नवीन लेखन...

‘संकल्प’ आणि संकल्प सिद्धी ?

‘अने फ्रॅन्कची’ डायरी- Museum मधील डायरी

डिसेंबर महिना चालू झाला  की ‘संकल्पाचे’ वारे सुरू होतात . मी सुद्धा पंधराव्या वर्षापासून  काही ना काही संकल्प करायचा ठरवीत असे . पण अनेक वेळा  जानेवारी महिना संपण्यापूर्वीच  तो  मोडलेलाच असायचा.    संकल्प करणे  म्हणजे  काय? संकल्प म्हणजे ‘कृती’ नव्हे.  ती गोष्ट  प्रत्यक्षात आणता आली पाहिजे.

शाळेत असताना  खूप अभ्यास करून  खूप खूप गुण मिळवायचे  असा  माझा संकल्प असे . पण  गणपती ,नवरात्र , दिवाळी  आणि डिसेंबर मधल्या सहली , स्नेहसंमेलन , क्रीडा स्पर्धा  यात  मी  इतकी  गुंतली  जात असे की , मी केलेल्या संकल्पाचा मलाच विसर पडत असे .

महाविद्यालयात  गेल्यावर  इंग्रजी  माध्यम असणार , तेव्हा  आपल्याला इंग्रजीचे ज्ञान  असणं  आवश्यकच आहे . म्हणून मी इंग्रजी- मराठी शब्दकोशातून  पाच-सहा शब्द , त्यांचा उच्चार  आणि अर्थ जाणून  लक्षात ठेवत असे . हळू हळू  हा संकल्प सुद्धा  अर्धवटच सोडला  गेला .

आई पोळी भाजी करायला मुद्दाम सांगत असे . पण  रोज रोज  तेल – मोहरी – हिंग- हळद  घालून  तीच , तीच फोडणी  चार दिवस शिकल्यावर  मला अगदी कंटाळा आला . म्हणून स्वयंपाक घरातील कोणत्याही  संकल्पाचा विचार करायचाच नाही , असं मी त्याचवेळी ठरविलं.

थोडी मोठी झाल्यावर  ‘संकल्प’ म्हणताच , मला   १२ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नेदरलँड्सच्या ‘ॲना  फ्रँकची’ आठवण यायची. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर, ज्यूंचा छळ चालू  केला, नाझी  सैनिकांच्या अत्याचारापासून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ॲन फ्रँकच्या  वडिलांनी कुटुंबासह ६  जुलै १९४२ ला अ‍ॅम्स्टरडॅममध्ये एका बिल्डींगमधील सिक्रेट खोलीमध्ये लपून बसण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात लपून बसलेल्या फ्रॅंक कुटुंबाला भयानक जीवन जगावे लागले.

पुस्तकाच्या दुकानातील शोकेसमध्ये  ठेवलेली डायरी  ‘ॲनाने’ जेव्हा पाहिली , तेव्हाच  तिच्या मनात भरली होती. तीच डायरी , तिच्या वडिलांनी  वाढदिवसाच्या दिवशी  भेट म्हणून दिली  होती. ही डायरी तिला अतिशय प्रिय होती. कारण वयाच्या १३व्या वर्षी ‘पत्रकार’ होण्याचा ‘संकल्प’ तिने केला होता.

अने फ्रॅंकने  १४  जून १९४२ पासून १  ऑगस्ट  १९४४ ती पकडली जाईपर्यंत ,‘संकल्प’ करून, खंड पडू न देता सातत्याने तिच्या जीवनाच्या अखेर पर्यंत, तिने पुढे  तारीखवार  शेवटपर्यंत डायरी  लिहिली. ‘खिडकीतून पाहिलेल्या हिटलरी पाशवी घटनांची आणि स्वतःच्या जीवनातील घटनांची तारीखवार नोंद या चिमुरड्या पोरीने केली . युद्ध संपल्या नंतर , लपून बसावे लागलेल्या’ सर्व काल खंडावर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा ‘संकल्प’ तिने केला होता. तिच्या मृत्यूनंतर हीच डायरी ‘अने फ्रॅन्कची’ डायरी म्हणून जगप्रसिद्ध झाली. खरोखरच मला तिचं  नेहमी कौतुकच वाटते. याला म्हणतात ‘संकल्प सिद्धी’.

