळता देत जाईन.’ शाळेच्या प्रिन्सिपॉलने जयाचं नाव दिल्लीला राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यासाठी पाठविले. पुढे जयाला ‘बालवीर’ पुरस्कार मिळाला. दिल्लीलाही तिचा सत्कार झाला. कॉलनीतील प्रत्येक आई आपल्या मुलींना ‘शूर जया’चं उदाहरण द्यायला लागल्या.

-कथा मानकर

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..