नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक पाच

पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.

मिक्सरमधून नारळ वाटून घ्यायचा आहे, पहिला आत टाकलेला नारळ बाहेर काढायच्या आधीच दुसरा नारळ वाटण्यासाठी आत टाकावा का ?
नाही ना !

तसंच आपल्या पचनाचं देखील आहे. खाल्लेलं पचायच्या आधीच दुसरं आत टाकू नका. दुसरं आत टाकलेलं पचणार तर नाहीच, पण पहिलं आत टाकलेलं देखील खराब होईल.

हं. मी “दर दोन तासाने खावे” असा जो प्रचार होतोय, त्यासाठी काय दृष्टीकोन असावा तेच सांगतोय.

पहिलं खाल्लेलं पचलेलं नाही, तोपर्यंत वरून पुनः पचनासाठी माल आत पाठवला जातोय.

गाई गुरांची गोष्ट वेगळी, त्यांना जसं मिळेल तिथून, जेवढा मिळेल तेवढा चारा, भसाभस खाऊन एका कप्प्यात अर्धवट खाल्लेला चारा साठवता येतो. आणि नंतर सुरक्षित जागी येऊन अर्धवट खाऊन साठवलेला चारा पुनः तोंडात आणून, निवांत, निर्धास्त, स अवकाश, सावकाश रवंथ करीत पचन करायचे असते. दिवसभर खा, खा, केलं तरी, रात्रभर खाल्लेलं पचवायला वेळ देतात. पचवायच्या वेळी परत परत खाणे नाही. त्यामुळे या प्राण्यांना सहसा गॅस प्राॅब्लेम कधी होत नाहीत.

पण मानव प्राण्याची बातच वेगळी !

भूक लागेल तेव्हा घरात डबे भरलेले आहेत. बाहेर जावं तेव्हा खिसे भरलेले आहेत. दर दोन तासानी खा खा खात रहायचं. पण पचवायला मात्र वेळ अजिबात द्यायचा नाही. वर “डाॅक्टरनीच सांगितलंय” असं म्हणायला मोकळे! कारण काय तर, अॅसिडीटी वाढू नये म्हणून, अल्सर होऊ नये म्हणून…..

असं करून कसं चालेल ?
आपणाला त्याने बुद्धी दिलेली आहे. तिचा सुयोग्य वापर करून घ्यायला पाहिजे. आपणाला, गाईगुरांसारखं खाल्लेलं अन्न परत बाहेर तर काढता येत नाही. परत परत अन्न बाहेर काढता येणार नाही. जे काही पचन करायचं ते एकदाच.

सतत खात राहिल्याने पचन पूर्ण होत नाही, आधीचं खाल्लेलं पचलेलं नाही, आणि पुनः वरून सतत अतिरिक्त कामाचा ताण ! तोपर्यंत आधीचं पेंडींग काम आणखी काम वाढवलेलं असतं. मग एक ना धड भाराभर चिंध्या !

म्हणजे कसं होतंय ना, मे महिन्याच्या सुटीतील पाहुण्याची सरबराई काही संपत नाही, सासरची माणसे घरातून बाहेर पडेपर्यंत, ह्यांच्या मित्राचं टोळकं येतं. माहेरची माणसे येऊन थडकतात. कुणाला काय काय हवं. सगळ्यांची उठाबस नीट व्हायला हवी. शिवाय पाहुण्यांच्या समोर आपली हौस मौज काय करायची असते ती वेगळीच. नवऱ्याची मदत मिळवायची तर त्याच्या वेगळ्याच तऱ्हा ! अश्शी धांदल उडते ना ! मग चिडचिड होते.

बरं हे पाहुणे वेगवेगळ्या वेळी, जरा दमानं आले, तर थोडं बरं असतं. सगळे एकदम आले तर दम निघतो ! एका एका पावण्याची ऊठाबस करणं सोपं असतं. प्रत्येकाकडे लक्ष देता येतं. पण सगळ्यांचा एकत्र कल्ला म्हणजे म फारच होतं…..

……तसंच पोटाचं पण होतं.
आता चटपटीत पावभाजी आत आली आहे, तोपर्यंत थंडगार आईस्क्रीमचा गोळा वरून खाली पडतो. आता कुठे पावभाजीचं प्रकरण संपवतेय, तोपर्यंत दुसरं प्रकरण पुढ्यात. त्याची व्यवस्था लावायच्या आत फणस आंबे जांभळं राडा करतात. पुनः जेवण वेगळंच ! सरबत पन्हे असंही अधे मधे होतं.
या प्रत्येक पाहुण्याच्या तऱ्हा वेगळ्या !
घरातल्या पाहुण्यांची उठाबस करणं एकवेळ सोपं. कोणीतरी माणूस हाताखाली ठेवता येतो, वाटलंच तर हाॅटेलही आहे. पण पोटाकडे असे पर्याय नाहीतच !

एकदाच काय ते होऊन जाऊदे, पण नाही.
एकट्या पोटानं काय काय आणि किती किती करायचं ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
01.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..