एका  मुलाखतीत “ पत्रकार शोभा डे “ यांनी सांगितलं होतं  ,आयुष्यभर मी  संकल्प  पाळते . मी रोज झोपण्यापूर्वी  आठ ते दहा ओळी   लिहिते –  जे  मला  सुचेल ते , रुचेल ते, पटेल ते .  खरोखरच  असं   सातत्य पाळणाऱ्या  व्यक्तींचा  मला नेहमी आदर वाटतो.

या सर्व  संकल्पना वरून  मला  माझ्या आईची  तसेच  तिच्या समवयस्क स्त्रियांची  आठवण येते . त्यांच्या संकल्प — नाव  अर्थातच “ चातुर्मास व्रत “  एक वर्ष तिने  चातुर्मासात  ” हरी पाठाचे अभंग ” पाठ केले होते . पुढे ती  न बघता रोज  म्हणत असे.

ती वर्षभर येणाऱ्या  स्त्रियांना  दोन रुपये  व हातावर साखर  देत असे .  ही सवय  इतकी अंगवळणी पडली ती अगदी अखेरपर्यंत . तिची ही कृती म्हणजे ‘संकल्प सिद्धी’ नव्हे काय ?

एक वर्ष तिने  एका होतकरू मुलाला  चातुर्मासात  सकाळच्या शाळेतून आल्यावर  रोज  जेवण दिले . समाजाचे ऋणच  जणू   ती  फेडत  होती .   कोणताही गाजावाजा न करता . तिच्यासारख्या असंख्य  स्त्रीया  घरातल्या    सर्व  जबाबदाऱ्या पार पाडत  होत्या .

मी सुद्धा  आत्तापर्यंत  दोन गोष्टी  पाळल्या आहेत.   पहिली गोष्ट म्हणजे  शाळेत नोकरी करत असताना , अगदी न चुकता , प्रत्येक तासाला  वर्गात काय शिकवायचे , याची पूर्ण तयारी करूनच , मी वर्गात जात असे, मुख्याध्यापिका असून सुद्धा .अत्यंत तळागाळातल्या परिस्थितीतून आलेल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सांस्कृतिक दृष्ट्या ‘शिक्षित करून’, त्यांना  परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रवृत्त करणे , हाच माझा ‘संकल्प’. अगदी  निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत. कारण, मी  आवडीने  शाळेत नोकरी  पत्करून, अध्यापनात ‘संकल्प सिद्धीचे’  व्रत घेतले होते .

दुसरी गोष्ट म्हणजे  रोज सकाळी उठल्यावर  आणि निजण्यापूर्वी  आई-वडिलांचे स्मरण करून  मी  त्यांना वंदन   करते  . या दोन्ही गोष्टी  करत असताना  संकल्प करण्याची ‘सहज प्रवृत्ती’  त्यांनीच माझ्यात जोपासली होती  .

संकल्प  सिद्धीस जात नाही , अपूर्ण सोडावा लागतो    म्हणून  संकल्पच करायचा नाही  असं मुळीच  नाही . कारण  त्यामुळे  आपण विचार करतो , कृती करतो.  सातत्य आणि नियमितपणा  आपल्या   अंगी  बाणविला  जातो ,  त्यातूनच  आयुष्याला  एक शिस्त , वळण लागते.

संकल्प हे  आश्वासन नाही. संकल्प म्हणजे कृतीमागची ‘प्रेरक’ शक्ती. माणसाच्या आयुष्यातील, संकल्प हा स्वनांकडून सत्याकडे नेणारा पूल आहे .

वासंती  गोखले

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..